अजूनकाही
प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख. कविता महाजन यांनी ‘भारतीय लेखिका’ या पुस्तकमालिकेत विविध भारतीय भाषांतील लेखिकांची तब्बल ४० पुस्तकं मराठीमध्ये आणली. त्या प्रकल्पाविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख...
.............................................................................................................................................
अनुवादाला माझ्या आयुष्यात मूळ लेखनाइतकंच महत्त्वाचं स्थान आहे. एखादी कविता आपल्या भाषेत अनुवादित करून पाहिली की ती अधिक कळते, हे मी विद्यार्थिदशेतच अनुभवलं आणि कवितांच्या अनुवादांनी माझ्या वह्या भरल्या. त्यानंतर सामाजिक कामं सुरू झाल्यानंतर कामाचा एक भाग म्हणून गद्यलेखन व वृत्तपत्रीय लेखांचे अनुवाद हे दोन्हीही समांतर सुरू राहिलं. विचार पक्के होत जाण्यात त्याची मदत झाली. वाचनातही आजदेखील साठ टक्के मजकूर इतर भाषांमधला वा अनुवादित असतो. इस्मत चुगताई यांच्या निवडक कथांचे अनुवाद मी मराठीत केले; त्यातूनच बळ घेऊन पुढे मी माझी ‘ब्र’ ही पहिली कादंबरी लिहिली. इस्मत चुगताई यांचं ‘रजई’ हे माझं पहिलं अनुवादित पुस्तक. त्यानंतर लीलाधर जगुडी, निर्मला पुतूल यांचे कवितासंग्रह, ‘आगीशी खेळताना’ हे कार्यकर्त्या स्त्रियांच्या डायऱ्यावर आधारित पुस्तक, काशिनाथ सिंह यांची कादंबरी अशी अजून तीन पुस्तकं मराठीत आणली.
सलग व सातत्याने काम केलं, तरी अनुवादक कमीच पडतील, इतकं उत्तमोत्तम साहित्य देशी-परदेशी भाषांमध्ये आपल्याकडे आहे... हे वाचताना कायम जाणवत होतं. स्वत:चं लेखन, वाचन, अभ्यास आणि अर्थार्जनाची कामं व घरसंसार हे सारं सांभाळत आवडलेल्या लेखनातला एखादा टक्काही आपण मराठीत आणू शकणार नाही, याची जाणीव झाली होती. तरीही अनेक पुस्तकं मराठीत असावीत असं वाटायचं. ही जाणीव विमेन्स वर्ल्ड या संस्थेनं १९९९ साली आयोजित केलेल्या भारतीय लेखिकांच्या शिबिरात गडद होत गेली. त्यानंतर काही वर्षांनी मी ‘भारतीय लेखिका’ या शीर्षकाखाली काही पुस्तकं मराठीत आणण्याची योजना आखली.
दरम्यानच्या काळात आत्मपरीक्षण करताना अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती... ती अशी की, मी अनुवादक म्हणून फारशी बरी नाही. माझे काही अनुवादक मित्रमैत्रिणी ज्या सहजतेनं अनुवाद करतात, त्यांच्या तुलनेत मला अनुवादासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. लेखनाप्रमाणेच अनुवादाचेही मी अनेक खर्डे करते आणि तरीही असमाधान कायम असतं. त्यामुळे स्वत: फारसे अनुवाद करण्याच्या फंदात न पडता संपादन करावं; कारण तुलनेनं संपादक म्हणून मी चांगलं काम करत आले. आजवर सातशेहून अधिक पुस्तकांचं संपादनाचं काम करण्याचा अनुभवही माझ्या गाठीशी आहे. तर जे काम बरं जमतं ते करावं, हे उत्तम. मग मनोविकास प्रकाशनाच्या अरविंद पाटकर यांच्याकडे ही कल्पना मांडली आणि ४० स्त्री लेखकांची प्रत्येकी एक अशी ४० पुस्तकं मराठीत आणायची ठरवून काम सुरू केलं.
अनेकदा परदेशी भाषा या आपल्याला आपल्या देशातल्या अगदी बाजूच्या राज्याच्या भाषेहूनही समजणाऱ्या व जवळच्या वाटत असतात, असा देशभरातला अनुभव आहे. त्यामुळे देशी भाषांमध्ये आपसात होणारे अनुवाद मोजकेच. सरकारी संस्था थोडीशी कामं करतात, पण त्यातून समकालीन साहित्य त्वरित उपलब्ध होतंच असं नाही. उदाहरणार्थ साहित्य अकादेमी पुरस्कार मिळालेल्या लेखकाचं पुस्तक अकादेमीतर्फे अनुवादित होण्याची शक्यता असते. अशात युवा पुरस्कार सुरू झाले आहेत, पण त्याआधी या पुरस्कारापर्यंत पोहोचणारे लेखक वृद्धच असायचे, त्यांच्यानंतर लेखकांचा दोन पिढ्या होऊन तिसरी फळी मैदानात उतरलेली असे.
आंध्र प्रदेशातल्या एका मोठ्या अनुवाद प्रकल्पाचे खंड पाहिले, तेव्हा मराठीतले कोण हे कुतूहलानं पाहिलं. त्यात वि. स. खांडेकरांची कथा आणि दिलीप चित्रेंची कविता दिसली. यांचे अनुवाद अयोग्य होते असं नव्हे, पण समकालीन नव्हते. समकालिनांच्या साहित्याचा अनुवाद एक लेखक म्हणून मला प्राधान्यक्रमावर ठेवावा वाटतो, पूर्वसुरींचा विचार त्यानंतर करावा, ही माझी भावना आहे. त्यानुसार मी पुस्तकांची निवड केली.
समकालिनांमध्ये प्रत्येक स्त्री-लेखकाच्या भीतीच्या आणि धाडसाच्या जागा वेगवेगळ्या आहेत; अनुवादातून भीतीच्या जागा कमी होऊन धाडसाच्या वाढतील, हा लिहिणाऱ्यांना होणारा फायदा होता. वाचकांना आपल्या भाषेतल्या दोन-तीन स्त्री लेखक धाडसी म्हणून परिचित असतात, पण त्यांच्या कामाकडे कसं बघावं हे कळत नाही, विचित्र पद्धतींनी त्यांना विरोध होत राहतात, त्यांचे तिरस्कार केले जातात, त्यांना तुच्छ लेखलं जातं वा अनुल्लेखानं टाळलं जातं. बाई असून राजकीय घडामोडी, सामाजिक समस्या, अर्थकारण, लैंगिकता अशा गोष्टींवर लिहिते याचं अती कौतुक किंवा मग हे विरोध - तिरस्कार- घृणा स्त्री लेखकांच्या वाट्याला येतात.
पुरुष लेखकांच्याही वाट्याला हे आलं होतं, पण ते तीन पिढ्या आधी आलं आणि सावकाश संपलं. स्त्री लेखकांच्या बाबत अद्याप हे प्रकार संपण्याची वेळ आलेली नाहीये. त्यामुळे इतर भारतीय भाषांमधल्या स्त्री लेखक मराठीत आणल्या, तर संख्याबळ वाढेल आणि इतक्याजणी काहीतरी समान सांगताहेत तर त्याचा विचार करायला हवा, असं या वाचक-समीक्षक व समकालीन पुरुष लेखकांना कदाचित वाटू शकेल.
देशभरातल्या स्त्रिया काय लिहिताहेत? त्यांचे लेखनविषय व प्रकार कोणते आहेत? लिहिण्यासाठी त्यांनी कोणत्या किमती मोजल्या आहेत? या प्रश्नांची उत्तरं देखील या प्रकल्पातून शोधण्याचा प्रयत्न केला. हा खरं तर एक साहित्याचा समाजशास्त्रीय अभ्यासच होईल, इतकी विविधता या उत्तरांमध्ये होती. तो आजचा विषय नसल्यानं त्याबाबत सांगत नाही, केवळ उल्लेख करून पुढे सरकते.
अनुवादातली पहिली अडचण पुस्तकांची निवड. कोणत्या स्त्री लेखक, त्यांची कोणती पुस्तकं हे ठरवणं अवघड होतं, कारण मुळात ते शोधणं अवघड होतं. साहित्य अकादेमी व भारत भवन इथून काही संपर्क मिळाले असते... मिळालेही; पण त्या सर्व स्त्री लेखक चांगल्या-वाईट अर्थांनी प्रस्थापित असलेल्याच असणार हे गृहित होतं. मग अनेकांशी चर्चा, गप्पा, चौकशा करत स्त्री लेखक व त्यांची पुस्तकं निवडली. आपल्याकडे प्रत्येक भाषेत त्या-त्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एखादी सूची असणं किती गरजेचं आहे हे जाणवलं. मराठीतही असं काम नियमित आढळत नाही. संपर्क पत्ते – फोन नंबर्स मिळवल्यावर त्यांच्याशी कुठल्या भाषेत संपर्क साधायचा, हेही कळेनासं झालेलं. कारण अनेकींना केवळ त्यांची मातृभाषाच कळते, हे ध्यानात आलं. इतर भाषांशी संपर्कच न आल्यानं त्यांचं लेखन एका अर्थानं प्रभाव नसलेलं, अस्सल होतं. त्यामुळे ते मिळवण्याची धडपड जास्त करावी वाटली. स्वत: लेखक असल्याचा आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचा मला या कामात खूपच फायदा झाला. अन्यथा इतक्या ओळखीही झाल्या नसत्या व इतकी पुस्तकंही हाती आली नसती.
सहसा अनुवादक आपल्याला आवडतं एखादं पुस्तक निवडतात किंवा लोकप्रिय पुस्तकांचे हक्क मिळवून प्रकाशक ती पुस्तकं व्यावसायिक अनुवादकांकडून अनुवादित करून घेतात. इथली प्रक्रिया त्याहून बरीच निराळी होती. कविता, कथा, कादंबरी, लेख हे चार प्रकार मी प्रामुख्याने निवडायचे असं ठरवलं होतं. त्यात अर्थात विज्ञान कादंबरी इत्यादी उपप्रकार असणार होतेच. सर्जनशील लेखनासोबतच स्त्री-पत्रकारांनी लिहिलेली काही पुस्तकं आणि वृत्तपत्रांमधलं सदरलेखन अशी दोन-तीन पुस्तकंही निवडायची ठरवली. स्त्री-प्रश्नांवर काही स्वयंसेवी संस्थांनी सर्वेक्षणं करून, अभ्यास अहवाल तयार करून, त्यावर आधारित पुस्तकं लिहिलेली आहेत.
त्यातलं ‘कुमारी माता’ हे एक पुस्तक व अशी अजून काही पुस्तकंही निवडली. काही पुस्तकं नियमित अनुवाद करणाऱ्या अनुवादकांनी प्रकल्पाची माहिती समजल्यावर माझ्याकडे स्वत:हून आणून दिली, त्यातलं एखादं निवडलं.
भारतीय स्त्री लेखकांची ही निवड त्या भाषेतील प्रातिनिधिक आहे, असं नाही. मात्र या स्त्री लेखकांनी आपल्या भाषेतील साहित्यात आणि पर्यायानं भारतीय साहित्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, हे निश्चित. वय, वर्ग, लोकप्रियता, पुरस्कार असे मुद्दे विचारात न घेता स्त्री-विषयक स्वतंत्र विचार मांडणाऱ्या, स्त्री-जीवनाचं समकालीन दर्शन घडवणाऱ्या, एकुणात स्त्री-केंद्रित असणाऱ्या साहित्याचा विचार इथं केला. त्यानुसार लेखक निवडण्यास सुरुवात केली. त्या-त्या स्त्री लेखकावरील स्वतंत्र लेख अथवा त्यांची मुलाखत प्रत्येक पुस्तकात समाविष्ट केली. त्यावरून त्या प्रत्येकीचा व्यक्ती आणि लेखक असा दुहेरी परिचय वाचकांना झाला. पुस्तकं डिझाइन करतानाच त्यात सुरुवातीला लेखक-अनुवादकांचा बायोडेटा, मग प्रस्तावना आणि मुलाखत वा लेख अशी रचना केल्यानं सामान्य वाचकांखेरीज अभ्यासकांनाही फायदा झाला.
अनुवादक निवडणं ही खरोखर कसरत होती. आधी एक कल्पना अशी होती की, भारतीय स्त्री लेखकांच्या पुस्तकांचे अनुवाद मराठीतल्या स्त्री लेखकांकडून करून घ्यावेत. ती फार चटकन बाद झाली. चांगले लेखक हे चांगले अनुवादक असतातच असं नाही, हा त्यातला पहिला मुद्दा होता. दुसरा लेखकांचे प्राधान्यक्रम हे कायम स्वत:च्या लेखनाला असणार आणि अनुवादाला बहुतांश लेखक दुय्यम समजणार, हे दुसरं कारण होतं. तिसरं कारण हे माझी संपादक म्हणून गोची टाळण्यासाठीचं होतं... ही कोण आपल्याला सूचना देणार वा सुधारणा सुचवणार वा आपल्या अनुवादाला प्रस्तावना लिहिणार - असा लिहिणाऱ्यांचा अहंकार निश्चितच आडवा आला असता; (हे अनुभवातूनच सांगतेय.) हे मला टाळायचं होतं. निश्चित वेळात, मोठ्या संख्येचं काम शिस्तीत करायचं असेल तर लेखकांच्या मूडचे चढउतार व अहंकार सांभाळत बसण्यापेक्षा अनुवादकांकडेच अनुवादाचं काम सोपवणं सोयीस्कर होतं.
त्या-त्या भाषांमधून थेट अनुवाद करणारे अनुवादक कमी मिळणार, याची कल्पना होती. त्यामुळे अशा वेळी हिंदीत वा इंग्लिश भाषांमधल्या अनुवादावरून अनुवाद करावे लागणार होते. भारतीय भाषांमध्ये आपसात अनुवाद जितके सहज होतात, तितके इंग्लिशमधून होत नाहीत. मुळात भारतीय भाषा इंग्लिशमध्ये वा कुणाही परदेशी भाषेत जाताना सपाट झालेली असते. तिचे सांस्कृतिक संदर्भ एकतर विरविरीत झालेले असतात किंवा त्यासाठी टीपा द्याव्या लागलेल्या असतात. बोलीभाषांची नजाकत पूर्णपणे नष्ट झालेली असते. एका भारतीय इंग्लिश स्त्री लेखकानं त्यांची कुणीतरी हौसेनं अनुवादित केलेली कादंबरी या मालिकेत समाविष्ट करता येते का बघा, म्हणून माझ्याकडे पाठवली. कादंबरी बरी होती, अनुवादाचा प्रयत्न प्रामाणिक होता, पण गडबड प्रमाण मराठी भाषेनं केली होती. मुंबईतला वांद्र्याचा परिसर, टॉवर्स आणि झोपडपट्ट्या, त्यातल्या माणसांचे आपसातील संबंध असा साधारण विषय. विविध जातीधर्माप्रांतांची, निरनिराळ्या आर्थिक स्तरांमधली माणसं एका सुरात एकमेकांशी बोलत होती, ही भाषिक एकात्मता काही केल्या सुसह्य वाटत नव्हती. बोलीभाषांचा अजिबात गंध नसलेल्या अनुवादकाला बदल करून देणंही शक्य झालं नाही. अनुवाद नाकारण्यात आला.
काही अनुवादक एका भाषेतून चांगला अनुवाद करतात, म्हणजे त्यांना दुसऱ्या भाषेतून चांगला अनुवाद करता येतोच असं नाही; हेही अजून एका पुस्तकावेळी समजलं. उदा. इंग्लिशमधून उत्तम अनुवाद करणाऱ्या अनुवादकानं हिंदीतून अनुवाद करताना वाट लावली.
अजून एक अनुभव महत्त्वाचा जाणवला. अनुवादकाची वृत्ती जशी असेल, त्या पद्धतीचं पुस्तक त्याच्याकडे आलं, तर कामाचं सोनं होतं. उदाहरणार्थ या मालिकेतला प्रफुल्ल शिलेदार या कवीनं मानसीच्या कथांचा केलेला अनुवाद. काव्यात भाषा आणि जादुई वास्तववादाचा वापर याची जाण प्रफुल्लसारख्या कवीकडे सखोल असल्यानेच हा अनुवाद उत्कृष्ट होऊ शकला. अजून एक काम नमुन्यात बरं वाटलं होतं, पण पूर्ण झाल्यावर ध्यानात आलं की, त्यातला जोम - जोरकसपणा पूर्णत्वे अदृश्य होऊन भाषा अत्यंत सौम्य, मवाळ झाली आहे. एका अनुवादक बाईंनी तर शिव्यांच्या जागी फुल्या टाकल्या होत्या. संवाद त्या-त्या पात्राचे असतात, लेखक-अनुवादकाचे नाही... त्यामुळे पात्र बोलेल तसं लिहिलेलं असतं, हे ध्यानात न घेता त्यांचे भाषिक संकोच वरचढ झाले होते.
प्रत्येक पुस्तक हे अनुवादाबाबत नवं काहीतरी शिकवून, समजावून जाणारं असतं. अनुवादकांसोबत भाषा, शैलीचा अनुवाद, बोलींचा वापर, म्हणी - वाक्प्रचार व शिव्यांचा अनुवाद, कवितांचा अनुवाद अशा अनेक विषयांवर वेळोवेळी खूप चांगल्या चर्चा झाल्या. तेव्हाच त्यांची टिपणं काढून ठेवायला हवी होती, असं वाटतंय. तरीही या प्रत्येक पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून मी काही मुद्दे मांडलेले आहेत. त्या माझ्या ब्लॉगवरही ठेवलेल्या आहेत, इच्छुक वाचक पुस्तकांखेरीज त्या तिथंही वाचू शकतील.
.............................................................................................................................................
कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment