‘कविता’ प्रत्यक्ष कृतीत उतरवता उतरवता खरी ‘कविता’ आयुष्यातून कधी गमावली, याचा मलाच पत्ता लागला नाही!
पडघम - साहित्यिक
वैभव छाया
  • कविता महाजन
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख... महाजन यांच्या एका मानसपुत्रानं लिहिलेला...

.............................................................................................................................................

पंखांचं काय झालं

याबाबत

मी कधीच काहीएक बोलत नाही

एवीतेवी ते काल्पनिकच

मी सांगत आलेय फक्त

उखडल्या गेलेल्या हातांविषयी

सतत...

कविताताईच्या या ओळी आजही आठवत नाहीत असा एकही दिवस जात नाही. कथा आणि व्यथा यातला नेमका फरक माहीत असलेली, जाणीवेत आणि नेणीवेत अतिशय प्रगल्भ असलेली ही एकमात्र बाई, जीनं जगण्याच्या नव्या व्याख्या रचल्या. ती कायम उखडल्या गेलेल्या हातांना जगासमोर आणत राहिली. आज कविताताईला आपल्यातून जाऊन वर्ष झालं. दिवस भरभर सरून जातात. माणूस जातो, त्याच्यामागं कुणी जात नाही. जग त्याआधीही चालत आलेलं असतं, त्याच्यानंतरही चालूच राहणार असतं. पण काही माणसं असतात अशी, ज्यांच्या जगण्यानं इतरांना जगण्याचा आधार मिळत असतो. जगण्याचं कारण मिळत असतं. कविताताई अशीच होती.

मी आणि किशोरदा जगताप गमतीत तरीही तितक्याच जबाबदारी आणि गांभीर्यानं बोलायचो- ‘ज्याचं कुणी नाही त्याची तू कोयताताई. तुझ्या लेखणीच्या नि कृतीच्या धारदार कोयत्याने आमच्या दुःखाचे जाळे सपासप कापून पुन्हा आम्हाला उभी करणारी कोयताताई.’ ती जगली आपल्या अटीवर आणि तिनं जग सोडलं ते स्वतःच्याच अटीवर. अगदी शांतपणे, कुणालाच कसलीच चाहूल न लागू देता. ती गेली. लोकांनी, तिच्या चाहत्यांनी, तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांनी लिहिलं- ‘कविताताई गेल्या!’ माझ्यासाठी माझ्या जगण्याची, लिहिण्याची प्रेरणा, माझी कवितासुद्धा तिच्यासोबतच निघून गेली.

कविताताईनं माझ्यातल्या कवीला जन्माला घातलं, जोपासलं, वाढवलं, जिथं कुठं त्या रोपट्याला कीड लागतेय दिसताच हक्कानं दूषित पानं, मुळं कातरून काढली. या कातरण्याच्या जखमाही झाल्या अंगावर. त्या जखमाही तिनंच मायेनं भरून काढल्या. माझ्या अत्यंत कठीण काळात ती पाठीशी उभी राहिली. पण जेव्हा तिचा काळ आला, तेव्हा तिनं कुणालाच जवळ येऊ दिलं नाही. एकटीच काहीही न सांगता निघून गेली.

कविताताईचा आणि माझा परिचय फार अलीकडचा. मी फेसबुकवर आलो, तेव्हा तिला पाहिलं. वर्ष होतं २०१०. नुकताच विद्यापीठात शिकायला सुरुवात केली होती. पुस्तकांचं वाचन एका पठडीतलं होतं. तेव्हाचं फेसबुक आणि आत्ताचं फेसबुक यात खूप फरक होता. सुरुवातीला फेसबुकवर अनेक नामवंत लेखक नियमित लेखन करायचे. त्यांचे नियमित वाचक होते. आजच्यासारखी ट्रोल गँग नव्हती. कविता महाजनांच्या यादीत आपण असावं म्हणून मी स्वतः खुपदा प्रयत्न केले होते. पण त्यांच्याशी काही केल्या बोलणं होत नव्हतं. तरी त्यांचं लेखन नियमित वाचायचो. कारण आता साध्या मॅसेजला, कमेंटला रिप्लाय दिला नाही, फोटो लाईक केला नाही म्हणून ट्रोल करणं किंवा ब्लॉक करणं, अशी असहिष्णुता त्या काळी नव्हती!

हा दहा वर्षांपूर्वीचा काळ. ताई लिहायच्या. त्यांच्या पोस्टखाली दोनशे, तर कधी तीनशे, तर कधी पाचशे कमेंट असायच्या. बहुतांश वेळा त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या यांवर चर्चा असायची. अनेक नामवंत पत्रकार आपापल्या प्रतिक्रिया द्यायचे. ते वाचायलाही मजा यायची. आपणही कविता महाजनांसारखं फेमस असावं असं वाटायचं. लोकांनी आपलं वाचावं, आपल्यासाठी प्रतिक्रिया लिहाव्यात, चर्चा करावी ही अपेक्षा मनात बाळगून असायचो. पण लेखक काय असतो, लेखन प्रक्रिया, लेखनाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम, त्याच्या प्रभावाचा परीघ काय असतो, यापासून पूर्णतः अनभिज्ञ होतो. यातूनच आपल्या परिघाबाहेर झालेल्या लेखनाचं वाचन करण्याचं ठरवलं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

योगायोग असा की, वाचायला हातात घेतलेली पहिली कादंबरी होती ‘ब्र’. ती एका बैठकीत वाचून पूर्ण केली. त्यानंतर मात्र कविताताईकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून गेला. त्याआधी कविताताई म्हणजे कुणीतरी सेलिब्रेटी लेखिका, चित्रकार वगैरे हाच समज डोक्यात होता. तो पूर्णतः बदलून गेला. तिच्याबद्दल थोडं थोडं ऐकण्यात यायचं. त्याचं खास कारण म्हणजे माझा मित्र ऋषिकेश जोशी. त्याची मोठी बहीण संजीवनी शिंत्रे या कविताताईची जीवलग मैत्रीण. कधी सीएचएम महाविद्यालयाच्या उपप्राचार्या असलेल्या डॉ. ज्योतिका ओझरकरबाईंशी ज्या छोटेखानी चर्चा व्हायच्या, त्यात कविताताईंचं नाव ओघानं यायचंच यायचं. त्यामुळे आता त्यांच्याशी संपर्क करण्याचा मोह अनावर होत होता. त्यांचं ‘कुहू’ कादंबरीचं काम चालू होतं. भारतातील पहिली मल्टीमीडिया डिजिटल कादंबरी त्या करतायेत हे त्यांच्या वॉलवर वाचायला मिळे. त्यांची चित्रं पहायला मिळत. औरंगाबादच्या कॉलेजात चित्रकला शिकताना आलेले अनुभव त्या लिहीत. ते खासे पॉप्युलर होते. त्यांचा अपघात झालेला होता. त्या अपघातातून बचावल्या. पाठ कामातून गेली. औषधांनी वजन वाढलं. त्यावर विविध उपाययोजना करून त्यांनी मात केलेली अनेकदा त्यांच्या वॉलवर वाचायला मिळे. त्यांच्या अपघातानंतरच्या एकूण एका गोष्टींबद्दल त्यांच्या मैत्रिणींनी लिहिलेल्या गोष्टी अधूनमधून न्यूज फीडमध्ये डोकावत असायच्या.

कविताताईचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधलं काम, तिनं दत्तक घेतलेली एचआयव्हीग्रस्त मुलं, त्यांच्या पुनवर्सनासाठी उभारलेली यंत्रणा, घरकाम करणाऱ्या महिलांसाठींचं काम, भाषाविषयक संशोधन, तिची चित्रकला, पाककृती, दिशा क्रीएटीव्हजच्या अंतर्गत चालणारं एडिटिंगचं काम, स्वतःचं स्वतंत्र लेखन हा सारा सर्वव्यापी पसारा फेसबुकवरून मी पाहत राहायचो. मनातल्या मनात दंग व्हायचो. एक बाई इतका सारा पसारा कसा सांभाळते? आश्चर्य वाटायचं.

मध्येच त्या फेसबुकवरून गायब व्हायच्या आणि तीन-चार आठवड्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रकट व्हायच्या. नंतर नंतर ते सवयीचं झालं. त्यांनी नवीन प्रॉजेक्ट हातात घेतलं की, त्या गायब व्हायच्या. मग, ते प्रॉजेक्ट लाँच झालंय ही बातमी आली की, कविताताईही फेसबुकवर हजर व्हायची. सायलंट रिडरचा असा माझा प्रवास २०१० ते २०१३ पर्यंत सुरू राहिला.

२०१३ साल उजाडेपर्यंत फेसबुकनं ट्रोलर्सना कोणत्याही सेन्सॉरशिपशिवाय खुलं रान मोकळं करून दिलं होतं. ही ट्रोलिंग जितकी राजकीय होती, तितकीच ती पर्सनल स्कोअर सेटल करणारीही होती. या घाणेरड्या राजकारणाची कविताताई एक सॉफ्ट टार्गेट होती. अशाच एका दिवशी एका नालायकाचा फोन आला- ‘तू काय रे, त्या बाईच्या वॉलवर कमेंट करतोस, लाईक करतोस. दारू पिऊन पडलेली असते. नवरा सोडला, पोरं सांभाळत नाही. अशा बायांना ठोकून काढलं पाहिजे.’ म्हणत मला चेतवून दिलं. फोन ठेवताना, ‘ये तू त्या वॉलवर, मी सोडत नसतोय आज तिला’ असं बोलून मला आवतन देऊन गेला. हे वाक्य ऐकल्यावर वाईट वाटलं. राग आला, पण त्याच क्षणी कविताताईला फोन करण्याचा निश्चय केला. भीत भीत इनबॉक्समध्ये नंबर मागितला. ताईनं चटकन नंबर दिला. मी फोन केला. हे आमचं पहिलं संभाषण.

ताई म्हणाली, ‘काय रे कसा आहेस?’ मी उत्तरलो, ‘ठीक आहे ‘मॅडम”. पलीकडून ताई ओरडल्या, ‘काय रे, हे ‘मॅडम’ वगैरे काय लावलंय. माझं नाव कविता आहे. कळलं का?’ मी काहीच म्हणालो नाही. मग त्याच बोलायला लागल्या. तेव्हा मी रमाबाई नगरातल्या अनेक पैलूंवर लिहीत होतो. घाटकोपरच्या रमाबाई नगरात १९९७ साली घडलेल्या हत्याकांडानंतर एक नवीन पिढी तरुण झाली होती. त्यांचं भावविश्व मांडण्याचा तुटपुंजा प्रयत्न छोट्या छोट्या लेखांतून करत होतो. ताईला ते आवडायचं. मी लिहिलेलं ताई वाचत आहे हे ऐकून मीच अवाक् झालो. ज्या गोष्टीसाठी ताईला फोन केला ते राहिलं बाजूला, आम्ही दोघं बराच वेळ गप्पा मारत राहिलो.

आधी विषयावर, संदर्भांवर चाललेली चर्चा आता लेखनशैलीवर आली. बोलताना मध्ये मध्ये रेंज जायची. ती रागानं म्हणायची ‘या टाटा डोकोमोची चटणी केली पाहिजे. पालघरचे आदिवासी जशी मुंग्यांची चटणी करून खातात ना, तशी चटणी या सिमकार्डची करून खाणार मी एक दिवस’. अतिशय गंभीर लेखन करणाऱ्या बाईचा ह्युमर पाहून मी भलताच सुखावत होतो. मग त्यांनी प्रश्न केला, ‘तुझी लेखन करण्याची वेळ कोणती?’

मी म्हणालो, ‘विशेष नाही. जेव्हा मनात येईल तेव्हा लिहितो.’

‘म्हणजे बेशिस्त आहेस लेखनाच्या बाबतीत.’

मी निमूटपणे ‘हो’ म्हणालो.

‘लिहिताना कोणतं पेन आणि कागद वापरतोस?’

मी म्हणालो, ‘कागद पेन नाही वापरत. थेट लॅपटॉपवरच लिहितो.’

मग तर अजूनच उखडल्या. ‘म्हणजे तू लेखनाबाबतीत फार सिरिअस नाहीस.’

मी विचारलं, ‘असं कसं?’

त्यावरचं उत्तर फार भारी होतं- ‘ते मी तुला नंतर सांगेन. पण त्याआधी एक गोष्ट ऐक. फेसबुक हे दीर्घलेखनासाठी मारक आहे. ते का मारक आहे आणि बेशिस्त का म्हटलंय याची तू मला तीन दिवसांत सविस्तर उत्तरं देशील तरच तुला पुढचं स्पष्टीकरण माझ्याकडून मिळेल. अन्यथा नाही.’ पहिल्याच संभाषणात आपुलकी, चौकशी, हक्कानं रागावणं, सल्ला आणि शिकवण असं सारं काही मिळालं होतं. मी थोडा गुंग झालो होतो. पुढील तीन दिवस हरेक तऱ्हेनं उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. थोडीबहुत तोडकीमोडकी उत्तरं मिळाली. ती सांगितली. पण ताई म्हणाली- ‘प्रयत्न केला आहेस शोधण्याचा यातच समाधान आहे. एक दिवस नक्की उत्तरं मिळतील तुला. फक्त उत्तरं शोधताना उशीर करू नकोस. काही प्रश्नांची उत्तरं लवकर शोधायची असतात. उशीर झाला की हातातून सर्व काही निसटून जातं.’

त्यानंतर मात्र ताईशी सलग बोलणं होत राहिलं. तिनं मला भाषा शिकवली. भाषेची लकब, भाषेच्या गमतीजमती समजावल्या. ब्राह्मणी व अब्राह्मणी भाषासाहित्याच्या सौंदर्याविषयी बरीच चर्चा केली. ऊठसूठ फुड पॉर्नच्या नावाखाली जे फोटो टाकायचो, ते तसेच न टाकता प्रत्येक पदार्थाची जातकुळी काय, त्याचा उगम, त्याचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भ व संबंध काय आहेत, ते कसे शोधायचे, ते कसे मांडायचे याचं नीट शिक्षण दिलं. सिनेमा कसा पहावा हे आधी शिकलो होतो. पण सिनेमा किंवा पडद्यावरील कोणताही कंटेट पाहिल्यानंतर तो कसं समजून घ्यायचा, स्वतःच्या राजकारणाच्या अनुषंगानं त्याचं समीक्षण कसं करावं, ते करताना काय भान जोपासलं पाहिजे, त्याची मांडणी कशी असली पाहिजे, याचे धडे दिले.

आमचं हे सर्व बोलणं व्हायचं फेसबुक मॅसेंजर किंवा फोनवर, पण इतकं बोलणं होऊनही आजवर भेटता आलं नव्हतं. ११ मार्च २०१४ रोजी मी स्वतःहून भेटायला तिच्या वसईच्या घरी गेलो. तसं अंबरनाथ आणि वसई दोन्ही विरुद्ध टोकाची ठिकाणं. जवळपास चार तासांचा प्रवास. ज्या इमारतीचा पत्ता दिलेला, त्या इमारतीत गेलो खरा, पण घर कसं ओळखावं हे कळेना. पण एका दारावर एक सूचना लिहिलेली होती – ‘Do Disturb.’ म्हटलं हेच कविताताईचं घर असणार. त्या दिवशी दिशाही घरीच होती. माझी आणि ताईची ती पहिली प्रत्यक्ष भेट. दिशालाही तेव्हाच भेटलो.

ताईच्या घराला म्हणजे गोडाऊन म्हटलं तरी हरकत नाही. फक्त बेडरूम आणि किचन तेवढं आखीव, रेखीव, सुंदर सजवलेलं. हॉलमध्ये चारही भिंतीवर कपाटं. कपाटात पुस्तकं, ऑफिस डेस्क, त्यावर कागदं, टिपणं, भरपूर पेन, ब्रशेस, स्टेशनरीचं सामान, डाव्या भिंतीवर शोकेस, त्यात ट्रॉफ्या, सन्मानचिन्ह, त्याच्या बाजूला दोन पोती, त्यातही छोटी-मोठी सन्मानचिन्हं. मागच्या बाजूला तिनं काढलेली चित्रं, कॅनव्हॉस एकावर एक रचून ठेवलेली.

रंगाचा वास हॉलभर पसरलेला, पेनांचा, कागदाचा, शाईचा हलकासा वास, खिडकातून डोकावणारं ऊन, त्यास पाठमोरी बसलेली, तिच्या डोक्यावरून सूर्यकिरणं हलकी विलग होत जाताना, डोळ्यांवरचा चष्मा हलक्यात नीट करत माझ्याशी गप्पा मारणारी कविताताई त्या प्रतिमेत मला ‘लार्जर दॅन लाईफ’ वाटत होती. ती हलकेच बोले, पण आवाजात धार होती. फोनवर बोलणं, ऐकणं हा वेगळा अनुभव असतो. प्रत्यक्षातला अनुभव वेगळा असतो. तिथंच काम करता करता ती बोलत होती. मी ऐकत होतो. अवाक् होऊन पाहत होतो. तिच्या कामाचा वेग, हातात आलेल्या टिपणांमधील चुका काढणं, त्या दुरुस्त करून पुन्हा तशा चुका होऊ नयेत म्हणून अतिशय आपुलकीनं बाजूलाच सल्ला देणारी टिपणं लिहिणं, युजीसीच्या प्रबंधातील भाषेच्या चुका, तपशीलाच्या मांडणीच्या चुका सुधारून घेण्याचं काम करता करता असिस्टंटला ती ब्रीफही करत होती. तिचे ब्रीफिंग करणं थेट होतं. तीक्ष्ण होतं. आवाज कानात थेट घुसत होता. तरी त्यात अरोगन्स नव्हता. कमालीचं कारुण्य होतं. मी फार खुश होतो कविताताईला पाहून, भेटून आणि प्रत्यक्षात अनुभवून!

जेव्हा तिला भेटायला गेलो, तेव्हा नुकताच मीही आजारपणातून सावरलो होतो. करिअरचा पत्ता नव्हता. चाचपडतच होतो. घाबरतच बोलायला सुरुवात केली. ताई म्हणाली, ‘तू कविता बऱ्या लिहितो रे. पण त्याला कविता म्हणता येईल का यावर मी अजून ठाम नाही.’ मी विचारलं, ‘ताई कविता लिहिणं म्हणजे नक्की काय इथून मला समजावून सांग’. आणि तिथून खऱ्या अर्थानं शिकणं सुरू झालं. आपल्याकडे असलेलं कंटेट, अनुभव शब्दांत उतरवणं हे फार गरजेचं असतं. पण त्याला प्रभावीपणे उतरवणं किती महत्त्वाचं असतं हे त्यातून कळालं. हळूहळू मी शिकत गेलो. माझी कविता बरी होत गेली. ज्या दिवशी ती नीट झाली त्या दिवशी ती स्वतःहून म्हणाली- ‘आता तुझा संग्रह यायला हरकत नाही.’ तिनं माझ्याकडून काही कविता मागवून घेतल्या. स्वतः सहा ते सात वेळा त्यांचं वाचन आणि संपादन नेटानं बसून करून घेतलं. संपादन पूर्ण झाल्यावर एक पत्र लिहिलं. ते पत्र आजही जपून ठेवलं आहे. मला कधीच वाटलं नव्हतं माझा कवितासंग्रह कधी प्रकाशित होईल म्हणून. पण तो झाला. कविताताईनं आणि माझ्या जिवलग मित्रांनी तो प्रकाशित करवून घेतला. माझं योगदान त्यात फारसं नव्हतंच. त्याचं श्रेय कविताताईचं. तिनंच जन्माला घातलं होतं ते सारं.

म्हणून ती आई ठरली माझी. ती तेवढ्यावरच थांबल्या नाही. गेल्या वर्षापर्यंत मी जे काही करत होतो, त्यावर ती बारीक नजर ठेवून होती. ‘सारं काही समष्टीसाठी’च्या पहिल्या कार्यक्रमात अगदी कुणालाही थांबपत्ताही न लागू देता ती रवींद्र नाट्य मंदिरला आली होती. तब्येत साथ देत नव्हती. फारसं चालता येत नव्हतं. पाठदुखीनं हैराण होती. तरीही आली. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यामुळे धीर मिळाला. कारण पहिलाच प्रयत्न होता. तो ज्येष्ठांकडून डावलला जाईल ही भीतीही होती. अर्थात त्या भीतीची पर्वा कुणाला होती! पण कविताताईनं ती भीती घालवली. नंतर मी माझ्या व्यापात अडकत गेलो. त्यामुळे भेट कमी होऊ लागली.

एकदा असंच अचानक बोलावलं. यावेळेस निमित्त होतं, कानाचं, डोक्याचं. वसईच्या कोणत्या तरी डॉक्टरनं चुकीचा रिपोर्ट देऊन तिला पुरतं टेन्शनमध्ये आणलेलं. मला म्हणाली, ‘दिशा नाहीये सध्या. उद्या मी आणि तू केईएमला जातोय डॉ. बापटांना भेटायला.’ का जातोय, कशासाठी जातोय हे प्रश्न विचारण्याची सोय नव्हती. मी डॉ. रेवत आणि प्रज्ञा माने सोबत पोहोचलो केईएमला. डॉ. बापटांनी तपासण्या केल्या. रिपोर्ट पाहिले. म्हणाले, ‘कविता, तुला आरामाची सक्त गरज आहे. फक्त दोन-तीन औषधं देतो. ज्यानं कानांत येणारे आवाज नाहीसे होतील. पण शांत झोपेपेक्षा दुसरं कोणतंही औषध नाही तुला.’ तरी ताई विचारत होत्या, ‘नेमकं झालंय काय?’ डॉक्टरांनी एका वाक्यात निदान केलं, ‘मेंदूचा अतिरिक्त वापर हाच तुझ्या त्रासाचं कारण आहे.’ ताईनं फक्त मान डोलावली. कुणी सांगितलं म्हणून ऐकलं हा तिचा स्वभावच नव्हता.

केईएममधल्या सर्व जुजबी तपासण्या करून छानपैकी जेवलो. त्या दरम्यान खूप गमतीजमती, खुमासदार किस्से तिनं सांगितले. sarcasm कसा असतो, त्याला मांडण्याच्या, लिहिण्याच्या पद्धती कोणत्या, कशा असतात, तो कसा लिहिला पाहिजे, त्यातून पुरुषी माजाला कसे चिमटे काढता येतात, तेही पुरुषांना न दुखावता, यावर ती भरभरून बोलली. मी फक्त ऐकत होतो. आजवर धीरगंभीर असणारी, प्रसंगी कडक शिस्तीची आणि आज मेंदूजवळ गाठ आहे की काय, या विचारानं दवाखान्यात आलेली बाई किती निर्विकार चेहऱ्यानं वावरते. तिच्यात विनोदी लेखनाची अफाट क्षमता आहे. ते का अजून समोर आणलं नाही हा प्रश्न सतावत होता. या प्रश्नावर मला ललित अंगानं बरंच काही लिहिता आलंही असतं. पण ते खोटं ठरलं असतं, कारण तिच्याठायी असलेल्या कारणांचा मागमूस ती कधीच लागू देत नव्हती.

ती खमक्या स्वभावाची होती, जिद्दीची होती. स्वतःच्या अटीवर जगलेली आणि जगाला तसं वागायला भाग पाडणारी होती. बाई असण्याच्या व्याख्या आणि कक्षा दोन्ही रुंदावणारी आधुनिक स्त्री होती. तिच्या कादंबऱ्या, कथा, कवितासंग्रह, लेख, ब्लॉग, अभ्यासग्रंथ, पाककृती, ललितलेखन, बालसाहित्य, चित्रं, पेंटिग्ज हे सारं सातत्यानं प्रकाशित होत राहिलं. तिची कोणतीही कलाकृती रिकामी गेली नाही. प्रत्येक कलाकृतीनं अपेक्षित यश मिळवलं. ‘उंच माझा झोका पुरस्कारा’नं सन्मानित झालेल्या कविताताईनं वेदिका, संघमित्रासारख्या ताकदीच्या कवयित्री सर्वांसमोर आणल्या. तिच्या कामाचा आवाका, पसाराच इतका मोठा होता की, भल्याभल्यांना हेवा वाटला! एक बाई असून इतकं कसं करू शकते, असं बोलणाऱ्या अनेक पुरुष लेखकांना मी स्वतः ऐकलंय. अर्थात कविताताईनं या सर्व लोकांना कधीच काडीचाही भाव दिला नाही. तिनं नवीन कवी जन्माला घातले. त्यांना पोसलं, वाढवलं, त्यांची मुळं कवितेच्या मातीत अधिकाधिक कशी घट्ट होत जातील, यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेतली. असे प्रयत्न मराठीतील किंवा इतर भाषेतील कितीसे साहित्यिक घेतात? उत्तराचा आकडा सांगायला दोन हातांची बोटं पुरेसे ठरतील.

नेमकी ही प्रतिभा खुपणाऱ्या लोकांनी तिला शेवटच्या वर्षांत प्रचंड त्रास दिला. सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, पण नंतर ते वाढतंच गेलं. ते इतकं वाढलं की... जाऊद्या... जुन्या गोष्टी नको. का ठाऊक, ताईनं या वादापासून मला कायम दूर ठेवलं. मी अनेकदा विचारलंही मी येऊ का? ती नको म्हणायची. एक-दोनदा विचारूनही पाहिलं- का? ती एवढंच म्हणायची, ‘मी सांगतेय ना नको. तेवढं पुरे.’ मी शांत व्हायचो.

मग पुढे तिच बोलायला सुरुवात करायची, ‘तू आत्मचरित्र कधी लिहिणारेस? एवढे किस्से पडून आहेत. त्यांना मूर्त रूप कधी देणारेस? कितीतरी लिहायचं बाकी पडलंय. त्याला कधी हात लावणारेस?’ मी नेहमी एकच उत्तर द्यायचो – ‘ताई, एकदा घर होऊन जाऊ दे. मग निवांत बसेन.’ हे उत्तर ऐकलं की, हमखास झापणं ठरलेलं असायचंच. त्यात काळजी होती. ती तेव्हा सिरिअसली घेतली नाही. मध्यंतरी एका प्रकाशन संस्थेनं तिला करारपत्रकाच्या मुद्द्यावरून फसवलं होतं, तेव्हा माझ्याच एका मित्राला त्या प्रकरणात लक्ष घालायला सांगितलं. ते प्रकरण हळूहळू निवळलं. त्यानंतर तिची चार पुस्तकंही आली. तेव्हा ती म्हणाल्या, आता बालसाहित्य करायचंय. १२ पुस्तकं करायची आहेत. पण ती आता पुण्याला जाऊन करेल. सामान आवरतेय. खूप पसारा पडला आहे. मी सवयीनं म्हटलं- ‘येतो वसईला.’ तिनं सवयीनं म्हटलं- ‘आता नको, पुण्यात गेल्यावर ये.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ताई पुण्याला गेली. जाताना बॅगपॅकर कंपनीनं काही सामान गहाळ केलं, त्याचा नाहक त्रास तिला सोसावा लागला. नव्या ठिकाणी गेल्यानंतर सामानाची आवराआवर, पुस्तकं नीट लावून ठेवणं यातच ती बिझी होती. मी तिला २१ सप्टेंबरला फोन केला असावा बहुतेक, मी सात दिवसांनी येतोय मुंबईत. परत आल्यावर पुण्याला येतो. त्यावर पुन्हा तिनं सवयीनं ‘नाही’ म्हणत, ‘दिशा जेव्हा कॅनडाला जाईल, तेव्हा ये मला घ्यायला. मग नव्या घरी येते तुझ्याकडे चांगली आठवडाभर.’ दिल्लीत कोर्टाच्या निमित्तानं अडकलेलो होतो. अचानक २६ तारखेला ताई खूप आजारी असल्याचं कळालं. २७ ला ती गेली. पावसाचा जोर उत्तर भारतात भरपूर होता. २६ ला निघता आलं नाही. २७ ला पहाटे पोहोचलो. २८ला पुण्यात पोहोचलो, तेव्हा ताईला अग्निदाहाच्या स्वाधीन होतानाच थेट पाहिलं. एक धगधगता निखारा शांत होताना पाहिला. एक मोठं पर्व काळाच्या पडद्याआड गेलं होतं.

ताई गेली, ती जोपर्यंत होती तोपर्यंत तिच्या एकुण एका सल्ल्याला थोडं थोडं टाळत राहिलो. तिचं म्हणावं असं पूर्ण कधीच ऐकलं नाही. मला लेखन पूर्णवेळ प्रायोरिटी कधीच बनवता आली नाही. माझ्या प्रायोरिटी मीच वेगळ्या ठरवून ठेवल्या होत्या. कामाच्या व्यापातून मी थोडा वेळही काढू शकलो नाही. कधी हक्कानं थोडं दटावून ताईला ‘मी आधी येऊन भेटतो पुण्याला’ असं म्हणू शकलो नाही. ती कामात कसलीच ढवळाढवळ पसंत करत नाही म्हणून तिच्या टाळण्याला मी गृहीत धरून राहिलो. तिच्या चिरंतन जगण्याच्या विचारालाही गृहीत धरून राहिलो.

ती इतक्या शांतपणे निघून गेली, यावर आजही विश्वास बसत नाही. तिनं जाऊन आज वर्ष झालं. या वर्षभरात मी काहीही नवीन लिहू शकलो नाही. ज्या चळवळीचा मंच माझं कार्यक्षेत्र आहे, तिथंही मी काही भरीव करू शकलेलो नाही. काही नवीन वाचणं, रचणं या गोष्टी जवळपास नाहीतच. एक कविता शब्दांत उतरवता आलेली नाही. माणसांसाठी लिहिलेली ‘कविता’ प्रत्यक्ष राजकीय कृतीत उतरवता उतरवता आयुष्यातून खरी ‘कविता’ मी कधी गमावली याचा मलाच पत्ता लागला नाही. अखेरचं जिद्द करून भेटायला यायला पाहिजे होतं, मी ते केलं नाही. ठरवलं असतं तर शक्य झालं असतं, पण मी चुकलो. ही चूक आयुष्यभर मनाला खात राहील. त्यातून आता माझी सुटका नाही.

कविताताई विनम्र आदरांजली.

.................................................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......