अजूनकाही
मुलं वाचत नाहीत, मुलांसाठी चांगलं साहित्य निर्माण होत नाही असं रडगाणं गात बसण्यापेक्षा आपल्याला जमेल ते आपण करावं अशी कविता महाजन यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी अत्यंत सहेतुकपणे बालसाहित्याचे लेखन केले होते. याच भूमिकेतून त्यांनी ‘इंद्रायणी साहित्य’साठी विविध लोककथांवर आधारित ‘जंगलगोष्टी’ ही मालिका लिहिली होती. मनोरंजक गोष्टींबरोबरच मुलांची जिज्ञासा पूर्ण करेल अशी माहिती, हस्तकलेची हौस भागेल अशी कृती असे या जंगलगोष्टींचे स्वरूप होते.
या गोष्टींच्या प्रकल्पानंतर मुलांसाठी ‘आपले आदर्श’ असे मध्यवर्ती सूत्र ठेवून भारतातल्या विविध क्षेत्रातल्या प्रेरणादायी व्यक्तींवर चरित्रं लिहायची अशी तिची योजना होती.
चरित्र या साहित्यप्रकारातून वाचनाबरोबरच प्रेरणाही मिळेल असा या मालिकेचा हेतू होता. या योजनेतून त्यांनी ३८४ वडाची झाडे लावणारी तिम्मक्का, हारगिला म्हणजेच क्षेत्रबलाकांचे संरक्षण आणि संवर्धन करणारी पौर्णिमादेवी बर्मन आणि कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करणारी के. विजया यांच्यावरील चरित्रं लिहायलाही सुरुवात केली. या चरित्रांपैकी तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन ही चरित्रे पूर्ण झाली, परंतु कविता महाजन यांच्या अकाली मृत्यूमुळे के. विजया यांच्यावरचे पुस्तक अपूर्णच राहिले. आता त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन ही दोन चरित्रं पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशित करत आहे.
तिम्मक्का या कर्नाटकातल्या निरक्षर स्त्रीने स्वतःच्या व्यक्तिगत दुःखावर मात करण्यासाठी वडाची झाडे लावली आणि त्यांचे संगोपन केले. हे करत असताना आपण पर्यावरण रक्षणाचे केवढे मोठे काम करतोय याची तिला जाणीवही नव्हती. आज तिला संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात ज्येष्ठ पर्यावरणवादी स्त्री म्हणून ओळखले जाते. वयाची शंभरी पार केलेल्या या आजीचे चरित्र बालवाचकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
याच मालिकेतील दुसरे पुस्तक पौर्णिमादेवी बर्मन या आसाममधल्या स्त्रीवर आहे. जैवविविधतेचा अभ्यास करताना हारगिला म्हणजेच क्षेत्रबलाक या विषयावर पीएच.डी. करणाऱ्या पौर्णिमादेवींना असे जाणवले की पीएच.डी.चा पुस्तकी अभ्यास करून पदवी मिळेल, मानमरातब आणि लठ्ठ पगाराची नोकरीही मिळेल, पण तोवर हारगिला पक्षी या जगातून नष्ट झाले असतील. त्यामुळे काळाची गरज ओळखून त्यांनी पीएच.डी.चा अभ्यास तात्पुरता बाजूला ठेवला आणि हारगिला पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आपले करिअरच नाही तर अख्खे आयुष्यच पणाला लावले. आसाममधल्या स्त्रिया आणि मुलांना एकत्र करून वेगवेगळ्या कल्पना लढवत त्यांनी हारगिला आर्मी अशी संघटना बांधली आणि सर्वतोपरीने हारगिला पक्ष्यांना वाचवले. आज पौर्णिमादेवींना स्थानिक पुरस्कारांपासून ग्रीन आँस्करसारख्या जागतिक पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
तिमक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन या दोन्ही चरित्रांमधली कविता महाजन यांची अर्थपूर्ण रेखाटने वाचकांना वेगळाच आनंद देतील. या चरित्रांमध्ये गोष्टीबरोबरच त्या त्या विषयाशी संबंधित असणारी मनोरंजक माहितीही वाचकाची जिज्ञासा पूर्ण करणारी आहे.
कविता महाजन यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंद्रायणी साहित्य ‘कंटाळ्याशी कट्टी’ हे कविता महाजन यांचे बालनाट्यही प्रसिद्ध करत आहे. साध्या साध्या गोष्टींनी सतत बोअर होणाऱ्या बच्चेकंपनीने कंटाळ्याशी कट्टी केली तर कशी मजा येईल याचे दर्शन या नाटकातून घडते. गाणी, नृत्य, नाट्य आणि मुख्य म्हणजे मुलांच्या भावविश्वातला कल्पनाविलास साधणारे हे धम्माल बालनाट्य सर्वच वयोगटातील वाचकांना आवडेल.
कविता महाजन यांची पुस्तके प्रकाशित करुन इंद्रायणी साहित्यने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद देऊन या लोकप्रिय लेखिकेला मानाचा मुजरा करण्याची जवाबदारी वाचकांवर आहे.
.............................................................................................................................................
पौर्णिमादेवी बर्मन यांच्या चरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5126/Hargila-Baydo
सालुमरद तिम्मक्का यांच्या चरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5127/Salumarad-Timakka
.............................................................................................................................................
लेखिका संजीवनी शिंत्रे व्यवसायाने शिक्षिका व ग्रंथसंपादक आहेत.
smita1707@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment