तू अशी गेलीस, त्यासाठी तुला कधीच माफ करणार नाही!
पडघम - साहित्यिक
दिशा महाजन
  • कविता महाजन आणि दिशा महाजन
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख... महाजन यांच्या मुलीनं लिहिलेला...

.............................................................................................................................................

प्रिय आई,

हे पत्र लिहिण्याआधी किती विचार केला मी, किती मनोरे बांधले आणि किती पानं रखडली! आपण एकाच घरात राहूनपण एकमेकांना सतत पत्र लिहायचो. काय वाटते, काय चुकते, काय सांगावेसे वाटते सगळे शब्दरूप होऊन कागदावर उमटायचे. त्यानंतर किती गोष्टी सोप्या व्हायच्या!! अवघड वाटणारी संभाषणं क्षणार्धात सहज होऊन जायची!!!

मागच्या वर्षी २५ सप्टेंबरला दुपारी तुला हॉस्पिटलमध्ये अॅडिमट केलं आणि नंतर काय झालं हे तुला सांगायची संधी कधी मिळालीच नाही म्हणून हे पत्र. आपण दोघी आजारी होतो तेव्हा. त्यात तुला अॅडिमट केलं. चित्रा आजी-अरुण आबांना कळवलं आणि ते त्यांचं सगळं प्लॅनिंग बाजूला ठेवून भेटायला आले आणि परत औरंगाबादला गेलेच नाही, पूर्णवेळ माझ्या सोबतच राहिले. माझे कॉलेजपासूनचे सर्व मित्रमैत्रिणी धावून आले. तुझे फेसबुकवरचे काही मित्रमैत्रिणीदेखील भेटून गेले. सगळं ठीक होईल वाटलं. २६ तारखेला माझी तब्येत अधिक ढासळली. पण मी आजारी पडले तर तुला कोण सांभाळेल या विचाराने मी कुणाला काही सांगितले नाही, पण डॉक्टरांनी मात्र मला घरी जाऊन आराम करायला सांगितले. त्या सकाळी मी तुला शेवटचं ‘जिवंत’ पाहिले.

संध्याकाळी आले तेव्हा तुला व्हेंटीलेटर लावलेला पाहिला. पण तो तात्पुरता असल्याचे समजले. २७ला डॉक्टरांनी मला पण अॅडमिट करून घेतले. दुपारी तुला बघायला आले तर शंभर नळ्यामध्ये गुरफटलेल्या जिवासारखी वाटत होतीस. निश्चल. अबोल. संध्याकाळी सातच्या सुमारास डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की, आता काही होऊ शकत नाही. मला अजूनही आठवतं माझ्या बाजूला तन्वी उभी होती. मी एक दीर्घ श्वास घेऊन त्यांना सांगितलं की, ‘थांबवा, आता मग, व्हेंटीलेटर काढून टाका. तिला नको होतं हे काही. तसं तिने सांगून ठेवलं होतं. पण मला एकदा तिला शेवटचं बघू द्या. नळ्या काढलेला तो निश्चल देह मला बघवणार नाही.’ ते ‘ठीक आहे’ म्हणाले. तुला तेव्हा पाहिलं, तेव्हा अगदी दगडाच्या देहाकडे पाहत आहे असं वाटत होतं. तुझ्या दाट केसांतून हात फिरवत जेव्हा मी तुला एका वाक्यात ‘thank you’ आणि ‘sorry’ म्हटलं तेव्हा खूप रडायला आलं. वाटलं तू आत्ता उठशील आणि म्हणशील, “खूप झाली नौटंकी, कामाला लागा आता.” पण ते कधी झालंच नाही.

परत माझ्या खोलीत आले, तेव्हा अचानक खूप शांत झाले. पटापट निर्णय घेऊ लागले. त्या क्षणी हे जाणवलं की तू यासाठी मला तयार करत आली आहेस. तू नेहमी मृत्यू, आयुष्य, त्यानंतर घ्यावे लागणारे निर्णय याबद्दल बोलायचीस. त्यामुळे त्या क्षणी काय करावं लागेल हे मला माहीत होतं. सगळ्यात आधी तर डोळे पुसून तुझ्या मृत्युच्या बातमीचे एक अधिकृत पत्र लिहिले. डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की, इन्फेक्शनमुळे तुझे अवयव किंवा देहदान करता येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे ठरवले. सगळ्यात पहिला फोन जोयानाच्या घरी केला. जोयानाच्या वडिलांना फोन करून तुझ्या मृत्यूची बातमी द्यायला तन्वीला सांगितले. जोयानाची आजी, आई, बाबा आणि इतर कुटुंबियांशी तुझा असलेला खास सलोखा अजूनही जाणवत राहतो.

तुझा मृत्यू झाला त्या रात्री आबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की, “आई नाही, बाप नाही, पण तुझा आजा आहे, लक्षात ठेव.” ते अजूनही माझ्या पाठीशी आहेत आणि असतील.

तू गेल्यानंतर भरपूर लोक आले. अनेकांना मी ओळखत होते, अनेकांना नाही. वैकुंठ स्मशानभूमीत उमाताई आणि दादा एका बाकावर बसलेले दिसले. उमाताईंना इतकं थकलेलं, दादांना इतकं अबोल मी कधीच पाहिलं नव्हतं. मी माझी ‘आई’ गमावली आणि त्यांनी त्यांची ‘मानसकन्या’! त्यांचं दु:ख मी कधीच समजू शकणार नाही.

त्यानंतरचे पुढचे तीन महिने मात्र खूप दगदगीचे गेले. तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या काही गोष्टी donate केल्या, काही तुझ्या मित्र-परिवारात वाटल्या, काही माझ्यासाठी ठेवल्या. ते तीन महिने मी अगदी practically decision घेतले. जणू आपण महिन्याचे सामान भरतो किंवा आठवड्याचा भाजीपाला करतो अगदी तसं. कारण तू मला हे सगळे निर्णय घ्यायला निर्णयक्षम केलं होतंस. याद्या करणे, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आधी अधोरेखित करणे, ठरलं की, निर्णय घेऊन मोकळे होणे, कुढत न बसणे हे सर्व ‘संस्कार’ तेव्हा कामी आले.

माझा कॅनडाचा व्हिसा आला आणि त्यानंतर तर सगळं अगदी मार्गी लावलं मी. अनेकांनी विचारलं पण की, तुझी आई वारली ना? मग तू असे decision घेऊन मोकळी झालीस? तुला दु:ख नाही होत? तुला मी रडताना पाहिलं पण नाही! तू तिचे कपडे असेच donate करणार? अनेकांना मी कोडगी पण वाटले. या परिस्थितीत तू मला म्हणाली असतीस की, लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, त्यांचं सगळं ऐकत बसलं तर आपण आपले कधी जगणार? आणि मी पण तेच केलं. ‘हो, मी अशीच आहे’ म्हणत पुढे चालत राहिले.

मी कॅनडाला येण्याआधी बऱ्यापैकी गोष्टींची व्यवस्था लावणे गरजेचे होते. इथे आल्यावर अर्चना मावशी आणि अतुल काकाची सोबत असेल हे माहीत होतं. त्यामुळे नवीन देशात जायचं त्याची तयारी कमी आणि आपला देश सोडायचा याची तयारी जास्त होती. पण इथं आल्यावर मात्र करायला काही उरलेच नाही. मग मात्र मी खूप रडले. अजूनही कधी कधी रडते. रात्री झोपताना, दिवसा अभ्यास करताना अचानक, सबवे किंवा बसमध्ये तुझी आठवण आली की, रडून घेते. आणि मला नाही वाटतं हे रडणं किंवा दु:ख कधी थांबेल किंवा तसं वाटण्यात काही चुकीचं आहे. आता तू म्हणशील की, “आपले प्रॉब्लेम्स छोटे असतात आणि इतरांचे मोठे. जास्त विचार करू नकोस. पुढे सरक.” पण इथं तुझं चुकतं. छोटे असो वा मोठे, प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स असतात. एका माणसाच्या अडचणी आणि दु:खाची तुलना तुम्ही दुसऱ्या माणसाशी करू शकत नाही. तू मला निर्णयक्षम बनवलंस, पण मृत्यूच दु:ख कसं सहन करायचं हे नाही शिकवलं. तू मला सांगत गेलीस की, तू गेल्यानंतर काय practically आणि legally करायचं, पण तीन-चार महिन्यांनंतर एकटेपणाचं काय करावं हे कोण सांगणार? रोज रात्री घरी आल्यावर माझी पांचट बडबड कोण ऐकणार? माझी वर्गमित्रांशी होणारी भांडणं कोण ऐकणार आणि फुकटचा उपदेश कोण करणार?

माझ्या आयुष्यात पुढे येणारे खूप मोठे milestone तू मिस करणार आहेस. मला दिलेली वचनं तू मोडत आहेस आणि मी तुला केलेली प्रॉमिसेस पूर्ण करण्याची संधीपण गमावली आहेस. लोकांना जळी-स्थळी-काष्ठी देव दिसतो, तसं मला किस्से आणि घटनांमध्ये तू दिसतेस आणि विरून जातेस. तू अशी गेलीस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. पण तू मला दिलेल्या निर्णयक्षमतेच्या ताकदीसाठी तुला ही एक चूक माफ.

बाकी मला विचारू नकोस की, मी कशी आहे. अगदीच हवं असेल तर मी मजेत, खुश किंवा मस्त असं उत्तर देईन. मी जगत आहे. तुझ्याशिवाय आनंदी, happening आणि प्रफुल्लित जगण्याचे मार्ग शोधत आहे. या एका वर्षात स्वत:मध्ये घडलेले आमूलाग्र बदल अनुभवत आहे. आपण पडलो तरी पकडायला कुणीतरी आहे, हे विसरून नव्यानं धडपडायला शिकत आहे. नवीन देशात स्वत:ची नवी ओळख तयार करण्याच्या प्रयत्नात मग्न आहे. पण एकटी नाहीये आणि कधीच नसेन. अर्चना मावशी आणि अतुल काका या सगळ्यात मला खूप सांभाळून घेत आहेत. मुग्धा मावशी (कर्णिक) आणि स्मिता मावशीशी (शिंत्रे) आठवड्यातून एकदा तरी बोलणं होतं. मित्र-मैत्रिणींशी मात्र जवळ जवळ रोज बोलणं होतं. माझ्या दैनंदिन आयुष्यात काय चाललं आहे, याची सगळी खबरबात त्यांना असते, तुझी कमी ते भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काळजी नसावी.

तुझी,

दगड दिशा

.............................................................................................................................................

दिशा महाजन यांचा मेल - mahajandisha93@yahoo.in

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......