अजूनकाही
आज महात्मा गांधी यांची १५०वी जयंती. त्यानिमित्तान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख.
............................................................................................................................................
परिषदेचा मुख्य प्रश्न आहे, ‘Is Gandhi Possible!’ माझ्या मते गांधी शक्य आहेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्यांना शक्य करायला पाहिजे. गांधी एक व्यक्ती म्हणून परत येणे कदाचित अशक्य आहे, पण खरे म्हणजे ‘आज सब मुमकिन है!’
सध्या संस्कृतीच्या नावाखाली अनेक गोष्टी होत आहेत. एक शक्ती आहे जी दर दिवशी संस्कृतीच्या नावाखाली काही तरी नवीन करते आहे आणि लोकांना मग प्रश्न पडायला लागला आहे की, खरेच अशी आपली परंपरा आहे, अशी आपली संस्कृती आहे?
हा देश, या देशाची परंपरा, या देशाचा इतिहास कधीच एक होऊ शकला नाही. भारतात सगळेच अनेक आहेत- मग ते धर्म असोत, भाषा असोत, पोषाख असोत, आहार असोत, चालीरीती असोत, देवदेवता असोत. आपल्या हिंदू धर्मातच पहिले एक ब्रह्मांड होते आणि हळूहळू त्याचे ३३ कोटी देव झाले. ज्या काळात ३३ कोटी देव झाले, त्या काळात आपली लोकसंख्या एक कोटी पण नसेल. म्हणजेच देवसंख्या आपल्या लोकसंख्येपेक्षा अधिक होती. ही गोष्टदेखील एक प्रकारची विविधता दर्शवते. म्हणूनच जी गोष्ट आजच्या काळात सारखी सांगितली जाते आहे की, भारत एक आहे, याचे कारण हेच की, तो अनेक आहे आणि गांधींनी याच विविधतेचा स्वीकार करून ती लोकांसमोर ठामपणे मांडली होती.
दुसरा मुद्दा असा की, आपल्या प्रत्येकामध्ये भरपूर भेदभाव आहेत आणि या सर्व समावेश करणे शक्य आहे. आपल्या संस्कृतीत आपण एक दुसऱ्याशी बोलून, सल्ला-मसलत करून कुठल्याही गोष्टींचे, संकटांचे, प्रश्नांचे निवारण करू शकतो. पण आजकाल असे वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया चालू आहे की, कुठली तरी एक बहुसंख्य शक्ती निर्णय घेईल आणि ते निर्णय सगळ्यांसाठी बंधनकारक असतील. गांधींच्या मते ही अतिशय चुकीची पद्धत आहे.
आपल्यापैकी बरेच जण पुस्तक वाचत असतील, तरुणांबाबत हे विधान करणे कदाचित चुकीचे ठरेल, कारण Googleवर शोधून जी माहिती मिळेल तीच ते वाचतात. काही वर्षांपूर्वी मी एक ५०० पानी पुस्तक लिहिले ज्याचे शीर्षक ‘India Decides’ असे आहे. त्यात मी ३००० वर्षांपासूनची आपली असहमती, विवाद, विविधता यांची जी परंपरा आहे, त्यांची काही उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मला असे दिसून आले की, आपल्यात असहमती हा एक महत्त्वाचा गुण आहे. जर हिंदू धर्म सर्वसंतुष्ट असता तर त्यापासून तीन नवीन धर्मांचा जन्म कसा झाला? बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म, एका दृष्टीने हे असहमतीचे धर्म आहेत, पण आपण त्यांचा स्वीकार केला की, हे पण आपल्या धार्मिक व्यवस्थेचे हिस्से आहेत. आजकाल प्रत्येक दिवशी काहीतरी दुसरे बनवले जात आहे. उदा. असे नवीन नवीन कायदे आणले जात आहेत, नवीन नवीन प्रक्रिया लागू केल्या जात आहेत, ज्यामुळे कुठल्या तरी एका अल्पसंख्याक समूहाला अचानक वेगळे ठरवले जाते. गांधीजींनी असे म्हटले होते की, ‘I am a good Hindu, therefore I’m a good Muslim, therefore I’m a good Christian...’ असे म्हणणे चुकीचे ठरेल की, आधी दुसरे कोणी नव्हते, आधीसुद्धा वैचारिक, धार्मिक मतभेद, असहमती असणारे लोक होते, पण तेव्हा आपण सर्व एकमेकांना समजून घेऊन एकोप्याने राहत असू.
मला असे वाटतेय की, गांधीजींनी सांगितलेली अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यांना असे विचारण्यात आले होते की, ‘जर सर्व धर्म शेवटी एकाच ईश्वराची साधनं आहेत, तर एवढ्या धर्मांची आवश्यकता काय? पूर्ण मानवतेचा एकच धर्म असायला पाहिजे.’ त्यावर गांधीजींनी उत्तर दिले की, ‘All religions are true, but they’re imperfect!’ असे उत्तर देऊन त्यांनी धर्मांच्या बाबतीत, एका प्रकारे एक नवीन लोकशाही निर्माण केली! आणि ती लोकशाही अशी होती की, प्रत्येक धर्माला जागा असेल, सर्व धर्मांकडे काहीतरी चांगले सांगायला आहे.
संस्कृतीचा एक पैलू भाषा आहे. आपण आपल्या संस्कृतीबद्दल विचार करताना आपल्या भाषेचादेखील विचार करतो. आजच्या घडीला सार्वजनिक संवाद साधताना होणारा अभद्र भाषेचा वापर, शिवीगाळ, दुसऱ्याचे म्हणणे नीट शांतपणे समजून न घेण्याची पद्धत, हे सगळे आपले गुण झाले आहेत. गांधी सर्वांत कठीण क्षणी आणि सगळ्यात मोठ्या शत्रू समोरदेखील अगदी शांतपणे आणि कोमल भाषेत बोलत असत. तुमच्या भाषेतील सुशीलता ही तुमच्या आतील सुशीलतेचा पुरावा देते. जो माणूस दुसऱ्यांसोबत फक्त शिवीगाळ करून बोलू शकतो, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी बोलतो तो सुसंस्कृत, भद्र तर नाहीच आणि माझ्या मताप्रमाणे भारतीयदेखील नाही, तसेच त्याला भारतीय परंपरेची जाणीवदेखील नाही.
‘सत्याग्रह’ हा शब्द आजकाल फारसा कोणी वापरताना दिसत नाही. तसेच ‘सत्यमेव जयते’ हेदेखील फक्त सरकारी कागदपत्रांपुरते मर्यादित राहिलेले आपल्याला दिसते. सध्या खोटे बोलण्यासाठी जेवढा खटाटोप चालला आहे, तेवढा आपण कधी पाहिला नाहीये! या काळात खोटे बोलणाऱ्यांची संख्या फक्त राजकारण्यांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. धर्मनेता, खेळाडू, नट असे विविध क्षेत्रांतील मान्यवरदेखील खोटे बोलायला लागले आहेत. आणि गंमत म्हणजे त्यांना माहिती आहे की, आपण खोटे बोलतोय. आपले सध्याचे शिक्षणमंत्री हे एक असे राजकारणी आहेत, ज्यांना खोटे बोलल्याशिवाय जेवण पचत नसेल. म्हणूनच अशा वेळी एक नव्या पद्धतीच्या सत्याग्रहाची गरज आहे की, ‘खरं बोला!’ किंवा जो खोटे बोलतो आहे त्याला कळू द्या की, तुलाही माहिती आहे की तू खोटे बोलतो आहेस. एवढे पुरेसे आहे. यासाठी आंदोलन करायची, इकडे तिकडे जाण्याची गरज नाहीये.
अशा प्रकारे एक छोटा सत्याग्रहदेखील आपण सुरू करू शकतो. खरे सांगायचे तर गांधींइतका निर्भय माणूस गेल्या २०० वर्षांत जन्मला नाही. त्या गांधींना स्मरताना आपण भयभीत होत आहोत, खरे म्हणजे जर गांधी कुठल्या तरी रूपात आज आपल्या समोर आले असते, तर देव जाणे त्याने काय केले असते, आपली काय हालत केली असती. गांधी आपल्याला अस्थिर करतो, अनिश्चित करतो, विचलित करतो. म्हणून आपल्याला असत्य पचवायला सोपे वाटते आणि सत्य शोधायचा आपण प्रयत्न करत नाही. हे थांबण्यासाठी प्रतिकार, साहस आणि निर्भयता या तीन मूल्यांवर उभी असलेली एक संस्कृती आपल्याला निर्माण करायला सुरुवात करावी लागेल. ही संस्कृती म्हणजे, आपल्या परंपरेला समजून आणि त्या वारसाहक्काला पुढे नेण्यासाठी केलेला प्रयत्न असेल. ही परंपरा फक्त गांधींपर्यंत मर्यादित नाही, त्यांच्या आधीपासूनची आहे.
गांधींच्या दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात.
आजकाल बरेच स्वत:ला आध्यात्मिक म्हणवणारे गुरू, स्वामी, बाबा समोर येत आहेत, आणि ते सर्वच खोटे बोलत आहेत. त्यातले बरेचसे बाबा बलात्कार, चोरी, खून, हिंसा इत्यादी गुन्ह्यांमध्ये पकडले जातात, त्यांना शिक्षा होत नाही ही वेगळी गोष्ट आहे, परंतु ते पकडले तर जातात. मी तर नास्तिक आहे, म्हणजे मला अध्यात्माचे वरदान मिळाले नाहीये, पण जेव्हा ते पकडले जातात, तेव्हा मला एक प्रकारचे आध्यात्मिक सुख मिळते, त्यांची नावे काहीही असोत, बऱ्याच जणांच्या नावात राम असते, ती बाब सोडून द्या! सुख मिळण्याचे कारण एवढेच की, आजही आपल्या लोकशाहीत एवढी शक्ती आहे की, अशा अपराध्यांना किमान पकडले तरी जाते. सध्या केवळ धर्मातच नाही तर राजकारणातदेखील अपराध्यांची संख्या वाढलेली दिसते. संसदेत या वेळी सर्वाधिक अपराधी निवडून आले आहेत, ही संख्या किती ते तुमच्या सारखे सुजाण नागरिक जाणून आहात. आणि म्हणूनच एका नव्या प्रकारच्या अध्यात्माची आपल्याला गरज आहे, जे या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन त्यावर उपाय सुचवेल.
एक शेवटचा मुद्दा! गांधीजींना असे विचारले होते की, ‘तुमच्या मते, असा कुठला विषय आहे की जो आपल्या शालेय शिक्षण पद्धतीत अनिवार्य केला पाहिजे?’ गांधीजींनी देशभक्ती, स्वातंत्र्यासाठी संघर्ष, राष्ट्र निर्माण वगैरे असे काहीच सांगितले नाही. त्यांनी सांगितले, संगीत! आणि म्हणूनच एका प्रकारे जर शक्य असेल तर आपल्याला या आरडाओरडीजवळ जाण्यापेक्षा संगीताजवळ जायला पाहिजे. आजकाल भरपूर लोक खूप बोलत आहेत, मी पण बोलतो आहे - तुम्ही मला बोलायला बोलावले तर मी चूप बसून कसे चालेल!?
पण बरेच लोक त्या विषयाचा अभ्यास नसूनसुद्धा त्या विषयावर बोलत आहेत! ही जी बडबड, शब्दांचा अप्रामाणिक भडिमार दिवस-रात्र चालू आहे अशा वेळी गांधीजींच्या मौनव्रताला स्मरून आपण मौन बाळगायलाही शिकायला पाहिजे. हे मौन भित्रेपणाचे लक्षण नसेल तर एका साहसी आणि निर्भीड व्यक्तीचे थोड्या काळासाठी स्थगित केलेल्या विधानाचा पुरावा असेल!
शब्दांकन - कबीर पळशीकर
‘वाङ्मय वृत्त’च्या सप्टेंबर २०१९च्या अंकातून साभार
............................................................................................................................................................
रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India
............................................................................................................................................................
लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 03 October 2019
हा अशोक वाजपेयी इथला का ? : https://www.aksharnama.com/client/article_detail/2919
तोच असेल तर संपादक मंडळाची धन्य आहे!
-गामा पैलवान