अजूनकाही
केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आपल्या कार्यक्षम मंत्रालयाबाबत जसे ओळखले जातात, तसेच बेधडक विधानांबाबतही. त्यांची विधानं सहसा वादग्रस्त नसतात, मात्र परखड असतात, स्वपक्षासाठीही! मुळात अशी विधानं करतानाच ते सांगतात की, जे खरं ते मी बोलतो. तरीही इतर भाजपीय उग्र, बेताल व विद्वेषी नेत्यांप्रमाणे ते बोलत नाहीत व पक्षशिस्तही मोडत नाहीत. विधान मागे घेण्याची वेळही सहसा त्यांच्यावर येत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या एका विधानाची मात्र दखल घेणं गरजेचं आहे.
‘आरक्षणामुळे कुठल्याही जातीची प्रगती झाली नाही’ हे त्यांचं ते विधान. याला जोडून सध्या राजकारणात उमेदवारी मिळवताना इतर सर्व पात्रतेत अपात्र ठरल्यावर लोक जात पुढे करतात, असंही ते म्हणाले. विधानाचा हा उत्तरार्ध त्यांचा अनुभव असू शकतो. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. ते स्वत: जातपात धर्मभेद मानत नाहीत, असं सातत्यानं सांगत असतात.
आपल्या समाजात एक प्रकारची सामाजिक वास्तवतेची निरक्षरता आहे. ती म्हणजे मी जातपात मानत नाही, माझ्या घरात मानत नाहीत, आंतरजातीय विवाह झालेत. आंतरधर्मीय विवाह झालेत, तर आता काही जातपात कोण मानत नाही, तो इतिहास झाला, असं आवर्जून ही मंडळी सांगतात.
आपण, आपले कुटुंबीय, आप्तस्वकीय म्हणजे समाज अशा गैरसमजातून ही निरक्षरता वाढते. यातही अनेकदा प्रबोधनातून नाही तर आरक्षणविरोधी मानसिकतेतून ही सापेक्ष समता पुढे केली जाते. पण ते हे विसरतात की, या देशाचं जातवास्तव त्याच्या पलीकडे, सनातन, क्रूर, अभिनिवेशी व पूर्णत: विषमता पोसणारं आहे… तेही आज अगदी २१व्या शतकात, चांद्रयान चंद्रावर उतरवण्याच्या तयारीत असताना!
खुद्द भाजपच्याच दलित आमदाराचे जातीयतेचे अनुभव नुकतेच बातमीत होते.
गडकरी पुढे असंही म्हणाले की, मोदी त्यांची जात पुढे करत नाहीत! एवढा सत्याचा अपलाप? २०१४ व १९ दोन्ही निवडणुकीत मोदींनी ‘मी नीच जातीचा असं प्रियांका गांधी म्हणाल्या, कारण मी ओबीसी आहे...मागास आहे’, तर राहुल गांधींनी केलेलं ‘सर्व गुन्हेगार मोदी कसे?’ (नीरव, ललित इ.) हे विधान स्वत:वर ओढवून घेत ‘मी पिछडा म्हणून मोदी व गुन्हेगार एकच ठरवलेत’ असं रूदन जाहीरपणे केलेले गडकरी विसरले?
आता त्यांच्या आरक्षणामुळे कुठल्याही जातीचं भलं झालं नाही, या विधानाकडे पाहूया. मुळात घटनाकारांनी कुठल्या जातीचं ‘भलं’ व्हावं म्हणून आरक्षणाची तरतूद केलेली नाही, तर जन्माधिष्ठित उच्च-नीचतेच्या हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथेला, त्यातून निर्माण झालेल्या विषमतेला दूर सारून समता प्रस्थापित करण्यासाठी, धर्मानं केलेला अन्याय दूर करून न्याय देण्यासाठी आरक्षणाचं धोरण आखण्यात आल.
हे धोरण आखलं तोवर जगात कुठेही अस्तित्वात नसलेली अस्पृश्यता हिंदू धर्मात होती आणि अगदी आजही कायद्यानं बंदी असूनही ती काही ठिकाणी पाळली जाते. या अस्पृश्यतेनं काही जाती बहिष्कृत करण्यात आल्या होत्या. त्यांचं स्थान गावकूसाबाहेरील हगीनदारीजवळ असे. त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जाई. त्यांना पाणीही वरून वाढलं जाई. जनावरं धुतली जात, पण अस्पृश्यांना पाणी मिळत नसे. गावातला न्हावी गुरं भादरायचा, पण अस्पृश्यांना हाकलून द्यायचा. बहिष्कृत असले तरी अंगमेहनतीची कामं, ढोल पिटणं, दवंडी पिटणं, निरोप पोहचवणं, ही कामं त्यांच्याकडून ‘अंतर’ राखून करून घेतली जात.
याशिवाय महत्त्वाचं म्हणजे मेलेली गुरं वाहून नेणं, त्यांची चिरफाड करून त्यांचं चामडं चर्मकाराकडे देणं हे काम असे. मानवी मैला डोक्यावरून वाहून नेणारी जात ही हिंदू धर्मात होती, आजही आहे. स्वातंत्र्य मिळालं, आरक्षण मिळालं आणि धर्मानं नाकारलेला शिक्षणाचा अधिकार घटनेनं समतेसह दिला. त्या आधी शिक्षण मिळत असे, पण अस्पृश्य मुलामुलींना वर्गाबाहेर बसावं लागे. वेगळ्या भांड्यात पाणी प्यावं लागं. स्वातंत्र्यानंतर आरक्षणानं वर्गाबाहेरून वर्गात सर्व मुलांसोबत बसायला मिळालं, शिकायला मिळालं!
जवळपास अडीच हजार वर्षानंतर शिक्षण या गावकुसाबाहेरील मुलांना समानतेनं मिळू लागलं!
नितीनजी, अडीच हजार वर्षांचा बॅकलॉग भरून काढणं सोपं नव्हतं. कारण आरक्षण मिळालं तरी बरोबरचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन जातीयच राहिला. अपवादानं सहकार्य मिळायचं. ‘मागास’, ‘बीसी’ या विशेषणांसह पुढे ‘सरकारी जावई’ अशी हेटाळणीही वाट्याला येत असे, आजही येते.
अशा परिस्थितीतून शिकून, विपरित सामाजिक वातावरणातून झगडत अनेक मागास जातींनी आरक्षणातून आत्मसन्मान कमावला. त्यातूनच शंकरराव खरात, दया पवार, लक्ष्मण माने, रावसाहेब कसबे, नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, भाई संगारे, अर्जुन डांगळे, अरुण कांबळे, रामदास आठवले, गवई, रूपवते, खोब्रागडे तयार झाले. बेबी कांबळे, हिरा पवार, उषा अंभोरे, उर्मिला पवार, आशालता कांबळे, मीनाक्षी मून ते प्रज्ञा दया पवार, शिल्पा कांबळे अशी मोठी यादी आहे. भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव ते कलाकार भाऊ कदम, सिद्धार्थ जाधवपर्यंत ही यादी जाते.
नितीनजी, हे सर्व तुमच्यासारखे वाड्यात जन्मले नाहीत की, जन्मजात श्रेष्ठत्वाचं वरदान घेऊन आले नाहीत. यातल्या अनेकांची आत्मकथनं आणि इतर ललित व वैचारिक लेखन वाचा, मग तुम्हाला कळेल आरक्षणानं कुणाचं काय झालं.
नितीनजी, ज्या सहजतेनं तुम्ही ‘कुणाचं भलं झालं?’ असं विचारलेत ना… त्याच सहजतेनं या विजयादशमीला रेशीम बागेत जाल, तेव्हा शेजारच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्रपरिवर्तन दिनासाठी जमलेल्या लोकांना पहा, तिथला माहौल पहा आणि तिथं कुणालाही विचारा आरक्षणानं काय झालं?
गुलामी भोगलेल्यांचे वारस आत्मसन्मानाची जी गौरवगाथा तुमच्यासमोर गातील, तेच तुमच्या विधानाला खोडून काढणारं बाणेदार उत्तर असेल!
नितीनजी, एकदा नुस्ती कल्पना करा तुम्ही अस्पृश्य जातीत जन्मला असता आणि गुलामी अनुभवली असती तर असं विधान तुम्ही केलं असतं?
...............................................................................................................................................................
‘हमरस्ता नाकारताना’ या बहुचर्चित पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5071/Hamrasta-Nakartana
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 29 September 2019
संजय पवार,
हिंदू धर्माविरुद्ध बोंबा मार्ल्याखेरीज चैन पडंत नाही का तुम्हांस? म्हणे जगात कुठेही नसलेली अस्पृश्यता हिंदू धर्मांत होती .... ? इथे भारताबाहेरच्या अस्पृश्यतेची उदाहरणं आहेत : https://en.wikipedia.org/wiki/Untouchability#Untouchability_elsewhere
वाचून घ्या एकदा.
असो.
बाकी, आरक्षणामुळे कोणत्याही जातीची कसलीही प्रगती होणार नाही असं खुद्द बाबासाहेबांचंच मत होतं. म्हणून त्यांना आरक्षण फक्त १० वर्षांपुरतंच हवं होतं. तुम्ही म्हणता ती शिक्षित दलितांची पिढी (दया पवार, नामदेव ढसाळ, वगैरे) त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वामुळे पुढे आली आहे. त्याचा आरक्षणाशी संबंध नाही.
आपला नम्र,
गामा पैलवान
Vividh Vachak
Thu , 26 September 2019
पवारजी, हा तुमचा लेख बहुतांशी पटला. बहुतांशी म्हणायचे कारण की, आपला लेख आरक्षणामुळे ज्या दलित कुटुंबांना शिक्षणाचा आणि सन्मानाचा मार्ग खुला झाला आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे, (आणि ते आरक्षणाचे सर्वात मोठे यश आहे). पण एका वेगळ्या अर्थाने आरक्षणामुळे कुणाचं भलं झालं नाही हे सत्य आहे. उदाहरणार्थ, जात माणसाला सोडून जाऊ शकली का? किंबहुना, आरक्षण मिळत असल्यामुळे जातीचा विसर पाडून घ्यायला भले भले तयार नसतात. (किंबहुना, ब्राह्मणांना जात ही सर्वाधिक बिनकामाची गोष्ट झाली आहे आणि जर आरक्षण तीन पिढ्यानंतर बंद केले असते तर जातीचा त्याग त्या त्या दलित लोकांनी आनंदाने केला असता, जो हल्ली होत नाही). नंतर, पिढ्यानपिढ्या सवलती उपटून आरक्षणाच्या झारीत शुक्राचार्यांप्रमाणे अडकून बसलेले लोक सुद्धा दिसतात आणि हे आपल्याच बांधवांच्या पोटावर पाय आणतात. तेव्हा जातीविरहित आणि पूर्वग्रहविरहित समाज हा आरक्षणापायी बनू शकलेला नाही. त्यासाठी केवळ तथाकथित उच्च जातींना दोष देण्यापेक्षा जरा बघावे की ह्यात इतर गोष्टींचा किती दोष आहे ते. असे असताना सुद्धा गडकरींचे विधान थोडे असमंजसपणाचे वाटले. त्यांनी जरा सविस्तर स्पष्टीकरण आणि आधारार्थ माहिती दिली असती तर जरा आणखी बरे झाले असते. असो.
Sachin Shinde
Wed , 25 September 2019
Sanjay sir khup chan lekh lihlat, thode jativadyana samajale ki aarkshan mhanje kaay.