अजूनकाही
आज महात्मा गांधी यांची १५०वी जयंती. त्यानिमित्तान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख.
............................................................................................................................................
नांदेडला माझे बालपण स्वातंत्र्यसैनिक कॉलनीमध्ये गेले. आम्ही कॉलनीत अनेक स्वातंत्र्यसैनिक बघितले. त्यांच्यातले बहुतेक ‘आम्ही गांधीजींच्या चळवळीतले आहोत’ असे सांगत, पण सामाजिक कार्याबद्दल उत्सुक नसत. त्यावरून आम्ही बालगोपाल (स्वातंत्र्यसैनिकांचे नातू-पणतू) त्या वेळी असा निष्कर्ष काढत असू की, ‘हे गांधीवादी काय खरे स्वातंत्र्यसैनिक नाहीत. कारण जे इंग्रज, रझाकर यांच्याविरुद्ध लढले ते शहीद झाले. हे गांधीवादी होते म्हणून वाचले.’ अर्थात ही गोष्ट खरी नव्हती. पण क्रांतिकारक असणे म्हणजे भगतसिंगासारखे असणे, ही बाब लहानपणीच मनावर बिंबली होती.
२००२ मध्ये ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ हा सिनेमा आला. मी दोन वेळा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघितला. त्याच्या सुरुवातीला काही तरुण गांधीजींविरोधात घोषणा देत रेल्वे स्थानकावर दाखवले आहेत. सहकारी विरोध करत असताना गांधीजी त्या तरुणांना भेटण्यास जातात. हे तरुण गांधीजींना काळे फूल देतात व म्हणतात, ‘गांधीजी, आप चाहे तो भगतसिंग, सुखदेव और राजगुरू को फांसी से बचा सकते थे। पर आपने ऐसा किया नहीं। इतिहास आपको कभी माफ नहीं करेगा।’
कोणताही तरुण डाव्या चळवळीच्या संपर्क येतो, तेव्हा त्याच्यासमोर आदर्श असतो तो भगतसिंगाचा. त्यामुळे भगतसिंगाला फासावर चढवण्यास गांधीजी जबाबदार होते असे वाटत असे, जे की चुकीचे होते. भगतसिंगाला तुरुंगामधून बाहेर काढण्याचा कट क्रांतिकारकांनी रचला होता, पण भगतसिंगाने त्याला विरोध केला होता, हे नंतर समजले.
पुढे २००३ला अमरावतीला वैद्यकीय शिक्षणासाठी गेलो आणि डाव्या विचारच्या स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. सक्रियपणे सहभागी झाल्याने आंदोलन व मोर्चा नित्यनियमाने चालू झाले. आम्ही खूप अभिमानाने सांगायचो, ‘आम्ही भगतसिंगाला आदर्श मानतो अन त्याच्या विचाराने काम करतो. फोटो भगतसिंगाचा लावायचा अन काम गांधींसारखं काम करायचं, हे आम्हाला जमत नाही.’ हा गांधीजींबद्दलचा द्वेष जरी नसला तरी जिव्हाळा मात्र नक्कीच नव्हता.
२००५ला बाबा आमटेंनी सोमनाथ येथे सुरू केलेल्या ‘श्रम संस्कार छावणी’ला जाण्याची संधी भेटली. डॉ. विकास आमटे सांगत होते की, ‘आनंदवनमध्ये पूर्वी कुष्टरोगी (लेप्रसी) असलेल्या व आता बऱ्या झालेल्या लोकांनी कातलेले सुत घेण्यास गांधी आश्रमाने नकार दिला. तेव्हा बाबांनी सर्व चरखे आनंदवनाच्या चौकात आणून जाळून टाकले.’ कम्युनिस्टांच्या कम्युनचा प्रयोग करणारे या दृष्टीने आम्ही बाबांकडे पाहत होतो, पण ते गांधीवादी लोकांविरुद्ध दिसत होते. बाबांनी गांधीजींबद्दल लिहिलेली कविता फार उशिरा वाचनात आली.
२००९ला वैद्यकीय शिक्षण संपले. आता पुढे काय करायचे हा मोठा गहन प्रश्न होता. महाराष्ट्रात कम्युनिस्टांनी आरोग्य क्षेत्रात अॅकेडमिक काम केलेले आहे, पण विधायक काम नव्हते. विद्यार्थी चळवळीत असताना पक्षाचा जो क्रांती कार्यक्रम आहे, त्यावर खूप विश्वास होता. वाटायचे सुधारणा न करता सरळ राजकीय सत्ता हातात घेऊनच क्रांती करायची. अॅकेडमिक शिक्षण संपले तसे स्वप्ने व वास्तव यातील फरक समजला.
महाराष्ट्रात प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात कम्युनिस्टांना स्थान नसले तरी जमिनीवरील लढाईत डावे पुढे होते. पाच वर्षे काम केल्यावर (जेव्हा की, युपीए-१मध्ये डावे होते) जाणवले की, भविष्यात पक्षाबरोबर काम करता येणार नाही. महाराष्ट्रात गांधीजींच्या विचाराने आरोग्याविषयी काम करणाऱ्या अनेक संस्था होत्या, पण तेथे जाणे टाळले. अमरावती सोडल्यावर पुढील एक वर्ष नागपूरमध्ये काढले. तिथे असताना कॉम्रेड शंकर गुहा नियोगी व छत्तीसगढ मुक्ती मोर्चा यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी लोखंडाच्या खाणीत काम करणाऱ्या मजुरांना संघटित करून दल्ली राजहरा येथे ‘शहिद हॉस्पिटल’ उभारले आहे. १०० बेडचे हे हॉस्पिटल अजूनही यशस्वीपणे चालू असल्याचे समजले.
२०१०ला नागपूर सोडले आणि दल्ली राजहरा येथे शहीद हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये अतिकामामुळे दिवस-रात्र यातील कोणताही फरक काम करताना जाणवत नव्हता. कॉम्रेड नियोगींनी केलेले काम समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. डॉ. शैबाल जाना सर व चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना नियोगींच्या कामाबद्दल एक वेगळीच माहीत समोर येत होती. ते खादीचे समर्थक व स्वतः खादी वापरत.
कॉम्रेड नियोगींच्या कामाचे सार होते ‘संघर्ष और निर्माण’ हे दोन शब्द. ‘संघर्ष के लिये निर्माण और निर्माण के लिये संघर्ष’ हे त्यांचे घोषवाक्य होते. हा संघर्ष येथील प्रस्थापित निम-सरंजामशाही व भांडवलदारी व्यवस्थेविरुद्ध होता. संघर्ष एकवेळेस समजत होता, पण ‘निर्माणा’चे गणित काही कळत नव्हते. शहीद हॉस्पिटल, शहीद गॅरेज, शहीद स्कूल, शहीद स्पोर्ट्स क्लब असे १७ विभाग ज्यांच्याद्वारे ‘निर्माण’चे काम चालायचे. फक्त निर्माणकडे बघितले असे भासायचे, गांधीजींचे विधायक काम करणारे आश्रम आहेत. कॉम्रेड लोक असे कुठे विधायक करतात? या ‘निर्माण’ व ‘संघर्ष’ने भांडवलदार वर्ग, ठेकेदार व दारूमाफिया यांच्याविरुद्ध आव्हान उभे केले होते. या चळवळीत काम करत असताना ३५ लोक शहीद झाले होते.
कॉ. नियोगी डाव्या चळवळीतले असे एक नेतृत्व होते की, जे गांधी जयंती मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरी करत. २ ऑक्टोबर १९९१ला रायपूर येथे गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण छत्तीसगढमधून लोक जमणार होते. नियोगी गांधी जयंतीच्या तयारीसाठी भिलाईला आले होते. तिथेच त्यांची हत्या झाली. दुसरा असा कम्युनिस्ट नेता गांधीजींच्या इतक्या विचारांजवळ गेलेला पाहिला नाही.
२०११ला नियोगींच्या हत्येला २० वर्षे झाली होती. त्यानिमित्त दल्ली राजहरा येथे कार्यक्रमासाठी ‘संघर्ष और निर्माण’ पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सदगोपालन आले होते. त्यांच्यासोबत चर्चा करताना एका कार्यकर्त्याने गांधीजींबद्दल नकारात्मक मत व्यक्त केले. मग सदगोपालन यांनी दिवसभर गांधी आणि नियोगी आंदोलनावर चर्चा केली.
त्यातून समजू लागले की, गांधीजींनी पोस्ट कम्युनिस्ट क्रांतीचे फाउंडेशन केले आहे. पण खरी अडचण अशी होते की, गांधीजींना कोणत्याही विचारधारेच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यांनी सरंजामशाही व्यवस्था व भांडवदारी व्यवस्था यांचे वाहक म्हणून काम केले असले तरी ती व्यवस्था टिकावी असे त्यांना वाटत नव्हते. त्यांनी भांडवलदार वर्गासाठी विश्वस्त पदाचा मुद्दा समोर आणला. कम्युनिस्टांसाठी हा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा होता, आजही आहे. नियोगी आंदोलनाने या विश्वस्त पदाला पर्याय उभा केला होता. स्वतंत्र भारतातील हा पहिला प्रयोग मानता येईल की, जिथे एक कम्युनिस्ट माणूस गांधीजींचे काम प्रत्यक्षपणे जमिनीवर उतरवू पाहात होता.
गांधीजींनी राजकारणाचे आध्यात्मिककरण केले. नियोगी यांनी प्रादेशिक कष्टकरी संस्कृतीचा उपयोग करून एकाच देशात दोन राष्ट्रीयत्व सांगून प्रस्थावित उच्च जात-वर्गकेंद्रित राजकारणाचे जनतेमध्ये विकेंद्रीकरण केले.
डॉ. अनिल सदगोपालन यांच्यामुळे नोव्हेंबर २०१२ला ‘नयी तालीम’च्या सेवाग्राममधील तीन दिवशीय राष्ट्रव्यापी संगोष्ठीत सहभागी होता आले. संपूर्ण भारतातील अनेक भागांत प्रसिद्धीपासून दूर राहून ‘नई तालीम’ प्रमाण मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट झाली. ‘नई तालीम’चे कार्यकर्ते जातीव्यवस्थेबाबत गांधीजी चुकीचे होते असे ठामपणे व्यासपीठावरून सांगत होते, पण भांडवलदार वर्गाबद्दल भूमिका घेत नव्हते. चर्चेनंतर समोर आले की, गांधीवादी आहोत असा दावा करत होते, त्यांच्यातील अनेक संस्था भांडवलदार वर्गाचे करोडोचे फंडिंग घेत होत्या. कदाचित आज सरंजामी व्यवस्था मोडली आणि नवीन निम-सरंजामी व्यवस्था उदयास आली आहे. आजचे उत्पादन व उत्पादनाची साधने यावर भांडवलदार वर्गाचे वर्चस्व आहे. भारतातील उत्पादन व्यवस्थेचा पाया जातीव्यवस्था आहे. येथे वर्ग बदलता येतो, पण जन्मजात मिळालेली जात बदलता येत नाही. हे कोडे गांधीजींना सुटले नाही. ते शेवटच्या काळात कोणत्याही वर्चस्वाला बळी पडले नाहीत. आणि ते कम्युनिझममधील हिंसा वजा केली तर कम्युनिझला विरोध नसल्याचे बोलू लागले होते.
एका वयोवृद्ध गांधीवादी (नाव आठवत नाही. वय ८०वर्षापेक्षा जास्त व उत्तराखंडचे होते. जल, जमीन, जंगल व हवा अधिकार यासाठी काम करत होते) नेत्यासोबत चर्चा झाली. त्यांनी गांधीजींसोबत काही काळ काम केले होते. त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांनी मला कॉम्रेड इ. एम. एस. नमुद्रिपाद यांनी लिहिलेले ‘महात्मा इन इझम’ (ऑनलाइन उपलब्ध आहे) हे पुस्तक वाचण्यास सांगितले. कॉम्रेड नमुद्रीपाद यांनी गांधीजींसोबत प्रत्यक्ष काम केले होते. १९५७ला ते केरळचे कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते. त्या पुस्तकामधील गांधीजींचे विश्लेषण वाचून गांधीजी जवळचे वाटू लागले.
या गांधीवादी नेत्याने प्रत्येक्ष घडलेला एक प्रसंग सांगितला. आश्रमात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असताना एकाने गांधीजींना प्रश्न विचारला, ‘भारत स्वतंत्र झाला, इंग्रज भारत सोडून गेले. आता आपली लढाई कोणाविरुद्ध असेल?’ त्या वेळी गांधीजींनी कमलनयन बजाज यांच्याकडे बोट दाखवले आणि ‘यांच्याविरुद्ध होईल’ असे सांगितले. त्या वेळी बजाज कुटुंबासारखे कमी होते, पण आज अनेक मोठ-मोठी भांडवलदार कुटुंबे उदयाला आली आहेत. त्यामुळे ही लढाई अजून कठीण झाली आहे.
मागच्या वर्षी जळगावला दोन दिवसीय ग्राम्ची परिषद झाली. त्यात अंतोनियो ग्राम्ची या डाव्या विचारवंताचे विचार समजण्याची संधी मिळाली. हा डावा विचारवंत राज्यसत्तेच्या उभारणीसाठी ‘नैतिकते’ (moral value)वर खूप भर देतो. मग आठवते, गांधीजांना टोकाचे ‘नैतिकतावादी’ समजून दूर राहणाऱ्या कम्युनिस्टांनासुद्धा ‘नैतिकते’शिवाय वर्गसंघर्ष करता येणार नाही. कम्युनिस्ट नैतिकतेशिवाय सत्तेत आले तर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जे वाटोळे केले, तसे देश पातळीवर करतील. ग्राम्ची व बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काम झाले आहे, तसे ग्राम्ची व गांधीजी यांच्याविषयी भविष्यात होण्याची गरज आहे.
............................................................................................................................................................
रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India
............................................................................................................................................................
लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment