आज महात्मा गांधी यांची १५०वी जयंती. त्यानिमित्तान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख.
पुण्यात २८ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान ८४वी ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ झाली. त्यामध्ये जागतिक कीर्तीचे चित्रकार गुलाम महंमद शेख यांनी ‘कलागजर २०१८’ या पुण्यात होणाऱ्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना हे विचार मांडले. त्यांच्या मूळ इंग्रजी भाषणाचा हा मराठी अनुवाद…
............................................................................................................................................
काठियावाडच्या एका छोट्या गावात सुरेंद्रनगरला मी शाळेत असताना गांधीजींचे आत्मचरित्र वाचले होते. मला मान्यच करायला हवे की, त्यांनी ज्या मोकळेपणामुळे लिहिले, त्याने मी थक्क झालो होतो. तुम्ही ते वाचले आहे की नाही, मला माहिती नाही. त्यांच्या पुस्तकाला त्यांनी नाव दिले आहे, ‘आत्मकथा किंवा माझे सत्याचे प्रयोग’. त्यामुळे त्यांना शक्य तितके ते खरे लिहीत गेले. त्यात सत्याची व्याख्या केलेली नाही, पण सत्याचा शोध मात्र घेतला आहे.
मी ज्या प्रसंगाबद्दल बोलतोय, तो वाचला तेव्हा मी तरुण किंवा पौगंडावस्थेत होतो. त्या प्रसंगाच्या वेळी गांधींचे जे वय होते, त्याच वयात मीही होतो. मी चुकत नसेन तर ते अठरा वर्षांचे होते. त्यांच्या वडलांना असाध्य आजाराने पछाडलेले होते. त्या काळात करायचे त्याप्रमाणे मुलेच आई-वडिलांची उतारवयात काळजी घ्यायचे, तसे तेही शुश्रूषा करत. पण त्यांचेही तरुण वय होते. ते लिहितात, त्यांचे वडील जमिनीवरील अंथरुणावर आडवे झालेले होते. त्यांना सोडून गांधी त्यांच्या पत्नीबरोबर रात्र घालवायला गेले. त्यांनी लिहिताना हे अत्यंत अपराधी भावनेने किंवा पाप केल्याच्या जाणिवेने लिहिले आहे. त्याच रात्री काही वेळाने त्यांचे वडील वारले. म्हणजे जेव्हा त्यांचे वडील वारले, त्या क्षणी अंतिम क्षणी त्यांचा हात हातात घेणे त्यांना शक्य झाले नाही. एक तरुण मुलगा म्हणून मी हे वाचून थक्क झालो. एवढ्या मोकळेपणाने कोण हे सांगू शकेल? आपला अपराध मान्य करणे, ती घटना हे एक पाप आहे, असे मानून कोण सांगेल?
मग माझेही जग बदलले. मी बडोद्याला आलो. मी प्रवास केला, प्रदर्शने केली वगैरे वगैरे. पण मी गांधींकडे बराच काळ वळलो नव्हतो. पण अशी एक वेळ आली, विशेषत: साठी-सत्तरीच्या दशकात, मग नंतर ऐंशी-नव्वदच्या दशकातसुद्धा की, आम्ही हिंसेच्या समोरासमोर आलो. विशेषत: मी ज्या भागात राहतो, तिथे जे हिंसेने थैमान घातले होते, तेव्हा माझ्या मनात विचार आला की, मार्गदर्शनासाठी वळावे तर कोणाकडे?
त्या दिवशी मला वाटले की, माझ्या मनात आलेले विचार लिहून ठेवावेत. मी आता जे बोलत आहे, ते औपचारिक व्याख्यान नाही, पण डॉ. गणेश देवींनी मला बोलायला सांगितल्यावर आलेल्या अनेक कल्पना मांडल्या आहेत.
याशिवाय अजून एक प्रेरणा म्हणजे, जेव्हा तुम्ही-आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, ज्याबद्दल आपण वाचले आहे, पण ते ठिकाण आपल्या डोळ्याने पाहिले, तोही एक निर्णायक प्रसंग ठरलाय. तर मी वाचायला लागलो, तेव्हा पहिल्यांदा काय वाचले तर परत एकदा आत्मकथा. हे लक्षात घ्या की, ही आत्मकथा माझ्याच मातृभाषेत गुजरातीत लिहिली होती. माझ्याकडे जी आवृत्ती आहे, ती १९२७ मधली. मी वाचू लागलो तेव्हा अनेक प्रसंग वाचताना मला माझ्या बालपणी त्या भागात त्या काळात जणू जगत गेलो.
पण नेमके काय झाले ते सांगतो. गांधी वाचणे एकाच वेळी दमवणारेही असते आणि स्फूर्तिदायीही असते. त्यांचे आरोग्य, साध्या जगण्याचा टोकाचा अट्टाहास, आश्रमात मसाले न घातलेले अन्न खाणे… बाहेरच्या जगात औषधांचा शोध लागलेला. मणिलाल त्यातून बरे झाले हे वाचून अखेर आपल्यालाच सुटका झाल्यासारखे वाटते. घरी शौचासाठी वेगळी व्यवस्था नव्हती, तेव्हा ते कस्तुरबांना, त्यांच्या पत्नींना, आलेल्या पाहुण्यांच्या मूत्रविसर्जनाचे भांडे घेऊन जायला लावतात, तेही सेवेचा भाग असल्याने चेहऱ्यावर स्मित ठेवून, तेव्हा तर आपला थरकाप होतो. आपल्याला तर राग येतो, जेव्हा त्यांच्या मुलांना ते औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवतात, त्याचा त्यांचा एक मुलगा हरिलालवर वाईट परिणाम होतो. हरिलालच्या आयुष्यात प्रमादांची मालिकाच लागते. त्याची कोणतीही खंत वा खेद न वाटता, तो त्याचे समर्थनच करतो. अनेक प्रसंग वाचताना आपल्याला धक्का बसतो, कधी गोंधळ उडतो.
पण हाच तो माणूस जो त्याच्यावर हिंसक हल्ला करायला आलेल्या जमावाला धीराने तोंड देतो किंवा सांप्रदायिक दंगे आणि हिंसक वातावरणात स्वातंत्र्य मिळताना कलकत्त्यात हाच माणूस निर्धाराने उभा राहतो. १९४७ साली हेच घडले. त्यांच्यावर फेकलेला लाकडी दांडा, नेम चुकल्यामुळे ते बचावले. त्यांचे एक चरित्रकार प्यारेलाल यांनी ‘महात्मा गांधी - अखेरचे पर्व’ या नावाने त्यांचे चरित्र चार खंडांत प्रकाशित केले आहे. त्यात प्यारेलालनी सांगितलेले प्रसंग १९४७मध्ये घडलेले आहेत आणि गांधींचा खून १९४८मध्ये झाला. प्यारेलाल सांगतात, ज्या माणसाने तो लाकडी दांडू फेकला होता, त्याने शांतता प्रस्थापित झाल्यावर माफी मागितली होती.
दक्षिण आफ्रिकेत आणि नंतर भारतात आल्यावर त्यांनी कायद्याच्या व्यवसायात असताना प्रामाणिकपणा आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. ज्यांनी त्यांच्यावर हल्ले केले त्यांना क्षमा केली. शिवाय त्यांच्यावर खटला भरायलाही नकार दिला. जर त्यांच्या नातीच्या, मनु गांधींच्या रोजनिशी वाचल्या तर कळते की, त्यांचा दिनक्रमावर आणि तो वेळेत होण्यावर कटाक्ष होता. त्यांची पदयात्रा अनवाणी पायाने हजारो किलोमीटर झाली. आधी ते नौखालीत ग्रामीण भागात गेले, तिथे हिंदूंना अभूतपूर्व हिंसेला सामोरे जायला लागले. नंतर ते बिहारमध्ये गेले, तिथे मुस्लिमांना क्रूर संघर्ष सोसावा लागत होता. अत्यंत वाईट सांप्रदायिक दंगलीत झालेले अत्याचार, उद्ध्वस्त स्थिती आणि त्यांचे उरलेले अवशेष यांना साक्षी होत ते गावांमागून गावे चालत गेले.
त्यांनी या पदयात्रेच्या सुरुवातीलाच ठरवले होते की, गरीब गावकऱ्यांना सहानुभूती म्हणून अनवाणी चालायचे. त्यांनी शिवलेले कपडे आणि चादर वापरणे तर मागेच १९२२ मध्येच विदेशी मालावरच्या बहिष्कारासाठी सोडून दिलेले होते. पदयात्रेत ते तात्पुरत्या उभारलेल्या झोपड्यात राहत होते. ते दैनंदिन प्रार्थनेत हिंदू आणि इस्लामी प्रार्थना करत आणि हिंसेचा अवलंब करणाऱ्यांनी द्वेष सोडून द्यावा आणि भिऊन निघून गेलेल्या शेजाऱ्यांना परत आणावे असे आवाहन केले. प्यारेलालनी असे अनेक प्रसंग सांगितले आहेत की, लोकांनी केलेल्या हिंसाचाराबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आणि त्यांच्या जुन्या शेजाऱ्यांना परत बोलावले. फाळणीच्या हिंसाचारामुळे केलेल्या पदयात्रेनंतर ते दिल्लीला परतले, ते भंगी कॉलनीत राहिले. तिथे त्यांनी त्यांच्या दैनंदिन प्रार्थना चालू ठेवल्या.
तिथेही त्यांना इस्लामिक व इतर प्रार्थनांचा समावेश केल्यामुळे नाराज झालेल्या लोकांना सामोरे जावे लागले. हे ग्रामीण बंगाल किंवा बिहारमध्ये नाही झाले. ते झाले राजधानी दिल्लीत. त्यांनी प्रार्थना थांबवली. उपस्थित सर्व लोकांनी विविध धार्मिक प्रार्थनेला संमती देईपर्यंत ती थांबवली. त्यानंतर ते निर्वासित छावण्यांमध्ये जाऊ लागले. ते त्यांच्या देशबांधवांना भानावर येण्यास सांगू लागले. आणि जेव्हा या कशाचाही उपयोग होत नाही असे दिसले, तेव्हा त्यांनी त्यांच्या अंतिम शस्त्राचा आधार घेतला- उपोषणाचा. आत्म्याची शुद्धी आणि शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी.
प्यारेलाल आणि मनु यांच्या पुस्तकांचा मी उल्लेख केला आहे, ते प्रसंग वाचल्यावर सीमेच्या दोन्ही बाजूच्या जनतेला सोसावे लागलेल्या अनुभवाने आपण व्यथित होतोच. पण या माणसाच्या अविश्वसनीय वाटाव्या अशी कृतीने अचंबित होतो. हा एकटा माणूस समुद्राच्या लाटेसारख्या रौद्र हिंसक लाटेने देशाला वेढलेले असताना त्याला तोंड देतो. असा माणूस खरेच अस्तित्वात होता का, असे वाटू लागते.
त्यांच्या खुनाचे अनेक प्रयत्न झाले, पण ते अविचल राहिले. प्रसंगी त्यावर गमतीने विनोदही केले. त्यांनी स्वत:च लिहिलेले दक्षिण आफ्रिकेतील दिवसांबद्दल वाचणे हा आपल्याला सुधारून समृद्ध करणारा अनुभव असतो. या पुस्तकाचे उपशीर्षक आहे, ‘माझे सत्याचे प्रयोग’. सत्यावरची अढळ निष्ठा हे त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट होती. त्याचे अनेक पैलू आहेत. त्याचे त्यांच्या अविचल धैर्य, नैतिक-वैचारिक बांधिलकीचे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात दाखले दिसतात.
मला याचे मुळीच आश्चर्य वाटत नाही की, त्यांच्याजवळ जो कोणी जात असेल त्याच्या दृष्टीने तो आयुष्य बदलून टाकणारा अनुभव असेल. हा असा हाडामांसाचा माणूस होता. अगदी आपल्यातलाच होता. तो त्याला जे आदर्श वाटत होते, त्याला सर्व अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत चिकटून राहिला. तो सांगतो की, तो संत किंवा महात्मा नाही. त्यांनी सगळ्याच मानवी विकार आणि प्रमादांवर मात केली. या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सत्य आणि अहिंसेच्या आड येणाऱ्या सर्व ताकदींशी अथक संघर्ष केला. आज गांधी वाचला तर आपण दुःखी होतो. शहाणपणाचे, सभ्यपणाचे वर्तन आपल्या सार्वजनिक जगण्यातून नाहीसे होत आहेत. स्वातंत्र्य आक्रसत आहे. गांधींनी स्वत: त्यांच्या विरोधकांचाही मान राखला होता. ते त्या विरोधकांचे किंवा वेगळ्या विचारांचे स्वागत करत स्वत:च्या विचारांना किंवा कार्यक्रमांना सहमत नसणारांचेही ऐकून घेत. त्यांचा वेगळा विचार असण्याचा हा नम्रपणे मान्य करत.
मनुने डायरीत लिहिले आहे की, ते प्रत्येक पत्राला उत्तर देत. अगदी द्वेषपूर्ण पत्रांचाही ते रोजच्या प्रार्थना सभेत उल्लेख करत. माझे मित्र, इतिहासकार सुधीर चंद्रा हे गांधींचे वर्णन ‘अशक्याचे शक्यात रूपांतर करणारा’ असे करतात. गांधी आज जास्त गरजेचे झाले आहेत, कारण जे जग सोडून ते गेले, ते जग आज फारच जास्त हिंसक झाले आहे. हिंसक घटना घडल्या नाहीत, असा दिवस जात नाही. हे सांगण्याची गरज नाही, आपल्याला याची चांगलीच जाणीव आहे. गांधी आज असते तर त्यांनी काय केले असते? शंकेखोर म्हणतील की, या हिंसेला जर त्यांनी अहिंसेने उत्तर दिले असते, तर तशा पहिल्या प्रयत्नातच त्यांचा बळी गेला असता.
आता गांधी नाहीत म्हटल्यावर प्रश्न गांधीनामक संकल्पनेकडे येतो. काही जण म्हणतील की, ती संकल्पना आपण मारून टाकलेलीच आहे. मग मी विचार केला की, मला जर गांधी चित्ररूपात पकडायचे असतील, तर मी त्यासाठी काय घेऊ, कसे घेऊ? असे काही प्रश्न माझ्या मनात गुंजत राहिले पार १९७०-८०पासून. त्या काळात माझ्या शहरात अनेकानेक उलथापालथी झाल्या, भयानक वांशिक हिंसाचार झाला, पण मला योग्य अशी प्रतिमा सापडत नव्हती. चित्रकाराला कामाला सुरुवात करण्यासाठी मनात एक प्रतिमा दृग्गोचर व्हावी लागते. मग काही वेगळेच घडले.
इतर अनेक गोष्टीप्रमाणे मला संगीताचीही आवड आहे. बऱ्याचदा चित्र काढताना मी संगीत ऐकतो. मी ऐकत असलेल्या संगीतकारांपैकी एक मला खूपच भावतात, ते म्हणजे कुमार गंधर्व. ते नुसतेच गायक नव्हते, तर त्यांना कवितेतही खूप रस होता आणि ती कविताही सोळाव्या शतकातली, म्हणजे मध्य युगातली म्हणा ना. आणि कवी होता कबीर. मग मी कबीराबद्दल विचार करायला सुरुवात केली, आणि कुमारांबद्दलही. मी म्हटले, जर कुमार गंधर्व कबीर गाऊ शकतात, तर मी कबीराला चित्ररूपात का पकडू शकत नाही? असा हा सरळसाधा प्रश्न होता. मग मी कबीराच्या प्रतिमांकडे पाहायला सुरुवात केली. मला लक्षात आले की, भारतीय परंपरेत कबीराच्या प्रतिमा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कमी आहेत. मीराबाई नावाच्या महान कवयित्रीची तर आपल्याकडे प्रतिमाच उपलब्ध नाही. अशा अनेक कवींच्या आपल्याकडे प्रतिमा नाहीत.
तर काय करावे, कुठून सुरुवात करावी या विचारांत मी होतो. आपल्या काळातले एक महान चित्रकार विनोद बिहारी मुखर्जींनी एक भलेमोठे म्युरल काढले आहे, आठ फूट लांबी नि आठ फूट उंचीचे. इथे एक गोष्ट सांगायलाच हवी, मुखर्जींची दृष्टी खूपच अधू होती. पहिल्यांदा तर त्यांना कला महाविद्यालयात प्रवेशच मिळाला नाही. रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतीनिकेतनमधली ही गोष्ट. अखेर प्रवेश मिळाला. ते ग्रंथपाल झाले. त्यांनी तिथे अभ्यास केला. १९४७मध्ये त्यांच्या बरोबर शांतीनिकेतनमध्ये हजारीप्रसाद द्विवेदी हे हिंदीचे विख्यात विद्वान होते. कबीर या विषयातले तज्ज्ञ. द्विवेदींनी मुखर्जींना हिंदीभवनाच्या भिंतींवर चित्र काढायला आमंत्रण दिले. मुखर्जींना जेमतेम दोन-तीन फुटांवरचेच दिसत असे. त्यांनी ती भिंत हातांनीच रापून अंदाज घेतला आणि चित्र काढायला सुरुवात केली. चित्राचा विषय होता मध्ययुगातील महान भारतीय संत. त्यांनी रामानुज, सूरदास यांची चित्रे काढली. पण कबीराचे चित्र काढण्यासाठी ते प्रतिमेच्या शोधात होते. त्यांनी विचार केला की, पेशाने कबीर विणकर होता. मुखर्जींनी विणकरांच्या झोपड्यांना नि वस्तीला भेट दिली आणि त्यांना प्रतिमा सापडली. त्यांनी कबीराला साधासुधा विणकर म्हणून चितारला.
हे सर्व माझ्या मनात होते. शोधताना मला ज्या कबीराच्या एक-दोन प्रतिमा सापडल्या, त्या मी वापरायला सुरुवात केली आणि कबीरावर मालिका केली. हिंदीमध्ये एक प्रकारची कविता आहे, त्याला ‘उलटभासी’ म्हणतात. म्हणजे जे म्हणायचे आहे त्याच्या बरोबर उलट. सैतानाहाती भागवत म्हणावे तसे. म्हणजे त्या भाषेतल्या सगळ्या प्रतिमा उलट्या असतात. मी तिथून सुरुवात केली. मग मी विचार केला की, जर मी कबीराची प्रतिमा वापरतो आहे, तर कबीराची कविताही वापरावी. एका कवितेत तो म्हणतो, ‘ये घट भीतर सूर्यचंद्र है, ये घट दौलत तारा’. घट म्हणजे भांडे, देहरूपी भांडे. या भांड्यात अनेक सूर्यचंद्र आहेत. या देहातून, देहाच्या प्रतिमेतून, कबीर देहाबाहेरच्या गोष्टींपर्यंत पोहोचतो.
मी असा विचार केला की, अशा कविता किंवा प्रसंग, ज्यातून कबीर अशा तिरपागड्या गोष्टी सांगतो त्या एकत्र कराव्यात. उदाहरणार्थ, मुलगा आईच्या आधी जन्माला आला. शिक्षकाने विद्यार्थ्याचे पाय धरले. वगैरे वगैरे. असे अनेक प्रसंग आहेत. मग मी स्वतःची अशी एक ‘उलटी भाषा’ तयार केली. अठराव्या शतकातल्या एका चित्रातली कबीराची प्रतिमा मी माझ्या पद्धतीने वापरली आणि त्याच्या चेहऱ्यावर चिकटवून टाकली. त्याला म्हणतात, ‘एक अचंभा देखा रे भाई, थाडा सिंग चढावे गाय’. तो म्हणतो, ‘अरे बघा रे, मी हा काय चमत्कार बघतोय! सिंह गायी राखतो आहे’. तर हे अशातून आलेले काहीतरी आहे. याला ‘हिरणा’ म्हणतात. कुमार गंधर्वांनी हे एक विशिष्ट पद गायले आहे. पण मी व्हिएतनाममधली हिंसा, हिंदी चित्रपटसृष्टीतली हिंसा आणि इतर अनेक हिंसक प्रसंग कबीराच्या चेहऱ्यावर रोपले.
डाव्या बाजूला विनोद बिहारी मुखर्जींनी चितारलेली प्रतिमा आहे, त्यांनी एका विणकराची प्रतिमा योजली होती. वरती एक अवतरण छापलेले आहे. उजव्या बाजूलाही एक कबीराची प्रतिमा आणि एक वर्तुळाकार आहे आणि एक आरसा, भिंतीवर वा तक्त्यावर चिकटवलेला. कबीरपंथी म्हणतात की, सगळ्यात पहिले आपल्या आत डोकावून पाहा. आरसा या साधनातून तुम्ही स्वतःच्या आत जाऊ शकता. काही कलाकारांनी एकत्र येऊन ‘सहमत’ नावाची संघटना स्थापली. त्यातल्या एका कलाकाराचा निर्घृण खून झाला. त्यांनी गांधींच्या मार्गाने जायचे ठरवले. जे कुणी गांधींना पत्र पाठवत, त्या सगळ्यांना गांधी पोस्टकार्डाने उत्तर पाठवत, अगदी दोन ओळी का असेनात. म्हणून आम्ही सर्वांनी पोस्टकार्डे रंगवली. छोटी पोस्टकार्डे. ही गांधींची मला सापडलेली पहिली प्रतिमा ज्यात मी शिरू शकलो, ज्यासाठी मी खूप काळ वाट पाहिली. ही एका वस्तुसंग्रहालयात आहे. काही प्रतिमा त्यांच्या चष्म्याच्या, पादत्राणांच्या आणि घड्याळाच्या आहेत.
मला एक मोठे - एकतीस फूट उंच आणि वीस फूट रुंद - म्यूरल करण्यासाठी विचारणा झाली. भोपाळमधील विधानसभेच्या इमारतीसाठी. मी त्यासाठी तीन चित्रे काढली. एकाला मी ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ असे नाव दिले. मी विचार केला की, त्यासाठी मी स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष घडलेली एखादी घटना घ्यावी. मी एक स्फोटक क्षण- फाळणी - पकडला. खालच्या बाजूला दोन समूह एकमेकांशी झुंजत आहेत, ज्याला आपण सुष्ट आणि दुष्ट यांच्यातला लढा म्हणू. मग मी विचार केला की, या सगळ्यात मला गांधी शोधायचे असतील तर ते कुठे शोधावेत? त्या काळात, आधी म्हटले तसे, गांधी हे बंगाल नि बिहारच्या खेड्यांमध्ये आणि कलकत्त्यामध्ये होते. म्हणून आपल्याला चित्रात ते मध्येही दिसतात आणि कडेच्या समासातही. इथे मला गांधींना चित्रात सामावून घेता आले.
अशाच एका चित्रात गांधींची प्रतिमा जळालेल्या शहरात दिसते. मी जेव्हा योग्य प्रतिमा शोधण्यासाठी शेकडो छायाचित्रे पाहात होतो, तेव्हा मला जाणवलेली प्रतिमा म्हणजे जेव्हा ते आपली भूमिका काय असावी याचा शोध घेत होते. त्यांनी अजून कायद्याच्या व्यवसायात प्रामाणिकपणा आणायला सुरुवात केलेली नव्हती. सत्याग्रह किंवा सविनय कायदेभंग चालू केलेला नव्हता, पण त्यांच्या तरुण मनात काहीतरी चालले होते. अशी प्रतिमा ही स्वतःची प्रतिमा शोधणाऱ्या तरुणाची आहे, असे वाटून मी तीच पुढे माझ्या चित्रात वापरली.
पुढे मग मला अवनींद्रनाथ टागोरांची काही चित्रे बघायला मिळाली. ते रवींद्रनाथांचे काका, त्यांनी तीन माणसांची व्यक्तिचित्रे काढली होती. गांधी, (दीनबंधू) सी.एफ.अँड्र्यूज हे त्यांचे एक सहकारी आणि रवींद्रनाथ टागोर. त्यातील गांधींचे व्यक्तिचित्र मला विशेष जाणवले. कारण तेव्हा ते आफ्रिकेतून भारतात परत आले होते. पण तेव्हा त्यांनी शिवलेल्या कपड्यांचा त्याग केलेला नव्हता. मला वाटले की, हेही व्यक्तिचित्रण आपण वापरावे. म्हणून मी ते माझ्या मोठ्या चित्रात आणले. पण मग माझ्या मनात विचार आला की, मूळ चित्राशी गांधींचा संबंध कसा आणणार? तेव्हा मला झाडूवाल्याचीच प्रतिमा जाणवली. मला वाटले की, तेच गरिबातल्या गरीब माणसाचे प्रतीक आहे. म्हणूनच गांधींनी त्याच्यात स्वतःला कल्पिले असावे. या झाडूवाल्याची परिस्थिती, प्रतिमा, स्थान शेकडो वर्षे आहे, तसेच आहे. त्यामुळे या दोन प्रतिमा त्या मोठ्या चित्रात मला आणता आल्या.
अशाच एका मोठ्या समूहचित्रात मी वेगवेगळ्या धर्माची, समाजाची जितकी व्यक्तिचित्रे, प्रतीके, प्रतिमा वापरता येतील तेवढी वापरली. ती मी अनेक वेगवेगळ्या चित्रांमधून घेतली. अगदी सुरुवातीच्या पुनरुज्जीवन काळातील इटालियन चित्रकार ग्योत्तोपासून, पर्शियन चित्रातून आणि भारतीय चित्रांपर्यंत अनेक व्यक्तिचित्रे घेतली. अशाच एका मोठ्या चित्रात एकीकडे झाड रेखाटले होते. ज्ञानप्राप्तीचे झाड तर दुसरीकडे मोठे जहाज असणार होते आपल्या काळाचे प्रतीक म्हणून. तर त्यात सुकाणू कोणाच्या हाती दाखवायचे असा प्रश्न होता. तिथेही मी गांधी चितारले. त्यांच्या मागे अंधारातली छोटी व्यक्तिचित्रे चितारली, तर तीच एका बाजूला मोठ्या आकारात चितारली. त्यांच्या घोळक्याभोवती घरे होती. जसे बरोड्याला तलावाभोवती घरे आहेत आणि ते जणू एकमेकांशी संवाद साधत आहेत, अशा प्रकारे रचना केली. या संवादाला ‘संगत’ असेही म्हणतात.
मला जेव्हा कोची बिएनालेचे (२०१४) निमंत्रण आले, तेव्हाही मला वाटले येथेही गांधींनाच निमंत्रण करावे. परत एकदा मी गांधींकडे वळलो. पण या वेळी मी बिनोदबिहारी मुखर्जींच्या प्रतिमा वापरल्या. ग्योत्तोच्या चित्रातून पक्षांशी बोलणारा संत फ्रान्सिस घेतला. वास्को द गामाची प्रतिमाही घेतली. त्यातील इतर प्रतिमा, घरे, झाडे भारतीय वापरली, पण मुख्यतः केरळातील कालिकतची वापरली, कारण वास्को द गामा तिथे उतरला होता.
अशा प्रकारे वसाहतीकरण आणि इतर गोष्टी त्यात उतरल्या. मला नेहमीच अशा काही शहरांबद्दल उत्सुकता वाटते की, जिथे एका बाजूला भयंकर हिंसा आणि असेच निर्घृण प्रकार झालेत. तर त्याच शहरात दुसऱ्या भागात अशा हिंसाचाराला पायबंद घातलेला दिसतो. या संदर्भात अहमदाबादकडे बघता येते. हे चित्र काढण्यासाठी डिजिटल तज्ज्ञांची मदत घेतली. गुगलवर मला शहरातील घर न् घर बघता येत होते. शहरातला मधला भाग आम्ही घेतला. योगायोगाने तो हृदयाच्या आकारात होता. मला गांधी राहत असलेल्या काळातील अहमदाबाद रेखाटायचे होते. पण आता हे शहर एका शवागारासारखे झाले होते. त्यामुळे ते चित्र राखाडी रंगात रंगवले. तिथे दंगलीनंतरचा संहार दाखवला होता.
मग मला वाटले की, शहरातील काही गल्ल्या आणि माणसेही दाखवावी. मग गांधी तिथे रहात असलेले घर रेखाटले. त्याचे नाव हृदयकुंज होते. या रचनेच्या भोवती मला शहराची, घरांची रचना करायची होती. हे शहर इथल्या रहिवाशांना शोषून घेत होते. म्हणजे हे सतत शोषण चालू असताना येथे कोठून तरी माणसे राहण्यासाठी येत होते.
आता या शहरात गांधी आणायचे तर ते कसे आणायचे तर मी त्यांची चार प्रतीके वापरली. एक तर त्यांचा चष्मा, आजूबाजूचे जग बघण्याची दृष्टी, तर दुसरे त्यांच्या चपला, त्यांचा देश चालून बघण्यासाठी, तर तिसरे त्यांचे घड्याळ, वेळ पाळण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी. कारण गांधींनी आयुष्यभर त्यांच्या आयुष्याचा एकेक मिनिट, एकेक सेकंद पुरेपूर वापरला, तर चौथे प्रतीक म्हणजे त्यांची खाण्याची थाळी आणि कटोरा. गांधींच्या बोलण्यात नेहमी येणाऱ्या दरिद्रनारायणाची जाणीव की, तो रोज रात्री भुकेल्यापोटी झोपी जातो.
गांधी आणि कबीर, असे वाटते की, ते एकमेकांना पूरक आहेत. जेव्हा कबीर जातो, तेव्हा गांधी येतात, तर जेव्हा गांधी जातात, तेव्हा कबीर येतो. दोघेही सत्याचे शोधक आहेत. कबीराने त्याचा शोध घेतला व ते व्यक्तीवर सोडून दिले. त्याने कोणत्याही संघटित धर्माचा आधार घेतला नाही. खरे तर त्याने इस्लाम आणि हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टींवर कडक ताशेरे झोडले आहेत. तर गांधी तसे नव्हते. पण ते त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते.
या संदर्भात श्रीमती पोलॉकनी एक आठवण सांगितली आहे. त्या द. आफ्रिकेतील गांधींचे सहकारी. तर एकदा एक माणूस गांधींकडे आला व तावातावाने वाद घालू लागला. गांधींनी त्याला बसायला सांगितले. काही बोलून झाल्यावर त्याच्याबरोबर चालू लागले, स्वत:चे हात त्याच्या खांद्याभोवती ठेवून चालले. तो हळूहळू गांधींचे ऐकू लागला. ते चालून परत आले. त्या माणसाने खिशातून चाकू बाहेर काढला आणि गांधींना अर्पण केला आणि कबूल केले की, तो गांधींचा खून करायच्याच उद्देशाने आला होता.
गांधी असे हृदय परिवर्तन करायचे. ते असे नाही म्हणायचे की, माझेच बरोबर आहे. माझे चुकत असेल तर तुम्ही सांगा, दुरुस्त करा. मी अजूनही सत्य शोधतच आहे. त्यामुळे अजून तुमच्याकडून शिकेन. असे अनेक प्रसंग सांगता येतील. यांना कोणत्या लेबलखाली बसवायचे? निधर्मी म्हणायचे, का श्रद्धाळू म्हणायचे? का आणखीन तिसऱ्या कोणत्या गटात बसवायचे- जिथे कबीर जेव्हा बोलतो, तेव्हा त्या दिशेने घेऊन जातो. तिथेच गांधी हृदय परिवर्तनाच्या मार्गाने घेऊन जातात.
मराठी रूपांतर - जयंत गाडगीळ
‘वाङ्मय वृत्त’च्या सप्टेंबर २०१९च्या अंकातून साभार
............................................................................................................................................................
रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India
............................................................................................................................................................
लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment