शरद पवारांना अडचणीत आणणारा कॉम्रेड!
पडघम - राज्यकारण
संजय जेवरीकर
  • शरद पवार आणि कॉम्रेड माणिक जाधव
  • Thu , 03 October 2019
  • पडघम राज्यकारण शरद पवार Sharad Pawar माणिक जाधव Manik Jadhav

देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांना अमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारा माणूस एक कॉम्रेड आहे आणि ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जेवरी या गावचे रहिवासी आहेत. कॉम्रेड माणिक जाधव हे त्यांचे नाव. या चौकशीचा एक मोठा राजकीय इव्हेंट उभा करून माध्यमे आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यात शरद पवार यशस्वी झालेले असले तरी या कॉम्रेडविषयी फारशी माहिती असंख्यांना नाही. 

.............................................................................................................................................

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माझे गाव जेवरी (पिंपळवाडी). या गावचे रहिवासी कॉम्रेड माणिक जाधव यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रभर शेतकरी आणि कामगाराच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्रातील बुडत चाललेली साखर कारखानदारी हा मागच्या पाच वर्षांपासून त्यांच्या चिंतनाचा विषय होता. जेवरी गावाच्या मातीत बंडाची बीजे पेरली असावीत आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात या गावाच्या मातीतील तरुणाने अनेक पर्याय दिले आहेत. माणिक जाधव याच जेवरीच्या मातीतील आहेत.

साखर कारखाने, सूतगिरण्या आणि सहकारी संस्थांच्या बाबतीत एखाद्या वकिलापेक्षाही जास्त अभ्यास असलेला हा माणूस कधीच डगमगला नाही, लाचार होऊन कधी कुणासमोर त्याने शरणागती पत्करली नाही. कामगारांच्या प्रश्नावर कायम बोलणारा, कधीही कुणाला याबद्दल भीक न घालणारा हा लढवय्या कामगार नेता आजही कामगारांच्या एकेक पैशांतून उभारलेल्या कामगार भवनात राहतो. आमदार झाला म्हणून कधी माजला नाही, पैसे नाहीत म्हणून कधी थकला नाही.

एखादा लढा उभारला की, त्याला शेवटपर्यंत न्याय देणारा हा मनुष्य मागच्या पाच-दहा वर्षांपासून फारसा कुणाला भेटतसुद्धा नव्हता. अज्ञातवासात राहून त्यांनी न्यायालयात हा लढा लढला, महाराष्ट्र पिंजून काढून, सगळे बुडीत कारखाने धुंडाळून त्यांनी हा लढा यशस्वी केला. काही वर्षांपूर्वी मी आणि ते दोघंही मिळून किल्लारी साखर कारखान्याचा लढा उभारत असताना ते मला नेहमी लढा कसा लढावा याविषयी बोलले. सगळे मोठे मासे गळाला लागणार असल्यामुळे यावर न्यायालयात व्यापक तपशीलाने विचारविनिमय झाल्याचे ते म्हणायचे. या याचिकेला पुरावे म्हणून जी कागदपत्रे लागणार होती, ती सगळी माणिक जाधव यांनी पुरवली आहेत. ते म्हणायचे, ‘मी खूप मेहनत करतोय, मात्र प्रशासन यात लक्ष घालत नाही. इतके दिवस न्यायालयात जात आहेत, मला यश मिळावे.’

आज पुन्हा त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले संजय हे सगळे चुकीचे सुरू आहे. कार्यकर्ते रस्त्यावर काय येत आहेत, निषेध काय करत आहेत. खरे काय घडले आहे, हे यांना कुणीही सांगायला तयार नाही. यात सध्याच्या सरकारचा काय दोष आहे. दोन्ही न्यायालयांनी शरद पवार यांना दोषी धरले आहे. त्यामुळे कितीही आंदोलने झाली तरी यातून त्यांची सुटका नाही. यात अनेक जण money laundring मध्ये अडकणार आहेत. करोडो रुपयांचे कर्ज असताना हे कारखाने कवडीमोल विकले गेले आहेत, यात आलेला पैसा कुठेही जमा नाही. आम्ही कोर्टाला सगळे पुरावे दिले आहेत. इतके सगळे असताना राजकारण करून प्रकरणाची दिशा बदलणार नाही. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने त्यांच्या बगलबच्यांच्या घशात घातले आहे. ज्या कारखान्याच्या जीवावर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेकवार सत्ता हस्तगत केली, त्याच कारखान्याचे बळी देऊन शेतकऱ्यांचे जीव घेतले गेले. अनेक कामगार देशोधडीला लागले. कारखाने सहकारात तोट्यात चालवायचे आणि तेच कारखाने खाजगी झाले की, विक्रमी उत्पादन करायचे याचे गणित काही आजपर्यंत समजले नाही. हजारो एकर जमीन घशात घालायची, कर्जाचे डोंगर चढवायचे, अख्खी एक बँक संपून गेली तरी कोणत्याही नेत्याला त्याचे सोयरसुतक असू नये, याचे उत्तर कोण देणार? आज शरद पवार यांच्यावर कारवाई होते तर सगळ्यांना त्यांचा पुळका आला. मात्र एकालाही असे वाटले नाही की, इतकी करोडोंची रक्कम कुठे गायब झाली?


माणिक जाधव खऱ्या अर्थाने हा लढा लढत आहेत. अण्णा हजारे. अॅड. सतीश तळेकर ही सगळी मंडळी अत्यंत हिमतीने हा लढा यशस्वी करण्यासाठी सहाय्य करत आहेत, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करायला हवे. इतक्या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात लढायचे ही काही छोटी गोष्ट नाही. सगळेच दिग्गज, टोळीने कारखाने आणि बँक संपवणारी ही मंडळी भ्रमात राहिली. आमचीच सत्ता असल्याने कोण काय करेल असे त्यांना वाटले, मात्र न्यायदेवता आंधळी आहे असे म्हटले जात असले तरीही तिने डोळे उघडे ठेवून न्याय दिला.

माणिक जाधव म्हणतात, आम्ही गेल्या २० वर्षांपासून कायदेशीर लढा लढत आहोत. राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळेच आम्ही कायदेशीर लढाई लढत होतो. आता त्या लढाईला यश आले आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रांची तपासणी करून २२ ऑगस्ट २०१९ रोजी ८४ पानांचे निकालपत्र दिले आहे. या निकालपत्रात पान ६८ व ७९ वर शरद पवार यांच्या नावाचा चार ठिकाणी उल्लेख आहे. त्यामुळे कलम १०९ , १२० ब नुसार शरद पवार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने योग्य निर्णय दिलेला आहे. न्यायालय योग्य कारवाई करत आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणीही ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केलं. दिल्लीच्या तख्तापुढे कधीही न झुकलेल्या शरद पवार यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या जेवरीच्या या कॉम्रेडला माझा लाल सलाम...

.............................................................................................................................................

लेखक संजय जेवरीकर ज्येष्ठ पत्रकार व सध्या जेवरी या गावचे सरपंच आहेत.

.............................................................................................................................................

रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 08 October 2019

वीसवीस वर्षं सत्तेविरुद्ध लढा देणं सोपं नाही. माणिक जाधव यांच्या चिकाटीस विनम्र अभिवादन. त्यांच्या लढ्यास यश लाभो. नव्हे, ते लाभणारच आहे. माणिक जाधवांचा त्याग असीम आहे. त्यांच्याप्रती दोन्ही हात जोडून ______/\______ कृतज्ञता !
-गामा पैलवान


jabbar mulla

Sun , 06 October 2019

सत्य कधीच मरत नाही.. माणिक जाधव यांस विनम्र अभिवादन..!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......