बंदिश म्हणजे काही भावगीत नव्हे!
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. भीमसेन जोशी यांची एक तल्लीन भावमुद्रा
  • Sat , 31 December 2016
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe बंदिश Bandish कुमार गंधर्व Kumar Gandharva

पं. भीमसेनजींचा किती बुलंद, गोड आवाज! किती ‘चैन’ बढतीमध्ये! तुमच्या मनावर कसा भावात्म परिणाम झाला? कोणते भाव मनात जागे झाले? मी नाही विचारणार. तुम्हाला श्रमपरिहार वाटला की, हुरहूर वाटले हेही नका मला सांगू. करुण की प्रसन्न? ‘कसं आणि काय सांगणार’ असंच तुम्ही म्हणणार आणि ते खरं आहे. पण ऐकायला आवडलं एवढं नक्की. मनाच्या तारा जुळल्या. बंदिशीचे शब्द ऐकू शकलात का? त्या शब्दांचा अर्थ लावावा असं तुम्हाला वाटलं का? शब्द ऐकला की, अर्थाचा बोध, निदान अंदाज बांधण्याचा प्रयत्न हा होतोच. “अब तो ऋतुमान रे नहीं बोलूंगी तुमसंग प्यारे, रैन जगाए प्रेम बढाए उन के जाओ जी जिन का मन भाये” आणखी एक पाठभेद – “अब तो ऋतुमान आये हो ना बोलूंगी पिया प्यारा, रैन जगाए, प्रेम बढाए जिन के जाओ जी मन भाये”. एका तद्दन हिंदी फिल्मी गाण्याच्या शब्दांची सहजच आठवण झाली – ‘पास नाहीं आना, तुम को सौंगद है के आज मुहोबत बंद है!” तर हे शब्द आहेत या बंदिशीचे. नायिका म्हणते – “मी ऋतुमती आहे-” आपल्या मध्यमवर्गीय, पांढरपेशा संस्कृतीत ही गोष्ट आरोही ठासून सांगण्याची आहे का? या बंदिशीचे शब्द, त्यांचा सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक दृष्टिकोन या सर्व गोष्टी जिज्ञासा जागृत करणाऱ्या नक्कीच आहेत. पंढरपूरच्या उत्पातांचा लावणीचा एक कार्यक्रम एकदा ऐकला होता. लावण्यांना या अशा विषयाचं कधीच वावडं नव्हतं. उलट किती तऱ्हांनी या विषयाचे उल्लेख आहेत लावणी वाङ्मयात. असो.

भैरवी रागातली ठुमरी आहे – “बाजू बंद खुल खुल जाय”. ठुमरी खूप जुनी आहे. फैय्याज खान साहेबांच्या आधीच्या पिढीच्या गायिकाही ती गात असत. ठुमरीचा शब्दार्थ शृंगारिक आहे, पण भैरवीच्या त्या सुरांचा ‘असर’ असा आहे की, मन ‘उन्मत’ व्हावं! गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना राग विलासखानी तोडीमधली ‘निके घुंगरिया’ ही बंदिश शब्दार्थाने रागभावाला अनुरूप वाटत नाही (आणि हे त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगितलंही आहे!). असं अनेक वेळा होतं की, राग, चांगला गायला\वाजवला गेला की, एक ‘दिव्य’ वातावरण उभं राहतं. एक भव्य, उदात्त उच्च दर्जाचा अनुभव मन घेतं आणि त्या रागाची बंदिश शब्दार्थाने मात्र सैंया, दैय्या वा सासू-नणंदेचं गाऱ्हाणं सांगत असते. १. रागदारी संगीतात असं का होतं? २. असं होणं ठीक आहे का आणि ३. ते टाळता येईल का?

असं का होतं, या प्रश्नाचं उत्तर रागसंगीताच्या उत्कर्षाच्या इतिहासात आहे. तुम्हा-आम्हा संगीताच्या श्रोत्यांना या इतिहासाशी काय देणं-घेणं असा विचार मनात येणं अगदी साहजिक आहे. इतिहास संशोधनाच्या काटेकोर शिस्तीत तो इतिहास सांगणं हे एका खंडात्मक ग्रंथाचं आणि या विषयाला सर्वस्वानं वाहून घेतलेल्या प्रकांड पंडिताचं काम आहे. (म्हणजे माझ्या छोट्याशा लेखाचं आणि माझं ते काम नाही, नाही का?) तरीही या इतिहासाची पुसटशी कल्पनासुद्धा आपल्याला रागसंगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन\परिप्रेक्ष्य देऊ शकते. बंदिशींची भाषा, शब्द आणि काव्यविषय हे रागसंगीताच्या इतिहास संशोधनाचं एक महत्त्वाचं साधन आहे, पण इथं तो विषय नाही. रागसंगीतात संगीतार्थानं बंदिशीच्या काव्यार्थाशी फारकत घेतली आहे का आणि घेतली असली तर ती का घेतली असावी असा विषय आहे.

फारकत घेतली आहे असं माझं (आणि अनेकांचं) निरीक्षण आहे. बंदिशीचे शब्द श्रोत्यापर्यंत पोचवणं हा गायकाचा उद्देश तर नसतोच, पण प्रयत्नसुद्धा असल्याचं सर्वसाधारणपणे दिसत नाही. त्या शब्दांचा भावार्थ संगीतानं समृद्ध करत जावं असा उद्देश गायक मनाशी बाळगत असेल असं मानणं कठीण आहे. गायक गाण्यासाठी - म्हणजे स्वर-लयीच्या आविष्कारासाठी - गातो.

मग असं असेल तर तो अर्थपूर्ण (निदान अर्थयुक्त) शब्द का वापरतो? त्याने केवळ निरर्थक उच्चार (ध्वनि) वापरावेत आणि असे ध्वनि-उच्चारच वापरले जाणारे गायनप्रकार अस्तित्वात होते, आणि आहेत! पण मग तरीही ‘बंदिश’ अर्थयुक्त शब्दांची का? इथेच ख्याल गायनाची मेख आहे. ख्याल गायन हा संगीताच्या विविध प्रवाहांचा संगम आहे. शब्दभाषेचा वापर न करणाऱ्या संगीताचा एक प्रवाह आहे. वाद्यं तर शब्दभाषा उत्पन्न करू शकत नाहीत. वाद्यांचं कंठानं अनुकरण करणं हा एक प्राचीन संगीत प्रवाह आहे. संपूर्णपणे निबद्ध म्हणजे पूर्वनियोजित गायन-वादन असा प्रबंध गायनाचा एक प्रवाह ‘ख्याल’ या प्रकाराच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात होता. एतद्देशीय आणि परकीय जेत्यांबरोबर आलेले लोकसंगीताचे प्रवाह होते. कवाली हा त्यापैकीच एक.

या सर्व प्रवाहातून सांगीतिक आणि अन्य सामग्री घेऊन ‘ख्याल’ हा गानप्रकार (आकृतिबंध) उत्क्रांत झाला आहे. ख्यालापूर्वी गीत होते. त्यात शब्द आणि ताल-सूर हातात हात घालून होते. त्या गीताची ‘जमीन’ ख्यालाने स्वरलयीच्या अधिकाधिक उत्कर्षासाठी उपयोगात आणली. गीतामध्ये सांगीतिक विस्ताराच्या जागा शोधून संगीताचा परिपोष करण्याच्या प्रयत्नातून ‘ख्याल’ विकसित झाला असावा. सोप्या भाषेत ‘गीत’ सांगीतिक अभिव्यक्तीच्या गरजेपोटी ताणून ख्यालापर्यंत आणलं गेलं असावं. या ताणाताणीत गीताचा आकार लहान झाला. म्हणजे ओळींची संख्या कमी झाली. जुन्या काही ख्यालांना मुखडा (धृपद) आणि दोन अंतरे (कडवी) आहेत. पण मुखडा आणि एकच अंतरा असलेले ख्यालच अधिक रूढ आहेत.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर अनेक गवई फक्त मुखडा गाताना दिसतात. बऱ्याचदा अंतऱ्याची गायकांना गरज भासत नाही. गीताचा आकाराबाबत संकोच झाला तसा अर्थाबाबतही संकोच झाला. गायकांचं मन संगीतार्थ खुलवण्याकडे वाढत गेलं आणि शब्दार्थ सजवण्यात त्यांचं स्वारस्य कमी झालं. इतकं की हळूहळू त्यांना शब्दार्थाचं भानही उरलं नसावं. ज्या मूळ स्रोताकडून सुरुवातीला शब्द ही सामग्री गायकानं ख्याल बांधण्यासाठी घेतली, त्या स्रोतांशी पुढे गायकाची नाळ जुळलेली राहिली नाही. शब्द राहिले, शब्दार्थाशी देणं-घेणं उरलं नाही. इतकं की, त्या शब्दांची किंवा त्या शब्दार्थाची गवयांना अडचणही वाटली नाही. श्रोत्यांना पूरिया धनाश्री ऐकवायचा आहे, तर ‘अब तो ऋतुमान…’ कसं गाऊ असं काही गवयांना वाटलं नाही, इतके गवई पूरिया धनाश्रीमध्ये गुंगून गेले. त्यांनी श्रोत्यांना गुंगवून टाकलं आणि श्रोतेही पढिक नसल्याने पूरिया धनाश्रीच्या रसास्वादात अडचण आली नाही.

ख्यालाच्या बंदिशीचे शब्द त्या त्या काळाच्या, सांस्कृतिक संदर्भाच्या खडकांपाशी अडकून पडले, पण संगीत मात्र पुढे पुढे वाहत गेलं. ख्यालाची ही मर्यादा आहे की यश? मला वाटतं यश अधिक आहे, मर्यादा कमी आहे. पहा तुम्हाला पटतं का!

आता दुसरा प्रश्न – असं होणं ठीक आहे का? अहो, पण असं झालं आहे. आणि आपण कोण हे ठीक की न ठीक ठरवणारे!

तिसरा प्रश्न – हे टाळता येईल का? का नाही टाळता येणार? नक्कीच येईल. प्रश्न फक्त एवढाच आहे की, हे टाळण्याची फार मोठी गरज आहे का? नव्या बंदिशी नवे रचनाकार नवं भान ठेवून नक्कीच रचू शकतील. (पण असे प्रयत्न विरळाच आहेत!) परंपरेतही एका रागात अनेक बंदिशी उपलब्ध असल्यावर गायकांनी आपल्या धारणेनुसार बंदिशींची निवड केली असावी. आजचा गायकही बंदिश निवडताना मला नाही वाटत, त्या बंदिशीच्या शब्दार्थाला प्रथम प्राधान्य देत असेल. नव्या बंदिशींना जुन्या, परंपरागत बंदिशींशी स्पर्धा करणं खरंच सोपं नाही! परंपरेत अनेक वर्षं गायलेली बंदिश ‘सिद्ध’ झालेली असते. तिचा शब्दार्थ काहीही असो, तिचा नाट्यगुण, तिचा डौल त्या शब्दरूपाशी विद्यार्थिदशेपासून झालेली जवळीक, या सर्वांमुळे गायकाला ती आपलीशी वाटते.

काही उल्लेख केल्याखेरीज हा लेख पूर्ण करणं बरोबर होणार नाही. पूर्वीचे काही गायक\गायिका बंदिशीच्या शब्दांबद्दल सजग, संवेदनशील नक्कीच होते. एकतर त्यांनी संगीतार्थाला प्रतिकूल अशा बंदिशी गायल्या नाहीत. रागसंगीतात राग-समय, राग-ऋतु हे साहचर्य सुप्रस्थापित आहे. या साहचर्याला अनुलक्षूनच बंदिशी त्यांनी निवडल्या किंवा रचल्या. त्यामानाने राग-भाव साहचर्य विवाद्य आहे. या साहचर्याच्या सूक्ष्म छटांत ते शिरले नाहीत. किशोरीताई सांगतात की, त्यांच्या गुरू आणि आई मोगूबाई या बोल आलाप करतानासुद्धा बंदिशीच्या शब्दांचे ऱ्हस्व-दीर्घ जपत असत. संगीताच्या सोयीसाठी शब्द अर्धवट तोडलेला त्यांना चालत नसे. शब्द एकदा वापरायचा असं ठरवल्यावर त्याचा मान राखला गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.

पंडित कुमार गंधर्व यांनी खूप बंदिशी रचल्या आणि प्रत्येक बंदिशीत शब्दार्थ, शब्दनाद आणि संगीतार्थ यांचा आपल्या मनासारखा मेळ बसतो आहे, याबाबत कटाक्ष ठेवला. कुमारजींची राग ‘श्री’मधील ‘कर न दे रे कछु लला रे’ ही बंदिश जरूर ऐका (मला या बंदिशीने चक्रावून सोडलं होतं!) राग काही विवक्षित\नेमकं सांगतो असं गायकाला (रचनाकाराला-वाग्गेयकाराला) मुळात वाटतं का? ती अनुभूती शब्दांच्या चिमटीत तो पकडू शकतो का? आणि पुन्हा पुन्हा ती बंदिश गाताना तो राग तेच सांगत राहील अशी खात्री तो देऊ शकतो का, खूप प्रश्न आहेत. बंदिश म्हणजे काही भावगीत नव्हे!

बंदिश रागाची शकल दाखवले असं म्हणतात. एकाच रागातल्या अनेक बंदिशी गायल्या\एकल्या की एका रागाच्या अनेक छबी दिसून रागाचं व्यक्तिमत्त्व उमजू लागतं.

बंदिश मंत्रासारखी असावी, सूत्ररूप, अल्पाक्षरी, सिद्ध आणि अनेक तरंग उत्पन्न करू शकणारी! बंदिशीनं गाणाऱ्यासाठी आणि ऐकणाऱ्यासाठी खूप जागा द्यावी. अवकाशाचं सूचन करून अवकाश भरून काढण्याची उर्मी द्यावी…

पहा तुम्हाला अशा बंदिशी सापडतात का?

 

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

Post Comment

Vijay Joshi

Mon , 02 January 2017

Chan lihale aahe mi kinva maze guruji matr bandisincha vapar prasanganusar karato mhanje mandirat karyekram asel tar are man ram ha khyal gato. Rain ka sapana nahi arthat yasathi ekach ragachya anek bandishincha "stock""Asane garajeche aahe tasech sangitik drushtine rag aalavta aala tari to tya bandishichya vajanane develop karata aala pahije durdaivane tasha approach ne talim dili jat nahi tasech khas bandishi sudhha khas shishyana shikavly mule sagalya vidyartyana sagalya bandishi milat nahit mag te konachyakadun tari ardhvat aikun gatat. Tyana jar ti bandishach nit kalali nasel tar tyapramane upaj kay karanar....aso. Pan tumhi changly vishayala hat ghatla aahe yabaddal abhinandan tasech Tummala vinanti ki he tumachya facebook wallvar pan taka aani sangitik mitrana tag kara. Changla vishay aahe dhanyavad


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......