अजूनकाही
आगामी ९३व्या साहित्य संमेलनाची नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राचं नुकतेच प्रकाशन झाले आहे. प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती संपली. त्यातील हे एक प्रकरण...
.............................................................................................................................................
…३० मे २००७ रोजी मी ‘सुवार्ता’च्या कार्यालयाचा अखेरचा निरोप घेतला. त्या रात्री टोरांटो येथील आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेसाठी मी विमानाने निघालो. माझे मन ‘सुवार्ता’ कार्यालयात रेंगाळत होते. अडीच तपांचे माझे तेथील वास्तव्य, त्या काळात घडलेल्या घटना, घेतलेले निर्णय, अनुभवलेले समाधानाचे नि संघर्षांचे प्रसंग, छेडलेली आंदोलने, जोडलेली नातीगोती, भेटलेल्या व्यक्ती, विभूती… आठवणी काही पाठ सोडायला तयार नव्हत्या… सारे सारे चलच्चित्रपटाप्रमाणे मन:चक्षूंसमोरून सरकत होते… विविध विचारांचे, भावनांचे काहूर मनात माजले होते… मी माझ्या कार्यात आणि लोकांत किती खोलवर गुंतलो होतो, याची जाणीव झाली.
दुसऱ्या दिवशी परदेशाच्या भूमीवर पाऊल टाकले. मित्र, स्नेह्यांनी स्वागत केले… पत्रकार परिषदेत बरेच नवे आणि निराळे शिकायला मिळाले. नवे मित्र मिळाले. परिषद आटोपून मी न्यूयॉर्कजवळच्या लाँग आयलंडवरील मॅनहॅटन येथील सेंट मेरी चर्चमध्ये रुजू झालो. अतिशय श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांची तिथे वस्ती आहे. या चर्चमध्ये मी चार महिने कार्य करणार होतो. माझ्याकडे भरपूर निवांत वेळ होता… चर्चचे प्रशस्त वाचनालय होते. प्रसिद्ध गूढवादी थॉमस मर्टन यांच्या साक्षात्कारवादावरील ग्रंथांचे वाचन सुरू केले. त्या ग्रंथांनी मला अंतर्मुख केले. निरासक्तीतील मुक्तपणाचे मूल्य मला पटवून दिले. एकदा बायबलचा पाठ वाचताना एका वाक्याने लक्ष वेधले, ‘अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव, तू आपले लोक व आपल्या बापाचे घर विसर…’ (स्तोत्र ४५:११).
मला माझ्या तन-मनाच्या गुंतलेपणाची तीव्र जाणीव झाली. मला उमजत गेले की, जेव्हा आपण ‘स्व’पासून दूर जातो, अलिप्तपणे ‘स्व’कडे पाहू लागते; तेव्हा आपल्याला आपल्या अंतरात्म्याचे अधिक वास्तववादी दर्शन घडते. आसक्तीचे धागे किती चिवट असतात, याची जाणीव होते. ती अनोखी प्रचिती होती. उदा. माझे कार्य, माझा मित्रपरिवार, सेवकवर्ग, सहकारी, वाचकवर्ग, चर्चमधील माझे पद व त्यातून मिळणारा सत्ताधिकार, माझी अभ्यासिका… वाऱ्यामध्ये कर्दळीचे झाड वरपासून खालपर्यंत थरथरावे, तशी एक शिरशिरी सर्वांगाला स्पर्शून गेली. मी शहारलो. भानावर आलो, जागृत झालो. आसक्ती ही अध्यात्माच्या मार्गातील कशी मोठी धोंड असते, हे समजून आले. त्या अनुभूतीमुळे माझा आत्मा जणू एखाद्या पिसासारखा वाऱ्यावर विहार करू लागला. आसक्ती म्हणजे आत्म्यावरचा शेंदूर. तो खरवडून काढला की, आपल्याला आपल्या शुद्ध रूपाचे दर्शन घडू लागते. क्षणभर का होईना, मुक्तीचे मोल समजून आले… मी शांत, शांत झालो… ‘हृदय आत्म्याला जधी खेळविते…’ त्या जातीचा हा अनुभव असतो.
गेली काही वर्षे तो अनुभव साथ करत आहे… कधी चंद्र ढगाआढ होतो, मग जीव गुंतू पाहतो… मी सावध होतो… आसक्ती-निरासक्तीचे गणित वाटते तितके सोपे नाही, असे ध्यानात आले. कधी होईल माझे मन पूर्णपणे निरभ्र? मी स्वत:ला प्रश्न करतो. उत्तरासाठी मी खोल, खोल, ‘आत’ पाहतो… आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चुकणार नाही का?
‘फादर, तुम्हाला कधी एकटं एकटं वाटतं का?’ असा प्रश्न अधूनमधून मला विचारला जातो.
वास्तविक एकटेपणा हा आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य अंश आहे. बाळ आईच्या गर्भात असते. आई गर्भाला प्राणापलीकडे जपत असते, तरी ते बाळ त्या अंधारात एकटेच असते… एकटेपणात त्याची वाढ होत असते. एकटेपण सोबत घेऊन ते या जगात येत असते. सावलीसारखे एकटेपण आपला सांगाती आहे… त्या एकटेपणाबरोबर अपुला अखंड संवाद सुरू असतो. आयुष्याच्या अखेरच्या श्वासानंतर आपले एकटेपण घेऊन आपल्याला नियंत्याच्या भेटीला जायचे आहे. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘…alone and speechless shall I stand before Thee face to face…’
४ डिसेंबर १९६८. माझा पंचविसावा वाढदिवस. मी सेमिनरीत होतो. माझ्या प्राध्यापकांनी व वर्गमित्रांनी माझ्या पंचविशीबद्दल मला शुभेच्छा दिल्या. माझ्यासाठी प्रार्थना केल्या. २५ वर्षे म्हणजे आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या रात्री मी सेमिनरीच्या चॅपलमध्ये खूप वेळ चिंतनात घालवला. सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. वेदीवर एक दिवा मिणमिणत होता. त्या पवित्र आणि गूढ काळोखात मी एकटा होतो… अचानक एक विचार मनात चमकून गेला - मी कुटुंबात शेंडेफळ. माझी सर्व भावंडे माझ्यापेक्षा मोठी… मी वयाने मोठा होत जाईन…, तीसुद्धा… आणि सर्वांग गोठवणारा विचार मनात आला… मी धाकटा… निसर्गनियमाप्रमाणे अनेक जण माझ्या अगोदर निघून जातील… मला हे सर्व पाहावे लागणार आहे. सामोरे जावे लागणार आहे त्या कटू सत्याला. मंदिरातील अंधाराप्रमाणे माझे एकटेपण गडद होत गेले.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आत्ममग्न झालो. जे जीवन नश्वर आहे, त्याला आपण किती घट्टपणे बिलगत असतो. आपण जगणे गृहीत धरतो. खरे म्हणजे मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. परंतु माझे तरुण मन मरणाचा अप्रिय विचार सहन करू शकत नव्हते.
आता मागे वळून पाहताना दिसते ती सुहृदांच्या मृत्यूची माळ. बहुतेक माझ्यापेक्षा ज्येष्ठ, काही लहान. मी दहावीत असताना बाबा गेले. एके दिवशी अभ्यास करत असताना बाबांची आठवण दाटून आली. त्यांची प्रसन्न मूर्ती नजरेसमोर तरळू लागली. मी खोलीत एकटाच होतो. मी स्फुंदून स्फुंदून रडलो. एकटेपणाचा मला आलेला हा पहिला अनुभव होता. दु:ख हे स्वभावाने एकटे असते. दु:खाचा क्रूस ज्याला त्याला एकट्यानेच वाहावा लागतो. मग ते दु:ख एक दिवसाच्या अनाथ बालकाच्या मृत्यूचे असो, की नव्वदी उलटलेल्या वृद्धाचे असो.
असाच एकटेपणाचा अनुभव थोरल्या भावाच्या (बाबूच्या) मृत्यूच्या दिवशी आला. बाबा गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर पोटच्या मुलासारखी माया केली. मी फादर झाल्यावर त्यांच्या मायेला उधाण आले. ते मला खूप जपत होते. मी आंदोलनात उडी घेतली. स्थानिक दहशतवादाविरुद्ध आम्ही एल्गार पुकारला. त्या वेळी बाबूने मला समजून घेतले व माझ्या भूमिकेचे समर्थनही केले. ते गेले (१० जून २००६) तेव्हा त्यांचे वय ८३ वर्षांचे होते. त्यांच्या संयमी व शिस्तबद्ध जीवनामुळे त्यांचा अखेरचा दिस सुंदर होता. उत्तररात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी त्यांना मूठमाती देऊन आम्ही चर्चमधून घरी परतलो. आंघोळी आटोपल्या. सर्वांनी मुक्यानेच चार घास घशाखाली ढकलले. रात्रभर जागरण झाल्यामुळे डोळे पेंगुळले होते. त्यांचा मुलगा मार्शल, त्याची पत्नी मीना व मुले आपल्या खोलीत गेले. वहिनी खाली तिच्या खोलीत व मी एकटा पहिल्या मजल्यावरील माझ्या खोलीत.
माझा डोळा काही लागत नव्हता. मी पलंगावर तळमळत होतो. मला घर रिकामे रिकामे झाल्यासारखे वाटत होते. आपण आपल्या अस्तित्वाने या पृथ्वीच्या पोकळीत ‘स्पेस’ व्यापत असतो. मृत्यूनंतर ती स्पेस मोकळी होते. ती रिकामेपणाने भरलेली असते. ते रिकामेपण आपल्याला बोचत असते, खुपत असते. तो अनुभव त्या दुपारी आला. स्थळापेक्षा काळ व्यापक असतो. काळ ती जखम हळूहळू भरून काढतो. तोपर्यंत काळजात वेदना घेऊन कसरत करत चालत राहावे लागते. अशा वेळी आसवे एकाकीपणाची आग विझवत असतात. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. मी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. आपल्या पदाला, वयाला हे शोभत नाही, असे मनाला बजावू लागलो, दटावू लागलो. मला एकटे वाटते, हे मला कुणाला दाखवून द्यायचे नव्हते. आपल्या साऱ्या दु:खांचा खजिना तळाशी ठेवून, राजहंस सरोवरात डौलाने पोहत असतो, त्याप्रमाणे आम्हा धर्मगुरूंना वागावे लागते. आम्हांला सर्वांसमोर अश्रू ढाळण्याची परवानगी नसते. वास्तविक अश्रू हे आपल्या माणुसकीचे पाझर आहेत, करुणेचे गहिवर आहेत.
मला राहवले नाही. मी उठलो. तळमजल्यावरील वहिनींच्या खोलीत गेलो. आई गेल्यानंतर वहिनी माझी आई झाली होती. हळूच दार ढकलले. वहिनी जागीच होती. पलंगावर बसली होती. कितीतरी रात्री तिने जागरणे केली होती. आज त्या खोलीत बाबू नव्हते! त्यांच्या नव्हतेपणाने ती खोली काठोकाठ भरली होती... घर रिकामे होते आणि नव्हतेदेखील… पाटीवरील रेघोट्या पुसाव्यात त्याप्रमाणे मृत्यूनंतर सारे काही नाही पुसले जात. विश्वरूप होऊन चैतन्यमय आत्मतत्त्व (Spirit) सूक्ष्मरूपाने रेंगाळत राहते… देहाची मर्यादा नसल्यामुळे ते अधिकच संचारी बनते. बाबू आम्हांला दिसत नव्हते, तरी जाणवत होते. घरात गूढ शांतता होती. आम्ही दोघे खूप वेळ एकमेकांच्या जवळ बसलो. ओठांतून शब्द फुटत नव्हते. मी सहज बोललो, ‘दादय, बाबूची खूप आठवण येतेय…’ वहिनी शांत होती. माझा बंधू निघून गेला होता. तिचा सुखदु:खाचा, स्वप्नांचा, साफल्याचा सहासष्ट वर्षांच्या सहजीवनाचा साथी निघून गेला होता... त्या मानाने माझे दु:ख हलके होते… आम्ही काहीच बोललो नाही.… ती शांतता खूप बोलकी होती. आमचे अश्रूच बोलत होते. दु:खाने आम्हांला किती जवळ आणले होते! माझे दु:ख वहिनीने तिच्या पदराखाली घेतले.
माझे दुसरे बंधू आलेक्स ऊर्फ नाना. वय वर्षे ८४. प्रकृतीने धडधाकट. सदा पायाला चक्रे बांधलेली. ते अचानक आजारी पडले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ते कोमात गेले. वसईहून आम्ही त्यांना बोरिवलीच्या ‘करुणा’ इस्पितळात हलवले. उपचार सुरू झाले, परंतु गुण पडला नाही. दिवा हळूहळू मंद होत आहे, असे डॉक्टरांनी सूचित केले. मलाही तसे जाणवले.
दिवसभर मी खूप थकलो होतो. फ्रेश होण्यासाठी मी जवळच असलेल्या पुतण्याच्या - चार्लसच्या - खोलीवर गेलो. तिथे अनेक नातेवाईक एकत्र बसले होते. मृत्यू चोरपावलांनी येत आहे, हे मला दिसत होते; परंतु त्यांना मी तसे स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो. त्यांना धीर देण्याचा केविलवाणा प्रयत्न मी केला. माझी छाती भरून आली. मी पुन्हा खोलीत गेलो. दार लावले… धडपडत्या नानाची धावपळ नजरेसमोरून सरकू लागली…. मला आठवली ती एक रात्र. फादर झाल्यावर एके दिवशी मला प्रचंड ताप भरला होता. अॅम्ब्युलन्सने मला वसईहून मुंबईच्या होली स्पिरीट इस्पितळात हलवण्यात आले. पोटात खूपच वेदना होत होत्या. मला डॉक्टरांच्या हवाली करून सगळे घरी निघून गेले. फक्त नाना माझ्यासोबत राहिले. माझ्या पलंगाशेजारी थंडगार फरशीवर त्यांनी ती रात्र काढली… असे हिमती नाना आता कॉटवर निश्चेष्ट पहुडलेले होते. भात्याप्रमाणे त्यांची छाती वरखाली होत होती… नि आमचीही. ते काही तासांचेच आपले सोबती आहेत, या विचाराने मला भरुन आले. छाती खूप जड झाली. वॉश घेऊन बाहेर आलो. काहीच झाले नाही, असा आविर्भाव धारण केला. माझा धीर सुटत चालला आहे, असे घरच्यांना जाणवू नये, म्हणून मी शिकस्त करत होतो. खरे म्हणजे माझे एकाकीपण झाकण्याचा तो दुबळा प्रयत्न होता. तसाच इस्पितळात धावलो. शेवटपर्यंत नानाच्या जवळ राहिलो. त्यांच्यासाठी बायबलचे वाचन केले… हळूहळू नानांचा श्वास थांबला (८ ऑगस्ट, २०१३). एका आयुष्याची अखेर झाली. जिने जीवनभर साथ केली, त्या नानीला नानांचा विरह असह्य झाला. वर्षभरात नानीही (१ सप्टेंबर २०१४) देवाघरी निघून गेली. नानी नानाची सावली म्हणून वावरली, ‘सूर्यास्त’ झाल्यावर नानीने स्वत:ला प्रश्न केला : आता मी येथे कशासाठी थांबले आहे?
आपल्या सुहृदांच्या मृत्यूमुळे पोकळी निर्माण होते. ती कुणीही भरून काढू शकत नाही. अगदी परमेश्वरदेखील ती तशीच राहू देतो. त्या पोकळीला खंबीरपणे भिडायचे असते, हे आयुष्याने शिकवले!
.............................................................................................................................................
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 02 October 2019
काय सांगताहात फ्रान्सिस तुम्ही ? आपल्या सुहृदांच्या मृत्यूमुळे पोकळी निर्माण होते, ती कुणीही भरून काढू शकत नाही .... ? पण इथे पोप तर येशूच्या मृत्यूची पोकळी मोठ्या तन्मयतेने भरून काढतोय धर्मांतरं करून. तुम्हाला माहीत नाही वाटतं? की येशू पोपचा सुहृदच नाहीये? मला तरी हीच शक्यता खरी वाटतेय. येशू हे पोपने तोंडी लावायला घेतलेलं व्यंजन आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान