कादंबरी लिहिताना भोवती पात्रांचा जो गोतावळा तयार होतो, त्यामुळे तेवढा काळ माझा एकटेपणा दूर होतो. म्हणून मला कादंबरी लिहिणं आवडतं.
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • ‘ब्र’, ‘भिन्न’, ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’ आणि ‘कुहू’ या चार कादंबऱ्यांची मुखपृष्ठं
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika ब्र Bra भिन्न Bhinna ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम Thaki ani Maryadit Purushottam कुहू Kuhu

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख. ‘ब्र’, ‘भिन्न’, ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’ आणि ‘कुहू’ या चार कादंबऱ्यांच्या जन्मकथा महाजन यांनी सांगितल्या आहेत...

.............................................................................................................................................

१.

‘मी जर स्पर्मबँकेतून स्पर्म विकत आणून तुला जन्माला घातलं असतं, तर तू माझी एकटीचीच मुलगी राहिली असती कायद्यानं. तुझ्या कस्टडीसाठी माझ्यावर कोर्टात उभं राहण्याची वेळ आली नसती, तुझं माझ्यासोबत असणं का गरजेचं आहे, हे सिद्ध करत बसावं लागलं नसतं आणि तू कुठलाही तणाव निर्माण न होता माझ्यासोबतच राहिली असतीस. मी तुला मस्तपैकी माझ्या पद्धतीनं वाढवून मोठं केलं असतं... स्वतंत्र, निर्णयक्षम आणि कॉन्फिडन्ट!’ मी लेकीला म्हटलं. तिला माझ्या अशा कल्पनाविलासांची सवय झालेली असल्यानं तिनं नुसतं नाक उडवलं आणि माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष केलं.

‘ठकी’चं बीज बहुतेक तेव्हाच या ‘सिंगल मदर’च्या कल्पनेनं माझ्या मनात रुजलं असावं. मागाहून इतर अनेक संदर्भ त्याला खतपाणी घालत गेले. ‘आई’ या भूमिकेतला हा माझा मुलगी सोबत नसण्याचा कालखंड सगळ्यात अवघड होता. मुलीचं सोबत नसणं अनेक तऱ्हांनी जाणवत राहायचं. घराचं घरपणच गेलं आणि घर फक्त एका ऑफिसमध्ये रूपांतरित झालं. स्वत:कडे मी ‘केवळ एक आई’ म्हणून कधीच पाहिलं नसलं, तरीही ही एक ‘महत्त्वाची भूमिका’ आहे हेही मी नाकारलं नाही. त्यामुळे जी काही घालमेल व्हायची, ती झालीच. त्या काळात मी तिचं आणि माझंच नव्हे, तर माझं आणि माझ्या आईचं नातंही तपासून पाहू लागले. खेरीज मी लहानपणी आजोळी वाढल्याने आईची भूमिका निभावणाऱ्या आजीशी असलेलं नातंही शोधू लागले. आईकडे आपण फक्त आई म्हणूनच पाहतो, माणूस म्हणून नाही; हे बरोबर नाही, असं तिच्या मृत्यूनंतर वाटत होतं. मरून गेली की, माणसं वेगळी दिसायला लागतात, वेगळी कळायला लागतात.

माझ्या आधीच्या कादंबऱ्यांना, खासकरून ‘ब्र’ला आत्मपर म्हटलं गेलं; पण प्रत्यक्षात त्यात माझा असा व्यक्तिगत अनुभव एखाद-दुसराच असेल. आपल्या आयुष्यातले प्रसंग नावं बदलून कादंबरीत जसेच्या तसे लिहून काढणं, हे मी फार क्वचित केलंय. ‘ठकी’तही एखादा अनुभव वगळता आत्मपर असं फार काही नाही. मात्र लेखन कालानुक्रमे तपासलं, तर त्यातून लेखकाचं आंतरिक आत्मचरित्र दिसू लागतं, असं मला वाटतं. लेखकाचे सुप्त वा प्रकट विचार, भावना, इच्छा, अपेक्षा, स्वप्नं हे सारं या आंतरिक आत्मचरित्रात येत असतं.

घटना, प्रसंग, आपले वा इतरांचे अनुभव, दिवास्वप्नं, तपशील आणि माहिती या बाह्य गोष्टी आंतरिक आत्मचरित्राहून बऱ्याच वेळा निराळ्या असतात, असू शकतात, खरं तर असाव्यातच. वाचक सहसा कादंबऱ्यांमधल्या या बाह्य तपशीलांमध्ये लेखकाचं आत्मचरित्र शोधत बसतात; काही समीक्षकही चरित्रात्मक समीक्षेच्या नावाखाली हाच उद्योग करतात आणि लेखक हताश होऊन ते वारंवार नाकारत बसतात. ‘जर ते स्वत:चं नसेल, तर शब्दांत इतकं अस्सल उतरलं कसं?’

— हा अनेक वाचकांचा भाबडा प्रश्न असतो. त्याचं उत्तर दोन गोष्टींमध्ये दडलेलं आहे. एक म्हणजे लेखकाचं आंतरिक आत्मचरित्र आणि दुसरं म्हणजे लेखकानं गांभीर्यानं व सर्वतोपरी केलेला कादंबरीच्या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या बाह्य तपशीलांचा सूक्ष्म व सविस्तर अभ्यास.

२.

‘ब्र’ मी २००० साली लिहिली आणि २०१२ला ‘ठकी’चं लेखन सुरू केलं. आता या सर्व काळातलं माझं आंतरिक आत्मचरित्र मी तपासून पाहते... कारण लेखकाला जे प्रश्न पडतात, ते काही स्वत:च्या जगण्यातून आणि काही आजूबाजूच्या माणसांच्या जगण्यातून. त्यामुळे आयुष्यात येणारी-जाणारी माणसं व घटना या निमित्त असतातच, नाही असं नाही; पण त्याहून महत्त्वाचा असतो तो त्यामुळे सुरू झालेला विचारांचा प्रवास.

‘ब्र’च्या वेळी मला असं वाटत होतं की, आपलं काम माणसाला शेवटपर्यंत खरी सोबत देतं. माणसं दुरावतात, कधी मरतात. नोकरी, व्यवसाय, घरकाम, छंद असं काहीतरी करत राहणं गरजेचं त्यामुळे. काम माणसात ऊर्जा निर्माण करतं आणि समाधानही देतं. त्यामुळे ‘ब्र’चा शेवट प्रफुल्ला स्वत:चं काम सुरू करण्याचा निर्णय स्वयंप्रेरणेनं घेते, इथं झाला. त्यानंतरच्या काळात मला असं जाणवू लागलं की, माणसं भरपूर काम करतात, वैविध्यतेनं करतात; ते मनापासून, आनंदानं, समाधानानं, प्रामाणिकपणानं करतात; आणि तरीही त्यांच्या मनात मध्येच नैराश्य का डोकावतं? आत्महत्येचे, मृत्यूचे विचार का वेढून घेतात? जगण्याला काहीच अर्थ नाही, असं का वाटू लागतं? मग मी तत्त्वज्ञानाचं, संतसाहित्याचं वाचन वाढवलं. विज्ञानाच्या वाटेनं अनेक विचारांचा पाठपुरावा सुरू केला.

या प्रश्नातूनच ‘भिन्न’च्या लेखनाची सुरुवात झाली. लिहिताना त्याची उत्तरं सापडत गेली. ‘भिन्न’च्या ब्लर्बवर मी लिहिलं : खरं आहे की, आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं; त्याचप्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हेही पाठोपाठ कळतं. मग आपल्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं.

‘भिन्न’ जरी सामाजिक तपशीलांसाठी चर्चेत राहिली, तरी एका आजाराच्या निमित्तानं प्रेम, लग्न, कुटुंबं, नाती, मुलं सगळ्याचा विचार मी केला होता. व्यक्तिकेंद्रित व सामाजिक असे काही भेद लेखनात केले जावेत, हे मला पटत नाही.

एकाच व्यक्तीभोवती घुटमळणारं लेखनही सामाजिक असू शकतं. किती कोनांमधून लेखक त्याकडे पाहतो, हे महत्त्वाचं. यानंतर शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा केसस्टडीसाठी मी ज्या पहिल्याच घरात गेले आणि तिथं आत्महत्या केलेल्या बापांची मुलं पाहून आतून-बाहेरून हादरले. मी सगळं पुन्हा स्वत:शी जोडून पाहू लागले. त्या मुलांमध्ये मला माझ्या मुलीचा चेहरा दिसू लागला. भले आपल्या जगण्याचा भोगवटा आपल्याला भोगावा लागतो, पण आपली आई भित्री होती, जगण्याच्या संघर्षाला ती सामोरी जाऊ शकली नाही, या औदासीन्याचं सावट निदान माझ्या मुलीच्या मनावर पसरून राहता कामा नये, हे तीव्रतेनं जाणवलं. मग वाटलं, आपल्या माणसांनी फक्त जिवंत असणंदेखील खूप पुरेसं असतं. भले ती आपल्याजवळ, आपल्यासोबत नसतील; कदाचित मनानंही आपली राहिलेली नसतील, पण ती या पृथ्वीवर कुठे ना कुठे जिवंत आहेत, स्वत:चं आयुष्य नीट जगताहेत, हे पुष्कळ आहे की. असेल योग तर येतील ती पुन्हा जवळ. तोवर तग धरून राहता आलं पाहिजे. तग धरून राहिलोत आशेनं, तरच बदललेले दिवस दिसतील.

...तर हे तग धरणं काय असतं? कशाच्या आधारावर ही चिकाटी, हा चिवटपणा माणसात येतो? — हे प्रश्न यानंतर मनात उगवले. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्यांच्या बायकांनी नाही केल्या. त्याच, किंबहुना त्याहून अधिक विपरित परिस्थितीत त्या कशा जगताहेत आणि कुटुंबालाही कशा जगवताहेत? मरण्याची कारणं माहीत आहेत, पण त्या मरणाला ओलांडून जगण्याच्या प्रेरणा कोणत्या असतात? केवळ मृत्यूला घाबरून किंवा मरणवेळच्या वेदनेच्या कल्पनेला घाबरून जिवंत राहत नाहीत माणसं... हे मी एड्स झालेल्या रुग्णांसाठी काम करताना अनुभवलं होतं. मरणाच्या दारातही माणसांना हसायचं असतं, आनंद हवे असतात, सुख-समाधान हवं असतं, प्रेम करायचं असतं आणि प्रेम करवूनही घ्यायचं असतं. मोठं नको असतं काही, छोटी-छोटी सुखं हवी असतात अगदी. स्पर्श, चव, रंग, आवाज, आकार, गंध... पंचेद्रियांची सुखं. एका व्यक्तीला एका इवल्याशा आयुष्यात किती आनंद आणि किती सुखं घेता येतील याच्या मर्यादा असतात. या मर्यादांचा खुल्या करण्याच्या वाटा कलांमधून गवसतात. रंग आपल्याला दिसत असतातच, पण त्याकडे बघण्याची नजर चित्रकार आपल्याला देतात. शब्द, सूर, ताल, रंग, आकार, पोत... लेखक- कलावंत आपण न पाहिलेल्या जगांमध्ये आपल्याला घेऊन जातात आणि आपलं जगणं समृद्ध करतात.

सत्य कटूही असतं आणि मधुरही, वास्तव कुरूपही असतं आणि सुंदरही. आपण ते उघड्या डोळ्यांनी, खुल्या मनानं पाहिलं पाहिजे इतकंच. चित्रकलेचं शिक्षण घेताना शिकलेले अनेक धडे आठवू लागले. सौंदर्याच्या कल्पना तेव्हा कशा बदलत गेल्या होत्या, ते आठवलं.

‘कुहू’ची सुरुवात इथून झाली. मानेवर जखम असलेला, आपल्या गाण्यानं जग अधिक सुंदर बनवू इच्छिणारा, नैसर्गिक जगण्याची ओढ असलेला पक्षी बघताबघता एक रूपक बनून गेला. नैसर्गिक जाणिवा आणि व्यवहार यांच्यातला एक झगडा त्यात आहे.

मला स्वत:ला व्यवहार कधी नीट जमला नाही, जमण्यासाठी मुळात नीट समजलाच नाही; तरी चांगली माणसं भेटत गेल्यानं आल्या संकटांमधून निभाव लागत गेला. पण सगळ्याच कलावंतांचं किंवा अतिसंवेदनशील माणसांचं नशीब इतकं चांगलं असतं असं नाही. प्रेमापासून ते पैशांपर्यंतच्या अनेक अभावांमधूनही मी आजवरतरी तरले, सगळे तरतातच असं नाही. कुहू मरतोच. ‘भिन्न’मधली प्रतीक्षाही मरून गेली होती. पण मी सकारात्मक विचार करणारी आहे. खासगी आयुष्यातल्या निराशा किंवा व्यक्तिगत शोकांतिका ही सामूहिक नैराश्याचं किंवा सामाजिक शोकांतिकेचं कारण नसते...

हे उत्तर मला ‘कुहू’ लिहीत असताना सापडलं. तरीही हा व्यवहाराचा मुद्दा डोक्यात राहिलाच. जेव्हा ‘ठकी’ लिहिण्यास घेतली त्याची सुरुवातच कलावंतांच्या जीवनातल्या या व्यावहारिक मुद्द्यांपासून झाली.

‘ब्र’पासून ते ‘ठकी’च्या सुरुवातीपर्यंतचा वैचारिक प्रवास मी इथं ढोबळमानानं लिहिलाय. कारण इथं प्रामुख्यानं बोलायचं आहे ते ‘ठकी’बद्दल! खेरीज कवितांचे संदर्भ इथं वगळलेत. कवितांचा खरं सांगायचं तर मी अजून नीटपणानं विचारच केलेला नाहीये.

३.

‘ठकी’ लिहीत असताना मी माझे प्रकाशक दिलीप माजगावकर यांना एका पत्रात लिहिलं होतं : कविता लिहिणं कधीही सुसह्य. कादंबरीचा फार ताप असतो. एकतर ती लिहून संपता संपत नाही. इतका पसारा होतो की, सगळं लवकर आवरावं असं सारखं वाटत राहतं. गर्दीच गर्दी होते. एकेक पात्रं तर बोटाच्या टोकाशी येऊन बसतात त्वचेआत. नखसुद्धा कापायची भीती वाटते की, नखाखालीपण निजलेलं असायचं कुणी व्याकूळ होऊन. सगळ्यांचं करता करता जीव शिणून जातो. आधीच्या तीन कादंबऱ्यांचा अनुभव गाठीला आहे, हा भ्रम चौथी कादंबरी लिहिताना काही पानांतच फुटतो.

कुठलीही पूर्वपुण्याई किंवा पूर्वपाप कामी येत नाही. नवे पेच, नवे शोध, नवं सुख, नव्या वेदना, नव्या वाटा. पुन्हा एका नव्या पुरुषासोबत झोपल्यासारखं वाटतं. आपलं शरीर तेच असलं तरी बघता-बघता अनोळखी जागा ओळखीच्या होत जातात त्याच्या स्पर्शानं आणि या शक्यता आपल्यात होत्या, हे जाणवून चकित व्हायला होतं. जुन्याचा पार विसर पडतो.

जसा भोग्या तशी रात होऊन जाते. हाताची कातडी उष्णतेनं सोलून निघते. डोक्यातला जाळ वाट मिळेल तसा फुटू लागतो. डोळ्यांतल्या सूक्ष्म लाल रेषांचा गुंता वाढत जातो. कादंबरी लिहिणं हा केवळ मानसिक नव्हे, तर एक शारीरिक अनुभव बनत जातो. आत्ता या क्षणी असं वाटतंय की, ही कादंबरी लिहून पूर्ण झालेली असावी आणि मी दोन्ही तळहातांना गार गार नक्षीदार मेंदी लावून नुसतं मांडीवर हात ठेवून शांत सुखानं बसून राहावं केस मोकळे सोडून.

कविता लिहिणं म्हणजे प्रियकराला आयुष्यात एकदाच, एकाच रात्री भेटणं. आणि कादंबरी लिहिणं म्हणजे चिरेबंदी वाड्यात, भल्या मोठ्या एकत्र कुटुंबात धाकटी सून म्हणून नांदणं. कुणी प्रेमळ, कुणी छळणारे, कुणी जीवाला घोर लावणारे असे अनेक नमुने तिथं असतात. सगळ्यांचे रागलोभ सांभाळत, सगळ्यांना जोडून ठेवण्याची धडपड करत राहावं लागतं. मला माणसं खूप आवडतात. मोठी कुटुंबं आवडतात. त्यातले सगळे गुणखदोष, फायदे-तोटे माहीत असूनही आवडतात.

कादंबरी लिहिताना भोवती पात्रांचा जो गोतावळा तयार होतो, त्यामुळे तेवढा काळ माझा एकटेपणा दूर होतो. म्हणून मला कादंबरी लिहिणं आवडतं. एखाद्या पात्राच्या पायांवर डोकं टेकून नि:शब्द रडता येतं. एखाद्या पात्राच्या मांडीवर निजून गोष्ट ऐकता येते. कुणी मला ‘जेवलीस का’ म्हणून विचारतं साधेपणानं, तर कुणी समोर वाढलेलं ताट खसकन ओढून घेऊन भूतकाळात नेतं. भल्याबुऱ्या असंख्य घटनांनी भरलेलं जिवंत रसरशीत आयुष्य जगत असल्याचा एक आभास तयार होतो.

माणसं नसलेल्या घरातले पाळीव प्राणी किंवा निर्जीव वस्तू अनेकदा माणसांची जागा घेतात. माझा संगणक, लिहिण्याचे कागदखपेन, मी रोज पांघरते ती वैद्यबाईंच्या साडीची गोधडी, पुस्तकं, खेळणी, घराची एक काळ्या रंगाची भिंत ही सगळी माझ्या आयुष्यातली महत्त्वाची पात्रं बनतात. मला त्यांच्याशी संवाद साधता येतो. कादंबरीतली पात्रंही मग हळूहळू घरात वावरू लागतात. सरावाची होतात. त्यांचा लिप्ताळा इतका वाढत जातो की, हे लेखन अपूर्ण राहून मी मध्येच मरून गेले, तर ही पात्रं भुतांसारखी वातावरणात भटकत फिरत राहतील असं वाटतं.

५.

प्रश्न पडतात. एकावेळी एकच नाही, अनेक. म्हणून कादंबरीचा अवकाश हवा असतो की, लिहिता लिहिता कदाचित काही उत्तरं सापडतील. ‘कसं सुचतं?’ — या प्रश्नाचं ‘प्रश्‍न पडतात आणि त्यांची उत्तरं शोधावी वाटतात’ हे एक साधं उत्तर आहे. ‘ठकी’ लिहितानाचा पहिला प्रश्न होता की, जग बाजार बनलंय म्हणताना माणसंही वस्तुरूप झालीत. या बाजारात किंमत नेमकी कशाला आहे? महत्त्वाचा घटक कोणता? वस्तू निर्माण करणारा निर्माता, वस्तू विकणारा विक्रेता, वस्तू विकत घेणारा ग्राहक, खुद्द वस्तू की दलाल? कळत गेलं हळूहळू की, ‘दुनिया दलालांची आहे.’ पण हा प्रश्न काहीसा बाजूला सरकवला गेला आणि त्यातून त्याजागी दुसरा मोठा प्रश्न आला. म्हटलं, या दलालांचा विचार पुन्हा कधी करू. दलालांइतकाच आजच्या दुनियेतला दुसरा मेख मारणारा शब्द आहे ‘सुमार’. म्हणजे काय आता मी सुमारांची गोष्ट सांगायची? एखादा सुमार नायक किंवा एखादी सुमार नायिका? छे! हिरो कसा सुपरडुपर पाहिजे... स्त्री असो वा पुरुष.

कोण आहेत आजच्या काळातले हिरो? बाकीची क्षेत्रं बाजूला ठेवून अगदी रंगमंच वा पडद्यापुरतं बोलायचं झालं तरी कोणते चेहरे, कोणती नावं येतात समोर मराठीत? सामसूम आहे की काय? का? जुन्या कहाण्या, दंतकथा, वावड्या ऐकल्या की, वाटतं काय जगत होती माणसं त्या काळात! म्हणजे सुमार लोक त्या काळातही होते असतीलच, पण मोजके का होईना सणसणीत उंची गाठणारे होते. तिथून कुणी कोसळले, कुणी बरबाद झाले. पण आज असं कुणी का सापडत नाही? सगळी उंच माणसंही तडजोडी करत-करत कमालीची बुटकी कशी होऊन जातात? तकलादू मालिकांमधून, जाहिरातींमधून स्वत:ला का वाया घालवतात अभिनेते? बदलत्या काळानुरूप वागायचं म्हणणाऱ्यांमध्ये काळाला आपल्या बोटांच्या तालांवर नाचवणारं कुणीच का दिसत नाही?

सत्तरेक वर्षांचा अभिनयक्षेत्रातला कालखंड मला दिसू लागला. त्यात मला माझी नायिका ‘पद्मजा’ सापडली. आईच्या भूमिका करणारी अभिनेत्री. उत्तम अभिनयक्षमता असलेल्या अभिनेत्रींच्या वाट्याला आपल्या भाषांमध्ये काय येतंय? तरुण असताना अगदी नायिकेच्या भूमिका मिळाल्या तरी नायकाची मनधरणी करत झाडांभोवती फिरत नाचायचं आणि संकृतीचे कढ काढायचे. वय जरासं वाढलं की, दुय्यम भूमिका; अजून थोडं वय वाढलं की, आई! कोणत्याही वयात साजेशा व सणसणीत भूमिका किती जणींना मिळाल्यात? स्त्रीची कोणतीही भूमिका केवळ नातेसंबंधांशी घुटमळणारी, भावव्याकूळ अशीच का असते? विचार करणाऱ्या बायकांचं आपल्या कलाकृतींना वावडं का आहे? नुसत्या बाहुलीसारख्या कोरीव-कातीव, सुंदर खेळणं असलेल्या किंवा फुलदाणीसारख्या शोभेची वस्तू असलेल्याच भूमिका त्यांना का मिळतात? का कुणी त्यांच्यासाठी अस्सल असं काही लिहीत नाही? — असे अनेक प्रश्न पडू लागले.

सिनेमातल्या वा मालिकांमधल्या आईच्या भूमिका पाहिल्या की फस्सकन हसू येई. बाकी वहिनी, मोठी जाऊ, धाकटी सून इत्यादी भूमिकाही ज्यांच्या ‘आईतत्त्व’ एनलार्ज करून ओतप्रोत भरलेलं आहे अशाच. चांगली बायकोही आईतत्त्व असलेलीच, नवऱ्याचे सगळे अपराध पोटात घालणारी. आई कधी चुकत नसतेच आणि चुकली तर ती आईच नसते. मग तिची मुलंही तिला अगदी सहज आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करतात. अगदी टिंगल-टवाळी केली जावी अशा या हास्यास्पद भूमिका. या भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सामान्य स्त्रियांच्या तुलनेत पंचवीस वर्षं पुढचं आयुष्य जगतात आणि भूमिका करताना पंचवीस वर्षं मागचं आयुष्य जगतात. ही कसरत त्या कशा पेलत असतील? सिनेमात, नाटकातच नव्हे, तर प्रत्यक्ष माणसांच्या आयुष्यांमध्येही आईच्या भूमिकेत मला खूप विसंगती दिसत होत्या; मग त्या उपरोधानंच लिहायच्या ठरवल्या. अति झालं आणि हसू आलं म्हणतात तसंच. अभिनेत्री नायिका असल्याने एक लाभ असा झाला की, अनेक कथानकांमधून आई रंगवता आली. तीही अनेक प्रकारची आई. सख्खी, सावत्र, सरोगेटेड, एकटी... किती तऱ्हा. आई न होता येणं, ही देखील एक तऱ्हाच.

आई या नात्याकडे समाज प्रेयसीच्या नात्यापेक्षाही अधिक रोमँटिकपणे पाहतो. आईला कसंही वागवलं तरी चालतं, पण आईवरून दिलेली शिवी चालत नाही. या मागचं समाजकारण, मानसिकता, मिथ्स काय आहेत? आईविषयी लोककथा, दंतकथा, पुराणकथा आईची कोणती प्रतिमा समाजमानसात रुजवतात? जेनेटिक्स आईविषयी काय सांगतं? सायन्सफिक्शन लिहिणारे भविष्यातल्या आईबाबत काय कल्पना मांडतात? पुरुषसत्ताक समाजातलं नेमकं कोणतं राजकारण होतं की, मातृदेवता नष्ट होत गेल्या? या सगळ्याच प्रश्नांचा शोध घ्यायचं ठरवलं. तशी पुस्तकं मिळवून वाचण्यास सुरुवात केली.

आपल्याकडे चित्रपटांना सुरुवात झाली, तो सारा इतिहास पाहिला आणि त्यातल्या स्त्रीभूमिकांचा विचार केला तर काय सापडेल? — या विचारातून मी या विषयाशी संबंधित पुस्तकं वाचून झाली होतीच. चरित्रं, आत्मचरित्रं, अनुभवकथन, व्यक्तीचित्रं अशा फॉर्ममधली दीडेकशे पुस्तकं वाचली. त्यात पाहिलेले सिनेमे, नाटकं यांच्या आठवणी मिसळत होत्या. वाचलेलं, ऐकलेलं गॉसिपही आठवत होतं. यातच काही वर्षांपूर्वीची ती जुनी कल्पना मिसळली — स्पर्मबँकेतून स्पर्म विकत घेऊन मूल जन्माला घालणाऱ्या सिंगल-मदरची! यात नाट्य होतं. जबरदस्त नाट्य.

हा एका नाटकाचा विषय आहे... मला वाटलं. त्याविषयी मी पहिल्यांदा बोलले ती रिमा लागू यांच्याशी. ‘कुहू’च्या डीव्हीडीसाठी वाचन त्यांनी केलं होतं. त्यात रिमाताई म्हणजे आईच्या भूमिका करणाऱ्या तमाम अभिनेत्रींमधल्या बाप! तरीही पद्मजा म्हणजे रिमा लागू नव्हेत. ही भूमिका केवळ त्यांच्यावर बेतलेली नाही. त्यात इतर अनेक जणी आहेत. रिमाताई आजच्या तमाम मोठ्या हिरोंची कधी ना कधी आई बनलेल्या आहेतच, त्यामुळे ‘अशा भूमिका करताना मोनोटोनी येत नाही का?’ — या प्राथमिक प्रश्नापासून सहज गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना नाटकाची थीम सांगितली. किती पात्रं असावीत, अशी काहीशी चर्चाही तेव्हा आमच्यात झाली. रिमाताईंचा ‘कुहू’ वाचतानाचा वाचिक अभिनय मी प्रत्यक्ष अनुभवत होते, आम्ही दोघीच होतो स्टुडिओत. तेव्हा एक चर्चा झाली होती की, इतक्या असंख्य शक्यता कलावंतांमध्ये दडलेल्या असतात, पण त्यांचा कधी विचारच होत नाही आपल्याकडे. अभिनय कसाला लागावा असं काही आव्हानास्पद अटीतटीनं क्वचितच समोर येतं. परदेशीच्या कामांमधल्या शक्यता, त्यातली अनेकविध उदाहरणं रिमाताई बोलताना देत होत्या. एक नवं दालन माझ्यासमोर खुलं होत होतं.

तर मी नाटक लिहिण्यास सुरुवात केली. एक-दीड पान लिहिलं. स्मिता जोशी ही मला नेहमीच ताळ्यावर ठेवणारी एक मैत्रीण आहे. ‘मजकूर फाडून टाक’ इत्यादी थेट व संक्षिप्त सल्ले ती देते आणि ते मी ऐकतेही. उत्तम चर्चा होतात आमच्या. तिला वाचून दाखवलं. ती म्हणाली, “मजकूर चांगला आहे, पण हे नाटक नाहीये. नाटक इतकं शब्दबंबाळ नसतं.’’

झालं. मजकूर फाडून टाकण्यात आला; तरीही तो पुढचे सहाएक महिने मनात घोळत होताच. मग कधीतरी एकदाचा डोक्यात प्रकाश पडला की, ही कादंबरीच आहे, पण फॉर्म निराळा आहे, भाषा निराळी आहे. पुन्हा मांड ठोकली. ही लेखप्रक्रियेची सुरुवात. पहिली दोन प्रकरणं ओघात लिहून झाली. तृतीयपुरुषी निवेदन होतं. पद्मजाकडे कादंबरीच्या सुरुवातीलाच आत्मचरित्र लिहिण्याची ऑफर येते, पुढे ती आत्मचरित्र लिहिते व नंतर त्याचा एकपात्री प्रयोगही सादर करते — असं सगळं हे नाटक म्हणून लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हाच डोक्यात होतं. आता वाटलं की, तिथं नाटकातलं नाटक करायचं होतं, तसं इथं पुस्तकातलं पुस्तक करावं. मग कादंबरीचा दुसरा भाग पूर्ण आत्मचरित्र लिहायचं असं ठरवलं. आणि आत्मचरित्रात न सांगितलेल्या, लपवलेल्या, बदलेल्या किंवा वेगळ्या दृष्टीने दिसणाऱ्या गोष्टी पहिल्या व तिसऱ्या भागात. हे ठरवल्यावर गोची अशी झाली की, कोणता भाग आत्मचरित्रात येईल व कोणता त्याबाहेर? मग पहिल्या भागातली तीन प्रकरणं लिहून झालेली असताना, ते थांबवून मी दुसरा भाग आधी पूर्ण केला. आता काम सोपं झालं होतं. त्यानंतर पहिला लिहून झाला.

मग मी काही लोकांना भेटले-बोलले. त्यांच्यापैकी दिलीप प्रभावळकरांनी अगदी तांत्रिक माहिती, बदलता काळ, नाटक - टीव्ही - सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना अभिनयात करावा लागणारा फरक, त्यातले फायदे-तोटे असं बरंच काही छान समजावून सांगितलं. ते लेखकही असल्यानं अधिक व्यवस्थित सांगू शकताहेत हे जाणवलं. कारण बाकी बरीच मंडळी अशी होती की, त्यांच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ होतं, पण सांगता येत नसे. अखेर बोलताबोलता उठून ते चक्क काहीतरी करूनच दाखवत की, ‘बघ, हे असं असतं!’ हालचाली, आविर्भाव ही त्यांची माध्यमं होती, शब्द नव्हे. त्यामुळे अनुभव चांगला असला, तरी अनेक ठिकाणांहून मी रिकाम्या हाती परत आले. अर्थात माणसं त्यांच्या घरात पाहायला मिळाली, हे तपशीलही लिहिताना कुठेकुठे उपयोगी पडत गेलेच. काहींनी नाव उघड करू नये, असं सांगितल्याने सगळ्यांची नावं पुस्तकाच्या ऋणनिर्देशातही नाहीत.

यात अजून एक गोची होती. ती म्हणजे आजच्या वास्तवातली काही प्रत्यक्ष माणसं या कादंबरीतली पात्रं आहेत. उदाहरणार्थ दिग्दर्शक वामन केंद्रे या कादंबरीतलं एक पात्र आहे. त्याला मी लिहिलेला प्रसंग सांगून विचारलं की, ‘या प्रसंगी तू कसा वागशील आणि काय बोलशील?’ मी कल्पनेनं काही लिहिलं होतं, ते वामननं अचूक करून दिलं. इतरांचे थोडके उल्लेख होते किंवा एखादं वाक्य होतं. त्यात शक्यतो वादग्रस्त ठरेल असेल असं काही ठेवलं नाही. वादाचे मुद्दे काल्पनिक पात्रांच्या ताब्यात दिले. खऱ्या माणसांची नावं देताना काहीतरी प्रयोग करायचा म्हणून किंवा सनसनाटी क्रिएट करायची म्हणून दिली नव्हती; तर त्यातून वास्तवाचा आभास निर्माण व्हावा, हा स्वच्छ हेतू होता. मुळात या कादंबरीत सगळा भास-आभासाचा खेळ आहे, त्याला हे साजेसंही ठरलं. काही मतं वा प्रतिक्रिया कुणाला पटणारही नाही किंवा खटकतीलही, पण एखाद्या व्यक्तीनं आत्मचरित्र लिहिलं, तर त्यात असं सारं असतंच की. त्यामुळे याकडे वाचक समंजसपणे पाहतील का? — असा पेच होताच. पण मग त्याचा फार विचार करायचा नाही असं ठरवलं.

६.

यावेळी मुंबई, पुणे आणि ठाणे असा जवळचाच भाग फिरायचा होता, त्यामुळे प्रवासात फार वेळ गेला नाही. बरीचशी माहिती वा तपशील इंटरनेटमुळे घरबसल्या मिळाले. उदाहरणार्थ मिंकचा कोट कसा दिसतो, किंमत काय इत्यादी इमेजसह एका सेकंदात मिळून गेलं. असे अनेक लहानसहान तपशील होते. संदर्भांची बहुतेक पुस्तकंही सहज उपलब्ध झाली. श्रीकांत बोजेवार हा मित्र चित्रपटांचा अभ्यासक, त्याच्याकडून बिगशॉपर भरून पुस्तकं आणली. एका टप्प्यावर काही सिनेमे नव्यानं पाहण्याची गरज वाटू लागली. काही सिनेमे गणेश मतकरी या मित्रानं सुचवले. तेही इंटरनेटमुळे सहज पाहता आले. हे सगळं सुरुवातीलाच समजतं असं नाही... कादंबरी पुढे सरकत जाते, कथानकात जे काही नवीन येतं त्यानुसार नवे संदर्भ शोधत राहावे लागतात; त्यामुळे कादंबरी पूर्ण होईपर्यंत शोध सुरू राहतोच.

सिंगलमदरचा संदर्भ होता. त्यानुसार काहीजणींना भेटले - बोलले. स्पर्मबँक पाहिली. तिथलं कामकाज समजून घेतलं. टेस्टट्यूब बेबी, सरोगेटेड मदर अशा अनेक विषयांवर काही डॉक्टरांशी चर्चा केल्या. स्पर्म विकत घेण्यात एक कायद्याची गोची आहे, तिच्याबाबत वकिलांशी चर्चा करून कायदे समजून घेतले. इतर काही वैद्यकीय तपशील कादंबरीत येतात. अल्झायमर, स्किझोफ्रेनिया या विकारांचे. त्या त्या टप्पावर पुन्हा संबंधधित डॉक्टरांशी व रुग्णांच्या नातलगांशी बोलले. हे सगळेच अनुभव त्यांविषयी स्वतंत्र सविस्तर लिहावं असे आहेत; कारण संशोधनातलं लेखनात ओघात येईल तितकंच येतं फक्त. प्रसंग सुचलेले असले, तरी ते जिवंत करण्यासाठी असे वास्तव तपशील अक्षरश: शेकड्यानं गोळा करावे लागतात. पण आता बऱ्याच जागी लोक मला नावानं ओळखतात आणि लेखनामागची मेहनतही जाणून असतात, त्यामुळे आधीच्या दोन्ही कादंबऱ्यांच्या तुलनेत वेळ, कष्ट कमी लागले व खर्चही बराच कमी झाला.

नाटकाचे तीन अंक असतात, तसं कादंबरीच्या पहिल्या भागात मी तीन अंक लिहिले. दुसऱ्या अंकात आत्मचरित्र. तिसऱ्या अंकात आत्मचरित्र प्रकाशित झाल्यावर व त्यानंतरच्या काळात तिच्या आयुष्यात जे काही घडतं ते येतं. नाटकाचा ‘चौथा अंक’ म्हणून एक प्रकार असतो. नाटक संपल्यानंतर नाटकमंडळीत आपसात जे काही घडतं किंवा लोक दारू पित गप्पा मारत बसतात, तो चौथा अंक. तर पद्मजाच्या आत्मचरित्राच्या नाटकाची गोष्ट संपल्यानंतर हा चौथा अंक सुरू होतो.

म्हटलं तर कादंबरी या चौथ्या अंकानंतर संपायला हवी होती. पण जगण्याचे पेच खूप असतात आणि लिहिण्यातही ते येतातच. एकच माणूस वेगळ्या जागी उभा राहून पाहिला किंवा एकच घटना अनेकजणांच्या नजरांमधून तर अर्थ कायच्या काय बदलून जात असतात. ती जी झेन कथा आहे — ‘स्वप्नात फुलपाखरू आलं हे सत्य की, मी फुलपाखराच्या स्वप्नातला माणूस असेन कदाचित, हे सत्य?’ तसं काहीतरी मी या दुसऱ्या भागात लिहिलं. दुसरा भाग आधी वाचून मग पहिला भाग वाचला, तर ही कादंबरी वेगळी वाटेल आणि पहिला आधी व दुसरा नंतर वाचला तर निराळी. नाटक, स्वप्नं, दिवास्वप्नं, भास-आभास या सगळ्या दुहेरी जगण्यात एका टप्प्यावर काय वास्तव आणि काय काल्पनिक हे कळेनासं होतं... हे मला या दुसऱ्यार्‍या भागाच्या रचनेतून सांगायचं होतं. माणसं दुटप्पी वागतात, आत एक बाहेर एक असतात, अनेक लोक दुहेरी व्यक्तिमत्वाचे असल्यागत वेगवेगळं जगत-वागत असतात आणि आपल्या देशातले थोडेथोडके नव्हे, तर एक कोटीच्या आसपास माणसं स्किझोफ्रेनिक आहेत. या जगात कसं वागायचं, कसा विचार करायचा, या जगाकडे कसं पाहायचं?

अजून एक सांगायचं म्हणजे, पद्मजा माझ्याहून आणि माझ्या मनातल्या आदर्श स्त्रियांहून फारच निराळी आहे. असं आपल्याहून इतकं भिन्न असलेलं माणूस रंगवणं सोपं नव्हतंच. लहानसहान तपशीलांमध्येही मी स्वत: डोकावणार नाही याची काळजी घेत, तिला तिच्यासारखं रंगवायचं होतं. तिच्या भौतिक इच्छा, अपेक्षा, भरभरून जगण्याची तऱ्हा, दागिन्याकपड्यांची आवड, काहीतरी शिकायचंय म्हणून ध्येयहीन शिकणं, प्रवाहात वाहवत जाणं व जशी परिस्थिती येईल तिला शरण जाणं, नियतीवादी असणं, कामांमध्ये वाटेल तशा तडजोडी करणं, सुमार भूमिका स्वीकारणं... हे सारं रंगवताना मला विचित्र वाटत होतं. पण लेखकानं त्याच्या पात्रांना आपापल्या पद्धतीनं जगू द्यावं, वाढू द्यावं हेच योग्य असतं.

स्त्री-पुरुष नात्याच्या अनेक छटा या कादंबरीत मी रंगवल्या आहेत. या व्यावहारिकतेत माणसाची किंमत काय? नात्यागोत्यांचा अर्थ काय? ज्या गोष्टींना आपण संयम, शुचिता, व्रत इत्यादी म्हणून पूजतो; त्या खरोखरच आखून घेतलेल्या मर्यादा असतात की माणसांची कुवतच मुळी मर्यादित असते आणि तरी तो मर्यादा पुरुषोत्तम असल्याचं नाटक करतो? — अशाही काही प्रश्नांश्‍नांचा यात शोध घेतलेला आहे.

या कादंबरीवेळी मनावर कोणतीही कौटुंबिक दडपणं नव्हती, वाचकांच्या प्रतिक्रिया कशा असतील याचा ताण नव्हता. भाषेचा ताण ‘भिन्न’च्या वेळी होता, तोही नव्हता. नकारात्मक लैंगिक अनुभवांचं चित्रण मी आधीच्या कादंबऱ्यांमध्ये केलं होतं, पण सकारात्मक लैंगिक अनुभव, लैंगिक फॅन्टसीज् मात्र कधी लिहिल्या नव्हत्या. त्याही या कादंबरीत मोकळेपणानं आल्यात. मॅजिक रिअ‍ॅलिझम मला तुफ्फान प्रिय आहे... तोही काही प्रसंगांमध्ये आलाय. अभिनयाचं क्षेत्रही माझ्यासाठी अगदीच नवीन. ते सगळं तज्ज्ञ लोकांकडून समजून घेणं हे एक नव्या विषयाचा अभ्यास करणंच होतं आणि अभ्यासाची मला कायम मजा वाटत आली आहे.

लेखन पूर्ण झाल्यावर, अनिता जोशी या पूर्वी अभिनयक्षेत्रातच असलेल्या भाषातज्ज्ञ मैत्रिणीसोबत बसून संपादनाचं काम केलं. दीडेकशे पानं काटछाट करून कमी केली. लेखनाबाबत असमाधान राहिलेलं असतंच मनात, त्यामुळे ठकीचे मी एकूण दहा खर्डे केले. त्यातला पहिला खर्डा मी हातानं लिहिलेला होता. हे हस्तलिखित नंतर माझ्या एका वाचकानं त्याच्या संग्रहासाठी विकत घेतलं. शाईच्या पेनांनी कागदांवर अख्खी कादंबरी लिहिणं हा खरोखर एक विलक्षण असा शारीर अनुभव होता.

लेखनाबाबत असमाधान असलं तरीही या कादंबरीच्या वेळी मी पहिल्यांच निर्मितीप्रक्रिया व लेखनप्रक्रिया दोन्हीही एंजॉय केलं. तो सगळा प्रवास फार आनंदाचा होता. आपल्याला नवंनवं सुचतंय, ते विनाअडथळा व ताणरहीत अवस्थेत आपण लिहू शकतोय, लेखन जगण्यात प्राधान्यामावर आहे... हे सगळं फार सुखाचं होतं. सुचलेलं सगळं इतकं स्वच्छ होतं की, दीडेक वर्ष मी रोज सकाळी लिहिण्याचा विचार घेऊनच जागी व्हायची. दैनंदिन कामं आणि इतर व्यवहार आखून ठेवलेले होते, ठरावीक वेळात त्या गोष्टी आटोपल्या की दिवसभर मी फक्त लिहीत असे. शारीरिक मर्यादा तेवढ्या जाणवत की, आपण चोवीस तासांत किती तास सलग लिहू शकतो? लेखन शेवटच्या टप्प्यावर असताना मला शुभा गोखले ही चित्रकार मैत्रीण मिळाली. तिची चित्रं स्टुडिओत जाऊन पाहिली. पाहाताना वाटलं की, मी जे लिहिलंय ते अगदी समांतर रंगवलंय की हिनं. मग तिची मूळ चित्रं पुस्तकाच्या व ‘पुस्तकातल्या पुस्तका’च्या अशा दोन्ही मुखपृष्ठांसाठी वापरण्याचं ठरवलं. आतही काही चित्रं फोटोशॉपमध्ये थोडे वेगळे इफेक्टस् देऊन वापरली. मुखपृष्ठासाठी वापरलेल्या तिच्या चित्रामधली ओढणीत मोती घेऊन निघालेली मीराबाई... की, कृष्ण येईल आणि रस्त्यात तर खड्डे आहेत, ते खड्डे आधी मोत्यांनी भरून काढायला हवेत!

अंत:करणात प्रेम वसत असलं की, जगणं हे असं इतकं साधं आणि सोपं बनतं. प्रेम म्हणजेच विश्‍वास! आणि तरीही एवढी बुद्धिमान असलेली ही माणूसजात आपली आयुष्यं दिवसेंदिवस इतकी गुंतागुंतीची का करून ठेवतेय? आमची आयुष्यं आधीच्या पिढीत तुकडा-तुकडा झाली होती, ती या पिढीत ठिपका-ठिपका बनलीहेत. पिक्सोलेट. तरीही या जगातला चांगुलपणा संपलेला नाही. भासआभासाच्या नाटकातही खरा आहे तो सखीभाव! ‘ठकी’मधून मला या टप्प्यावर हेच सांगायचं होतं की, ‘आस्थेची सावली घनदाट असते...’ आणि यावर माझा ठाम विश्वास आहे.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......