‘द मॅट्रिक्स 4’ येतोय... आणि अर्थातच ओरॅकलही येतेय...
कला-संस्कृती - चलत्-चित्र
माधवी वागेश्वरी
  • ‘द मॅट्रिक्स 4’चं एक संकल्पित पोस्टर
  • Sat , 28 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र बेवसिरिज web series द मॅट्रिक्स The Matrix ओरॅकल Oracle

‘प्रेम’ या मानवी मूल्यासाठी मरण पत्करणाऱ्या निओसाठी लहानशा सतीनं सूर्य उगवला होता. कधीतरी पुन्हा निओ दिसावा अशी तिची आशा. तसं तिनं विचारलंही होतं आणि मग त्यावर नेहमीप्रमाणे ओरॅकल गूढ बोलली होती.

एक तप अधिक चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ओरॅकलचं गूढ बोलणं कितीसं समजलं आहे, हा प्रश्न आजही छळतो आहेच म्हणा.

ओरॅकलची पुन्हा आठवण आली, ती मागच्या महिन्यात ‘मॅट्रिक्स’ या सिनेमाचा चौथा भाग येणार असल्याची अधिकृत घोषणा त्याच्या निर्माणकर्त्यांनी केल्यावर... खरं तर ओरॅकलची आठवण येतच राहते अध्येमध्ये... त्यात या वर्षी ‘द मॅट्रिक्स’ (१९९९) च्या पहिल्या भागाला २० वर्षं पूर्ण झाली. मधल्या काळात खूप काही झालं. मॅट्रिक्स जगाचे कर्ते वाचोस्कीज ब्रदर्स (लॅरी व अँडी) लिंगबदल करून आता लाना आणि लिली वाचोस्की सिस्टर्स झाले आहेत. त्यांच्या नावामुळे त्यांच्या फॅन्सनी ‘नेटफ्लिक्स’वरची ‘सेन्स 8’ वेबसिरिज बघून काढली. वाचोस्कीज आपल्या चाहत्यांना निराश करत नाहीत, एवढं मात्र नक्की. खरं तर कधी कधी वाटतं आपण फ्लॅशबॅकमध्ये जगत आहोत. कारण २० वर्षांआधीच ‘मॅट्रिक्स’ या सिनेमानं व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत जगणाऱ्या माणसाला मशीननं कसं गुलाम केलेलं असतं असं दाखवलं होतं. आपली आजची परिस्थिती पाहता वेगळं काही सांगण्याची गरज नाही.

‘द मॅट्रिक्स’ (१९९९) या सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन फिल्मनं वेड लावलं नाही, असा सिनेप्रेमी मिळणं अवघड आहे. आजकाल ‘गेम ऑफ थ्रोन’, ‘नार्कोस’, ‘ब्रेकिंग बॅड’ इत्यादी वेबसिरिज किंवा ‘मार्व्हल मुव्ही युनिव्हर्स’ न पाहणाऱ्यांकडे ‘तुमच्या जगण्यालाच काही अर्थ नाही’, अशा नजरेनं बघतलं जातं किंवा तुम्हाला वाळीत टाकलं जातं, त्याची सुरुवात ‘द मॅट्रिक्स’नं केली होती, असं म्हणायला हरकत नाही.

‘द मॅट्रिक्स’, ‘द मॅट्रिक्स रिलोडेड’ आणि ‘द मॅट्रिक्स रिव्होल्यूशेन्स’, हे तीनही सिनेमे प्रदर्शित झाले, तेव्हा किती कळले हा मुद्दा नव्हता, आपण हे सिनेमा पाहिले यातच लोक धन्यता मानत होते आणि त्याची हिरवी जादू अभिमानाने मिरवत होते. कम्प्युटर सायन्स घेतलेले लोक तर या सिनेमानं वेडे झाले होते आणि आपण कसला भारी विषय करिअरसाठी निवडला म्हणून माज करत होते. मेंदूला कितीही मुंग्या आल्या तरी चालतील, पण मला या सिनेमातील प्रत्येक प्रसंग, त्यातील विज्ञान, तत्त्वज्ञान समजलं पाहिजेच यासाठी ज्यांनी हट्ट केला आणि ते समजून घेतलं, त्यांचा आनंद तर अवर्णनीय होता! आजही आहे!! मॅट्रिक्सचं जग समजून सांगणारे कितीतरी लेख आणि व्हिडिओज आज नेटवर उपलब्ध आहेत. सिनेमे तर आहेतच, पण त्यातून तयार झालेले व्हिडिओ गेम्सनीदेखील तरुणाईला वेड लावलं आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर सिनेमातील इतर लोकांनी या सिनेमांतून किती उचलेगिरी केली याला काही तोड नाही. जपानी अ‍ॅनिमेशन आणि मार्शल आर्टने प्रभावित असलेले मॅट्रिक्समधले अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस आपल्याकडच्या किती तरी हिंदी सिनेमांमध्ये उचलले, आजही उचलतात.

एकूणच कथेची गरज आणि अचूक व्यावसायिक गणितं बांधून नियो, ट्रिनिटी, मॉरफियस, एजंट स्मिथ यांना चौथ्या भागात आणलं जाईलच. पण खरं तर ओढ लागली आहे ती ओरॅकलची.

ओरॅकल हे मॅट्रिक्स ट्रायोलॉजीमधलं इतकं महत्त्वाचं पात्र आहे की, ते सिनेमापुरतं मर्यादित राहिलं नाही. ते सिनेमाला पुरून उरून पडद्याच्या बाहेर आलं. तिला आपण आपल्यासोबत घेऊन आलो. मानवाला मुक्तीचा मार्ग दाखवणारी ही बाई! पहिल्या आणि दुसऱ्या भागात म्हणजे ‘द मॅट्रिक्स’, ‘द मॅट्रिक्स रिलोडेड’मध्ये ग्लोरिया फोस्टर यांनी ओरॅकलची भूमिका केली होती. ग्लोरिया फोस्टर आज हयात नाहीत, २००१ साली त्या वारल्या. तिसऱ्या भागात म्हणजेच ‘द मॅट्रिक्स रिव्होल्यूशेन्स’मध्ये मेरी अ‍ॅलीसनं ही भूमिका केली होती. दोघीजणी रंगभूमीवरच्या कमालीच्या ताकदवान अभिनेत्री. ओरॅकल हे पात्र आफ्रिकन-अमेरिकन असणं याचं महत्त्व आणि थिअरीज मांडल्या गेल्या आहेत.

निवांत सिगरेट पित कुकीज बनवनारी ओरॅकल, मॉरफियस आणि निओला मार्ग दाखवू शकणारी ओरॅकल, थेट आणि भेदक बोलू शकणारी ओरॅकल... ठरवलं तरी या बाईचं शांत आणि धीरगंभीर बोलणं कायमचे खिळे मारल्यागत आत अगदी आत रुतून बसलं आहे.

ओरॅकल ही दुसरी-तिसरी कोणी नसून मानवाची मानसिकता समजून घेण्यासाठी तयार केलेला तो एक प्रोग्रामच आहे, हे समजल्यावर माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला बसलेला धक्का फार मोठा होता. कोणीतरी विश्वासघात केल्यासारखा. पण म्हणून का तिनं जे सांगितलं, त्याचं महत्त्व कमी होईल! सुरुवातीला केवळ भविष्यवेत्ती दिसणारी ही व्यक्तीरेखा दरवेळी फार सखोल आणि सकस बोलून जाते. ‘डेस्टिनी’ आणि ‘फ्री विल’ यामध्ये अडकलेला निओ. ओरॅकल त्याला ‘चॉईस’ अर्थात ‘निवडी’बद्दल सांगते. निओनं प्रेम निवडलं होतं आणि म्हणून तो मानव जातीला वाचवू शकला.

ओरॅकल केवळ ‘निवड’ करायला सांगत नाही, तर त्याची ‘जबाबदारी’ घ्यायला शिकवते. भविष्यात पुढे काय होणार याची आपण भीती बाळगून असतो, पण ते भविष्य कोणीही तुम्हाला येऊन सांगणार नाही, तुम्ही तुमच्या निवडींमुळे त्या भविष्यासमोर जाऊन पोहोचतातच. ते सुंदर असेल की विद्रूप याची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे. आपल्या मर्यादा सांगताना ती म्हणाली होती, ‘No one can see.’ खरं पाहू जाता आपण कोणीही काहीही पाहू शकत नाही, आपण सर्वजण आपल्या समजुतीच्या मर्यादांनी बांधले गेलो आहोत. त्याच मर्यादित कुंपणामध्ये आपण निवडत राहतो. म्हणून प्रेमाशिवाय पर्याय नाही. मशीनलादेखील प्रेम ही भावना समजून घ्यावी लागेल.

आर्किटेक्टनं ओरॅकलला विचारलं होतं - How long do you think this peace is going to last?

ती म्हणाली होती  - As long it can.

...आणि आता चौथा भाग येऊ घातला आहे. त्याला लागणार होता तेवढा वेळ लागला.

मॉरफियसनी दिलेल्यांपैकी लाल रंगाची गोळी फक्त निओनच नाही, तर आपणही माणूस म्हणून निवडली होतीच की! त्यामुळे या वंडरलँडमधलं सशाचं बीळ जितकं खोल जाईल, तितकं खोल आपल्याला उतरावं लागणार... मागे नेणारे अज्ञानाचे रस्ते आता कायमचे बंद. आता फक्त सत्य आणि ओरॅकलची साथ. ती म्हणाली होती, तसं But I believed, I believed.

.............................................................................................................................................

लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 

madhavi.wageshwari@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

RAJESH MOHITE

Mon , 30 September 2019

मी बघितलेला आणि विचार करायला भाग पडलेला सर्वोत्तम चित्रपट माझ्या mobile मध्ये अजूनही 3 ही भाग आहेत व त्याचा संवाद खूप वेळ ऐकतो


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख