अजूनकाही
गेली काही वर्षं युरोप व अमेरिकेबाहेरची लेखक मंडळी जागतिक साहित्याच्या क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. याची सुरुवात काही प्रमाणात १९७०च्या दशकात झाली होती. त्या काळी लॅटिन अमेरिकेतील ग्रॅबिएल मार्क्वेझ वगैरे लेखक जोरात होते. यांच्या जोडीला नायजेरिया वगैरे देशांतील लेखकसुद्धा जागतिक पातळीवर लौकिक कमवत होते. अलीकडे यात थोडा बदल झाला असून पश्चिम आशियातील अफगाणीस्तानसारख्या देशातील खालिद हुसैनी किंवा जपानमधील हारुकी मुराकामी वगैरे नावं चर्चेत असतात. यातील अनेक लेखकांचं लेखन आता मराठीतही उपलब्ध झालं आहे.
‘द काइट रनर’ ही खालिद हुसैनी (जन्म - १९६५) या अफगाण लेखकाची गाजलेली कादंबरी. त्यात अफगाणीस्तानची राजधानी काबुल येथील एका सुखवस्तू माणसाच्या घरातले ताणतणाव चितारले आहेत. एवढंच नव्हे तर १९८०चं दशक व नंतर अफगाणीस्तानात झालेले राजकीय बदल व त्या बदलांचे जनसामान्यांच्या जीवनावर झालेले परिणाम याचंही चित्रण ही कादंबरी करते. अलीकडेच या कादंबरीवर आधारित इंग्रजी नाटक बघण्याची संधी मिळाली. आदित्य बिर्ला उद्योग समूहातर्फे दरवर्षी निवडक नाटकांची निर्मिती करण्यात येते. ‘द काइट रनर’ त्याच मालिकेतील एक नाटक आहे.
हुसैनी जरी अफगाण असले तरी ते १९८०पासून अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. काबुलमधील बालपणाचे अनुभव, नंतर अफगाणीस्तानात झालेल्या राजकीय उलथापालथी, तालिबानच्या हाती आलेली सत्ता, त्यानंतर काही धनाढ्य अफगाण कुटुंब कशी येनकेनप्रकारे अमेरिकेत सटकली, हे सर्व हुसैनींच्या कादंबरीत येतं. थोडक्यात ही कादंबरी बऱ्याच प्रमाणात आत्मचरित्रात्मक आहे. २००३ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीचं २००७ साली नाट्यरूपांतर झालं.
अमेरिकन नाटककार मॅथ्यू स्पँग्लर यांनी या कादंबरीवर आधारित त्याच नावाचं दोन तासांचं नाटक केलं आहे. हा जरा वेगळा प्रकार आहे, ज्यात अनेक ठिकाणी घडणाऱ्या कादंबरीचं नाट्यरूपांतर केलं आहे. स्पँग्लर यांनी आजवर जवळपास चौदा नाटकं लिहिली आहेत. त्यांना ‘द काइट रनर’च्या नाट्यरूपांतरानं अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या कादंबरीतील कथानक इतक्या विविध ठिकाणी घडतं, त्या कादंबरीचं नाट्यरूपांतर करणं तसं अवघडच असतं. या नाटकाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे अमीर हे मुख्य पात्र आणि एक प्रकारे नाटकातील सूत्रधार. दुसरं म्हणजे या नाटकात फ्लॅशबॅकचा सढळ वापर केला आहे. नाटक दोन अंकी आहे, कारण कादंबरी दोन भागात आहे.
नाटकाची सुरुवात होते ती काबुल शहरात, अमीर या तरुण मुलाच्या घरात. तो काळ असतो साधारण १९७५चा. तेव्हा अफगाणीस्तानात जबरदस्त उलथापालथी होत होत्या. अमीर काबुलमधील एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा. त्याची आई अमीरला जन्म देऊन देवाघरी गेलेली असते. अमीरच्या वडिलांनी दुसरा विवाह केलेला नसतो. अमीरचं कुटूंब ‘पख्तुन’ असतं. अमीरच्या घरी हसन व त्याचे वडील गेली अनेक वर्षं नोकर म्हणून काम करत असतात. हे कुटुंब ‘हाजरा’ असतं, म्हणजे सामाजिक उतरंडीत अगदी खाली असलेला समूह. (आपल्याकडच्या जातीव्यवस्थेपेक्षाही प्रसंगी अफगाणीस्तानातीलही सामाजिक व्यवस्था क्रूर ठरते.) अमीर व हसन समवयस्क असल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री असते. दोघांचा आवडता खेळ असतो पतंग उडवणं, काटलेले पतंग लुटून आणणं. काटलेला पतंग लुटण्याबद्दल हसन सर्वत्र प्रसिद्ध असतो.
काबुलमध्ये वार्षिक पतंगोत्सव भरत असतो आणि पतंग उडवण्याची स्पर्धासुद्धा. यात अमीर व हसन सहभागी होतात. या वर्षी ते स्पर्धा जिंकतात आणि यातच पुढच्या शोकांतिकेची बीजं असतात. ही स्पर्धा आपण जिंकावी अशी काबुलमधल्या काही टग्या मुलांची इच्छा असते. पण अमीर-हसनची जोडी त्यांची मनीषा पूर्ण होऊ देत नाही. चिडलेली टगी मुलं हसनला एकटं गाठतात आणि त्याच्यावर बलात्कार करतात. ही घटना अमीर लपून बघतो, पण आपल्या मित्राला वाचवण्याची हिंमत त्याच्यात नसते. ही अपराधीपणाची भावना अमीरला जीवनभर त्रस्त करते. इथं पहिला अंक संपतो.
दुसरा अंक सुरू होतो तेव्हा १९७९ साली रशियानं अफगाणीस्तानात रणगाडे घुसवलेले असतात. परिणामी अमीर व त्याचे वडील पाकिस्तानात पळून आलेले असतात. शेवटी ते बापलेक १९८१ साली अमेरिकेत स्थलांतरित होतात. अमीर मोठा होतो व एका विद्यापीठातून ‘सर्जनशील लेखन’ या विषयात पदवी मिळवतो. त्याला लेखक व्हायचं असतं. त्याच्या कुटुंबासारखंच अफगाणीस्तानातून स्थलांतरित झालेल्या एका मुलीशी, सोरायाशी त्याचा विवाह होतो. अमीर अमेरिकेत रमतो.
या दरम्यान अमीरच्या वडिलांचा मृत्यू होतो. एके दिवशी अमीरला त्याच्या वडिलांच्या अफगाणीस्तानातील मित्राचा, रहिमचा निरोप मिळतो. रहिमनं त्याला पाकिस्तानात बोलावलेलं असते. या भेटीत रहिम अमीरला जे सांगतो ते ऐकून अमीर अनेक पातळ्यांवर उदध्वस्त होतो. पहिलं म्हणजे अमीरच्या कुटुंबानं ज्या प्रकारे अफगाणीस्तानचा त्याग करून अमेरिकेत आश्रय घेतला, त्यात मातृभूमीचा विश्वासघात आहे. हा धक्का अमीर कसाबसा पचवतो तर दुसरा धक्का त्याची वाटच बघत असतो. रहिम अमीरला सांगतो की, हसन त्याचा सावत्र भाऊ आहे. अमीरच्या वडिलांचे व हसनच्या आईचे संबंध असतात. अमीरच्या नंतर लक्षात येतं की, म्हणूनच त्याचे वडील कधीही हसनचा वाढदिवस विसरत नसत. त्या दिवशी हसनला मस्त भेटवस्तू देत असत.
रहिमनं दिलेली माहिती ऐकून अमीरचं भावविश्व उदध्वस्त होतं. नंतर त्याला कळतं की, हसनला व त्याच्या पत्नीला जरी तालिबान्यांनी ते हाजरा असल्यामुळे मारून टाकलं असलं तरी हसनला एक मुलगा आहे, जो काबुलमध्ये कोठेतरी मोठा होत आहे. अमीर ठरवतो की काय वाट्टेल ते झालं तरी त्या मुलाला शोधायचं. या शोधासाठी अमीर काबुलला परत येतो. आताचं काबुल व त्यानं सोडलेलं काबुल यात काहीही साम्य नसल्याचं अमीरला जाणवतं. आताच्या काबुल़मध्ये सर्वत्र तालिबानची दहशत असते. तालिबान्यांनी अनेक ठिकाणी अनाथ, तरुण कोवळ्या मुलांच्या छावण्या उभारलेल्या असतात. ते स्वतःच्या वासनेसाठीही अनाथ मुलं वापरत असतात. हसनचा मुलगा अशाच एका अनाथालयात असतो. अमीर अनेक प्रकारचे प्रयत्न करून त्या मुलाला अनाथालयातून बाहेर काढतो आणि अमेरिकेला घेऊन येतो. अमीरला अजून तरी मुलबाळ झालेलं नसतं. अमीर हसनच्या मुलाला वाढवण्याचं ठरवतो.
या नाटकात सरळ निवेदनातून कथानक पुढे सरकतं. यात आधुनिक लिखाणात अनेकदा आढळतात तसे शैलीचे, निवेदनाचे वेगळे प्रयोग नाहीत. आहे ती माणसांची गोष्ट. त्यांच्या प्रेमाची गोष्ट. व्यक्तीला जीवनभर कुरडत राहणारी अपराधीपणाच्या भावनेची गोष्ट. म्हणूनच हे नाट्यरूपांतर शेवटपर्यंत खिळवून ठेवतं.
या नाटकाची निर्मिती ‘अॅक्वरीयस प्रॉडक्शन्स’ आणि ‘डी फॉर ड्रामा’ या नाट्यसंस्थांनी केली आहे. नाटकाचं दिग्दर्शन आर्कष खुराना या तरुण रंगकर्मीनं केलं आहे. या नाटकाशी मुंबईतील अमराठी रंगभूमीवर कार्यरत असलेले जवळपास सर्व महत्त्वाचे रंगकर्मी जोडलेले आहेत. अपवाद निपुण धर्माधिकारी या पुणेकर रंगकर्मीचा. नाटकाची प्रकाशयोजना क्वासार पदमसी यांनी सांभाळली आहे, तर नाटकातील पार्श्वसंगीत वरूण बंगेरा यांचं आहे. नेपथ्यरचना अयाझ बासराय यांनी केली आहे. बरून बंगेरा यांनी पश्चिम आशियात प्रचलित असलेल्या तंतूवाद्याच्या सढळ वापर केला आहे. त्यामुळे वातावरणनिर्मिती सहज होते. प्रेक्षकांना सतत जाणीव होत राहते की, ते अफगाणीस्तानात घडणारी गोष्ट बघत आहेत. असंच नेपथ्यरचनेबद्दल आहे. अयाझ यांनी रंगमंचाचा पुढचा भाग लोकेशन बदलासाठी वापरला आहे, तर मागच्या भागात खास काबुल वगैरेसारख्या शहरांतच आढळतील असे उंच कठडे उभे केले आहेत, ज्यावर बसून लहानगे अमीर व हसन सतत गप्पा करत असतात. या नाट्यघटकांबरोबरच क्वासार पदमसी यांनी रचलेली प्रकाशयोजना नाटकाचा परिणाम द्विगुणीत करते.
निपुण धर्माधिकारी यांनी साकार केलेला अमीरही या नाटकातील मध्यवर्ती भूमिका. अमीर हे महत्त्वाचं पात्र आहे, तसंच नाटकाचा एक प्रकारचा सूत्रधारही आहे. हे पात्र तसं फार गुंतागुंतीचं. या पात्रात एक प्रकारचा भेकडपणा आहे, स्वतःत कुढत राहण्याची वृत्ती आहे. आईविना वाढलेल्या मुलांच्या ज्या अडचणी असतात, त्या सर्व अमीरमध्ये आहेत. ही सर्व गुंतागुंत निपुण धर्माधिकारी यांनी फार समर्थपणे व्यक्त केली आहे. अभिषेश साहा (हसन), आकाश खुराना (अमीरचे वडील), कुमुद मिश्रा (हसनचे वडील) वगैरे पात्रांनी आपापल्या भूमिका फार समजुतीनं केल्या आहेत. कुमुद मिश्रासारखा ज्येष्ठ नटानं एका तशा छोट्याशा भूमिकेसाठी निष्कारण खर्च केला, असं मात्र राहून राहून वाटतं. ‘द काइट रनर’ बघताना मानवी जीवनात अपराधीपणा, विश्वासघात, नि:स्वार्थी प्रेम या भावनांचं केवढं महत्त्वाचं स्थान आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती येते!
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment