कविता ही मानेजवळच्या शिरेला स्पर्श करणारी गोष्ट आहे. ती शीर सापडावी लागते. सापडली की, तिला स्पर्श करत राहावं वाटतं!
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • ‘धुळीचा आवाज’, ‘मृगजळीचा मासा’, ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ आणि ‘तत्पुरुष’ या कवितासंग्रहांची मुखपृष्ठं
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika मृगजळीचा मासा Mrugjalicha Masa समुद्रच आहे एक विशाल जाळं Samudrach ahe ek vishal jal

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख. महाजन यांचं पहिलं प्रेम कविता हेच होतं. कविता लिहिणं, कविता जगणं, इतरांच्या उत्तम कवितांचे हौसेखातर, प्रेमापोटी अनुवाद करणं, हे त्यांचं एक जगणं होतं. त्या कवितेविषयीचा त्यांचा हा लेख...

.............................................................................................................................................

मला चित्रं रंगवायची होती, कविता किंवा अजून काहीही लिहाबिहायचं नव्हतं. हे अगदी लहानपणापासूनचं. खूप पुढे कधीतरी लक्षात आलं की, अखेर हे सगळेच व्यक्त होण्याचे मार्ग आहेत; आणि लिहिणं हा त्यातल्या त्यात सोपा, सोयीस्कर मार्ग आहे. त्यातही कविता लिहिणं हे अधिक सोयीचं. म्हणून पुढे कादंबऱ्याबिदंबऱ्या लिहिल्या तरी कविता लिहिणं कधी सुटलं नाहीच. कुठलाही कागदाचा कपटा आणि कुठलाही पेन्सिलचा तुकडादेखील चालतो कवितेसाठी, साधनसाम्रगीचा इथं गमजा नाही. खेरीज कविता ही कितीही मानसिक वेळ घेत असली, तरी अंतिमत: ती प्रत्यक्षातल्या काही क्षणांचीच गोष्ट असते. बैठक मारून कविता लिहीत बसलंय कुणी, असं कधी पाहिलं-ऐकलं नाही आणि लिहितानाही जाणवलं नाही. ती एक लहानशी चोरी असते. चोरटेपणानं करण्याची एक गोष्ट. जसं तीव्र भूक लागली की, चोरून खाल्लं जातं, काय खातोय हे न पाहता किंवा चव न पाहता किंवा अन्नाला बुरशी लागलीये वा ते वाळकं-वातड आहे, हे न पाहता किंवा लागलेल्या मुंग्या झटकायच्या आणि खायचं.

मी मुंग्यासुद्धा खाल्ल्या आहेतच की आदिवासींसोबत. लाल मुंग्या. त्या पकडण्याची एक विशिष्ट पद्धत असते. पुरुषभर उंचीची वारुळं असतात, त्यात धूर कोंडायचा, मग गुदमरून मेलेल्या मुंग्यांचा सडा पडतो, तो जमवायचा. मुंग्या वाळवायच्या आणि मग कातळावर ठेवून दगडाने चुरडून त्यांची चटणी करायची. आंबट-खारट चव. त्यामुळे अन्न खावं वाटतं आणि खाल्लं की, शरीराला सुख मिळतं.

आता यात काही प्रतीक आहे का? असेलही. कष्ट, विद्रोह, शिस्त, समूहानं जगणं आणि आपलं वारुळ निर्माण करणं असं काहीबाही शोधताही येईल शोधायचं तर! हे विद्रोह इत्यादी सारं झटकून एका विशिष्ट पारंपरिक चौकटीतलं सुबक सुखी कौटुंबिक आयुष्य जगावं वाटण्याच्या मोहाची दुबळी भावना विशी-बाविशीत मनात होतीच. तीतून या साऱ्यावर मात करून चौकटीनुसार आपलं चित्र कापून फ्रेममध्ये बंदिस्त केल्याला शरण जाणं आणि आपली वैचारिक वाढ खुंटवून ठेवणं हेही घडलंच. आता इतकंच आठवतं की, त्यानंतरचा खूप काळ अशी भुकेनं, चोरून आणि अगतिकतेनं मी कविता लिहीत होते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माझ्या बऱ्याचशा कविता म्हणजे शब्दांमधून रंगवलेली चित्रंच आहेत किंवा मग ती कुणाला तरी उद्देशून लिहिलेली पत्रं तरी आहेत. बोलायचं असतं, पण ऐकणारं कुणीच असतं. कधी माणसं असतात भोवताली, पण आपल्याला सांगायचंय ते समजून घेण्याची त्यांची कधी क्षमता, कधी वृत्ती, कधी कुवत, कधी लायकी नसते. मग लिहून ठेवायचं. आता त्याचे तपशील आठवत नाहीत; किंबहुना मी ते आठवू इच्छित नाही. मात्र खूपदा मी पत्रं लिहिली, तीही कविताच होती. किंवा आता कवितेविषयी बोलतोय तर असं म्हणू या की, या कविता म्हणजे मुळात पत्रंच आहेत.

सुरुवातीला लिहिण्यासाठी कविता हा आणि हाच फॉर्म निवडण्याचं कारण काय? कविता लिहिण्यासाठी कागद वा शाई कमी लागते किंवा वेळ कमी लागतो वा बैठक मांडून बसायची गरज नसते, या कारणांहून अधिक माझ्यापुरतं खरं कारण हेच आहे की, कविता धूसर असतात! सांगण्याहून अधिक त्या सुचवतात! सांगायचं ते सांगितल्याचं वरवरचं समाधान, समजणारे समजून घेतील ही पोरकट आशा आणि ज्यांना समजणारच नाही त्यांची ती लायकी वा क्षमताच नव्हती, असा कुरूप खुलासा स्वत:शीच करता येणं... ही कविता लिहिण्यातली माझी खरी सोय.

सांगायचंय ते सगळं शब्दश: चमचा-चमच्याने भरवण्याची आवश्यकता नसणं किंवा मोकळा अवकाश केवळ दोन शब्द वा दोन ओळींमध्येच न ठेवता एकूणच आशयातही ठेवणं मला गरजेचं वाटतं. अनेक रेषा व आकारांनी गच्च भरलेल्या चित्रांपेक्षा एखादाच नेमका आकार अवकाशाचं आव्हान पेलून दाखवतो, असं चित्र मला अधिक भावतं; कवितेतही धूसरता तेच काम करत असते.

मी जन्मले त्या नांदेडमधलं, एकूणच मराठवाड्यातलं त्या काळातलं वातावरण बाकी महाराष्ट्राहून बरंचसं निराळं होतं. घरात राजकीय, सामाजिक विचारसरणी होत्या; ते संवाद येता-जाता कानी पडत. मी शाळेत होते तेव्हाची आणीबाणी, त्यावेळी रंगलेल्या भिंती, त्या भिंतींवरची ती दचकवणारी स्लोगन्स आठवतात. नंतरच्या काळात झालेलं मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचं आंदोलन आठवतं.

आमच्या कॉलनीत राष्ट्र सेवा दलाची शाखा भरे आणि बाजूच्या कॉलनीत संघाची... आणि काहीही विचार न करता त्या भागातली मुलंमुली तिथंतिथं जात; नंतरच्या काळात अशाच मुबलक संख्येनं तरुण मंडळी आपली ऊर्जा ओतायला शिवसेनेत गेली, त्याही पुढच्या काळात मनसेत. तर लहानपणी पाहिलेले ते पूर्णवेळ कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे चेहरे आणि मुखवटे, होत गेलेले भ्रमनिरास आणि विचारसरणींचं क्रमश: नष्ट होत जाणं हे मी शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करेपर्यंतच्या काळातच पाहिलं. नंतर स्वत: संघर्षात्मक आणि विधायक अशा दोन्ही स्वरूपाच्या सामाजिक कार्यात उतरले. त्या कामाचा भाग म्हणून वृत्तपत्रीय लेखन, अनुवाद सुरू केले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

लहानपणी इतिहास खूप ऐकायला मिळाला. मी आजोळी वाढले, तेव्हा माझे आजोबा स्वातंत्र्यलढ्यात होते. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकाचं पेन्शनही कधी घेतलं नाही. चित्रकलाक्षेत्रात त्यांनी काम केलं, लेखनही केलं, लोकसाहित्याचं संकलन केलं. मामा बालकविता लिहितात. हे सगळं लहानपणी मी पाहत-वाचत-ऐकत होते. घरात जातीपाती मानल्या जात नव्हत्या. आजोबा जानवं घालत नव्हते. मामा धार्मिक कर्मकांडांमध्ये सहभागी होत नव्हता. घरात राज्य आणि हुकूमत आजीची चालत होती. घरी मुबलक पुस्तकं असत, मासिकं येत आणि गाण्यांच्या रेकॉर्डसदेखील ऐकायला मिळत. नाटक-सिनेमे मात्र वर्ज्य होते. पुढे वडलांच्या घरीही पुस्तकं होतीच. पण या घरातलं वातावरण पुरुषसत्ता जाणवून देणारं होतं. आई कोणतेही हक्क - निर्णयक्षमता नसलेली आणि गप्प बसणारी व सहन करणारी होती. तिच्याशी आणि वडलांशीही माझा जिव्हाळ्याचा संवाद कधीच होऊ शकला नाही.

घरात मराठीसोबतच उर्दू पुस्तकंही बरीच होती, कॉलेजमध्ये वर्गात अनेक मुस्लीम मैत्रिणी होत्या. ती भाषा, तिच्यातली नजाकत आवडायची. त्या टिपिकल शेरोशायरीतली अतिशयोक्ती तर त्या काळात अतोनात भुरळ पाडायची. त्या अनुकरणातून हौसेपोटी शब्द जुळवणं, ओळी लिहिणं सुरू झालं. यात स्वत:च्या जगण्याचं, जगतेय त्या काळाचं, आजूबाजूच्या वातावरणाचं, पर्यावरणाचं कुठलंही प्रतिबिंब नव्हतं.

इयत्ता नववीत असताना मराठीतले मी समांतर वाचलेले पहिले दोन कवी होते केशवसुत आणि नामदेव ढसाळ. केशवसुतांच्या निवडक कवितांचा संग्रह ‘झपूर्झा’ आणि नामदेवचा ‘गोलपिठा’. कवयित्रींपैकी सांगायचं तर अकरावीत असताना कॉलेजच्या लायब्ररीत पहिलं पाऊल टाकलं आणि मुखपृष्ठ आवडलं म्हणून पुस्तक उघडून चाळलं तो अनुराधा पाटील यांचा ‘दिगंत’ हा कवितासंग्रह होता.

या लायब्ररीनं मला मराठी, हिंदी आणि उर्दूतल्या अनेक कवींची ओळख करून दिली. हिंदीतून मी अनेक परदेशी भाषांमधले अनुवादही वाचले. खूप उत्सुकतेनं मी आडवंतिडवं वाचत होते. त्याच दरम्यान नांदेडमध्येच एका कवीसंमेलनासाठी आलेल्या शंकर वैद्य यांची भेट झाली. आम्ही त्यांना घ्यायला रेल्वेस्टेशनवर गेलो होतो. स्टेशनबाहेर एका निंबोणीच्या झाडाखाली बोलत उभे होतो चार-सहाजण. गाडी वळवून येईपर्यंतची काही मिनिटं. ते इथला गारवा, निंबोणीची कातरल्यासारखी दिसणारी पानं, हिवाळ्यांत पानांवर साठणारी धूळ असं काहीबाही सर्वसाधारण बोलत होते. ते ऐकता ऐकता मला जाणवत गेलं की, आपल्याला आपलं आसपास दिसत असतं, पण आपण कधी ते पाहतच नाही! या जाणीवेनं मला पुष्कळच बदलवून टाकलं.

