अजूनकाही
मराठीतील प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. गेल्या वर्षी याच दिवशी त्यांचं काहीसं धक्कादायक म्हणता येईल अशा पद्धतीनं निधन झालं. त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त रोहन प्रकाशनानं त्यांची ‘वाचा, जाणा, करा’ ही नऊ पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे.
‘नकटीचं नाक’, ‘पाणीदार डोळे’, ‘न ऐकणारे कान’, ‘केसांची करामत’, ‘डोकं आहे का खोकं’, ‘घड्याळाचे हात आणि टेबलाचे पाय’, ‘बोंबलणारा घसा’, ‘दातांमागची भुतं’ आणि ‘पोटाचं कपाट’, असा हा एकंदर नऊ पुस्तकांचा संच आहे.
मुलांसाठी मराठीमध्ये बरंच लिहिलं जातं. पण त्यातलं बरंचसं भाषांतरीत, रूपांतरीत किंवा आधारित असतं. स्वतंत्रपणे, कल्पकतेनं आणि मुख्य म्हणजे मुलांचा विचार करून जाणीवपूर्वक बालसाहित्याची निर्मिती फार कमी प्रमाणात होताना दिसते. माधुरी पुरंदरे हे कल्पकता, नावीन्य आणि प्रयोगशीलता यांबाबतीतलं मराठी साहित्यातलं प्रधान नाव. त्यांच्यानंतर अलीकडच्या काळात कविता महाजन यांनी कल्पकता, नावीन्य आणि प्रयोगशीलता हे उद्देश समोर ठेवून मुलांसाठी लेखन केलं आहे. प्रस्तुत पुस्तक-मालिका हे त्याचंच एक उदाहरण आहे.
मुलांची मराठी भाषेची जाण वृद्धिंगत व्हावी, त्यांची शब्दसंपदा वाढावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही पुस्तक-मालिका कविता महाजन यांनी लिहिली आहे. या मालिकेतील नऊ पुस्तकांमध्ये मुलांना आपल्या शरीरातील विविध अवयवांची अतिशय रंजक पद्धतीनं ओळख करून दिली आहे. मुलांना कुठलाही उपदेश न करता किंवा त्यांना बौद्धिक न ऐकवता मैत्रेयी या पात्राच्या माध्यमातून कविता महाजन यांनी प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला एक रंजक गोष्ट सांगत एका अवयवाची माहिती करून देतात.
पण केवळ अवयवाची माहिती गोष्टीतून करून देऊन त्या थांबत नाहीत. कारण गोष्टीत ऐकून-वाचून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा स्तुत्य प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्येक पुस्तकातील गोष्टीनंतर दोन रंजक, गमतीशीर आणि मुलांच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिली आहेत.
आता गोष्ट झाली, ती वाचून-ऐकून पडलेल्या प्रश्नांची उत्तरंही मिळाली. पण मुलांसाठी हे इथंच थांबत नाही किंवा थांबू नये. जी गोष्ट माहीत झाली, तिच्याशी संबंधित अजून थोडी रंजक माहिती मुलांना दिली तर ती गोष्टीइतकीच ती माहिती जाणून घेण्यातही रमतील, या हेतूनं पुढे रंजक माहितीचा विभाग आहे. त्यात त्या त्या पुस्तकाच्या विषयानुसार काही रंजक, वैज्ञानिक आणि मुलांच्या सामान्य ज्ञानात भर घालेल अशी माहिती दिली आहे.
ही माहिती देताना कल्पकता, रंजकता आणि मुलांचं कुतूहल शमेल हा विचार करून आवश्यक तेवढीच माहिती नेमकेपणानं दिली आहे.
पुस्तकातल्या या तीन पायऱ्या पूर्ण झाल्यानंतरची चौथी पायरीही तितकीच रंजक आहे. कारण त्यात पुस्तकाच्या विषयानुसार संबंधित मराठी म्हणी दिल्या आहेत. या म्हणी निवडतानाही मुलांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना त्या सहज समजतील यांचा विचार केला आहे. शिवाय सुभाषितवजा, ठसकेदार, नेमका अर्थबोध सांगणाऱ्या म्हणी, वाचताना मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही मजा येईल. कारण यातल्या अनेक म्हणी आपल्या दैनंदिन व्यवहारातून, संभाषणातून जवळपास नाहीशा झाल्या आहेत किंवा त्यांचा वापर थांबला आहे. दैनंदिन संभाषणाची खुमारी या म्हणींमुळे वाढू शकते आणि मराठी भाषेतील गमतीजमतीही मुलांना सहजपणे समजू शकतात. भाषेचा वापर रंजक पद्धतीनं करून दिला तर भाषा चांगल्या प्रकारे आणि लवकर आत्मसात करायला मुलं शिकतात, शिकू शकतात, हा विचार कविता महाजन यांनी केला आहे.
म्हणींच्या गमतीजमतीनंतर त्या म्हणींचा वाक्यांत उपयोग करून दाखवण्याचा स्वाध्याय दिलेला आहे. गोष्ट, प्रश्न, रंजक माहिती आणि म्हणी अशी मुलं जेव्हा क्रमाक्रमानं इथपर्यंत येतील तेव्हा त्यांच्यासाठी हा स्वाध्यायही तितकाच रंजक होईल, याचा विचार करून तो दिलेला आहे.
थोडक्यात ‘वाचा, जाणा, करा’ या पुस्तक-मालिकेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील -
१) आपल्या शरीरातील अवयांची गोष्टीरूप पद्धतीनं दिलेली रंजक माहिती
२) मराठीतील भाषिक गमती-जमती
३) अवयवांच्या अनुषंगाने असलेल्या म्हणी, वाक्प्रयोग आणि त्यांच्या उपयोगासाठी स्वाध्याय
४) त्या त्या अवयवाच्या अनुषंगाने इतर सर्वसामान्य माहिती
५) मुलांना आवडतील अशी गिरीश सहस्त्रबुद्धे यांची चित्रं
६) आणि रोहन प्रकाशनाची सुंदर निर्मिती
.............................................................................................................................................
‘वाचा-जाणा-करा’ या पुस्तक-मालिकेतील नऊ पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5125/Bombalnara-Ghasa
https://www.booksnama.com/book/5118/datanmagachi-Bhuta
https://www.booksnama.com/book/5123/Doka-ahe-ka-Khoka
https://www.booksnama.com/book/5124/ghadyalache-haat-aani-tablache-paay
https://www.booksnama.com/book/5122/Kesanchi-Karamat
https://www.booksnama.com/book/5121/Na-eknare-kaan
https://www.booksnama.com/book/5117/Nakaticha-Naak
https://www.booksnama.com/book/5120/Panidar-Dole
https://www.booksnama.com/book/5119/Potacha-Kapat
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment