म. गांधींचं १५०व्या जयंतीनिमित्त स्मरण करताना डॉ. आंबेडकरांचंही स्मरण करायला हवं!
सदर - गांधी @ १५०
अलका गाडगीळ
  • म. गांधी, डॉ. आंबेडकर आणि जेफ्री पेन यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 02 October 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

आज महात्मा गांधी यांची १५०वी जयंती. त्यानिमित्तान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख.

............................................................................................................................................

गांधींना एका ब्रिटिश पत्रकारानं विचारलं, ‘पाश्चात्य संस्कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं?’. गांधी म्हणाले, ‘I think it would be a good idea’. (ती चांगली कल्पना आहे). त्या ‘चांगल्या कल्पने’चं भारतात काय झालं? संस्कृतीचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे असा एकतर्फी राहिला का?

युरोपिय लेखक, मानसशास्त्रज्ञ, विचारवंत, राजकीय कार्यकर्ते, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा भारतीय संस्कृतीशी संपर्क आल्यामुळे त्यांच्या ज्ञान आणि विचारकक्षा विस्तारल्या. तसंच गांधी, नायपॉल यांच्यासारख्या भारतीय लेखक विचारवंतांवर पाश्चात्य उदारमतवादाचा सखोल प्रभाव पडला. या दोन संस्कृतींच्या देवाणघेवाणीतून ई.एम. फॉस्टर, डॉ. कार्ल यंग, व्ही. एस. नायपॉल, अ‍ॅनी बेझंट, लॉर्ड कर्झन, मार्टिन ल्युथर किंग, महात्मा गांधी आणि इतर अनेकांची जीवनदृष्टी बदलली. ‘फादर इंडिया’ या पुस्तकात लेखक जेफरी पेन यांनी भारताच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृती समजून घेण्याच्या आणि तिला परिपूर्ण करणाऱ्या लेखक, विचारवंतांचा मागोवा घेतला आहे.

इंग्लंडला भारताकडून काय मिळालं याचं मोजमाप करता येतं इतकं ते स्पष्ट आहे. त्याला सज्जड पुरावा आहे. ‘भारतावर राजकीय प्रभुत्व गाजवावं याच्या समर्थनार्थ इंग्लंडकडे कोणतंही सबळ कारण नाही’, असा विचार एडमंड बर्क यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला होता. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. ‘इस्ट इंडिया कंपनीनं भारतीयांचं पद्धतशीरपणे शोषण केलं. अत्यंत जुलमी आणि भ्रष्ट सरकार म्हणजे काय याचा नमुना कंपनीनं जगाला दाखवून दिला आहे.’

बर्क मूळचे आयरिश. बॅरिस्टर झाल्यानंतर १७९७ साली ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला. ब्रिटिश साम्राज्याच्या अतिरेकांची माहिती प्रकाशित होऊ लागली. पार्लमेंटमध्ये साम्राज्यवादाविरोधात बर्क घणाघाती भाष्य करायचे. त्यांचा युक्तीवाद अभ्यासावर आधारित असायचा. भारतासोबत अमेरिकन वसाहतीविरोधात त्यांनी आघाडी उघडली होती.

‘अधिकाधिक लोकांना अधिकाधिक सुख-समाधान मिळणं हेच योग्य-अयोग्यतेचं मोजमाप आहे’ ब्रिटिश साम्राज्याचे आरंभीचे प्रणेते जेरेमी बेंथेमच्या या तत्त्वानं प्रभावित झाले होते. बेंथेम इंग्लंडमधील समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि कायदे पंडित होते, तसंच उपयुक्ततावादाचे पुरस्कर्ते होते.

ब्रिटिशांनी आपल्या उदारमतवादी संकल्पना इथं रुजवण्याचा प्रयत्न केला. सतीप्रथेविरोधातील कायदा लॉर्ड बेंटिंग यांनी १८८९ मध्ये लागू केला. संमती वयाचा कायदाही १८९१ पारित करण्यात आला. या दोनही कायद्यावरून वादंग झालं होतं. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि तिचे हक्क ब्रिटिश सरकारला महत्त्वाचे वाटत होते, तर भारतीयांना, विशेषत: त्या काळच्या लोकमान्य टिळकांसारख्या राजकीय नेत्यांना समूहाच्या प्रथा-परंपरांना अबाधित राखायचं होतं.

गांधी १९१५ साली भारतात परतले आणि त्यांनी सत्याच्या आत्मिक शोधाची संकल्पना मांडली. ही संकल्पना वैयक्तिक आणि व्यक्तीकेंद्री होती आणि तिची मुळं पाश्चात्य शिक्षणात होती. गांधींना कोणी पाश्चात्य विचारवंत म्हणणार नाही, पण त्यांच्या खुनाचा कट ज्यांनी रचला, त्यांना मात्र ते पाश्चात्य संस्कृतीचे प्रचारक वाटत होते. 

व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या युरोपीय संकल्पनांना भारताच्या तत्कालीन सरंजामी आणि जातीच्या उतरंडीवर आधारलेल्या व्यवस्थेत थारा मिळाला नाही. भारतात आजही व्यक्तीवादापेक्षा समूहमानसवादाचं पारडं जड आहे.

‘प्राचीन परंपरा असलेल्या भारतीय संस्कृती संपर्कामुळे पाश्चात्य समाजावर अनपेक्षितपणे प्रगल्भ संस्कार झाले’, असं पेन म्हणतात. जातपात आणि इतर अनेक निर्बंधांसोबत भारतीय समाजातील विसंगतीही या पुस्तकातून समोर येतात. जाती बाहेरच्या माणसाला घरात न घेणारा भारतीय माणूस समलिंगी संबंधाच्या बाबतीत मात्र मवाळ असतो. छळ झाल्यामुळे काही परदेशी समुदाय भारतात आले आणि अल्प काळातच ते भारतीय समाजात मिसळून गेले. असं असताना भारतीय माणूस जातीप्रथा का पाळतो, हे ब्रिटिशांच्या समजण्याच्या पलीकडचं होतं.  

भारतीय समाजात जातीव्यवस्था किती खोलवर रुजली आहे, याचा अंदाज ब्रिटिश राज्यकर्त्यांना आला होता, पण सतीप्रथेप्रमाणे जातीव्यवस्थेला मात्र ते बेकायदेशीर ठरवू शकले नाहीत. लेखक पेन म्हणतात, ‘नागरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे राज्यकर्ते झुंडींच्या कायद्यांपुढे हतबल ठरले’.

इंग्लंडच्या उदारमतवादाकडे पाठ फिरवून अ‍ॅनी बेझंट भारतात आल्या. आणि त्या भारतातल्या स्वशासनाच्या चळवळीत सहभागी झाल्या. १९१६ साली लोकमान्य टिळकांनी बेझंट यांच्या सहकाऱ्यानं ‘होमरूल लीग’ची स्थापना केली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्या सहभागी झाल्या. ‘होमरूल लीग’चं रूपांतर नंतर ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’मध्ये झालं. भारतातल्या ब्रिटिश राजवटीला अ‍ॅनी बेझंट यांनी आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांना अल्प काळासाठी कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्य चळवळीसोबत भारतातील थिओसॉफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. अरविंद घोष आणि मीरा रिचर्डस् ज्यांना ‘द मदर’ म्हटलं जातं, त्यांच्यासोबत त्यांनी थिओसफी चळवळीची पायाभरणी केली. इंग्लंडमध्ये आणि नंतर भारतातही बेझंट यांना प्रकाशझोतात राहायला आवडायचं. पण त्यांच्या शेवटच्या पर्वात त्या अलिप्त झाल्या होत्या. ‘विस्मरण हेच माझं स्मारक असावं’, असं त्यांना वाटू लागलं. विसाव्या शतकातील कडकडीत प्रोटेस्टंट धर्माला त्यांनी नाकारलं होत आणि अखेरच्या दिवसांत त्या भारतीय परंपरेतल्या ‘एक शून्य मी’ या विचारापर्यंत आल्या.

‘अ पॅसेज टू इंडिया’ या कादंबरीचे लेखक ई.एम. फॉस्टर यांना देवासच्या तुकोजीराव होळकरमहाराजांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम मिळालं होतं. फॉस्टर होमो सेक्शुअल होते. इंग्लंडमध्ये त्यांची लैंगिक कुचंबणा झाली होती. विसाव्या शतकातील सुरुवातीच्या कालखंडातही सेक्ससंबंधीच्या अत्यंत मागास व्हिक्टोरियन संकल्पना रेंगाळत होत्या. इंग्लंडमध्ये समलैंगिकत्व गुन्हा ठरवण्यात आला होता. अशा नीतीकल्पना घेऊन फॉस्टर महाराजांच्या चाकरीत रुजू झाले. थोड्याच दिवसांत फॉस्टर गे आहेत, हे तुकोजीराजांच्या लक्षात आलं आणि त्यांना साथीदार शोधण्याचं काम त्यांनी सुरू केलं. फॉस्टर यांच्यासाठी तो सुखद धक्का होता. इंग्लंडमध्ये अनुभवायला मिळालेले अपमान आणि लैंगिक पावित्र्याच्या कडकडीत मागास संवेदनांचं देवासमध्ये विसर्जन झालं.

‘देवासला आल्याबरोबर फॉस्टरांनी परिसराची सैर केली आणि असंख्य मैलांच्या परिसरात एकही युरोपिय नसल्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘फक्त संपर्कात रहा’ असं ‘हॉवर्ड्स एंड’ या कादंबरीत त्यांनी लिहिलं होतं. मानवी करुणा हे नैतिक मूल्य या कादंबरीत जागोजागी प्रतीत होतं. ती मूल्य फॉस्टरना देवासमध्ये प्राप्त झाली’, पेन यांनी नोंदवून ठेवलं आहे.

‘अ पॅसेज टू इंडिया’ या त्यांच्या कादंबरीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दलची लेखकाची सहानुभूती दिसून येते. रॉनी हिस्लॉप आणि मेजर कॅलेंडर या ब्रिटिश वर्चस्ववादी संवेदना दर्शवणाऱ्या ऑफिसरबद्दल मात्र तिरस्कार वाटू लागतो.

भारतातील सहिष्णूता आणि सर्व धर्म-पंथांना आपलंस करण्याच्या नीतीचा अनेक ब्रिटिश ऑफिसर, लेखक आणि विचारवंतांनी गौरव केला आहे. लेखक जेफ्री पेन यांनी अशा अनेक उदाहरणांचे दाखले दिले आहेत. चर्च आणि राजसत्तेची फारकत करणारी सेक्युलरिझमची पाश्चात्य संकल्पना, तसंच चराचराला आपलंसं करणारी भारतीय परंपरा या संकल्पनांची चर्चा हा या पुस्तकातील महत्त्वाचा गाभा आहे.

विसाव्या शतकातील पहिल्या दोन-तीन दशकांवर मानसशास्त्रातील फ्रॉईडियन संकल्पनेचा प्रभाव होता. फ्रॉईड ‘स्व’चा शोध घेण्यावर जोर देत होते. व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तित्वाबद्दल भारतीय कल्पना काय आहेत हे शोधण्यामध्ये फ्रॉईड यांना अजिबात रस नव्हता. फ्रॉईडचे समकालीन असलेल्या कार्ल यंग यांना मात्र भलतंच वळण घेतलेल्या पाश्चात्य संकल्पनांचा समतोल ‘स्व’च्या भारतीय संकल्पना राखू शकतील असं वाटत होतं. पण त्यांच्या मांडणीला फारशी प्रसिद्धी मिळत नव्हती, कारण मानसशास्त्रावर डॉ. फ्रॉईड अधिराज्य गाजवत होते. भारतात कार्ल यंग आले, इथले डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि धार्मिक तत्त्वज्ञांशी त्यांनी चर्चा केली. आध्यात्मिक आणि आदिम, वैयक्तिक आणि सामूहिक या परस्परांना तोलून धराणाऱ्या आणि या दोहोंमध्ये असणाऱ्या इतर असंख्य शक्यतांमुळे डॉ. यंग यांचे डोळे दिपून गेले आणि त्यांचा गोंधळ उडाला. आत्मन (सेल्फ) आणि मंडल (होलनेस) या संकल्पनांमुळे ते भारून गेले असले, तरीही युरोपातील पेशंटना या संकल्पनांवर आधारलेल्या थेरपी मानणार नाहीत असं त्यांच्या मनानं घेतलं.

‘कर्झन, बेझंट, डॉ यंगआणि गांधींनी भारतात ज्ञानी आणि नैतिक व्यवस्था, ज्यामध्ये व्यक्तीला आनंदाचा शोध घेण्याची मुभा असेल, अशा राज्यव्यवस्थेचं स्वप्न पाहिलं होतं. पण या नव्या व्यवस्थेसाठी जरुरी असणाऱ्या प्रबुद्ध व्यक्ती आत्मकेंद्री होत्या. त्या जातीव्यवस्थेच्या चिखलातून बाहेर पडण्याची शक्यता नव्हती. बेझंट, यंग आणि गांधीच्या इंडो-युरोपियन संकल्पनांसाठी युरोपिय व्यक्तीवादी परंपरा आणि भारतीय समूहवादी परंपरांचा मिलाफ होण्याची जरुरी होती. या मिलाफामधून जातीविरहित समाज निर्मितीच्या शक्यता निर्माण झाल्या असत्या. पण भारतातील अशा प्रबुद्ध व्यक्तीही जातीची आणि समूहाची चौकट सोडायला तयार नव्हत्या’. भारतात इतक्या चळवळी होऊनही जातीचं जोखड दूर करता येत नाही. ‘वेस्टर्न लिबरलिझम’ इथं कसा हरला, हे पेन यांनी दाखवून दिलं आहे.

नायपॉल यांना भारताची लाज वाटायची. इथली घाण, जातीव्यवस्था आणि दुर्व्यवस्था त्यांना खुपायची. काश्मीरच्या डाल लेकच्या किनाऱ्यावर शौच करणाऱ्या व्यक्ती, उत्तर प्रदेशमधील छातीपर्यंत घुंघट घेणाऱ्या आणि घराबाहेर पडू न शकणाऱ्या स्त्रिया, आपल्या मुलांना काम करायला लावणारे पालक. शरम वाटायला लावणाऱ्या या वास्तवांमुळे भारताच्या प्रत्येक भेटीनंतर ते अस्वस्थ व्हायचे.

भारताताली कुटुंबव्यवस्था, समूदाय आणि धर्मभावनेमध्ये रोजचं भीषण वास्तव सुसह्य करण्याची शक्ती आहे, हे नायपॉल यांना सुरुवातीच्या काळात लक्षात आलं नाही.

पेन म्हणतात, ‘भारताबद्दल लिहायला लागल्यानंतर त्यांचं कादंबरी लेखन थंडावलं. भारतातल्या विसंगती त्यांच्या लक्षात आल्या. जुनाट रूढी परंपरांसोबत विज्ञान आणि कला, साहित्य, शास्त्र आणि समतेचा विचारही भारतात रूजतो आहे, याचं भान त्यांना आलं आणि त्यांच्यातला कडवेपणा कमी झाला. त्यांच्या भारतातल्या पूर्वजांच्या खेड्यातील धूळ त्यांना त्रास देत होती. पण अखेरीस त्यांना भारतातल्या अनेक वास्तवांच मर्म कळलं आणि ते भारताच्या छळणाऱ्या विचारातून मुक्त झाले’.

युरोपमधील आधुनिक आणि उदारमतवादी मुल्यांच्या संवेदना घेऊन नायपॉल भारताकडे बघत होते. मात्र उत्तरकाळात गांधींच्या ‘चष्म्या’तून त्यांना भारतातलं वास्तव दिसायला लागलं असंही म्हणता येईल. 

गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना कमी लेखणाऱ्या या काही उद्गारांसंबंधी बराच धुरळा उडतो. पण विरोधाभास असा की, अमेरिकेतील आफ्रिकन समाजाचे नेते डॉ. मार्टीन ल्युथर किंग ज्युनिअर यांना गांधींच्या सत्याग्रहाच्या संकल्पनेची भुरळ पडली. माँटेगोमेरीत सार्वजनिक वाहतुकीच्या आसनव्यवस्थेत वांशिक विभाजन करण्या आलं होतं. वंशभेद करणाऱ्या या व्यवस्थेविरोधात शांततापूर्ण आंदोलनं करण्यात आली. डॉ. किंग या लढ्याचं नेतृत्व करत होते. साल होतं १९५५. गांधीच्या शांततापूर्ण मार्गांचा अवलंब करण्यात आला होता. गांधीविचार वाचण्यापूर्वी डॉ. किंग यांना नैराश्य आलं होतं. किंग ख्रिश्चन धर्मोपदेशक होते. ‘लव्ह इन अ‍ॅक्शन’ हा संदेश त्यांनी आपल्या प्रार्थना सभांतून दिला होता, पण तो संदेशही त्यांना व्यर्थ वाटायला लागला. पण माँटेगोमेरी आंदोलनात त्यांना अचानक गांधी सापडले. न्यायालयानंही वाहतुकीतील वांशिक विभागणी घटनेचा भंग करणारी आहे, असा निर्णय दिला.

१९६० साली डॉ. किंग भारतात आले. गांधीविचार पुढे नेणाऱ्या विनोबा भाव्यांशी त्यांची भेट झाली. जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा राजसन्मान केला होता.

किंग यांचा ४ एप्रिल १९६८ रोजी खून करण्यात आला, तेव्हा ते ३८ वर्षांचे होते.

डॉ. किंग यांना महात्मा गांधी सापडले, तसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर का सापडले नाहीत, हा प्रश्न पडतो. तसंच डॉ. आंबेडकरांच्या पाश्चात्य शिक्षणातून मिळालेल्या उदारमतवादी संवेदनांचं भारतात काय झालं, याचा उहापोह जेफरी पेन यांनी का केला नाही याचंही आश्चर्य वाटतं.

शांततापूर्ण सत्याग्रह करून अमेरिकेतल्या आफ्रिकन वंशीयांना सामाजिक समानता मिळाली नाही, तसंच अस्पृश्यता पालन बेकायदेशीर होऊनही दलितांवरील हिंसा थांबलेली नाही.

गांधींना ग्रामस्वराज हवं होतं. खेड्यातच दलितांवर अधिक अत्याचार होतात आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी संसाधनंच मिळत नाहीत, असं डॉ आंबेडकरांचं प्रतिपादन होतं. म्हणूनच ‘खेड्याकडे चला’ या घोषणेविरोधातील ‘खेडी सोडा’ हा विचार डॉक्टरांनी दिला होता. ‘व्यक्ती हेच राज्यकारभाराचे एकक- युनिट असावं’ असा डॉ. आंबेडकरांचा विचार होता. या विचारांचं मूळ पाश्चात्य उदारमतवादी लोकशाही संकल्पनांमध्ये सापडतं.

महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांच्या वादांमधून गांधींचंही उन्नयन झालं. कारण त्यांच्या विचारांना डॉ. आंबेडकर बौद्धिक आणि नैतिक आधारावर आव्हान देत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात आंबेडकरांचे विचार सार्वजनिक चर्चेत आले.

पाश्चात्य विचारांप्रमाणे इंग्लिश भाषाही भारतात आली आणि दलितांसाठी ती मुक्तीदात्री ठरली. दलित संशोधक आणि लेखक चंद्रभान प्रसाद म्हणतात, ‘डॉ. आंबेडकरांनी इंग्लिश भाषेची तुलना वाघिणीच्या दुधाशी केली होती. ते दूध जे पितील ते बलवान होतील’.

डॉ. आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी इंग्रजीचं ज्ञान मिळवलं. कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. पण या ज्ञानाचं भारतात काय झालं? डॉ. आंबेडकरांना बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाडांनी शिक्षणासाठी निधी दिला होता. शिक्षण संपल्यावर आंबेडकर बडोद्यात दाखल झाले. बडोदा दरबारी त्यांना नोकरी मिळाली होती. पण शहरभर त्यांना घर मिळेना. आंबेडकर पोचायच्या आत घरमालकांना त्यांची जात समजलेली असायची. पाश्चात्य शिक्षणाचं भारतातलं असंही एक फलित होतं.

गांधी आंबेडकरांचे वेळोवेळी वाद व्हायचे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे, असं गांधी डॉक्टरांना म्हणाले होते. ‘आम्हाला मातृभूमीच नाही’, असं उत्तर डॉ आंबेडकरांनी दिलं होतं.

१५०व्या वाढदिवसानिमित्तगांधींचं स्मरण करताना डॉ. आंबेडकरांचही स्मरण करायला हवं.

............................................................................................................................................................

रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India

............................................................................................................................................................

लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......