माधवकृष्ण सावरगावकर (कवी अलोन) आम्हांला बी.ए.ला मराठी शिकवायला होते. त्यांच्या शिकवण्यातून कवितेच्या फॉर्मचा विचार सुस्पष्ट होत गेला. कुमारवयात ग़ज़ला, शेर, यमकजुळव्या कविता असं जे काही हौशीपणातून कृतक करत होते, ते सगळंच हलकेच विरून गेलं. मी कवितेत माझ्याकडे, माझ्या जगाकडे वळले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सामाजिक कामं करत असले तरी ती करण्यामागे वैचारिकता नव्हती, भावना प्रबळ होत्या; त्यामुळे या काळातल्या कविता एकतर प्रेमकविता होत्या किंवा सामाजिक घडामोडींबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या होत्या. काहीशा वरच्या लेअरमधलंच हे लेखन होतं, त्यात खोली अजिबातच नव्हती. अप्रामाणिक नव्हतं, म्हणून उथळपणा टळला इतकंच. पोरकटपणातही एक निरागस सौंदर्य असतं, ते तितकंच होतं त्यात.

त्यानंतर गांभीर्यानं लेखन सुरू झालं, तेव्हाचा हा सुरुवातीचा बराचसा काळ कविता ही केवळ भावनेच्या कह्यातली गोष्ट होती. बरंचसं आयुष्य मी भावना आणि कल्पना करण्यातच घालवलं आहे; तुलनेत विचार अगदीच कमी केला. विचारांची एंट्री तशी खूपच उशिरा झाली. तोवर प्रस्थापित झालेल्या या भावना विचारांना स्पेस द्यायच्या नाहीत, वाटा अडवून ठेवायच्या किंवा पळवून लावायच्या चक्क. विचार आणि भावना कवितेत समांतर नांदू लागणं मला गरजेचं वाटतं, ते आताआताशा साधतं आहे. त्यानंतर कवितेला हळूहळू स्वत:चा चेहरा मिळू लागला. एरवी माझ्या समकालीन कवयित्रींच्या कवितांमध्ये माझी कविता वेगळी दिसणारी नव्हती; किंबहुना मराठीतल्या आम्ही बहुतेक जणी एकाच चेहऱ्याची कविता लिहिणाऱ्या होतो. चंद्रकांत पाटील सरांसोबत झालेल्या कवितेविषयीच्या चर्चा आणि सुधीर रसाळ यांच्याकडून कविता म्हणजे नेमकं काय असतं व चांगली कविता कोणत्या कवितेला म्हणता येऊ शकतं, अशा गोष्टी ऐकणं हे माझी समजूत वाढवणारं होतं.

कल्पनांमध्ये रमणं आणि दिवास्वप्नांमध्ये जगणं लहानपणापासूनच खूप होतं. त्यामुळे मी वास्तव सहन करू शकले आणि स्वत:ला जिवंत ठेवू शकले. वास्तवाइतकाच सन्मान मी कायम कल्पनाशक्तीचाही करते. कविता लिहिणं हा जिवंत राहण्याचा एक मार्ग आहे. आजही ते सुरू आहेच, तसंच, किंबहुना अधिक जाणीवपूर्वक आणि सन्मानानं.

व्यक्तिगत आयुष्यातले प्रश्न आणि समाजात दिसणारे प्रश्न यांत फारसं अंतर नव्हतं. जातिधर्मभेद, लिंगभेद, वर्गभेद हे सगळं सर्वत्र अनुभवण्यास येत होतंच. ते कवितेत उमटत गेलं. कवितेतील मी त्यामुळे केवळ कविता महाजन ही एक व्यक्ती राहिली नाही, तर इतर कुणीही त्यातलं ते मी असायचं. आजही असतं.

पुढे कादंबऱ्या लिहायला लागले, तेव्हा त्यातली प्रमुख पात्रं माझ्या इतकी मानगुटीवर बसलेली असायची की, त्या-त्या काळातल्या ‘कवितेतला मी’ ती पात्रंच आहेत. आपपरभाव न राहणं, स्व विस्तारला जाणं, आपण अनेक होणं, यातून विविध भूमिकांमध्ये शिरून लिहिणं हा कादंबरीतला, कथेतला प्रकार कवितेबाबतही घडू लागला. त्यामुळे यातल्या भावना, विचार, भाषा, प्रतिमाविश्व एकाच वेळी माझं असतंही आणि नसतंही. ‘मालक’ या कवितामालिकेतल्या अनेक स्त्रिया हे थेटच सांगतात. किंवा ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ या दीर्घकवितेतलं निळ्या पोटाची काळी मासोळी हे पात्रही हेच दर्शवतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मधली काही वर्षं (२००७पासून ते २०११पर्यंत) मी लेखन बंद केलं होतं. कविताही लिहिल्या नाहीत. सगळं फिजूल वाटण्याचा, काहीसा बधिर काळ होता तो. याच टप्प्यादरम्यान माझ्यात चांगले वैचारिक बदल झाले. ज्यांच्याशी चांगला संवाद, वाद, चर्चा होऊ शकतात अशी माणसं संपर्कात आली. जी परिस्थिती बदलताच येणार नसते, ती आहे तशी स्वीकारणाची मानसिक शक्ती कमावता आली. व्यावहारिक संकटांना तीव्रतेनं सामोरं जावं लागलं आणि अर्थार्जनासाठी दुसरा काही पर्याय न मिळाल्यानं पुन्हा काहीसं क्षीण का होईना लेखन सुरू झालं.

या काळात मी बाकी वाचन करायची, पण कविता मात्र वाचूच शकत नव्हते. एक विचित्र भीती वाटायची आणि ती तरलता झेपायचीच नाही. या एका मोठ्या गॅपनंतर जेव्हा पुन्हा कविता लिहू लागले, तेव्हा अर्थातच माझी कविता बदलली होती. तिच्यातली विरामचिन्हं कमीकमी होत पार गायब होऊन गेली होती. विषय फारसे बदलले नाहीत, कारण मन:स्थिती वरवर बदलली होती, खोलातून नव्हे. तळाशी तेच पेच, तेच प्रश्न, तीच दु:खं कायम होती, ज्यांना केवळ कवितेतच जागा असू शकत होती. म्हणून गद्यलेखनात सकारात्मक टोन आला, तसा तो कवितेत आला नाही. ती व्यक्तिनिष्ठच राहिली या काळातही.

चित्रकार ठरावीक कालखंडात विशिष्ट रंग वारंवार वापरतात आणि त्या रंगाच्या नावाने त्याचा तो कालखंड चित्रांबाबत ओळखला जातो. तसं मला मी आजवर लिहिलेल्या कवितांकडे वळून पाहताना वाटतं. एका काळाचा दुसऱ्या काळाशी संबंध नाही इतक्या त्या त्या काळातल्या कवितांमध्ये आशयानुसार फरक दिसतो. या मी नव्हे तर दुसऱ्याच कुणा बाईने लिहिलेल्या आहेत, असंही काही वेळा वाटतं, इतके बदल विचार करण्याच्या व भावना करण्याच्या पद्धतींमध्ये होऊन गेलेले असतात. कादंबरी लिहिणं जसं काही वर्षं वा काही महिने चालत राहतं, तसं विशिष्ट मन:स्थिती दीर्घकाळ टिकून राहिल्यानं त्या काळातल्या कविता चित्रमालिकेप्रमाणेच एका रंगसंगतीच्या असतात. हा काळ फारच वाढला, तर कवितेत पुनरावृत्ती सुरू होते. कधीतरी ते स्वत:लाच ध्यानात येतं वा कधी दुसरं कुणी हितचिंतक ते मोकळं बोलून ध्यानात आणून देतात. अशा काळात लिहिणं थांबवलं नाही, तरी मी ते छापणं थांबवते; किंबहुना आपण या कवितेतून पुन्हा एकदा थोड्या वेगळ्या शब्दांत तेच सांगितलेलं आहे, हे कळताच ते कागद फाडून टाकते. मग कधीतरी ती मन:स्थिती बदलते. यात मध्ये काही वर्षंही रिकामी जातात. ती अर्थातच उपकारक असतात. कारण त्यामुळे पुढे वा मागे कुठेच न जाता गाडी बंद ठेवून न्यूट्रल राहता येतं थोडा काळ. खेरीज हेही कळतं की, कविता लिहीत नसतानाही कविता जगत असणं सुरूच असतं. कवीवृत्ती राहतेच.

आणि ही कवितेची दृष्टी जगाकडे आणि स्वत:कडेही पाहण्यातून समृद्ध करणारीच असते. कवितेचं तंत्र, घाट याचा वेगळा विचार मी अद्याप केलेला नाहीये; मात्र माझं चित्रकार असणं सगळ्याच लेखनात उमटत राहिलं, तसं कवितेतही. लिहिलेली कविता दिसते कशी, हे अजाणता पाहिलं जातंच आपोआप...

कमावण्याची इच्छा विरली आणि गमावण्यासारखं जवळ काहीच राहिलं नाही, त्यानंतरचं नि:संगपण कवितेत उमटू लागलं आहे. लोकांची धास्ती नाही, कोण काय म्हणतील याची पर्वा नाही, प्रतिक्रियांची तमा नाही. दृश्य अशा कुणापर्यंत किंवा विशिष्ट अशा कुणापर्यंत पोहोचायचं नाही वा विशिष्ट अशा कुणापर्यंत आपलं काही पोहोचवायचं नाही. जे लिहितेय त्याला कुणी कविता, कादंबरी, कथा इत्यादी म्हणो ना म्हणो याच्याशी काही देणंघेणं नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जगणं म्हणजे शिल्लक उरलाय तो काळ शक्यतो चांगला व्यतीत करणं आणि दर चोवीस तासांचा तुकडातुकडा, ठिपका-ठिपका वेळ बरा घालवणं इतकंच राहिलं. वयाच्या या टप्प्यावर पोहोचेस्तोवर जगण्याप्रमाणे कवितेतही आक्रसणं, बिचकणं, हातचं राखून ठेवणं होतंच आणि स्वपासून समाजापर्यंतच्या अनेक सेन्सॉरशिप होत्याच.

वाचन वाढवणं, जगभर काय चाललंय हे समजून घेणं, त्याचे अर्थ लावणं, त्यातल्या संगती-विसंगती शोधणं असं काहीही वयाच्या चाळिशीपर्यंत करता आलं नाही. त्यानंतर सुरू केलं असलं तरी ते अद्याप खालच्याच पायऱ्यांवर आहे. माहितीची, ज्ञानाच्या, विचारांच्या, मननाच्या कक्षेत परिणामी असंख्य गोष्टी आल्याच नाहीत. न्यूनगंड, मर्यादित बौद्धिक कुवत आणि भ्रम-भासांच्या जगावर अधिक प्रेम या माझ्यातल्या उणिवांनीही अनेक वाटांना स्वत:च अडसर लावून ठेवले. मी, माझं कुटुंब, माझं प्रेम, माझी मुलं, माझ्या आसपासच्या स्त्रियांची दु:खं - अडचणी - वेदना - संघर्ष... इतकंच माझं जग मर्यादित राहिलं. अर्थात आसपासच्या स्त्रिया विविध आर्थिक स्तरांमधल्या, अनेक जातीधर्मांमधल्या असल्याने त्याचा आवाका थोडा वाढला, नाही असं नाही. पण त्यामुळे कवितेतून सखोल सामाजिक व राजकीय भान आजवर तरी आलं नाही. तत्त्वज्ञानाकडे मात्र वळले, ही या काळातली एक चांगली बाजू.

स्त्री असणं ही जाणीव लिहिताना असे, तशी वाचताना मात्र कधीच नव्हती. खूप आडवंतिडवं वाचलं आणि देशीपरदेशी भाषांमधलं उत्तमोत्तम वाचलं. कवितांचे अनुवादही केले. कवितेच्या रचनेची समज त्यातून नकळत वाढत गेली. मुळात जगताना अनेक प्रश्न पडतात; काही स्वत:च्या आयुष्यातून आणि काही समाजात जे काही चाललेलं असतं त्यातून. लिहिणं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं शोधणं. त्यामुळे आंतरिक आत्मचरित्र त्यातून उमटत राहतंच; बाह्य आत्मचरित्रातल्या प्रत्यक्ष घटनांशी ते दरवेळी मिळतंजुळतं असेलच असं नाही, काही वेळा तर विसंगत असंही असतं. जगण्यातले काही तुकडे जर निव्वळ स्त्री म्हणून जगले जात असतील, तर त्या तुकड्यांमधून लिहिलं गेलेलं स्त्रीच्या चेहऱ्याचं असतंच; पण त्याखेरीज एक व्यक्ती म्हणूनही जगणं घडत असेल तर तो स्त्रीविशिष्ट चेहरा अनेक कवितांमधून अदृश्य होऊन जातो. शारीरिक, लैंगिक जाणिवा आणि स्त्री असल्यामुळेच वाट्याला आलेले काही चांगलेवाईट अनुभव हे मी लिहिलंय; पण या पलीकडचंही लिहिलंय. स्त्रीवाद ओलांडून स्त्रीविशिष्टत्व स्वीकारणं आणि हळूहळू तेही गळून पडून एक माणूस म्हणून, त्याहीनंतर केवळ एक जीव म्हणून स्वत:कडे पाहता येणं यासाठी कवितेची वाट मोठी गरजेची ठरली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘स्वत:च्या संदर्भात कविता म्हणजे काय आहे, असे तुम्हांला वाटते? तुमच्या जगण्यात कविता कुठे आहे, कशी आहे?’ असा एक प्रश्न अरुणा ढेरे यांनी दिलेल्या प्रश्नावलीत आहे. कादंबरी ही जगताना पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना बहुतांश वेळा ठोस वाटा दाखवते. तिथं अनेककेंद्री व सलग असा विचार दीर्घकाळ होतो. काही गोष्टी तिथं अजाणता घडतात, तर काही जाणीवपूर्वक घडवता येतात. लेखांमधून करकरीत मुद्दे समजून घेत मांडणी करता येते, विचार व संवेदनशीलता वाढवत नेता येते. कविता या सगळ्याच्या अल्याड असते. पाहिलेलं, समजून घेतलेलं, समजून घेणं कंटिन्यू असलेलं असं बराच काळ धुमसत असतं. त्यावरचे जड दाब एखाद्या क्षणी मोकळे होतात आणि त्या जडातल्या कोवळ्या फटींमधून कधी वाफा, कधी वारे, कधी रोपाचे धुमारे असं काहीही कवितेच्या वाटेनं बाहेर येऊ लागतं. त्या-त्या वेळी ते नोंदवून ठेवता आलं तर उत्तम. या नोंदी मी काही महिने जशाच्या जशा राहू देते आणि काहीशा तटस्थपणे त्यांच्याकडे पाहता येतंय हे जाणवल्यावरच त्या कविता नीट वाचते, आवश्यक वाटल्यास पुनर्लेखन करते, सुमार वाटलं तर फाडून टाकते. राहिलेलं यथावकाश प्रकाशनासाठी दिलं जातं. कविता आणि उत्स्फूर्तता या एका रेषेतल्या गोष्टी असल्या, तरी कविता आणि घाई या एकमेकींशी शत्रुत्व असलेल्या गोष्टी आहेत. गीत कुणाच्या मर्जीबरहुकूम लिहून देता येईल, पण कविता कुणाला बांधील नसते, नसावी!

एकुणात ‘कविता म्हणजे काय?’ याबाबत पूर्वी एकाजागी लिहिलं होतं तेच सांगते की, कविता ही मानेजवळच्या शिरेला स्पर्श करणारी गोष्ट आहे. ती शीर सापडावी लागते. सापडली की, तिला स्पर्श करत राहावं वाटतं. तिच्यावरचा दाब वाढला की, जगणं संपणार हेही माहीत असतं. कविता ही अशी माझ्या जगण्या-मरण्यावर ताबा मिळवून बसलेली गोष्ट वाटते. मी सुखातही कविता लिहिल्या, दु:खातही; प्रेमातही आणि इतरांकडून तिरस्कार, नकार, घृणा, संताप, मत्सर इत्यादी नकारात्मक भावना आदळल्यानंतर त्या कबूल करूनही कविताच लिहिल्या.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कधीकधी कविता मला एखाद्या खासगी डबीसारखी वाटते; जिच्यात काहीही ठेवता येतं... लहानपणच्या बांगड्यांच्या रंगीत काचा आणि पानफुटीची पानं, मोरचूदाचा मरणान्तिक आकर्षक विषारी मोरपंखी खडा, मरून गेलेल्या प्रियकराचं तुटलेलं नख, त्याच्या मिशीचा एक कापून घेतलेला केस, मेलेल्या आईची चिमूटभर राख, जंगलातून परतताना कुणा आदिवासी बाईनं पुरचुंडीत बांधून दिलेले तांदळाचे दाणे आणि मोहाची फुलं, वणवणीतल्या अपमान - अवहेलनांनी चिरफाळलेल्या पायांच्या भेगा, मुलीनं लहानपणी खास माझ्यासाठी काढून दिलेलं चित्रं, एका छोट्या मुलासाठी मी विणलेले लोकरी बुट, समूहानं निरपराध मरून गेलेल्या माणसांची माहीत नसलेली किंवा माहिती निरर्थक ठरवणारी संख्या, जंगलात रस्त्यांवर लिहून ठेवलेले संदेश, प्रियकराला परत पाठवून दिलेली त्यानं मला लिहिलेली पत्रं, एखादी सुस्पष्ट प्रतिक्रिया, एखादा तीक्ष्ण उपरोध, फक्त गणितं करणार्‍या माणसांविषयीची हताशा, जुन्या कवीच्या कवितेतला कालबाह्य झालेला शब्द; खेरीज जो सतत मानेवर येऊन बसतो आणि पाठीला कायमचं पोक आणतो तो अज्ञात विचारांच्या ओझ्याच्या अवाढव्य दगडाचा टवका, अपूर्ण राहिलेल्या इच्छेचं गळून पडलेलं लहानसं कवच आणि अनेक रिकाम्या रात्रींमधून सलगपणे पूर्ण पाहिलेलं प्रदीर्घ रंगीत स्वप्न किंवा न दिसणारं पारदर्शक सत्य किंवा ज्यांच्यासाठी अद्याप प्रतिमा किंवा शब्दही सापडलेले नाहीत अशा रिकाम्या जागा...

असं काहीही. या डबीत माझा जीव आहे असं मी म्हणणार नाही, पण ती माझ्याजवळ असणं मला जिवंत राहण्यात मदत करतंय, हे मात्र खरं.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Fri , 04 October 2019

शेवटाला येणारा परिच्छेद अप्रितम! ♥️

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......