‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चे लव्हली चटके!
कला-संस्कृती - टीव्ही मालिका
महेशकुमार मुंजाळे
  • The Permanent Roommates' आणि ‘Little Things’ या वेब सिरीजची पोस्टर्स
  • Fri , 30 December 2016
  • वेब सिरिज Web Series The Permanent Roommates Little Things लिव्ह इन रिलेशनशिप Live-in relationship

"जानू.... मेरे लिये सँडविच बना ना, प्ली ssssज!" तीचा एवढा लडिवाळ 'हुकूम' कानी यावा, त्याने किचनमध्ये जावं, सुंदर सँडविचेस बनवून आणावेत, दोघांनी एकमेकांना बिलगून त्या सँडविचेसवर ताव मारावा आणि खाद्य-प्रणयात मश्गुल व्हावं. हे दृश्य समाज, कुटुंब, जात, पोटजात, कुळ, गोत्र, चाली, रूढी-परंपरा, पत्रिका यांच्या संमतीने झालेल्या लग्नातील जोडप्यांमध्ये क्वचितच पहायला मिळेल. कारण समाजमान्य पद्धतीमध्ये मुलगा आपसूकच नवर'देव' होतो आणि मुलगी फक्त ‘नवरी’ राहते. मग देवाची सेवा करणं पामर भक्ताचं परम कर्तव्य होऊन जातं. अशा अलिखित करारपत्राच्या पार्श्वभूमीवर तो कशाला त्याचा पुरुषीपणा बाजूला ठेवून सँडविच बनवण्यासाठी किचनमध्ये जाईल? पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये हे दृश्य सहज शक्य आहे.

आई, बाप, भाऊ, बहिण आणि एका अर्थानं नवरा ही नाती जन्मतः लादली गेलेली असतात. यात तुम्हाला पर्याय दिले जात नाहीत. या नात्यांमागून आलेली अधिसत्ता तुम्हाला मान्य असो वा नसो पाळावीच लागते. पण मैत्री तशी नसते. यात जोडीदार निवडीचं, स्वतःवर हक्क गाजवू देण्याचं, न पटल्यास नातं तोडून निघून जाण्याचं स्वातंत्र्य अबाधित असतं. मैत्रीमध्ये तुमच्या मताला जेवढी किंमत आहे, तेवढी रक्तामुळे लाभलेल्या नात्यांमध्ये नाही. म्हणून मैत्रीला लोकशाहीचं द्योतक मानलं जातं. प्रेम हे मैत्रीच्या पुढचं पाऊल आहे, म्हणूनच प्रेमालासुद्धा मैत्रीचे वरील सर्व नियम आहे असे लागू होतात.

प्रेम करून विवाह करणाऱ्या जोडप्यांत कालांतरानं आपसूकच पुरुषसत्ताक पद्धत रुजण्याच्या शक्यता निर्माण होतात. कारण विवाह केल्यावर त्यातून मागे फिरणं, वेगळं होणं समाजमान्य नाही. ‘जिस घर पे तेरी डोली गयी, वहीसे तेरी अर्थी उठेगी’ हा हिंदी सिनेमांचा घासून गुळगुळीत झालेला डायलॉग मुलीच्या अंतरंगात उतरवला जातो. म्हणूनच तर ‘विवाह’ या शब्दाला ‘बंधन’ हे शेपूट जोडून ‘आज विवाह-बंधनात हे नवदाम्पत्य अडकलं’ अशी भाषणं लग्नात ठोकली जातात! जिLx परतीचा मार्ग कापून टाकलाय, तिथं ती नवर-देवाची सेवा करण्यात धर्म मानते आणि तोदेखील ‘करतेय तर करू दे’ म्हणता म्हणता ‘करायलाच पाहिजे’चा पवित्रा घेऊ लागतो.

या उलट लिव्ह-इन रिलेशनशिप. समाज तर केव्हाच लाथाडलेला असतो. जे काही नातं आहे ते केवळ परस्परसंमतीनं. त्यामुळे परतीचा निर्णयसुद्धा तुलनेनं बराच सहज आणि सोपा. आपल्या अति हक्क गाजवण्याने समोरची व्यक्ती दुखावू शकते, ती निघूनसुद्धा जाऊ शकते, याची जाणीव मनात असेल तर आपोआपच समानता नांदण्यास वाव मिळतो. दोघांनी कमवावं, दोघांनी गमवावं. कमावता-गमावता एकमेकांच्या आयुष्याच्या आनंदाचं मेतकुट जमवावं. स्वयंपाक स्त्रीने करावा, कमाई पुरुषानं करावी, कपडे-भांडी स्त्रीने धुवावी, घराची जबाबदारी पुरुषानं घ्यावी. या परंपरागत गोष्टींना फाटा देत लिव्ह-इन रिलेशनमध्ये स्त्री-पुरुष स्वतःच्या लैंगिक-सामाजिक ओळखी बाजूला ठेवून एकमेकांत मिसळले जातात. दोघांपैकी कुणी एक कमावता नसला तरी सामंजस्यानं आलेल्या प्रेम भावनेमुळे आणि अधिसत्तेचं गणित आधीच नाकारल्यामुळे हे संसार टिकण्याच्या शक्यता वाढतात. जिथं निखळ प्रेम आहे तिथं भांडणाची शक्यता कमी आणि भांडणं झाली तरी ते मिटण्याची शक्यता जास्त आहे. आणि जर नाहीच मिटली तर परस्पर संमतीनं वेगळं होण्याची तरतूद आहेच की!

केवळ दहा मिनिटांच्या भेटीत समोरच्याला पारखून लग्न करण्यापेक्षा किंवा प्रेम आहे म्हणून लगेच लग्न करून अडकून राहण्यापेक्षा आपण एकमेकांस योग्य आहोत का, हे पाहण्यासाठी सुद्धा लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला जातो. व्यक्तिपरत्वे लिव्ह इन निर्णयाची कारणं वेगवेगळी आहेत. हा निर्णय कुठल्या परिस्थितीमध्ये घेतात? सोबत राहताना त्यांच्या समोर नेमकी काय आव्हानं असतात? ती आव्हान भांडणात कशी बदलतात? भांडणं मिटवण्यासाठी काय काय केलं जातं? समाजरचना, कुटुंबव्यवस्था खरोखर तेवढ्या प्रकर्षानं फाट्यावर मारता येते का? या अशा प्रश्नांची थोडी फिल्मी, थोडी वास्तववादी उत्तरं देण्याचा प्रयत्न वेब सिरीजमध्ये होताना दिसत आहे. 'TVF- The Viral Fever' या वेब चॅनेलवरील 'The Permanent Roommates' आणि 'Dice Media' या वेब चॅनेलवरील ‘Little Things’ या लिव्ह इन रिलेशनशिपवर भाष्य करू पाहणाऱ्या दोन वेब सिरीज चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. तथाकथित संस्कृती रक्षकांना नेहमीच लव्ह-सेक्स-धोका या गोष्टींचा विटाळ असलेला पाहायला मिळतो. त्यात लग्नाविना एकत्र राहणारं प्रेमी युगुल म्हणजे अजूनच मोठा सांस्कृतिक धक्का. अशा स्फोटक विषयावर पारंपरिक टीव्ही मालिका करण्याचं स्वातंत्र्य कोणतं चॅनेल देईल?

 

या दोन्ही वेब सिरीज हिंदी आणि इंग्लिश संमिश्र म्हणजेच हिंग्लिश या माध्यमात आहेत. कारण लिव्ह इनमध्ये राहणारे आणि लिव्ह इन समजू शकणारे लोक दिल्ली-मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्येच असतात असा त्यांचा समज आहे. पण पुणे, औरंगाबाद, नाशिक यांसारख्या शहरांतही आता लिव्ह-इन जोडपी आढळू लागली आहेत. प्रमाण अगदीच कमी असलं तरी वाढतं आहे. म्हणूनच या अशा विषयांना संतुलित हात घालण्यासाठी अजूनही मराठी फिल्म व वेब सिरीजला मोठा वाव आहे.

लिव्ह-इन चांगलं की लग्न, हा सातत्यानं चर्चिला गेलेला विषय आहे. हा विषय जेव्हा स्वातंत्र्याच्या कक्षेत येतो, तेव्हा आपोआपच ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ हे वाक्य छापून त्यावर पडदा टाकला जातो. लिव्ह-इन काय आणि लग्न काय तोवरच चांगलं, जोवर समजूतदारपणे व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला जाईल.

 हळूहळू सुधारणा होत आता लिव्ह इन रिलेशनशिपला मर्यादित अर्थानं का होईना भारतीय कायद्यान्वये संमती मिळाली आहे. जे कायदे हिंदू विवाह पद्धतीमध्ये लागू होतात, ते सर्व कायदे लिव्ह-इन दाम्पत्यासाठीसुद्धा लागू होतात. फक्त हे सर्व समलैंगिक लिव्ह-इन जोडप्यांसाठी लागू होत नाहीत. कारण समलैंगिकतेला भारतीय कायद्याने गुन्हा घोषित केलं आहे.

हे सर्व कायद्याला मान्य असो वा नसो, पण समाजाला, संस्कृतीला हे मान्य नाही. अजूनही अविवाहित जोडप्यांना घर देणं, हॉटेलमध्ये रूम देणं, पर्यटन करणं, एकांतात बसणं जगाला मान्य नाही. तिथं समाजानं आपला समांतर कायदा प्रस्थापित केलेला आहे.

तथाकथित संस्कृती रक्षकांना हे सर्व पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण वाटतं, पण हिंदू संस्कृतीमधील आठ विवाह पद्धतींमध्ये 'गांधर्व विवाह' अशी एक पद्धत अस्तित्वात होती, ज्यात पालकांच्या, समाजाच्या परवानगीला आणि विधींना थारा नव्हता. ही गांधर्व विवाह पद्धत कालांतराने संपुष्टात आली. त्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बालविवाह प्रथा रूढ झाली, निर्णयक्षम वयाआधीच लग्न होऊ लागली. महाभारतातील दुष्यंत आणि शकुंतला यांचा गांधर्व विवाह झाला होता. त्यांचा पुत्र म्हणजे 'भरत'. पहा काय गंमत आहे, ज्या देशाचं नाव लिव्ह इन रिलेशनशिपमधून झालेल्या अपत्याच्या नावावरून ठेवण्यात आलं, तिथंच लिव्ह इन रिलेशनशिप संस्कृतीविरोधी ठरत आहे.

गजेंद्र आहिरे दिग्दर्शित 'सुंबरान' चित्रपटात पाटलाने ठेवलेल्या बाईला, कमळीला जितेंद्र जोशी 'लिव्ह इन' म्हणजे काय समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ‘कधी बी निघून जाऊ शकती आशी बाई ठीवनं म्हणजी लव्ह इन’ या अनुमानापर्यंत पोहचलेली बाई पाहिली की, एक भलताच ग्रामीण-शहरी प्रेमजीवनातला पातळ असा साम्यधागा दिसू लागतो. त्या पाठोपाठ दिसतात 'सुसंस्कृत' समाजाचे विस्फारलेल डोळे. हे समाजाचे चटके लोकप्रिय 'अमृता-इमरोज' या प्रसिद्ध लेखिका-चित्रकार जोडीलासुद्धा सहन करावे लागले होते. बालविवाह झालेली अमृता कालांतराने चाळीशीत असणाऱ्या इमरोजच्या प्रेमात पडली आणि दोघे विवाहाविना सोबत राहू लागले. आज अमृता आपल्यात नाही, पण इमरोज अजूनही अमृताच्या आठवणी जागवत हयात आहे. एका मुलाखतीमध्ये इमरोजला विचारलं गेलं की, ‘आपने सारी जिंदगी अमृताजी को पंखा करते बिता ली.’ तेव्हा उत्तरात इमरोज म्हणाला, ‘अमृता को पंखा करते वक्त हवा मुझे भी लगती थी!’

समाजानं कितीही त्रास दिला तरी 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना' ही मानसिकता बाळगून असाल तर कमळीचं ग्रामीण लव्ह-इन (!) काय आणि शहरी अमृताचं लिव्ह-इन काय, दोन्हीतल्या प्रेम भावनेत चटकेसुद्धा लव्हली वाटत असतील, नाही का?

लेखक मराठी चित्रपट व लघुपटांसाठी पटकथा लेखन करतात.

maheshmunjale@gmail.com

Post Comment

mahesh bhambere

Fri , 30 December 2016

Nice


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख