अजूनकाही
‘आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत’ हे प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे यांचे पुस्तक द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
भास्कर लक्ष्मण भोळे (३० सप्टेंबर १९४२-२४ डिसेंबर २००९) हे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या (साठोत्तरी) महाराष्ट्रातील एक मोठे विचारवंत होते. विसाव्या शतकातील सत्तरीचे दशक ते एकविसाव्या शतकाचे पहिले दशक असा सुमारे चार दशकांचा काळ हा प्राधान्याने भोळे यांचा लेखन-काळ म्हणता येईल. चौफेर सामाजिक विद्रोहाच्या दशकापासून उत्तराधुनिक अराजकी भिंगुळवाण्या काळापर्यंतची घुसळण पचवत, तिचे विश्लेषण करत, आपल्या विचारधारेशी ठाम राहून, विधायक प्रकाशवाटा धुंडाळत डॉ. भोळे यांनी लेखन केले. ते लेबलवाले वा घट्ट-मठ्ठ अमुक-तमुकवादी विचारवंत नव्हते आणि तरीही त्यांची विचारधारा भक्कम सामाजिक बांधिलकीची अशी अवश्य होती. बुद्ध-मार्क्स यांना एकत्र आणत आणि म. जोतीबा मुले, म. वि.रा. शिंदे, म. गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समन्वय साधत लोकशाही समाजवादाच्या व सर्वांगीण समतावादाच्या मार्गाने जाण्याचा ठोस विचार ते मांडत राहिले. हा कृतक समरसताभाव नव्हता.
भास्कर भोळे यांचा समन्वयवाद म्हणजे एक ढोबळ सरमिसळ नव्हती, तर ती एक संश्लेषक, सर्जनशील व निर्भेळ अशी परिवर्तन-दृष्टी होती. व्यक्ती, घटना, संस्था, विचारधारा यांच्याकडे ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहू शकत असत. त्यामुळे एकारलेला, अभिनिवेषी व विद्वेषी सूर त्यांच्या मांडणीत उमटत नसे. असहमती व्यक्त करताना वा टीका करतानासुद्धा त्यांचे ऐतिहासिक भान जागृत असल्याने स्पष्टता ठेवूनसुद्धा ते विघातक टोके गाठत नसत. ‘संवादभंगाच्या भिंती’ पार करण्याची त्यांची दृष्टी फार मोलाची होती. त्यांचा सर्व लेखन-संवाद त्यांनी इतिहासाचार्य वि.का. राजवाड्यांप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक मायमराठीतून केला. यात कोठेही अन्य भाषांचे अज्ञान, स्वभाषेचा दुरभिमान वा अभ्यासक्षेत्री पलानवाद नव्हता. ती एक जाणीवपूर्वक स्वीकारलेली बांधिलकी होती. खरे तर त्यांची भाषाविषयक जाण, जाणीवा आणि योगदानावर एक संशोधनप्रकल्प होऊ शकेल.
प्रा. भास्कर भोळे यांचे वर्णन अगदी थोडक्यात करायचे झाल्यास त्यांना एक ‘विवेकशील पुरोगामी प्रबोधनकर्ते’ असे संबोधता येईल. प्रस्तुत लेख-संग्रहात त्याचा प्रत्यय नक्कीच येत राहतो. ‘आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत’ या लेखसंग्रहात आधुनिक महाराष्ट्रातील आठ विचारवंतांवरचे बारा लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. तसे पाहिले तर सुमारे सव्वादोनशे पानांचा हा मजकूर आहे; पण तो अत्यंत विचारसंपृक्त आहे. गोपाळ हरि देशमुख तथा लोकहितवादी (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२), न्या. महादेव गोविंद रानडे (१८ जानेवारी १८४२-१६ जानेवारी १९०१), विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर (२० मे १८५०-१७ मार्च १८८२), गोपाळ गणेश आगरकर (१४ जुलै १८५६-१७ जून १८९५), लो. बाळ गंगाधर टिळक (२३ जुलै १८५६-१ ऑगस्ट १९२०), ना. गोपाळ कृष्ण गोखले (८ मे १८६६-१९ फेब्रुवारी १९१५), म. विठ्ठल रामजी शिंदे (२३ एप्रिल १८७३-२ जानेवारी १९४४) आणि राजर्षी शाहू महाराज (२६ जून १८७४-६ मे १९२२) यांच्याविषयीचे हे लेख आहेत. ते चरित्रात्मक नाहीत. संबंधित विचारवंतांसंबंधी एखादा पैलू वा क्षेत्र निवडून त्या अनुषंगाने केलेली ही मांडणी आहे.
या यादीत म. मुले व डॉ. आंबेडकर यांची नावे नाहीत. पण या दोन विचारवंतांवरील भोळे यांचे विवेचन स्वतंत्रपणे लेख व पुस्तकरूपाने इतरत्र प्रसिद्ध झालेले आहे. भोळे यांचे सुटे लेख ग्रंथगत करण्याच्या दृष्टीने काही ग्रंथांची आखणी झाली आहे. त्यातील हा एक ग्रंथ होय. त्यामुळे त्यात जे आले आहे, त्याचा विचार येथे अभिप्रेत आहे. उपरोल्लेखित व्यक्तींच्या नावांवर नजर टाकल्यावर सहजपणे जाणवते की, एकोणिसावे शतक आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध यांना व्यापणारा असा हा महाराष्ट्रासंबंधीचा कालखंड आहे. या कालखंडात आधुनिक महाराष्ट्राची मोठी जडणघडण झाली. या काळात महाराष्ट्राने मध्ययुगीनतेकडून आधुनिकतेकडे प्रवास केला. इंग्रजांच्या अमलाखाली पाश्चात्य संस्कृतीशी संपर्क, संवाद, संघर्ष, समन्वय हे सर्व घडत गेले. येथे नवशिक्षण रुजले. ती प्रक्रिया द्वंद्वात्मक होती. पारंपरिक-आधुनिक, धार्मिक-भौतिक, मातृभाषिक- आंग्लभाषिक, पाश्चात्य-एतद्देशी, साम्राज्यवादी-राष्ट्रवादी, अभिजन-बहुजन अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने संघर्षात्मक संवाद घडत येथील शिक्षणपद्धती आकाराला आली.
१९व्या शतकात महाराष्ट्रात मध्यमवर्ग उदयाला आला. लक्षणांचे काही मूलभूत साम्य असले, तरी हा मध्यमवर्ग भारताच्या अन्य प्रांतामधील मध्यमवर्गांपेक्षा काही बाबतीत वेगळा होता. (पाहा- राजा दीक्षित, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, २००९.) या वर्गाच्या पुढाकारातून येथे जे प्रबोधन घडू लागले, त्याची तीव्रता व लक्षणे अन्य प्रांतांपेक्षा काही प्रमाणात वेगळी होती. मात्र हे प्रबोधन भारतीय प्रबोधनाचाच भाग होते. किंबहुना समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, संस्कृती इ. विविध संदर्भात जे बदल भारतभर घडू लागले, त्यांचा आविष्कार महाराष्ट्रातसुद्धा घडत गेलेला आढळतो. स्वंयपूर्ण समाजजीवनावर आधारित सरंजामी वळणाची शेतीप्रधान अर्थव्यवस्था बदलू लागली. तिची जागा अर्धसरंजामशाही-अर्थवसाहतवादी अशी अर्थव्यवस्था घेऊ लागली. रयतवारीच्या रूपाने वेगळ पद्धतीची महसूल व्यवस्था येथे आली. परकी राज्यकर्त्यांकडून संपत्तीचे शोषण सुरू झाले. शेतीचे व्यापारीकरण घडू लागले. कारखानदारी येऊ लागली. नागरीकरण वाढू लागले. कामगारवर्ग उदयाला येऊ लागला. भारतीय राष्ट्रवादाचे आविष्कार जीवनाच्या विविध क्षेत्रांत जाणवू लागले.
महाराष्ट्रातील आर्थिक राष्ट्रवाद एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच आकार घेऊ लागला होता. सत्तावनच्या उठावापूर्वी महाराष्ट्रात अर्थशास्त्रावरचे जे चार ग्रंथ प्रकाशित झाले, त्यांच्या माध्यमातून शोषणाची समज, स्वदेशीची संकल्पना, नव उद्योगधंद्यांची आवश्यकता यांसारखे विचार पुढे येऊ लागले. लक्ष्मीज्ञानाच्या या पानावरून पुढे काही विचारवंतांनी राष्ट्रीय संपत्ती-शोषणाच्या वा आर्थिक निःसारणाच्या सिद्धान्पर्यंत आणि भारतीय अर्थशास्त्राच्या उभारणीपर्यंत मजल मारली. तत्कालीन राष्ट्रीय जागृतीला संस्थात्मक रूप लाभत गेले. हे रूप कलकत्ता, मुंबई व मद्रास या तेव्हाच्या तीन इलाक्यांमध्ये प्रकटत गेले. ‘बाँबे असोसिएशन’ किंवा ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही त्याचीच रूपे होती. राजकीय राष्ट्रवादातून एकीकडे काँग्रेसची सनदशीर चळवळ उभी राहिली आणि दुसरीकडे क्रांतिकारकांची देशप्रेमी धाडसबाजी उमाळून आली. साहित्य आणि कलेचे क्षेत्रसुद्धा राष्ट्रवादाने व आधुनिकतेने प्रेरित झाले आणि एक नवे सांस्कृतिक पर्व सुरू झाले.
समाजसुधारणेची चळवळ ही या प्रबोधनपर्वातील एक अत्यंत अर्थपूर्ण घडामोड होती. तिची नाळ राष्ट्रवादाशी जोडलेली होती. या चळवळीने जुनाट आणि दुष्ट चालीरीतींना विरोध तर केलाच; पण तिने मानवी संबंधांच्या लोकशाहीकरणाचा उल्लेखनीय प्रयत्नही केला. या सर्व घडामोडींच्या मंथनाला जात, वर्ग आणि लिंगभाव यांचे आयाम होते, हेसुद्धा विसरून चालत नाही.
भारतातील व महाराष्ट्रातील या सर्व बदलांना व घडामोडींना महत्त्वपूर्ण अशी एक पाश्चात्य जगताची पार्श्वभूमी लाभलेली होती. यामध्ये प्रबोधनुग, क्रांतीयुग, ज्ञानोदय यांचे संदर्भ महत्त्वाचे होते. विशेषतः पुनरुज्जीवन तथा प्रबोधन, धर्मसुधारणेची तथा प्रॉटेस्टंट चळवळ, भौगोलिक शोध, व्यापारी क्रांती, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती अशा घडामोडींच्या मालिकेने पाश्चात्य जगताचा चेहरामोहराच बदलून गेला. पण त्यांच्या सर्व तपशिलांमध्ये न जाता येथे एवढे सांगितले पाहिजे की, तेथे काही विचार, कल्पना, मूल्ये, तत्त्वे, विचारप्रवाह, परिभाषिते विकसित होत गेली, ज्यांचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात येथेही पडत गेला. मध्ययुगाच्या अखेरीला प्राचीन ग्रीक मानवतावादाचे आकर्षण पाश्चात्य जगात निर्माण झाले आणि त्या तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन घडू लागले. धार्मिक-आध्यात्मिकतेच्या घटकावर ऐहिकतेचा घटक मात करू लागला. मानवत्वाची प्रतिष्ठा वाढली. मानव आणि मानवाचे ऐहिक जीवन यांना विचारविश्वात केंद्रस्थान प्राप्त होऊ लागले. व्यक्तिवादाचा विचार विकसित होऊ लागला. मानवाचे नैसर्गिक हक्क आणि सामाजिक करार यांविषयीचे विचारमंथन व्यक्तीचे महत्त्व प्रस्थापित करणारे ठरले. हे विचारमंथन तत्कालीन सामाजिक व राजकीय व्यवस्थांना आव्हान देणारे होते. धर्मसुधारणेच्या चळवळीत ईश्वर आणि भक्त यांच्यातील मध्यस्थशाहीला झालेला विरोध, लॅटिन बायबलची प्रादेशिक भाषांतरे, भक्ताने मध्यस्थावाचून बायबलचा आधार घेण्याची मोहीम, धर्मसंस्थेतील कुप्रथांना होऊ लागलेला संघटित विरोध हा सगळा व्यक्तिवादाकडे नेणारा व्यवहार होता. पुढच्या टप्प्यात आर्थिक-व्यावसायिक क्षेत्रात शासकीय हस्तक्षेप नसावा असे सांगत असलेला मुक्त व्यापाराचा विचार हा व्यक्तिवादाचा आर्थिक आविष्कार होता. याचा अर्थ धर्मजीवन, समाजरचना, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था इ. सर्वत्र व्यक्तीचे दुय्यमत्व आणि असहाय्यता यांना छेद देऊन व्यक्तीचे निसर्गदत्त मूल्य प्रस्थापित होऊ लागले. तिचे कर्तेधर्तेपण अधोरेखित होऊ लागले. या सर्वाला जो एक दार्शनिक पाया लाभला, त्यातूनच व्यक्तिवाद खऱ्या अर्थाने विकसित झाला.
उदारमतवाद हे त्याचेच आणखी विकसित रूप. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, कायद्याचे राज्य, मानवता, बुद्धिवाद, वैज्ञानिकता इ. मूल्यांना व तत्त्वांना महत्त्व देणारे, लोकशाहीला व राष्ट्रवादाला बळ देणारे असे हे तत्त्वज्ञान होते. उपयुक्ततावाद हे या उदारमतवादाचेच एक जहाल रूप. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख साधू पाहणारे, मूलतः नैतिक तरीही ‘सुखवादी’ असे हे रूप होते. हे सर्व विचारसंकुल पाश्चात्य जगतात आधुनिकता प्रस्थापित करत गेले. अर्थात एका बाजूने लोकशाही राष्ट्र-राज्ये समर्थपणे उभी राहिली; पण दुसरीकडे या उदारमतवादी विचारसंकुलाने वसाहतवादी व भांडवलशाही वृत्तीशी बेमालूम हातमिळवणी केली. त्याच्या मुळाशी असणाऱ्या आधुनिक औद्योगिक संस्कृतीतील दुरितांची प्रतिक्रिया म्हणून (जसा पुढे समाजवाद व साम्यवाद उभा राहिला तसा दुसरीकडे) निसर्गवादाचा एक जोरकस प्रवाह पुढे आला आणि विशेषतः साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात प्रभाव गाजवू लागला. ‘निसर्गाकडे परत चला’ ही हाक, भावनात्मकतेची पुनर्स्थापना, जगाची घडी नव्याने बसवणची ऊर्मी, सर्वसामान्याविषयीचा कळवळा यांचे स्वच्छंद सूर कला-साहित्यात व विचारक्षेत्रात उमटू लागले. हे सूर मानवतावादाच्या आणि काही प्रमाणात परंपरावादाच्या सुरांमध्ये मिसळू लागले.
पाश्चात्य जगतातले असे सर्व बदल भारतातील ब्रिटिश धोरणे, प्रशासन-व्यवस्था आणि शिक्षण-पद्धती यांच्याद्वारे भारतावर प्रभाव पाडू लागले, परिणाम घडवू लागले आणि संघर्षात्मक संवादाला कारणीभूत ठरू लागले. ब्रिटिशांचा राजकीय अंमल, आर्थिक वर्चस्व, सांस्कृतिक धुरीणत्व यांचे पाश आवळले जात असताना एक नवा सार्वजनिक अवकाश मात्र निर्माण होत गेला. परिवर्तनासंदर्भात तो अवकाश महत्त्वपूर्ण ठरला.
प्रा. भा.ल. भोळे यांच्या प्रस्तुत लेखसंग्रहातील लेखन वाचताना त्याला उपरोल्लेखित प्रक्रियांची आणि द्वंद्वात्मकतेची विशाल पार्श्वभूमी आहे, हे लक्षात घेऊनच त्यातील लेखांचा विचार केला पाहिजे. भारतीय प्रबोधन हे परंपरा व नवता, पाश्चात्य प्रभाव व भारतीत्व यांच्या संयोगातून साकारत गेले. मात्र संयोग नेमका कशाचा आणि किती याबाबत भिन्न संप्रदाय, विविध विचारवंत यांचे आपापले दृष्टिकोन होते, आडाखे होते, मार्ग होते. त्यामुळे भारतीय प्रबोधनातील विविध संप्रदाय आणि विचारवंत यांची दिशा काही बाबतीत समान वाटली तरीही त्यांचे आपापले असे वेगळेपण असतेच असते. महाराष्ट्र हा तर अशा विविधतांचा विशाल पटच होता. त्या वेगळेपणाचा वेध घेणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे आव्हान पेलणे ही सोपी गोष्ट नव्हे.
प्रस्तुत लेखसंग्रह म्हणजे प्रा. भोळे हे या आव्हानाला कसे सामोरे जात असत, त्याचे एक दर्शनच होय. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण समजावून घेताना प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या अन्य सर्व लेखनाप्रमाणे प्रस्तुत लेखसंग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल. ही उपयुक्तता सामान्य वाचक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक या सर्वांसाठी आहे. प्रा. भोळे यांचे विचार महत्त्वाचे आहेतच; पण त्यांची विचार-पद्धतीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. प्रस्तुत लेखसंग्रहापासून हा दुहेरी बोध घेणे किती लाभदायक आहे, ही खरोखर एक अनुभवण्याची गोष्ट आहे.
.............................................................................................................................................
‘आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5108/Adhunik-Maharashtratil-Vicharwant
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment