अजूनकाही
धरणामुळे शेतीमाती, गावशिवार हरवून बसल्याची तगमग, नोकरी मुळे पूर्वजांची वहिवाट सांभाळता न आल्याचं दु:ख, ओस पडत चाललेली खेडी, उद्ध्वस्त होणारा माणूस पाहून व्यथित होणं आणि शिक्षक म्हणून शिक्षणव्यवस्थेला प्रश्न विचारणं अशी चतुसूत्री घेऊन, चिंतेला चिंतनाची जोड देत गेल्या पंधरा वर्षांपासून गंभीरपणे कविता लेखन करणाऱ्या संदीप जगदाळेचा ‘असो आता चाड’ हा कवितासंग्रह नुकताच लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केला आहे.
या संग्रहातल्या कविता ‘एक गाव मरताना पाहिलंय’, ‘प्रार्थनेची ओळ’, ‘जहाल पान लागलं’ या शीर्षकाच्या तीन विभागांत विभागल्या आहेत.
‘एक गाव मरताना पाहिलंय’ या विभागात एकत्रित केलेल्या कविता कवीचा अंतस्वर आहेत. कवीचं मूळ दुखणं आपलं सर्वस्व हरवल्याचं आहे. पैठण येथील जायकवाडी धरणामुळे हजारो लोक बेघर झाले. होत्याचं नव्हतं झालं. घरादारावरून पाणी फिरलं. भरल्या ताटावरून उठावं लागलं. कवीही सर्वस्व हरवून बसला. धरणाच्या पोटात गडप झालेलं गाव पाहून कवीचं मन गहिवरून येतं. या कविता वाचून वाचकालाही गहिवरून येतं. आपलं गाव पाण्याखाली गेलंय, ही गोष्टच त्याला सहन होत नाहीये.
‘पाण्यात मासे राहतात
खेकडे
मगर
कासव
अन् माझं गाव सुद्धा
भीती वाटते
कोणी माझा पत्ता विचारला तर’
धरणामुळे घरदार, गावशिव कायमची सोडावी लागल्याचं दु:ख कवीला आहे. आपल्या बापजाद्यांनी मोठ्या कष्टानं उभं केलेलं सारं जिथल्या तिथे सोडून येताना कवीचं अंतःकरण तीळ तीळ तुटतं. नव्या ठिकाणी संसार थाटण्याचा, उतरंडी मांडण्याचा प्रयत्न धरणग्रस्त करतायत, पण फारसं काही हाती लागत नाही. म्हणूनच कवी हताशपणे ‘काला फुटला तो कायमचाच’ असं म्हणतो.
धरणग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून मिळालेली मदत अतिशय तोकडी आहे. ना नीट पुनर्वसन, ना शेती, ना नोकऱ्या. यापैकी काहीही विस्थापितांच्या हाती लागलेलं नाही. धरणाला विरोध करणाऱ्यांना सरकारी यंत्रणेने चिरडून टाकले.
‘एक पोरगी डूबेंगे पर हटेंगे नहीं म्हणत
अडून बसली होती…’
पण शेवटी नाईलाज झाला. कोणताच पर्याय उरला नाही.
‘परक्या वाटांवर
पाय खोरून मरण्याशिवाय
तुमच्या समोर ठेवलेला नाही
दुसरा कोणताच पर्याय…’
पुनर्वसनाच्या नावाखाली दुसऱ्या गावात घरं दिली, जमिनीचे तुकडे दिले गेले ,परंतु ती माती आपली वाटत नाही.
‘पण ही परकी माती
माझ्या तळपायांना बिलगत नाही’
ही कवीची खंत आहे. ना ती माती विस्थापितांना आपली वाटते, ना तिथले मूळचे लोक धरणग्रस्तांना आपलं मानतात. परके, घरघुसे, उपरे या विशेषणांनी पदोपदी धरणग्रस्तांचा उद्धार केला जातो. सततच्या टोचणीमुळे हृदय पिळवटून जातं.
‘उपरे, घरघुसे म्हणून
पडले रोज असंख्य फटके’
स्वतःच्या गावाला पारखं होणं आणि दुसऱ्या गावात परकं होणं, दुःखाच्या या दोन्ही बाजू कवीला सतावतायेत. कवी अगतिक आहे, बेचैन आहे, अस्वस्थ आहे. त्या अगतिकतेतूनच तो, ‘मी खांद्यावर माझ्या गावाचं मढं घेऊन फिरतोय…’ असं म्हणण्याच्या टोकापर्यंत येतो.
हे ओझं आता त्याला सहन होत नाहीये. तो कंटाळलाय त्याच त्या गोष्टीला. एकदाचं हे सगळं संपवून टाका, असा टाहो तो फोडतोय. पिढ्यानपिढ्या हे दुःख आम्ही किती उगाळत बसावं? त्याची सहनशीलता आता संपलीय आणि म्हणूनच तो म्हणतो,
‘माझ्या घरगिळ्यांनो,
मला माझे शब्द बदलून द्या
हे दुःखाचं गाठोडं कुठवर वागवू?’
‘जे मी कवितेतून बोलतोय पुन्हा पुन्हा
असं कुठवर बडबडत राहू भ्रमिष्टासारखं’
थोडक्यात, कवितेतून येणारी धरणग्रस्तांची आर्त हाक, त्यांचं जगणं, दुखणं मुखर करणारा कवी हे जगणं बदललं, तरच मला नवी कविता लिहिता येईल या अपेक्षेत आहे.
कवीचा नदीवर, गोदावरीवर थोडा राग दिसतोय. जिच्या काठावर राहणारी पिढ्यांनपिढयाची घरं, ज्यांना विश्वास होता की तीच आपला सांभाळ करील म्हणून, पण ती अशी का फितूर झाली अन् उंबरा ओलांडून घरादारात घुसली याचं कोडं कवीला उलगडत नाही. त्याच मानसिकतेतून तो नदीनं डूख धरल्याची तक्रार करतो. नदीनं डूख कशाचा धरला असेल तर तिच्या देहावर जखम केल्याचा.
‘धरणाला मी आता
धरण मानत नाही
मानतो तुझ्या देहावरची जखम.’
धरणग्रस्ताचं जीवन जगणारा कवी पेशाने शिक्षक आहे. जिल्हा परिषदेच्या एकशिक्षकी, दोन शिक्षकी शाळांमधून विद्यार्थी घडवण्याचं अग्नीदिव्य पार पाडताना एकूणच शिक्षणव्यवस्था, अभ्यासक्रम आणि या सगळ्यात कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या पोरांचं स्थान काय आहे, याचा शोध घेताना कवी गंभीर होतो.त्याच्या चिंतनशीलतेला चिंतेची हळवी किनार प्राप्त होते. हाडाचा शिक्षक असल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता त्याला स्वस्थ बसू देत नाही. ‘प्रार्थनेची ओळ’ या विभागात यासंदर्भाने काही कविता आल्या आहेत.
‘पुस्तकबिस्तक ठीक ह्ये
कविताबिवीता अन्य धडेबिडेपन
उगळून झालेत सगळे
पण ह्या अख्ख्याच्या अख्या गचपनात
आम्ही कुठंच कसे नाही’
हा त्याचा प्रश्न आहे. शहरात बसून ठरवल्या गेलेल्या अभ्यासक्रमात आमच्या दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारं शिक्षण कुठंय?
शाळाबाह्य मुलांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. शाळा ओस पडत चालल्यात. या समस्येला कवीला रोज सामोरं जावं लागतं .ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार यांची पोरं आणि त्यांचं आयुष्य वीटभट्टीच्या आगीत होरपळून चाललंय. शाळा सोडून आई-वडिलांच्या मागे कामाला जाणाऱ्या कोवळ्या हातांना पाहून कवी अस्वस्थ होतो,
‘जांभळं, बोरं, चिंचा, पेरू
दप्तरातून काढून माझ्यासमोर ठेवणारी ही पोरं
अशी अचानक का गायब होतात दरवर्षी?
मी कितीदा तरी पाहिलंय त्यांना
फरफटत पोटापासून भाकरीपर्यंतचं अंतर कापताना...’
अक्षरापासून कोसो दूर जाणाऱ्या या लेकरांना परत येण्याचं आवाहन करताना कवीचा कातर होणारा आवाज वाचकाला हलवून सोडतो. अंतकरण पिळवटून टाकतो,
‘माझ्या लेकरांनो
परतून या
मी तुमच्या हातात पुस्तक ठेवीन
पुस्तकाच्या वासानं नजरेत उमललेलं
कापसाचं फूल पहायचंय मला.’
पुस्तकाच्या सहवासानेच तुमचं जीवन सुगंधी होणार असल्याची खात्री तो देतो.
टीव्ही, वृत्तपत्र, शिबीरे घेऊन देखावा करणाऱ्यांना या पोरांचं जग का दिसत नाही? बंद कानांना हे सारं काही ऐकू येत नाही? असा सवाल तो उभा करतो.
सरकारी व्यवस्था कष्टकरी कामगारांच्या लेकरांविषयी उदासीन असताना मी शिक्षक म्हणूनही तुमच्यासाठी फार काही करु शकत नाही अशी कबुलीही तो देतो. त्याच्या मनात एक शल्य आहे.
‘मला वाटलं होतं
मी होईन तुमच्यासाठी
मायाळू गारवा देणारं
वडाचं जुनाट झाड
पण मी किती दुबळा निघालो
मला देता येत नाही
तळहाता एवढीही सावली’
शिक्षक म्हणून असलेली स्वतःची मर्यादाही कवी स्पष्ट करतो.
परंतु या सगळ्या कोलाहलात तो नाउमेद होत नाही. परिस्थिती आपल्यासाठी पोषक नसली तरी खचून न जाता चालत राहण्याचा संदेश तो विद्यार्थ्यांना देतो. रोज तुमच्याकडून वदवून घेतलेली ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना आळवण्याचे आवाहन करताना तो म्हणतो,
‘माझ्या लेकरांनो
कितीही ठेचकाळलात, वावटळीत गुरफटलात
तरी मी सोबत दिलेली
प्रार्थनेची ओळ
जीवतोड धरुन ठेवा'
एवढीच एक गोष्ट आहे माझ्याजवळ
तुम्हाला देण्यासाठी’
चोहोबाजूंनी उठलेल्या वादळातही दिवा मिणमिणता ठेवण्यासाठी सन्मार्गावर चालण्याची शिक्षा तो विद्यार्थ्यांना देतो.
‘जहाल पान लागलं’ या विभागातील काही कवितांतून कवी जागतिकीकरण, बाजारीकरण, उदारीकरणाच्या आगमनानंतर खेड्याचं झालेलं बकाल रूप, ओस पडलेली खेडी, दुभंगलेली माणसं, जशी गावं बदलली तशी माणसंही बदलली यांची चिंता तो करतो.
‘माळवदाच्या आढ्याला
पाखरांसाठी कणीस बांधणाऱ्यांचं रान
रातोरात नेलं नव्हतं कुणी खुडून’
ही स्थिती चित्रीत करतो.
‘सातासमुद्राचं खारट पाणी
शिरू लागलंय नाकातोंडात
असं दम रोखून धरून
कुठवर तगवून धरणार आहोत स्वतःचा जीव’
नोकरीमुळं गावापासून दूर राहणाऱ्या कवीला आपल्या मातीपासूनचं तुटलेपण अस्वस्थ करतं. आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या वाटा वहिवाट म्हणून सांभाळता येत नसल्याची कबूलीही काही कवितांतून तो व्यक्त करतो,
‘ही माझी रक्तामांसाची माणसं
का वाटू लागलीयत परकी परकी
टीचभर खळगी भरताना
पदरात पडले हे परकेपण’
नवरा सोडून माहेरी बसावं लागलेल्या पोरीच्या बापाचं दुःख, त्याची अंतरिक घालमेल व्यक्त करणारी एखाददुसरी कविताही या संग्रहातून आली आहे.
कवीला मोठं सांस्कृतिक संचित लाभलंय. ज्या गोदावरीच्या पाण्यानं गाव गिळलं त्याच गोदावरीच्या काठावरील पैठण गावात तो राहतो. पैठणला लाभलेल्या संतपरंपरेतून मिळालेलं संचित कवीच्या गाठी आहे. चक्रधर, एकनाथ, सातवाहन यांचा उल्लेख करून त्यांच्याशी आपली नाळ जोडताना तो ‘वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यावर’ असं म्हणत आपल्या लेखनाची दिशा स्पष्ट करतो.
कवितासंग्रहाच्या अगदी सुरुवातीला तुकोबाचा अभंग दिलाय. शेतीमातीवर आघात करणाऱ्या या काळात शेताची राखण करण्यासाठी शेतकऱ्याला सजग करणारा तुकोबा आणि त्याचा प्रस्तुत अभंग कवीला आपला वाटणं साहजिक आहे.
या कवितेत आलेली भाषा तिचं एक अंगभूत सौंदर्य घेऊन आलेली आहे. सर्वस्व हरवलेलं असतानासुद्धा या कवीच्या भाषेत कुठलाच आक्रस्ताळेपणा नाही, तोडफोड करण्याची भाषा नाही. अत्यंत संयमी, मार्दवपूर्ण भाषेत तो मांडणी करतो. ही भाषा वाचकाला हलवून सोडते.
‘प्रार्थनेची ओळ’ या विभागांतून आलेला शिक्षक विद्यार्थ्यांना ‘माझ्या लेकरांनो’ हे संबोधन पुन्हा पुन्हा वापरतो. विद्यार्थ्यांविषयी असलेली त्याची आत्मीयता वाचकालाही आपलंसं करुन टाकते.
या कवितेतून काही ठिकाणी पैठणी बोलीचे दर्शन होते. ह्ये (आहे), नई (नाही), देतान (द्याल), भेटन (भेटेल) अशा काही शब्दांच्या योजनेतून याची प्रचिती येते. ‘झट्या’ हा शब्द दोन तीन कवितेतून आलेला दिसतो. ‘हजार झट्या खेळून माती पिकवली’ असं म्हणताना कवीला शेतकऱ्याच्या संघर्षाला, प्रयत्नांच्या पराकाष्ठेला अधोरेखित करायचं आहे.
या संग्रहात काही मोजक्याच प्रतिमा आल्या आहेत.
‘काही वस्तू तिला आठवतच नाहीत
ती पुन्हा पुन्हा तिंबते स्वतःला कणकेसारखं’
‘तिंबलेल्या कणकेची’ प्रतिमा स्त्रीच्या दुःखाला आणखी गडद करते.
नदीच्या पाण्यात गावशिव हरवून बसलेल्या धरणग्रस्तांच्या केविलवाण्या स्थितीचं वर्णन करताना कवीने ‘सोलून काढलेलं झाड’ ही समर्पक प्रतिमा वापरली आहे.
‘खोडावरची सगळी साल सोलून काढलेलं झाड
वठत जातं हळूहळू
तसा मुर्दाड होत गेलो...’
कवीने धरणाला ‘नदीच्या देहावरची जखम’ ही उपमा दिली आहे. यामुळे कवीची दृष्टी स्पष्ट होते. ‘घरगिळ्यांनो’ यासारखी आलेली एखाददुसरी शिवी कवितेची अपरिहार्यता म्हणून येते. एकूणच संदीप शिवाजीराव जगदाळे यांची ही कविता वाचकाला हलवून टाकते, विचारप्रवृत्त करते आणि मातीपासून तुटलेल्या असंख्य लोकांच्या समुदायाकडे पाठमोरं न होता त्यांच्याकडे सन्मुख होण्याची नवी दृष्टी वाचकांत निर्माण करते यात शंका नाही.
.............................................................................................................................................
'असो आता चाड' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5107/Aso-Ata-Chad
.............................................................................................................................................
लेखक हंसराज जाधव तरुण कथाकार आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment