प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक पुनर्मुद्रित लेख...
.............................................................................................................................................
साहित्यातून घडणारे लैंगिकतेचे दर्शन, हा प्रदीर्घ अभ्यासाचा विषय आहे. अकादमिक पद्धतीने त्याची मांडणी इतक्या कमी काळ-वेळेत करणे, हे त्या विषयावर अन्याय करणारे ठरेल. त्यामुळे एक लेखक, अनुवादक, संपादक म्हणून या विषयाकडे पाहत मी मांडणी करणार आहे. लैंगिकतेच्या व्याख्या इथे देत नाही, अभ्यासकांना त्या माहीत आहेत. त्यामुळे मी थेट विषयाकडे वळते. लैंगिक विषयांवर का आणि कसे लिहिले जाते? लिहिणे का टाळले जाते? भाषा आणि लैंगिकतेचे थेट नाते कसे आहे? असे प्रश्न सुरुवातीस उपस्थित होतात. या प्रश्नांमधून अजून काही प्रश्न निर्माण होतात.
१.
भाषेला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भ असतात. सांस्कृतिक संदर्भ पाहता भारतातील आजचे वातावरण हे बंदिस्त आहे, हे कबूल करावे लागते. संस्कृती ही काही एखादी वस्तू नव्हे, जी काही काळ जशीच्या तशी असेल आणि मग तिची मोडतोड होईल. ती बदलत राहणारी अमूर्त गोष्ट आहे. ललित साहित्य हे अशा बदलत्या संस्कृतीचा संदर्भ अस्तरासारखा आत जोडून घेऊनच निर्माण होत असते. ते पारदर्शक असते आणि क्वचितप्रसंगीच ते शरीराचे थेट दर्शन घडवते.
बंदिस्त समाजात केवळ लैंगिकतेबाबतच नव्हे, तर एकूणच शारीरिकतेबाबत बोलणे वर्ज्य मानले जाते. उदाहरण घेऊन बघूया. विवाहित स्त्रीवर झालेला बलात्कार या विषयावर लिहिलेल्या ‘पुण्यतोया’ या उडिया कादंबरीत बलात्काराचे थेट सोडाच, पण धूसर वा सूचक वर्णनही येत नाही आणि मानसिक आंदोलने, सामाजिक-कौटुंबिक परिणाम याविषयी कथानक रचताना शारीरिक दुष्परिणाम कुठेही नोंदवले जात नाहीत. ‘हे लिहिण्याची गरज काय? ‘बलात्कार’ या शब्दातच सारे आले...’ असा खुलासा त्यामागे असतो. तर ‘हे लिहिण्याची गरज काय’ याविषयी बोलू.
वास्तवात जेव्हा बलात्काराची पोलीस तक्रार नोंदवायची असते, तेव्हा आणि नंतर न्यायालयात केस उभी राहते तेव्हा... प्रत्यक्षात काय, कसकसे घडले, हे सांगायचे असते. त्यावेळी बहुतेक जणींना शब्द सापडत नाहीत. कारण त्यांनी ते कधी वापरलेलेच नसतात. योनी, लिंग, स्तन, ढुंगण, संभोग असे प्रमाण भाषेत वापरले जाणारे साधे शब्ददेखील उच्चारणे स्त्रियांना लाजीरवाणे वाटते. अल्पवयीन मुली व मुलगे बलात्कार आणि नंतरची तक्रार या प्रक्रियेतून जातात, तेव्हा त्यांना तर प्रमाणभाषेतील शब्द माहीतच नसतात. बोलीभाषेतील शब्द कोर्टात ग्राह्य धरले जात नाहीत, कारण ते व्यक्तीगणिक निराळे असतात आणि त्यांची अर्थनिश्चिती झालेली नसते. उदा. लिंगासाठी नू नू किंवा सू सू इत्यादी शब्द वापरले जातात. मुलांना लहानपणी शरीराच्या बाह्य अवयवांची सामान्य ओळख घरातून करून दिली जाते. हा डोळा, हे ना, हे हात इत्यादी शिकवताना योनी, लिंग, स्तन हे शब्द कधीही सांगितले जात नाहीत. वाढवयात मुलांना ते कुतूहलातून चौकशा करताना समजतात. किंबहुना बोलीभाषेतीलही लिंगविशिष्ट शब्दांचा जाहीर उच्चार हा अशिष्ट, असभ्य मानला जातो.
दुसऱ्या बाजूने अगदी लहान वयापासून हा मुलगा आणि ही मुलगी अशी आपली व इतरांची ओळख करून दिली जाते. हे भेद कुटुंबात, समाजात वावरताना थेट जाणवत राहतील, अशा तऱ्हेने ठसवले जातात. अशा बंदिस्त वातावरणात वाढलेल्या लेखकांना लेखनातही हे शब्द वापरणे अशिष्ट, असभ्य वाटू लागते. बलात्कार, लैंगिक शोषण, शारीरिक अत्याचार यांविषयी लिहिताना लेखक एकतर वस्तुस्थितीला सोडून लिहितात किंवा धूसर लिहितात; तर सकारात्मक लैंगिक अनुभवांची मांडणी करताना ते भावव्याकूळ होतात आणि रोमँटिसिझमची कास धरतात. हातांच्या बोटांवर मोजावेत, इतके कमी लेखक वास्तववादी मांडणी करताना दिसतात.
पौगंडावस्थेतील एखादा लेखक/कवी जेव्हा आपल्या लेखनात लिंगविशिष्ट शब्द वापरतो, तेव्हा त्याचे लेखन ‘विद्रोही’ समजले जाते. तरुणवयातील लेखक हेच लिहितो, तेव्हा असे लेखन करण्याला ‘स्टंट’ समजले जाते आणि प्रौढवयातील लेखक हे लिहितो, तेव्हा त्याला ‘आंबटशौकीन\रंगेल समजले जाते. कोणत्याही वयाच्या स्त्रिया जेव्हा लैंगिकतेविषयी लिहितात, तेव्हा त्यांना ‘बोल्ड’, ‘बिनधास्त’ समजले जाते. त्यांच्या लेखनाकडेच नव्हे, तर समाजातील एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे गुन्हेगाराकडे पाहावे तसे पाहिले जाते.
लपवायची गोष्ट लिहिल्याने ती कशी लिहिली आहे, हे वाचण्याचे कुतूहलही असते, ती वाचणे हे ओशाळेपणाचे, चुकीचेही वाटते आणि असे लेखन वाचणे ही देखील चोरून-लपून करण्याची गोष्ट आहे असे मानले जाते. कामजीवनविषयक वैद्यकीय माहिती देणारी पुस्तकेदेखील विकत वा वाचनालयातून घेताना वाचकांना संकोच वाटतो.
कथा-कादंबऱ्यांमधून शृंगारिक लेखन, पोर्नोग्राफीच्या जवळ जाणारी वर्णने जेव्हा पुरुषलेखक करतात, तेव्हा पुरुषवाचक त्याचे उत्सुकतेने स्वागत करतात. स्त्री-वाचकांना मात्र ते बऱ्याचदा काल्पनिक, बीभत्स, कंटाळवाणे वाटते; कारण केवळ पुरुषी दृष्टिकोनातून ते लिहिलेले असते. पुरुषांनी कल्पिलेला स्त्रीचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षातील स्त्रीचा दृष्टिकोन यांत अनेकदा मोठी तफावत असते. उदा. शंकर पाटील यांची ‘वेणा’ ही कथा आणि विजया राजाध्यक्ष यांनी ‘बाळंतपण’ या विषयावर लिहिलेल्या काही कथा यांची तुलना करून पाहता येईल. त्यामुळे स्त्रिया जेव्हा स्त्रियांच्या लैंगिकतेबाबत लिहितात, तेव्हा ते लेखन अधिकृत वाटू लागते. तथापि, स्त्रिया या पुरुषांहून अधिक बंदिस्त वातावरणात वाढलेल्या असल्याने त्यांच्या लेखनाच्या क्षमता आणि मर्यादा या पुरुषलेखकांहून भिन्न असतात.
२.
वेगवेगळ्या वयातील व्यक्तींची लैंगिकता, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमधील व्यक्तींची लैंगिकता, लैंगिकतेच्या वेगळ्या तऱ्हा असणाऱ्या गे, लेस्बियन, हिजडे अशा व्यक्तींची लैंगिकता... असे अनेकविध कप्पे करून त्यांबाबत लेखन झाले आहे की नाही आणि असेल तर कसे हे पाहता येऊ शकते. हे लेखन स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसे केले आहे, हे पाहणेही रोचक ठरेल.
यातील सर्वांत अधिक आढळणारा प्रकार म्हणजे धूसर व सूचक लेखन. पौराणिक कादंबऱ्यांमधील ‘ययाती’ या खांडेकरांच्या कादंबरीकडे यातील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून पाहता येईल. वार्धक्याच्या भावनेनं अस्वस्थ झालेला आणि मुलाचं तारुण्य घेणारा ययाती या कादंबरीचा नायक असला तरी त्याची लैंगिकता खांडेकरांनी धूसर करून मांडली आहे.
दुसरा प्रकार म्हणजे अनुषंगाने वा दुय्यम स्थानी ठेवून लैंगिकतेचा वापर. तेंडुलकरांच्या नाटकात हिंसेच्या संदर्भात आणि मर्ढेकरांच्या कवितेत यंत्रयुगाच्या संदर्भात लैंगिकता येते. तिसरा प्रकार थेट मांडणीचा. उदाहरणार्थ भाऊ पाध्ये, जयवंत दळवी आणि मेघना पेठे यांचे लेखन. भारतीय लेखकांपैकी वोल्गा या तेलुगू लेखिकेने जेंडर हा मुद्दाच केंद्रस्थानी ठेवून शरीराचं राजकारण उलगडून दाखवणाऱ्या कथा लिहिल्या आहेत. लैंगिकतेचा विचार तिने थेट केलेला दिसतो. अम्बई या तमीळ लेखिकेच्या कथाही अशाच थेट आहेत.
लैंगिकतेची थेट मांडणी ही बहुतेक वेळा वादाचा, चर्चेचा विषय ठरते. ती इतकी वरचढ होऊन बसते की, संबंधित लेखकांच्या लेखनातील बाकी वैशिष्ट्यांची दखलही अनेकदा घेतली जात नाही. टॅब्यू असलेल्या शब्दांचा वापर केला की वाचक, समीक्षक त्याच मुद्द्यावर खिळून राहिलेले दिसतात. त्यातही पुरुष लेखकांनी काही शब्द वापरणे खपून जाते, पण स्त्रियांनी तेच शब्द वापरण्यावर अघोषित मनाई असते. त्यातही पात्रांचा आर्थिक स्तर, व्यवसाय, जात-धर्म अशा गोष्टी तपासल्या जातात. मेघना पेठेच्या ‘नातिचरामि’मधली मीरा हे मध्यमवर्गीय, नोकरदार, एका फ्लॅटमध्ये राहणारे पात्र जेव्हा झवणे, मुतणे असे शब्द संवादात वापरते, तेव्हा वाचकाचा त्या पात्रावरचा विश्वास उडतो. लेखिकेने हे स्टंट म्हणून केले आहे, असे आरोप सुरू होतात. ‘हेच शब्द एखाद्या वेश्येच्या, झोपडीत राहणाऱ्या अशिक्षित कामकरी बाईच्या तोंडी आले असते; तर एकवेळ विश्वासार्ह मानले असते...’ असे विधान केले जाते. माझ्या ‘भिन्न’ या कादंबरीत रचिता हे एड्स झालेले पात्र सातत्याने लैंगिक शिव्यांचा वापर करते, तेव्हाही ‘एखादी मध्यमवर्गीय गृहिणी अशा शिव्या वापरेल का किंवा अमुक जातीची स्त्री असे अपशब्द उच्चारेल का?’ - असे प्रश्न विचारले जातात.
विवाहसंबंधातील लैंगिक वर्तन, विवाहबाह्य संबंधातील लैंगिक वर्तन आणि स्त्री व पुरुषवेश्यांचे व्यावसायिक लैंगिक वर्तन इत्यादी लैंगिक वर्तनाच्या तऱ्हा साहित्यात आढळतात. तुलनेत हिजडे, गे व लेस्बियन्स यांच्या लैंगिक वर्तनाविषयी खूपच कमी लेखन मराठीत झाले आहे. गे व्यक्तींचे अनुभव मांडणारे बिंदूमाधव खिरे यांचे ‘पार्टनर’ हे छोटेखानी पुस्तक हा विषय नको या कारणास्तव अनेक प्रकाशकांनी नाकारले आणि अखेर त्यांनी ते स्वत: प्रकाशित केल्यामुळे वाचकांपर्यंत नीट पोहोचू शकले नाही. लेस्बियन्सविषयी काही माहिती देणारे मंगला आठलेकरांचे ‘हे दु:ख कुण्या जन्माचे?’ हे मराठीतील एकमेव पुस्तक. पण पिंकी विराणीच्या ‘बिटर चॉकलेट’ या पुस्तकात ज्याप्रमाणे बालपणीच लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींच्या अनेक केसेस आल्यात किंवा सुनीता शर्मा यांच्या ‘कुमारीमाता’ या पुस्तकात अविवाहित मातांच्या केस स्टडीज दिसतात आणि त्यावरून त्या विषयाचा सर्वांगीण आढावा घेणारी मांडणी केलेली दिसते, तसे आठलेकरांच्या या पुस्तकात होत नाही. देशोदेशीचे कायदे इत्यादी जमवलेली माहिती देऊनही पुरेसा मजकूर होत नाही, तेव्हा अविवाहित स्त्रियांचे, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांचे अनुभव असे विषयांतर त्यात होते...
त्यामुळे मूळ विषयाचा आवाका समजून घेण्यात लेखिका कमी पडली आहे, असे जाणवते. कादंबरी या फॉर्ममध्ये प्रामुख्याने लैंगिकतेशी निगडित विषय आलेले दिसतात. त्यानंतर कथेत. कविता, नाटक, ललित निबंध या फॉर्ममध्ये तुलनेत कमी. कादंबरीची अनेक केंद्रस्थाने असतात. त्यामुळे त्यात हेही एक केंद्र असणे स्वाभाविकपणे घडत असावे. वेश्या, बारबाला, एड्स झालेल्या स्त्रिया यांची आत्मचरित्रे येण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यातून लैंगिकतेचे वेगळे व थेट दर्शन वाचकांना घडते.
३.
लैंगिकता भाषेतून व्यक्त करताना भाषेचे सामर्थ्य जसे जाणवते, तसेच भाषेच्या मर्यादाही जाणवतात. लिंगभावाधिष्ठित शब्द वापरताना, लैंगिक वर्तनाची वर्णने करताना लेखकाला आपल्या भाषेत कानकोंडे वाटते. लेखणी आक्रसून घेतल्याने लैंगिकता कधी ढोबळपणे व्यक्त होते, तर कधी धूसरपणे, कधी प्रतिमा-प्रतीकांचा वापर करून. आपल्या भाषेतील शब्द वापरणे काही वेळा ओंगळवाणे वाटते आणि लेखक त्यासाठी दुसऱ्या एखाद्या भाषेचा आधार घेतो. मराठीत लिहिताना हेच शब्द हिंदी, इंग्लिश अशा भाषांमधले वापरले तर त्याचा संकोच जरा कमी होतो. त्यातही पुन्हा स्त्रियांच्या अवयवांविषयी पुरुषांकडून लिहिले जाण्याची परंपरा आहे, पण पुरुषांच्या अवयवांविषयी पुरुष व स्त्रिया दोघेही क्वचितच लिहितात. अशा लेखनाला अश्लील, संस्कृतिविघातक अशी लेबले लावली जातील, अशी भीती लेखकांच्या मनात असते.
तात्त्विक मुद्दा नसतो, तेव्हा नैतिक मुद्दा उपस्थित करणे आणि स्त्रीचं चारित्र्यहनन करणे, हे आजही सुरू आहे. कला आणि कुलीनतेची सांगड आजही घातली जाते. कला, अभ्यास त्यागणं म्हणजे कुलीनता ही व्याख्या आजही समाजमानसात रुढ आहे. स्त्रीलेखकांना त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक रोषाला सामोरे जावे लागते. पुरुषलेखकांइतकी लेखनाची, प्रमाणभाषेच्या वापराची प्रदीर्घ परंपरा स्त्रीलेखकांकडे नाही. आपल्या बोलीभाषेचा वापर लेखनात करण्याऐवजी त्यांनी पुरुषी प्रमाणभाषेची निवड केल्याने, त्यांना भाषिक इतिहासाचे पाठबळ लाभत नाही. परिणामी मौखिक लोकसाहित्यात स्त्री जितक्या प्रभावी व जोरकस रीतीने व्यक्त झालेली दिसते, तितकी लिखित साहित्यात होत नाही. त्यामुळे लैंगिकतेबाबत लिहिताना स्वत:पासून ते समाजापर्यंत त्यांना संघर्ष करावा लागतो आणि स्वत:च्या सेन्सॉरशिपपासून सामाजिक सेन्सॉरशिपमधून जात लेखन करणे हा एक संघर्षाचाच अनुभव ठरतो.
यातूनही पुढचा प्रकार म्हणजे नवे शब्द निर्माण करणे किंवा व्यवहारात, बोलीभाषेत संबंधित व्यक्तींनी निर्माण केलेले नवे शब्द किंवा चिन्हभाषा जाणून, समजून घेऊन लेखनात वापरणे. उदा. गे व्यक्ती, पुरुषवेश्या आणि हिजडे यांच्या भाषेतले हे काही शब्द : कोठी (गुदामैथुन करणारा), गिरीया (गुदामैथुन करवून घेणारा), लिकुम (शिस्न), बिट्टू (नितंब), धरवाना (शिस्नप्रवेश), कोमेर (समलैंगिक मुखमैथुन), बोतल (कमनीय देह), चित्कू (सुंता केलेला पुरुष), थिपुर (शरीरविक्रीची किंमत), धुमकी (सिगारेट), डुंगर (पोलीस).
त्या त्या व्यक्तींसोबत जवळिकीने संवाद साधल्याखेरीज, त्यासाठी घराबाहेर पडून फिल्डवर गेल्याखेरीज त्यांची भाषा समजणे केवळ अवघडच नव्हे, तर अशक्य असते. परिणामी स्त्रीलेखकांचे अनुभवविश्व व भाषिकविश्व त्यामुळे मर्यादित राहिल्याचे जाणवते. लैंगिकतेतील नकारात्मक अनुभव आजकाल काही जणी कविता-कथांमधून धीटपणे मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात, पण तुलनेत लैंगिकतेचे सकारात्मक अनुभव खूपच कमी वेळा मांडला जातो. अनुभवांचा अभाव हे कारण इथे नक्कीच नसावे; पण आपल्या लैंगिक आवडीनिवडी स्वत:शी कबूल करणे, व्यक्त करणे, मग त्या लिहिणे ही प्रक्रियाच अजून मराठीत नीटपणे सुरू झालेली नाही. बदलाची सुरुवात झालेली असली तरी त्याची गती अत्यंत मंद आहे. लैंगिकतेतील सर्व वास्तवं लेखिकांनी अजून लिहिलेली नाहीत, मग लैंगिकतेबाबतच्या आपल्या फँटसीज काय आहेत, हे त्यांनी लिहिणे तर खूप दूरची गोष्ट आहे.
समाजातील अनेक घटकांनी अजून लिहिण्यासच सुरुवात केलेली नाही. उदा. आदिवासी व भटक्या विमुक्त जमातींमधील स्त्रिया. आदिवासी स्त्रीचे एक आत्मचरित्र मराठीत आले, पण कार्यकर्त्यांनी लिहवून घेतलेल्या या पुस्तकाचे लेखन बरेचसे रूढ ठोकताळ्यांप्रमाणेच झाले. या जमातींच्या लैंगिकतेच्या कल्पना, संस्कृती निराळी आहे. त्यांचे अनुभवविश्वही फार निराळे आहे. ज्या पोलिसी लैंगिक अत्याचारांना पारधी स्त्रिया सामोरे जातात, ते त्यांच्यापैकी एखाद्या स्त्रीने लिहिले तर साहित्यविश्व ढवळून निघेल. आदिवासी जमातींच्या लैंगिक वर्तनाविषयी अनेक गैरसमज समाजात प्रचलित आहेत. त्याचा त्रास आता वेगाने माणसांची सरमिसळ होण्याच्या काळात आदिवासी स्त्रियांना भोगावा लागतो आहे. आपल्या सकारात्मक व नकारात्मक लैंगिक अनुभवांना मोकळेपणाने व्यक्त करण्यास आज सुरुवात झालेली असताना, हे बाकीचे घटक लिहू-बोलू लागले, तर महाराष्ट्रातील निराळे सामाजिक-सांस्कृतिक जीवन वाचकांना अनुभवण्यास मिळेल.
.............................................................................................................................................
कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment