जोयानाची आजी... लिली परेरा
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • जोयानाची आजी... लिली परेरा
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika जोयानाचे रंग Joanache Rang

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख. महाजन यांच्या शेजारी लिली परेरा यांचं कुटुंब राहायचं. या कुटुंबातल्या जोयाना या मुलीविषयी महाजन यांनी ‘जोयानाचे रंग’ हे पुस्तकही लिहिलं आहे. या जोयानाच्या आजीविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख... त्यांच्या निधनानंतर लिहिलेला...

.............................................................................................................................................

बरीच वर्षं बंद असलेल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये नवे शेजारी राहायला आले, तेव्हा त्या घरातली प्रौढ बाई ही ‘लिलीआंटी’ होती; पुढे वर्षभरात तिच्या लेकाचं -जॉलवीनचं, जेनिफरशी लग्न झालं आणि अजून दोनेक वर्षांत जोयानाचा जन्म झाला, तेव्हा ती ‘जोयानाची आजी’ बनली. पुढे कधीतरी मी ‘जोयानाचे रंग’ नावाचं पुस्तक लिहिलं तेव्हा ही ‘प्रॅक्टिकल’ आजी वाचकांपर्यंत पोहोचली.

...

काल या आजीने या जगाचा निरोप घेतला. आज सकाळी जांभळ्या शवपेटीत, हिरवीगार साडी नेसवलेली आणि पांढरेशुभ्र हातमोजे चढवलेल्या हातांची बोटं एकमेकांत गुंफून त्यावर पांढऱ्याच स्फटिकमण्यांची जपमाळ ठेवलेली लिलीआंटी ओळखू येतही होती आणि नव्हतीही. चर्चमधल्या शांत प्रार्थना, मनात अनेक आठवणी आणि मग दूर डोंगरावरच्या मातीत दफन झाल्यावर टाकलेली मूठभर माती... तिच्यात थोड्या फुलांच्या पाकळ्याही होत्या...

आपण आजीच्या हातातल्या भाजीच्या पिशव्यांप्रमाणे आजीचं ‘सामान’ नाही आहोत आणि त्यामुळे तिनं आपल्याला उचलून न घेता स्वतंत्र चालू द्यायला हवं, असं लहानपणी म्हणणारी जोयाना गंभीरपणे तिला सांगितले त्यानुसार धार्मिक विधी करत होती.

धाकट्या जिअॅनला आजी गेलीये म्हणजे नेमकं काय झालंय हे कळत नसल्याने ती बागडत होती. आजीला स्ट्रोक आल्यानंतरच्या काळात फिजिओथेरपिस्टने सांगितलेले व्यायाम तिच्याकडून हुकुमी आवाजात कंपल्सरी करून घेणारी अवघ्या अडीच-तीन वर्षांची मुलगी म्हणजे हीच ती जिअॅन! जोयाना जितकी सौम्य, तितकी ही दांडगोबा!

...

लिलीआंटी नवऱ्यासोबत गोव्याहून मुंबईला स्थलांतरित झालेली. ते राहत त्या चाळीत आसपास अशीच आलेली काही ओळखीची कुटुंबं. पुढे त्यातलीच एक मुलगी तिची सून होणार होती. दारूच्या व्यसनानं आजार वाढून लिलीआंटीचा नवरा ऐन तारुण्यात तिला विधवा करून गेला. लिलीआंटी जेमतेम चार-पाच इयत्ता शिकलेली. मुलगी माध्यमिक शाळेत, मुलगा प्राथमिक शाळेत शिकणारे. तिनं परत जायचं नाही असं ठरवलं आणि आजूबाजूच्या केजी, पहिली-दुसरीच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. सातवीतली लेकही तिच्यासोबत शिकवू लागली आणि अजून काही वर्षांनी मुलगाही. जिद्द, कष्ट आणि स्वाभिमानाचे धडे या कुटुंबाकडून घ्यावेत!

मुलं चांगली शिकली, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि जोडीदारही चांगले मिळाले. चाळीतून ही चार-पाच कुटुंबं आमच्या कॉलनीत अगदी बाजूला नव्हे, पण एका भागात घरं घेऊन राहायला आली. तो घट्ट गोतावळा होता, राहिला आहे.

त्यांच्या गृहप्रवेशाची धांदल होती, तेव्हा मी एकुलती शेजारीण बारीकसारीक गोष्टी पुरवायला होते. संध्याकाळी पार्टी होती. लिलीआंटीनं येऊन बिचकत विचारलं, “आमच्याकडचं जेवणार का? नॉनव्हेज खातेस का?”

मी हो म्हटलं. मग ताट आणून देते म्हणून ती गेली. पुन्हा दहा मिनिटांत येऊन विचारलं, “थोडी बिअर घेणार का?” तिचा धीर चेपला होता. मी हसून ‘हो’ म्हटलं. मग सुटकेचा नि:श्वास टाकत ती म्हणाली, “मग तिकडेच ये ना जेवायला. तुझी आमच्या सगळ्या नातलगांशी ओळख करून देते.”

प्लेट वाढून घ्यायला मी स्वयंपाकघरात गेले, तर तिची एक मैत्रीण घाईने येऊन म्हणाली, “ते पोर्क आहे. तुला चालणार नाही ना?”

मी म्हटलं, “खाऊन बघते. थोडं वाढ. आवडलं तर अधिक घेईन.”

तिनं आनंदानं मला मिठीच मारली आणि ‘वाढून घे मग’ असं सांगून बाहेर सगळ्यांना जाहीर सांगून टाकलं की, ‘बघा, ही चांगली शेजारीण आहे. आपल्यासोबत आपल्यासारखं खातेय.’

अन्न माणसाला जोडतं आणि सोबत जेवणं तो जोड घट्ट करतं, हे तेव्हा नीटच लक्षात आलं.

...

मी प्रवासातून आले की, त्यांच्या दाराची बेल वाजवून मग माझ्या घराचं कुलूप उघडायचे. सकाळ असेल तर चहा, दुपार असेल तर जेवणही त्यांच्याकडे व्हायचं. लिलीआंटी माझ्या ताटाकडे पाहून वैतागून म्हणायची, “माझी मांजरसुद्धा तुझ्यापेक्षा जास्त भात खाते. हे काय जेवण आहे?”

एकमेकींच्या कहाण्या सांगून-ऐकून झाल्या होत्या. एकदा स्वयंपाकाची बाई नाही म्हणून मी काही बनवलं आणि एक वाडगा अर्थात शेजारी गेला. संध्याकाळी लिलीआंटीनं गंभीर स्वरात विचारलं, “तुला एक विचारू? म्हणजे बघ, तू भरपूर शिकलेली आहेस, पैसे कमावतेस, घर छान ठेवतेस, पुस्तकं लिहितेस, सुबक विणकाम-भरतकाम करतेस आणि आज तुझ्या हातचं खाल्लं तर लक्षात आलं की, स्वयंपाकही चांगला करतेस...”

एकदम एवढी स्तुती का सुरू आहे आणि यामागे दडलेला प्रश्न काय आहे हे मला कळेना. मी म्हटलं, “ते ठीक आहे, पण प्रश्न काय?”

तिनं धाडकन विचारून टाकलं, “... तर मग तुझा घटस्फोट का झाला?”

मी आधी खो खो हसलेच. तीही गोंधळली होती. म्हटलं, “या गुणांचा आणि लग्नं मोडण्याचा दरवेळी संबंध नसतो. जाऊ दे ते सगळं.”

मी नसताना घराची एक किल्ली त्यांच्याकडे असायची. जोयानाला खूप वेळा माझ्या घरात येऊन जेवायचं असायचं. जोयाना बाळ होती, तेव्हा तिला अंघोळ घालायची म्हटलं की, लिलीआंटी हाक मारायच्या. मी पाणी घालायला जायचे. कधी एकटीनं जेवायचा कंटाळा आला की, ताट घेऊन जाऊन त्यांच्यासोबत जेवायचे. एखाद्या रविवारी घराचं थिएटर करून अगदी सोफे, गाद्या, रग घेऊन पूर्ण अंधार करून मोठे बाउलभर पॉपकॉर्न घरीच बनवून आम्ही निवांत लोळत सिनेमा बघायचो.

...

जेनिफर लग्न होऊन आली, तेव्हा तिच्या आईनं तिला सांगितलेलं, “सासूला एकटं सोडायचं नाही. तुम्ही हिंडाफिरायला जाताना तिलाही विचारायचं.”

ही समजूतदार सून आईनं सांगितलं तसं वागली कायम. लिलीआंटी क्वचित त्यांच्यासोबत जायची, एरवी तुम्ही फिरून या म्हणायची. जॉलवीनच्या लग्नावेळी नृत्यं सुरू होती, तेव्हा दिरासोबत तिला नाचात सहभागी केलं गेलं हे पाहून आपल्याकडे विधवांना कसं बाजूला ठेवतात हे आठवून मला अगदी भरून आलं होतं. लिलीआंटीनं मलाही कधी एकटं पडू दिलं नाही. एखादी पार्टी असली की, मला शांत बसलेलं पाहून ती कुणाला तरी हाक मारून सांगायची आणि नाचात सहभागी व्हायला लावायची.

मला केव्हाही अस्वस्थ वाटलं की, जोयाना हे माझं टॉनिकचं होतं. पहिल्यांदा दिवाळीला एकटीच घरी आहे हे जाणवलं, तेव्हा लिलीआंटीला म्हटलं, “जोयानाला दिवाळीची अंघोळ घालायला घेऊन जाऊ का?”

त्यांनी आनंदानं होकार दिला. तिला मस्त तेल-उटणं लावून अंघोळ घालून, नवा फ्रॉक घालून मी पुन्हा घरी पोचवलं तेव्हा लिलीआंटीच्याही डोळ्यांत पाणी आलेलं.

...

रोज पहाटे उठून सुनेला डबा करून देणाऱ्या लिलीआंटीच्या सुनेनंही त्याच दक्षतेनं आपली वेळ आल्याचं ओळखून कर्तव्यं प्रेमानं पार पाडली. वसईहून विक्रोळीला कामाला जायचं, रात्री उशिरा परतल्यावर एकीकडे धाकटीला जेवू घालत दुसरीकडे लिलीआंटीला मिक्सरमधून बारीक-पातळ बनवून काढलेलं खाणं चमच्यानं भरवायचं. दिवसभर देखरेखीला बाई होती, पण रात्री सासूचे डायपर बदलण्याचं कामही तिनं कपाळावर एक आठी पडू न देता केलं. तिचं कोकणीत ‘माय गो...’ म्हणत लिलीआंटीला प्रेमानं दटावत खाऊ घालणं, स्वच्छ करणं आठवलं की, वाटतं लिलीआंटी पुण्यवान खरंच! तिच्या आजाराच्या काळात मुलानं नाईटशिफ्ट मागून घेतलेली, तो दिवसा देखभाल करायचा. लेक-जावई हाकेच्या अंतरावर राहत होते; तेही सेवेला तत्पर असत. असा गोतावळा, तोही बिनगुंत्याचा आजच्या काळात दिसणं दुर्मीळच. तिनं आणि मुलांनी जोडलेली केवढी माणसं आज तिला निरोप द्यायला आली होती. सगळ्यांच्याच मनात अनेक चांगल्या आठवणी असणार.

...

लिली परेरा... गुडबाय म्हणत नाही, तुझी माती झाली आणि माझी राख झाली तरी भेटूच आपण पुन्हा कधीतरी!

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......