‘सेक्रेड गेम्स’ : पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसरा सीझन निराशा का करतो?
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनचे एक पोस्टर
  • Sat , 05 October 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र सेक्रेड गेम्स Sacred Games अनुराग कश्यप Anurag Kashyap सैफ अली खान Saif Ali Khan नवाजुद्दीन सिद्दीकी Nawazuddin Siddiqui

एक वर्षापूर्वी नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स’ ही आपली पहिली भारतीय वेबसिरीज प्रसिद्ध केली. या वेबसिरीजने भारतात प्रचंड धुमाकूळ घातला. ‘सेक्रेड गेम्स’ ही एकूणच समकालीन भारतीय व्यवस्थेवर प्रभावीपणे भाष्य करणारी वेबसिरीज आहे.

मुंबईमध्ये येत्या २५ दिवसांत काय होणार? मुंबईवर कोणते संकट येणार? यासंबंधीची ही कथा आहे. सैफ अली खान (सरताज सिंग) हा नायक आणि नवाजुद्दीन सिद्दकी (गणेश गायतोंडे) हा प्रति नायक स्वरूपात दाखवला आहे. पहिला सीझन बाराव्या दिवसावर संपला होता आणि आता उरलेले कथानक दुसऱ्या सीझनच्या रूपाने नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या दुसऱ्या सीझनला दर्शकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. जसा पहिल्या सीझनच्या बाबतीत प्रतिसाद आणि उत्साह जाणवला, तसा तो सीझनच्या बाबतीत दिसला नाही.

हा दुसरा सीझन नेमक्या कोणत्या कारणांमुळे निराश करणारा ठरला, हे पाहायला हवे.

१. वेग

पहिल्या सीझनमध्ये पटकथाही भरभर वेगाने आणि दर्शकांना खिळवून ठेवत रोमांचकारकरित्या पुढे सरकते, पण दुसऱ्या सीझनमध्ये नेमके त्याच्या उलट अनुभवास येते. कारण अतिशय मंद वेगाने जाणारी पटकथा आणि कमी रोमांचकारक गोष्टी. पहिल्या सीझनमध्ये जो वेग प्रेक्षकांना पाहायला मिळतो, तो या सीझनमध्ये पहायला मिळाला नसल्याने थोडीशी निराशा पदरी पडते. त्यामुळे तुलनात्मकरीत्या पाहिल्यास दुसरा सीझन निराशा करतो. दुसरा सीझनही अनेक अर्थाने वेगवेगळ्या राजकीय, धार्मिक व सामाजिक विषयांवर गंभीररित्या भाष्य करणारा आहे, तरीही निराशा पदरी येते.

२. दिग्दर्शन

पहिल्या सीझनमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीची कथा अनुराग कश्यप यांनी, तर सैफ अली खानची कथा विक्रमादित्य मोटवानी यांनी दिग्दर्शित केली होती. दुसऱ्या सीझनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांची कथा अनुराग कश्यप आणि नीरज घेवाणे यांनी, तर सैफ अली खानची विक्रमादित्य मोटवाने यांनी केली. पहिल्या सीझनमध्ये पूर्णतः अनुराग कश्यप यांनी एकट्याने दिग्दर्शन केले होते, पण दुसऱ्या सीझनला त्यांनी नीरज यांच्यासोबत ती दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा काहीसा परिणाम नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या कथेवर पडलेला जाणवतो.

सैफ अली खानची कथा पहिल्या व दुसऱ्या सीझनमध्ये एकसारखी गेल्याचे जाणवते. नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या कथेमध्ये दिग्दर्शनात झालेला फरक निदर्शनास येतो. अनुराग कश्यप हे लो बजेट फिल्म बनवण्यामध्ये माहीर आहेत. बजेट वाढले की, त्यांची कलाकृती ढासळते असे ते ‘बॉम्बे वेलवेट’च्या दरम्यान म्हणाले होते. नेमके तसेच दुसऱ्या सीझनच्या बाबतीत घडले असावे. कारण दुसऱ्या सीझनचे बजेट वाढलेले दिसते. दिग्दर्शकांमध्ये झालेल्या या विभागणीमुळे कथेवरही झालेला परिणाम दर्शकांना निराश करतो.

३. पार्श्वसंगीत

‘सेक्रेड गेम्स’चा पहिल्या सीझन पार्श्वसंगीताने पुरेपूर भरलेला आहे, पण दुसऱ्या भागामध्ये पार्श्वसंगीताचा अभाव जाणवतो. किंबहुना ते नसल्याचाच भास होतो.

४. कथेमधील बदल

पहिल्या सीझनमध्ये मुंबईला येत्या २५ दिवसांमध्ये कोणता तरी मोठा धोका आहे, असे गणेश गायतोंडे बोलतो आणि कथा सुरू होते. त्या कथेचाच उत्तरार्ध दुसऱ्या सीझनमध्ये उभे आहे. पहिला सीझन पोलिसांचा तपास आणि गुन्हेगारी यांत फिरताना दिसते. त्यामुळे ती रोमांचकारकरित्या पुढे जाते. पण दुसऱ्या सीझनमध्ये ती एक तीव्र धार्मिक वळण घेते आणि राजकारण हा मुद्दा काहीसा बाजूला पडत जातो. कथेमध्ये झालेला हा मोठा बदल गोंधळून टाकतो.

५. संवाद

पहिल्या सीझनमधील संवाद उठावदार आहेत, तसे संवाद दुसऱ्या सीझममध्ये नाहीत. वेबसिरीजवर नसलेल्या सेन्सॉरशिपचा जो फायदा पहिल्या सीझनमध्ये उचलला गेला, तो दुसऱ्या सीझनमध्ये त्या पातळीवर उचलला गेला नसल्याचे निदर्शनास येते. परिणामी संवाद खूप अप्रभावी असल्याचे जाणवते.

६. तिसरा भाग

मुंबईवर न्यूक्लिअर अटॅक होणार आणि तो थांबवण्यासाठीचा प्रयत्न यासंबंधी हा दुसरा सीझन पुढे जात असताना सरताज सिंगचे वडील दिलबाग सिंग यांची कथा हळूहळू समोर येते, जी थेट भारत-पाकिस्तान फाळणीच्या संदर्भाशी नेऊन जोडते. आणि तिथेच ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझनदेखील येणार असे लक्षात येते. ही कल्पना थोडीशी विचलित करणारी ठरते.

तसेच पहिल्या सीझनमधील गायतोंडे आणि सरताज या व्यतिरिक्त दर्शकांना भुरळ घालणारी पात्रे म्हणजे म्हणजे ‘कुकु’ (कुबरा सेट) आणि ‘हवालदार काटेकर’ (जितेंद्र जोशी). जी दुसऱ्या सीझनमध्ये नसल्याची खंत अस्वस्थ करते. गणेश गायतोंडेला कुकु, तर सरताज सिंगला हवालदार काटेकर यांचे नसणे, सतत हेलावून सोडते.

‘सेक्रेड गेम्स’चे दोन्ही सीझन धर्म, त्यावर आधारलेले राजकारण आणि आजचा समाज या बाबतीले गंभीर स्वरूपाचे वास्तव समोर आणण्यात यशस्वी होतात. पहिल्या सीझनमुळे वाढलेल्या अपेक्षा आणि उत्कंठा, या निकषांवर दुसरा सीझन पुरेपूर उतरला नाही. अन्यथा तुलनात्मकदृष्ट्या न पाहिल्यास दुसरा सीझनही फारसा निराशाजनक ठरत नाही. पण कथा एकच असल्यामुळे तुलना केल्याखेरीज राहवत नाही.

अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि त्यांच्या टीमच्या अशा धाडसी कलाकृतीमुळे तिसऱ्या सीझ कडूनदेखील प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असणार, यात कोणतीही शंका नाही. तो किती खरा उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख