मराठी-इंग्रजीतील ज्येष्ठ कादंबरीकार किरण नगरकर यांचं ५ सप्टेंबर २०१९ रोजी निधन झालं. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही नगरकरांची पहिली कादंबरी १९७४ साली, म्हणजे त्यांच्या वयाच्या ३२व्या वर्षी प्रकाशित झाली. त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये फारसं लेखन केलं नाही. त्यांच्या ‘रावण अँड एडी’, ‘गॉड्स लिटिल सोल्जर’, ‘ककल्ड’ आणि ‘द एक्स्ट्राज’ या इंग्रजी कादंबऱ्यांनी इंग्रजीमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. नगरकरांच्या निधनानंतर त्यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या एकुलत्या मराठीतील कादंबरीची बरीच चर्चा झाली\होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीविषयीचा हा एक लेख...
.............................................................................................................................................
कादंबरी वाचताना असंख्य कथानकांच्या गुंतावळ्यात वाटा हरवत व शोधत बसणे, नंतर या खटाटोपाची व्यर्थता प्रतीत होत जाणे आणि त्याहीनंतर या कादंबरीच्या वरपांगी जाणवणाऱ्या आगळेपणाच्या बुडाशी असलेला ‘फॅशन’चा भाग स्पष्टपणे प्रतीत होणे, असे ‘सात सक्कं त्रेचाळीस’बद्दल घडते.
या कादंबरीत अनेक कथा आहेत. त्या त्या कथांचे नायक-नायिका आहेत. कुशंक पुरंदरे हे त्या कथांना जोडणारे पात्र आहे. त्याच्याच नजरेतून वाचक अन्य व्यक्ती व प्रसंगांकडे पाहतो. काही कथांमध्ये तो स्वतः नायक आहे, काहींमध्ये नुसता निवेदक. या कथांना क्रम नाही. कधी त्यांची अखेर आधी भेटते आणि मग अन्य तपशील पुढे येतो, तर कधी नुसत्याच संदर्भांनी त्यांचे धागे उकलत जातात. एखाद्या शब्दावरून वा प्रसंगावरून कुशंकला कुठल्यातरी काही गोष्टी आठवतात आणि आधीच्या वा नंतरच्या कथानकाचा एखादा तुकडा तो मध्येच उधळून टाकतो. बऱ्याच परीक्षकांनी हे तंत्र हा या कादंबरीच्या आगळेपणाचा फार महत्त्वाचा आधार मानला आहे. या तंत्रामुळे वाचक सारखा चक्रावत जातो. सगळे पूर्वसंदर्भ मनात नोंदवून त्याला सावधपणे व अडखळत-ठेचाळत ही कथामालिका पार करावी लागते. हे खरे असले तरी कादंबरीचा तो गौण भाग आहे. त्यात तसे नावीन्यही नाही. संज्ञाप्रवाहांच्या स्वरूपात मांडल्या गेलेल्या काही कथानकांसाठी हे तंत्र यापूर्वी अनेकदा वापरले गेले आहे. ‘सात सक्कं’चे यातील वैशिष्ट्य फार तर एवढे म्हणता येईल की, या तंत्राचा फाजील अतिरेक तीत होऊनसुद्धा कादंबरीची गतिमानता उणावलेली नाही. याला मुख्यत्वे श्रेयीभूत आहे, त्यांच्या शब्दांचा ताजेपणा, शैलीचा स्वैरपणा आणि अनुभवविश्वाचे वैचित्र्य!
अनेक समकालीन कादंबऱ्यांपेक्षा ‘सात सक्कं’ ही उजवी व लक्षणीय आहे, ही बाब वादातीत. तिच्या भाषेत अर्थवाहित्व आहे, लवचीकता आहे, अस्सल ओबडधोबडपणा असूनही लेखकाच्या मनातले नेमकेपणी व्यक्त करण्याची क्षमता आहे. तथाकथित सभ्यपणाच्या दांभिक आच्छादनाखाली निष्कारण अशिष्ट समजल्या जाणाऱ्या नागड्या सत्यांना लपवण्याचा वृथा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना ती बेधडक सामोरी गेली आहे. पांढरपेशी सूचकता, भोंगळ अलंकारिकता व सौष्ठवी पुस्तकीपणा यापासून मुक्त असलेल्या या भाषेला तिचा स्वतःचा असा घाट आहे. पात्रप्रसंगानुरूप ती बदलली आहे. पात्रांच्या अनुभवांना त्यांच्या सर्व संज्ञा-संवेदनांसह वाचकांच्या मनात संक्रमित करण्यात तिने यश संपादिले आहे.
विस्ताराने अवतरणे देण्याची ही जागा नव्हे. तरीपण पृष्ठे ११ ते १५ वरील इस्पितळाचे वर्णन उदाहरणार्थ सांगता येईल. त्या वर्णनातून ते इस्पितळ, त्याच्या सर्व शिसारी, कोंडलेपण, तुसडेपण, एकाकीपण, वेदना, कारुण्य इत्यादींसह समूर्त होते. अठरा विश्वे दारिद्र्य व डोक्यावर सतत घिरट्या घालणारा मृत्यू यांच्या सहवासात जीवन कंठणारा नंदाढेलाचा परिसरही लेखकाने असाच शब्दबद्ध केला आहे. बनारसच्या वसतिगृहातील वासनेने पेटलेली गद्धेपंचविशी, तिथे गवत कापायला येणाऱ्या बायांनी नकळत भडकवलेल्या वखवख प्रतिक्रिया आणि त्यात रवींद्रचा पडलेला बळी, गणपतीविसर्जनाच्या धुंद सोहळ्यात बेभान झालेला जनसंमर्द व त्या गलबल्यात स्वतःच्या विचारात हरवलेला व त्या बेभानपणाच्या पायी तुडवला गेलेला कुशंक, हे सगळे व असे कित्येक प्रसंग नगरकर वाचकांच्या अंतःचक्षूसमोर साक्षात उभे करतात.
कुशंकच्या आयुष्यात या ना त्या कारणाने डोकावलेल्या मैत्रिणींच्या वर्णनांचा आवर्जून या संदर्भात उल्लेख करावा लागेल. कादंबरीत एक ‘ती’ आहे. बुटकी बेसुमार मांड्यांची, अफाट खालीवर उताण्या देहाची, गोल गोल मासाची तळी अंगभर मिरवणारी, बेचव चिवट राखेप्रमाणे चव असणाऱ्या ओठांची, सुजट चेहऱ्याची! पुढे किती दिवस उपासमार होणार या भयाने कुशंक तिला गिगोलोसारखा भोगतो. शिरीन आहे. एकलकोंडेपणाशी संसार मांडून बसलेली, तल्लफ आल्यावर ‘बालपणा’पासून ते शेजाऱ्यांच्या वैकुंठवासी मांजरापर्यंत कशावरही कविता लिहिणारी. तिला एकांत चढतो. संगीताची ती शौकीन आहे. तिच्या हार्पवादनाचं कादंबरीतील वर्णन (पृ. १९) नितांत सुंदर आहे. ‘ह्या बाईबरोबर कोणीतरी झोपायला पाहिजे’ कुशंकला वाटते. एक प्राचिंती भेटते. पाच फुटांची. गुडघ्यापर्यंत वेणी, नाजूक कोवळी कोवळी. तिचे डोळे केवळ वर्णनातीत. तिच्या चित्रकार नवऱ्यासाठी (शतलज) ती कुशंकमार्फत कुणाकडे पैसे मागते. शेवटी औषधावाचून मरते.
ज्या दिवशी तिच्याबद्दलचे आकर्षण लैंगिक दडपण बनेल, त्या दिवशी तिच्याकडे यायचा थांबीन ही कुशंकची तिजविषयीची भावना! तशीच एक आरोती आहे. कुशंकची महाविद्यालयीन मैत्रीण. बुकसेलरच्या दुकानातली तिची पहिली भेट, नंतरच्या भेटीमधले नानाविषय, वहिनीने सांगितलेले आपल्या नवऱ्याचे शय्येतले खेळ तिने कुशंकला सांगताना अवघडलेला तो, नंतर नियतीच्या योजनेनुसार झालेली त्यांची फाटाफूट आणि सोशल सायन्सेसच्या गृहस्थाशी तिचे झालेले लग्न, तिची अपंग मुलगी पृथा व मुलगा गुड्डु, या तिच्या संसारात ‘कबाब में हड्डी’प्रमाणे कुशंकने काढलेले नऊ दिवस आणि शेवटी तिच्या प्रश्नामुळे स्वाभिमान दुखावून तिच्या संसारातून-आयुष्यातून- त्याने घेतलेला काढता पाय, हे सारेच प्रसंग हृद्य आहेत. अशीच एक चंदनी त्याला भेटते. सुंदर फक्त आणि अतोनात, रक्ताभिसरण जोरात चालू आहे, हे सतत पटवून देणारी, गोरी टवटवीत कांती, नाजूक धारदार आणि सुंदर नाक, धाप लागेल इतकी सुंदर, आपल्या सौंदर्याचा संपूर्ण स्वीकार केल्याने स्वतःत गुंतून न पडणारी, शंभर टक्के समरसतेने बोलणारी व स्वाभाविक निष्पापपणा जगणारी, असाध्य वाटणारी. पण ती जेव्हा साध्य होण्यास तयार होते, तेव्हा कुशंकच नकार देतो. ‘नाही म्हणण्याची कारणं काय वाटेल ती किंवा कितीही खरी असोत मी चंदनीला नाही म्हणून माझ्या चांगुलपणाला (थोडासा) दुर्मिळ झालो’ (पृ. १५३).
पण या सर्वांहून लोभस आणि गूढ शब्दचित्र आहे ‘तू’चे. तिचे चष्म्यातूनही विलक्षण दिसणारे डोळे, इतके उघडे तरीही सगळं झाकणारे, अथांग. ती विलक्षण बुद्धिमान (डोके नव्हे अॅसिटिलिनची ज्योत), नाटक-खोटेपणाचा तिच्या व्यक्तित्वाला लवलेशही नाही. कुशंकला फक्त तिच्या सहवासात सुगंध व गारवा जाणवतो. संभोगात मुक्तीचा साक्षात्कार होतो. तिच्या सहवासात राहणे त्याला फायटिंग फिट वाटते.
‘तू’ आणि ‘समुद्र’ कुशंकच्या मनात परस्परांच्या प्रतिमा म्हणून येतात. वाकुल्या दाखवल्यापासून अमृतानुभव, टॉयन्बी यांच्यावर चर्चा करण्यापर्यंतचे कोणतेही वय तिला पेलता येते, हे त्याला तिच्याशी बोलावंसं वाटण्याचं महत्त्वाचं कारण होतं. पण ती असते स्किझोफ्रेनिक. कधी फार चांगली, कधी तितकीच दुष्ट, कधी बोल बोल बोलणारी तर अचानक ‘मै चूप रहूंगी’ मूडमध्ये शिरणारी. विशिष्ट वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाने तिला झपाटून टाकलेले असते. त्यांना धडा शिकवण्यासाठी घातलेले चिलखतच तिच्या स्वातंत्र्यावरचे व विकासावरचे बंधन ठरते. कुशंकलाही तिचा स्किझोफ्रेनिया संसर्गाने जडतो. परिणामी कादंबरीवर त्याच्या सर्व अपेक्षांची संभाव्य अर्थपूर्ण परिपूर्तता म्हणून वावरणाऱ्या ‘तू’लाही तो मुकतो. पण तरीही ‘क्या फर्क पडता है?’ या प्रश्नाचं उत्तर फक्त तिच्याबद्दलच ‘पडता है, पडता है, पडता है’ असे येते.
याखेरीज रात्री-बेरात्री आपल्या सगळ्या लहानथोर पोरींना बदडणारे भाऊ काथवटे, कुशंकच्या वडिलांशी निष्कारण भांडणारा व पुढे निष्कारण मरणारा मद्रासी आणि त्याला नाटकीपणे रडणारी मद्राशीण- अशी शेजारची तऱ्हेवाईक बिऱ्हाडे; काका-काकू-पपा त्यांच्या चार इंग्रजी नावांच्या मुली; अॅनिमल ग्रेसने बाईनंतर बाई कॅसा नोव्हाप्रमाणे भोगत सुटलेला चित्त्यासारख्या डौलदार यष्टीचा रघू आणि क्लबातल्या डान्सरपासून भिषंदरच्या सुनेपर्यंत त्याच्या असंख्य भोगनायिका. तसेच इतरही काही संभोग : रशीद आणि त्याची प्रेयसी, काका आणि अमिनारा, कुशंक आणि त्याच्या मैत्रिणी (विशेषतः ‘तू’), यांच्यामधील. यापैकी प्रत्येकाची तऱ्हा नि पातळी अगदीच निराळी. राकेश तेजानीची प्रेयसी सीता रानडे व बहीण मोयना; बनारसच्या वसतिगृहातल्या ‘वासनाकांडा’त सापडलेले रघू, राकेश, जितेंद्र व सधन; आई, पपा, काका, काकू, प्राचिंती, सुन्हेरियाची पोरगी, रवींद्र आणि इस्पितळातले सहप्रवासी- या सर्वांना आलेली तऱ्हेतऱ्हेची मरणे; काकूंची राख त्यांच्या इच्छेनुसार चौपाटीवर नेत असताना कुशंकवर तुटून पडलेला गणेशविसर्जनाच्या धार्मिक नशेने धुंद झालेला जनसंमर्द, पोलिसांनी केलेली पाशवी पिटाई व शेवटी तो बोलत नाही म्हणून सेलमधल्या युनियनवाल्या फणसेने कुशंकच्या कमरेत हाणलेली सणसणीत लाथ, अशी कित्येक चित्रविचित्र पात्रे व अफलातून प्रसंग या कादंबरीत आले आहेत. त्यांचे रेखाटण काटेकोर आहे.
पण एवढे सारे असूनही ही एक बिनचेहऱ्याची प्रसंगमालिका होते. प्रसंगांचा एक चलतचित्रपट होतो. कादंबरीत चितारलेल्या या गतिमान पण अस्ताव्यस्त प्रसंगातून फार तर निवेदकाच्या भावजीवनाचा विस्कळीतपणा प्रकट होईल, तसेच संवेदनांचे काही पुसट, अंधुक, अस्पष्ट व असंबद्ध आकृतिबंध वाचकाच्या मनावर उमटतील. पण ही पात्रे त्याला सजीव वाटत नाहीत. लेखकाने स्वतःच्या सोयीनुसार रंग-ब्रशाने चितारलेली वाटतात. इतक्या अन्कनेक्टेड व अनरिलेटेड व्यक्तींचा हा बाजार वाचकांच्या मनात ‘समाजरूप’ धारण करून उभा राहत नाही. ही पात्रे केवळ विचित्र व तऱ्हेवाईक आहेत म्हणून नव्हे तर त्यांच्यातले संबंध (रक्तामांसाचे असूनही) मानवी नसल्यामुळे असे होते. त्यांच्यापैकी कुणाच्याच आयुष्याला निश्चित व बुद्धिपूर्वक दिलेली दिशा नाही. आयुष्यातील त्याची साध्ये स्पष्ट नाहीत. केवळ कुशंकच्या आयुष्याच्या विशिष्ट कालखंडाला छेद देणे व अनाद्यनंत वेदनेचे आणि सोसण्याचे साक्षीदार होणे एवढेच या सर्व पात्रांचे या प्रसंगमालिकेतील प्रयोजन दिसते. जिथे जिथे कुशंक कुणाला भेटतो तिथे त्याला व इतरांनाही वैराण एकाकीपण घेरून उरते. इथल्या सर्वांचाच पाढा साता पाचा पस्तीसपर्यंत बरोबर येतो, पण सात सक्कंला तो नेमका चुकतो, कारण ही कुशंकची भेट असते. पण त्यामुळे काहीच न बिघडता त्याचा सात दाहे सत्तरपर्यंतचा पाढा पुन्हा अचूकपणे पूर्ण होत राहतो.
असंबद्धतेची व अबोधतेची वा अशीच कशाची तरी मानवरूपधारी प्रतीके म्हणूनच ही पात्रे आकारत जातात. प्रतिभा-तिचा नवरा, कुशंक-प्रतिभेची सासू, प्राचिंती-शतलज, आसेती-तिचा नवरा, चंदनी-तिचा बाप-कुशंक, कुशंक-जनसंमर्द, कुशंक-फणसे किंबहुना कुशंक आणि एकूणच भोवताली ही सारी पात्रे जीवनातल्या संवादशून्यतेची प्रतीके म्हणून येतात. रघू, बनारसच्या वसतिगृहातली मंडळी ही दैहिक भोगशरणतेची प्रतीके ठरतात. तू-कुशंक-संबंध वासनेचे प्रतीकरूप होतात. असे नियतीने भिरकावल्यामुळे प्राप्त दिशांनी भरकटणारी ही सारी पात्रे आहेत. यदृच्छया त्यांच्या वाटा परस्परांना छेदून जातात, एकरूप होत नाहीत. स्वाभाविकच त्यांचे परस्परांशी असलेले संबंध जगावेगळे आहेत. प्रसंगी विकृत व रोगटही आहेत. ते बदलतात. पण या बदलाच्या आलेखात सुसंगती व तर्कशुद्धता शोधूनही सापडत नाही.
लौकिक अर्थाने ही सगळी पात्रे अभागी व अपेशी आहेत. पण कुणालाच कशाची खेद-खंत नाही. आहे ते वर्तमान प्रत्येकाने स्वीकारले आहे. भूतकालीन अनुभवांनी कुशंकइतकेसुद्धा अन्य कुणाला पछाडलेले नाही. त्यातल्या त्यात तोच स्वतःशी भूतकाळ अधूनमधून आळवतो. आकाशातल्या ढगांच्या आकाररचनांप्रमाणे पात्रांची पर्यावरणे बदलतात. तसेच त्यांचे रंगही पालटतात. मृत्यू, वेदना, कासावीसपणा, आर्तता, व्यथा, वासना, हिंसा, उपासमार याच मनोवृत्तीचे कमीअधिक गर्द असे रंग सर्वत्र आलटूनपालटून दिसत राहतात. हे रंग त्या त्या प्रसंगी संबंधित जिवांच्या व जीवनांच्या अस्तित्वाचेच घटक असतात. बाहेरून टाकलेले झोत असत नाहीत. आपापल्या रंगासह पात्रे जगत असतात. विकृती व वेदना इथे क्षणभंगूर व अपवादात्मक विक्षेप नसून सबंध आयुष्यक्रमाची किनार म्हणून वावरतात.
अनेकदा हा प्रसंगपट नजरेखालून घातल्यानंतर लक्षात येते की, लेखकांचे अनुभवविश्व अत्यंत संपन्न आहे, भाषा समर्थ आहे. संवेदनक्षम मनाला संवेदनसूचक भाषेची जोड हा दुर्मीळ योग त्याला साधला आहे. मानवी जीवनाचे तात्त्विक पृथःक्करण करण्याची सूक्ष्म दृष्टी व चिंतनशीलता तर त्याच्यापाशी आहेच पण तिच्या जोडीला सहसा न येणारी नर्मविनोदाची वरवर हसवून नकळत ओरबाडून, रक्तबंबाळ करणाऱ्या वास्तवाला चिमटीत पकडणाऱ्या विनोदाची झाक त्यांच्या लिखाणात सर्वत्र विखुरलेली आहे. हळवेपणाला चार हात दूर ठेवूनसुद्धा भावजीवन जपण्याचा, विसंगतता-हताशपणा-पृथकता यांनी हेलावून जाण्याचा हळुवारपणा त्यांना उत्तमप्रकारे साधला आहे. असंख्य क्षणचित्रांमधून एक (एकांगीच का होईना) जीवनदर्शन ते घडवू शकले आहेत. पण एवढे सगळे असूनही थोर अथवा अव्वल दर्जाच्या कलाकृतीच्या पातळीवर ही कादंबरी जाऊ शकत नाही. केवळ तिच्यात कार्यकारणभाव वा सुसूत्रता नाही, वा भाषेचे आंग्लीकरण व मोडतोड केली आहे, वा काही प्रतीकांमध्ये बटबटीतपणा व कथानकांमुळे विस्कळीतपणा-एकसुरीपणा आला आहे, काही प्रसंग अवास्तव, अतिरंजित व अविश्वसनीय आहेत, एवढेच नाही तर निष्कारण सनसनाटी प्रसंगांचेही तीत वैपुल्य आहे म्हणून नव्हे. किंवा ‘आपण सगळे फिट्जेराल्डचे गॅट्स्बी आहोत... आपापल्या डेझीच्या शोधात’, ‘माधवी मुकर्जीच्या चारुलतेसारखं थँक यू’... ‘दुआनिए रुस्सो’..अनेक पाश्चात्त्य व हिंदी सिनेमे- अशा असंख्य अज्ञात संदर्भामुळे वाचकाला तिच्याशी पूर्ण संवाद करता येत नाही म्हणूनही नव्हे. लेखक-वाचकाच्या अनुभवविश्वामध्ये असणाऱ्या तफावतीमुळे असे काही व्यत्यय नेहमीच अनिवार्य असतात. त्याचप्रमाणे पात्रांमधले संबंध व्याख्यातीत राहणे हेही वैगुण्य ठरत नाही. अनेक नाती तशी असतात. इथे सगळ्यांची सगळीच तशी असल्यामुळे जरा विचित्र वाटले तरी केवळ तेवढ्यावरून कादंबरीच्या थोरपणास बाधा आली नसती.
तर अशी बाधा येण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे या पात्रांच्या सामाजिक चौकटीचा अभाव. ही सगळी पात्रे अचानक भेटतात आणि अंतर्धान पावतात. तेवढ्या भेटीपुरताच त्यांचा संदर्भ आहे असे याचे समर्थन केले जाऊ शकते किंवा कुशंक-विशिष्ट आयुष्यक्रम हेच या कादंबरीचे निवेद्य आहे, असे स्पष्टीकरणही दिले जाऊ शकते. ते काहीही असले तरी कलाकृती म्हणून त्यामुळे कादंबरीची फार मोठी हानी झाली आहे हे सत्य उरतेच. कोणत्याही सामाजिक अधिष्ठानावाचून ती सारी पात्रे अधांतरी तरंगल्यासारखी कळसूत्री बाहुली वाटतात. ती आलीय कुठून, जाणारायेत कुठे याचा काहीच ठावठिकाणा मिळत नाही. त्यांच्या येण्या-जाण्या-वागण्याची उकल होत नाही. धूमकेतूसारखी आगंतुकपणे ती येतात, सूत्रधाराने(!) खेचतात, बाहेर पडतात. त्यांच्यानंतर येणाऱ्यांशी वागताना कुशंकला आपल्या स्वतःच्या ठिकाणी या अज्ञातवासी पात्रांच्या आठवणी मधूनच येतात, पण तो आणि नवागत यांच्यातल्या संवादात-संबंधात त्यांचा साधा संदर्भही येत नाही. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात वावरणारी पात्रे इतक्या पाणीबंद कप्प्यामध्ये राहणे संभवतच नाही.
ही सारी पात्रे एक-आयामी राहतात. तीन आयामी होऊ शकत नाहीत. कॅमेऱ्याने काढलेल्या चित्राप्रमाणे पसरट राहतात. ज्या समाजव्यवस्थेने त्यांना घडवले ती कुठेच प्रतिबिंबित होत नाही. लेखकाचा ‘कॅमेरा’ कधी तिकडे वळतच नाही. ‘ती जशी वागतात तशी का वागतात?’ असा प्रश्न अप्रस्तुत वाटतो कारण दैनंदिन जीवनातल्या अनेक क्रियांचे स्पष्टीकरण देता येत नाही हे खरे असले तरी व्युत्पन्न प्रतिभेच्या सामर्थ्यसंपन्न लेखकांनीही याबाबतीत हात टेकले तर त्यांच्या हातून थोर कलाकृती निर्माण होऊ शकणार नाहीत. ‘सात सक्कं’बद्दल हे घडले आहे.
रघू, आरोती, कुशंक वगैरे पात्रे सर्वसाधारण समाजाची प्रातिनिधिक नाहीत, ती त्याच्या एका अपवादात्मक गटाची प्रातिनिधिक आहेत असे मानले तरी तो गटही एक सजीव, सेंद्रीय समाजगट या स्वरूपात कादंबरीत साकार झालेला नाही. समाजात काहीजागी तुटकपणा, असंबद्धता व विसंगती असली तरी केवळ तुटकपणा, असंबद्धता व विसंगती म्हणजे पूर्ण समाज नव्हे. हताशपणा व किंकर्तव्यतेच्या जोडीला महत्त्वाकांक्षी क्रियाशीलताही मानवी जीवनाचा तितकाच महत्त्वाचा पैलू असतो. तिथे जगणाऱ्या माणसाच्या वाट्याला क्रोध, वासना, हिंसा, भयाणता, उपेक्षा, घृणा, तिरस्कार, एकाकी कोंडलेपणा याबरोबरच माया, ममता, सहिष्णुता, प्रेम, वात्सल्य, अभय, सुरक्षितता, ममत्व-भावनांचा ओलावा अशाही बाबी येत असतात. यानंतरच्या सगळ्या बाबी बुद्धिपूर्वक नाकारून जगणे हे माणसाचे स्वाभाविक (नॉर्मल) जगणे होऊ शकत नाही व असेच जगणाऱ्या सर्वांचे चित्रण सामाजिक मानवी जीवनाचे परिपूर्ण चित्र ठरू शकत नाही.
या कादंबरीचे तिच्या श्रेष्ठत्वास बाधा आणणारे दुसरे वैगुण्य प्रस्तुत परीक्षकाच्या मते हे आहे की, तिच्यात अनुकरणाचा व फॅशनच्या आहारी जाण्याचा भाग फार मोठा आहे. एका परीने पहिल्या वैगुण्याशी हे निगडित आहे. तिची मोडतोड केलेली भाषा, तिच्यातील ‘अतिभौतिकी असंबद्धता’, ‘देहपिंड म्हणून’ येईल त्या वास्तवाला पाषाणी तटस्थतेने, थंड व मुकाटपणे सामोरे जाणे या गोष्टी उदाहरणार्थ सांगता येतील. आणि अशा ‘फॅशनेबल’ गोष्टी आपणास कळत वा पटत नाही, असे म्हटल्यास लोक हसतील, आपल्याला पुराणमतवादी वा असमंजस ठरवतील अशा भीतीने अनेकदा एरव्ही साक्षेपी असलेले परीक्षकही कठोर सत्यान्वेषण टाळून अशा गोष्टींना डोक्यावर घेऊ लागतात. तिच्या व्यंगांनाही अलंकरणे ठरवत सुटतात.
एकदा त्यांनीच असे केल्यावर मग इतर त्यांचीच री ओढू लागतात. असे अनेकदा घडले. ‘सात सक्कं’बद्दल असा प्रकार घडतोय की काय अशी शंका येते. ज्यांना ही कादंबरी निरर्थक, विकृत वाटते त्यांना लवचीक आकलन व संवेदनशक्तीच नसल्याचा निष्कर्ष एका परीक्षकाने काढला आहे. तिच्यातील विसंगतीतील सुसंगती शोधण्यासाठी त्याने ‘अस्तित्व स्तरावरील भाना’चा वगैरे आधार घेतला असून सनसनाटी प्रसंगांची योजना वाचकांची संवेदना गतिमान राखण्यासाठी व पात्रांचा मानसिक ताण प्रत्ययित करण्यासाठी असावी असे म्हटले आहे. (अर्थात त्यामुळे कादंबरीच्या गाभ्याचा तोल ढासळतो, तरीपण त्याच्यावरून पूर्ण लक्ष ढळत नाही, असे त्यास वाटते. म्हणजे नेमके काय हे तेच जाणोत. असो.)
दुसऱ्या एका परीक्षकाने रोपटे आणि विनाशशक्तीची उपमा घेऊन प्रस्तुत कादंबरीत विनाशशक्तीपेक्षा रोपट्याचा चिवटपणा अधिक जाणवत असल्यामुळे ती थोर असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशीही सहमत होता येत नाही. मरण येत नाही म्हणून जमेल तसे परिस्थिती शरणवृत्तीने जगत राहणे यात चिवटपणाचा प्रश्न येतोच कुठे? श्रेयस व प्रेयस मिळवण्यासाठी- म्हणजेच खऱ्या अर्थाने जगण्यासाठी- सर्व शक्तींनिशी झुंजणे यात खरा चिवटपणा. तो तर या कादंबरीत अभावानेच आढळतो. सहजभावनांच्या आज्ञांबरहुकूम अ-मानुष पातळीवर जगणे हे मानवापेक्षा पशुपक्ष्यांनाच शोभून दिसते.
सारांश, कितीही उदो उदो केला तरी ‘सात सक्कं’ आधुनिक नाही. कारण केवळ काफ्का, काम्यूशी नाते सांगणे वा त्यांना अनुसरणे हे कादंबरीच्या आधुनिकतेचे कारण असू शकत नाही. ती केवळ मराठी भाषेत लिहिली म्हणूनच तिला मराठी म्हणायचे एरवी ती कोणत्याच अर्थाने ‘मराठी’ नाही. खरे तर ती कादंबरी नाही; तंत्राच्या आहारी जाऊन स्व-तंत्र शैलीने रंगवलेली ती प्रसंगमालिका आहे. मृत्यू, वेदना, एकाकीपणा, असंबद्धता, अर्थशून्यता, संवादहीनता इत्यादी गोष्टी समोर ठेवून (ठरवून) त्यांना सामावणाऱ्या व्यक्तींचे व प्रसंगांचे चैतन्यशून्य सांगाडे उभे करण्याचा हा प्रयत्न त्यांच्यातील कृत्रिमपणामुळे बराचसा विफल ठरला आहे.
(‘समाज प्रबोधन पत्रिका’च्या नोव्हेंबर-डिसेंबर १९७६च्या अंकातून साभार)
.............................................................................................................................................
हेही वाचा, पहा
१) किरण नगरकरांची एक मुलाखत - ‘लेखक अर्धाच पूल बांधू शकतो...’
https://www.aksharnama.com/client/article_detail/3609
२) सूचक आणि बोलकं मुखपृष्ठ कादंबरीचा मूड सेट करतं आणि मग सुरू होते झिया खानची ‘रोलर कोस्टर लाइफ स्टोरी’
https://www.aksharnama.com/client/article_detail/22
३) फक्त दोन मिनिटं मी एखाद्या शहाण्या माणसासारखा विचार केला असता तर ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कधीच लिहिली गेली नसती!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3646
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment