अजूनकाही
Yariv Mozer या दिग्दर्शकाचा ‘Snails In The Rain’ हा हिब्रू भाषेतील चित्रपट LGBT थीम्सवर आधारित चित्रपटांमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानावा लागेल. कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण, आशय आणि अभिनय या सर्वच पातळ्यांवर तो बाजी मारून जातो. एक अस्वस्थ करणारा अनुभव देणारा हा चित्रपट शेवटानंतरही पाठलाग सोडत नाही. जगण्याच्या अनुभवाचं महत्त्वाचं दस्तावेजीकरण करणाऱ्या काही मोजक्या कलाकृतींपैकी ही एक आहे.
१९८०च्या दशकातली ही कथा आपल्याला तेल अविव विद्यापीठातीलमध्ये शिकणाऱ्या बॉझ या एका अत्यंत देखण्या भाषाशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात घेऊन जाते. त्याचा एक ठरलेला दिनक्रम आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत राहतो. स्कॉलरशिप मिळण्यासाठी एका विद्यापीठाच्या उत्तराची तो वाट पाहत आहे. पण त्याच्या लॉकरमध्ये एका अज्ञात इसमाने त्याला लिहिलेली प्रेमपत्रं येऊन पडतात. त्या व्यक्तीचं बॉझच्या आयुष्यावर बारीक लक्ष असतं. अगदी सगळ्याच बारीकसारीक हालचालींवर. बॉझच्या आयुष्यात यापूर्वी एका मित्रासोबत किसिंगचा अनुभव आलेला असतो. तो पाठ सोडत नसतानाच आलेल्या या निनावी पत्रांमुळे तो अस्वस्थ होतो आणि प्रेयसीसोबतचं त्याचं आयुष्य बदलून जातं. तो प्रचंड देखणा असल्यामुळे आजूबाजूचे पुरुषही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. त्या पत्रांमुळे सावध होऊन तो आजूबाजूच्या सर्व पुरुषांकडे संशयाने पाहू लागतो. ती पत्रं त्याच्या प्रेयसीच्या हातात पडतात. त्या पत्रांचा छडा लावत असतानाच बॉझच्या लैंगिकतेचा वेध घेण्याचाही ती लपूनछपून प्रयत्न करते. अशातच बॉझच्या प्रेमात वेडी झालेली ‘ती’ व्यक्ती त्याला अल्टिमेटम देते. बॉझ त्यावर काय प्रतिक्रिया देतो, त्याच्या प्रोफेसरचं त्याच्याशी नातं काय आणि त्याच्या प्रेयसीशी त्याचं नातं तसंच राहतं का, हे सारं चित्रपटातच पाहणंच योग्य ठरेल.
Yoav Rueveni या अत्यंत देखण्या अभिनेत्याने बॉझच्या भूमिकेला चार चाँद लावले आहेत. त्याचं पुरुषांनाही भुरळ पाडण्याइतकं कमालीचं सुंदर दिसणं ही कथेची गरज होती आणि आपल्या देहबोलीतून या अभिनेत्याने भूमिकेला पूर्णपणे न्याय मिळवून दिला आहे. त्याच्या प्रोफेसरच्या भूमिकेत दिग्दर्शकाने उत्तम आणि संयत अभिनयाचा वस्तुपाठच गिरवला आहे. इतर सहकलाकारांचीही या दोघांना उत्तम साथ मिळाली आहे.
या चित्रपटातील एका दृश्यात बॉझचा प्रोफेसर म्हणतो, “बुद्धिबळाच्या खेळात जर मध्येच कुणी तिसरा माणूस आला तर त्याला खेळ सुरू कसा आणि कुठून झाला, हे कळणं गरजेचं नसतं. समोर मांडलेल्या सोंगट्यांच्या स्थितीवरून तो खेळ पुढे चालू ठेवू शकतो. त्याचप्रमाणे भाषेचा अभ्यास कुठूनही सुरू करता येतो.” अशा प्रसंगांमुळे चित्रपट ज्या उंचीवर गेला आहे, त्यावरून दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट आहे, यावर विश्वास बसत नाही. एका प्रसंगात बॉझ घरी नसताना त्याची आई येते आणि त्याच्या प्रेयसीशी गप्पा मारताना तिला विचारते की, तुम्ही दोघं लग्न कधी करताय? जगातल्या सगळ्या आयांना दिग्दर्शकाने एका वैश्विक धाग्याने बांधून टाकल्याने गंमत वाटली.
बॉझला येणारी प्रेमपत्रं हा चित्रपटाचा गाभा असल्याने त्यातील मजकूर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्या पत्रांतून त्या अज्ञात इसमाला बॉझबद्दल वाटणारी आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी ओढ स्पष्ट दिसते. एकतर्फी प्रेमात त्या व्यक्तीची होणारी कुतरओढ तिचा चेहरा चित्रपटात कुठेही दिसला नसतानाही आपल्याला जाणवते. त्याला शेवटी जाणवणारं भकास एकाकीपण आपलं मन व्यापून टाकतं. या चित्रपटाच्या लेखनाचंच हे सामर्थ्य म्हणावं लागेल.
‘Snails In The Rain’ या शीर्षकाविषयी विचार करताना कुठे पुसटसाही धागा मिळत नव्हता. पण मग लक्षात आलं की, बॉझला त्या अनुभवाचा असलेला गोगलगायीसारखा चिकट, गिळगिळीत गिल्ट या शीर्षकामागे दडलेला असावा. गोगलगाय ज्याप्रमाणे पाठीवर घर घेऊन फिरते, त्याप्रमाणे प्रेयसीसोबत असूनही त्या वेगळ्या लैंगिकतेने आणि त्या अनुभवाने बॉझची पाठ न सोडणं, हेही कदाचित अभिप्रेत असावं.
पुढेमागे कधीतरी या चित्रपटाची भारतीय आवृत्ती काढण्याचा मोह एखाद्या दिग्दर्शकाला नक्की होईल. फक्त ही तरल कलाकृती एखाद्या कविमन असलेल्या संवेदनशील दिग्दर्शकाच्याच हातात पडावी!
लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment