अजूनकाही
‘हमरस्ता नाकारताना’ हे सरिता आवाड यांचे आत्मकथन राजहंस प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केलेय आणि अल्पावधीतच ते चर्चाविषयही झालेय. कोण आहेत सरिता आवाड?
लौकिक ओळख सांगायची तर प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळी यांची मुलगी. पण इथेच त्यांची ओळख संपत नाही. तर एक बॅंक कर्मचारी म्हणून अधिकारी पदापर्यंतचा प्रवास, त्याआधी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून साहित्य-सांस्कॄतिक वातावरणासह सामाजिक राजकीय विचारधारा संघटना यांच्याशी परिचय, सहभाग. सेवादल, युक्रांद, मागोवा गट, दलित पॅंथर ते जनता पार्टीपर्यंतचा प्रवास, कधी थेट सहभागातून कधी दुरून, तर कधी अभ्यास म्हणून त्यांनी जवळपास ३० ते ४० वर्षे केला, जो कालांतराने स्त्री चळवळीशी जोडून तिथेच स्थिरावला.
या आत्मकथनात लेखिकेचा प्रवास असला तरी त्यात तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक स्त्रियांचाही प्रवास आहे. त्यात प्रामुख्याने आजी (आईची आई), आई, स्वत:च्या जावा, याशिवाय चळवळीच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या मैत्रिणी यांचा समावेश आहे.
पण यातही आई सोबतचे त्यांचे नाते व उत्तरोत्तर बदलत गेलेले संबंध या आसाभोवती हे कथन प्रामुख्याने फिरत राहते. त्यातूनच वडील व भाऊ यांच्यासोबतचे संबंधही येतात. एका प्रतिथयश लेखिकेच्या, त्याही मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील अनेक प्रसंग वाचकांना धक्कादायक वाटतील असे आहेत. त्यातून लग्न व कुटुंबसंस्थेचा पोकळपणा जसा दिसतो, तसाच आतड्याची म्हणवली जाणारी नातीही कशी बदलत जातात हेही कळतं.
दुसरा टप्पा आहे लेखिकेचं प्रेमात पडणं, नंतर लग्न करणं आणि या आंतरजातीय लग्नाचे तिच्या माहेरी, सासरी उमटलेले पडसाद. ब्राह्मण व नवबौद्ध या विवाहाकडे भलेभले विचारवंत, साहित्यिक यांनी कसं पाहिलं व त्याच वेळी पती रमेश आवाड यांच्या सुरुवातीला वस्तीपातळीवर राहणारी व नंतर बैठ्या चाळीत स्थिरावलेली कुटुंबाची माहिती, नातेसंबंध, तिथली स्त्री-पुरुष विभागणी ही लेखिका नोंदवते.
विद्यार्थिदशेत आणीबाणीपासून सक्रिय झालेली लेखिका विविध ठिकाणी अर्थार्जन व कामाचे अनुभव घेत बॅंकेची नोकरी स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत करते. या प्रवासात परिवर्तनवादी चळवळीशी सुटलेला, तुटलेला धागा आपल्यापरीने जोडायचा प्रयत्न करत राहते. ती सगळी धावपळ, तगमग, आपल्याला सरिता आवाडांच्या अथक प्रयत्नांतून दिसत राहते.
आई, वडील, पती रमेश आवाड व पुढे मुले हे या आत्मकथनाचे केंद्रबिंदू आहेत. आत्मकथनाचा मोठा भाग या चार बिंदूनी व्यापलाय. कारण लेखिकेला आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पहायलाही हे चार बिंदूच कारणीभूत झालेत हे वाचताना लक्षात येतं.
हमरस्ता नाकारताना सरिता यांनी मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातले पाश प्रेमविवाह, तोही आंतरजातीयसाठी तोडले. हे तोडताना त्या तर्ककठोर होत्या असं नाही, तर भावनेचा शेवटचा तंतू त्यांनी हरप्रकारे प्रयत्न केलेला दिसतो. शेवटी वैचारिकतेला प्राधान्य देत त्यांनी वेळोवेळी मग भावविवशता मागे टाकली.
स्वत:च्या कुटुंबाशी एक लढाई जिंकल्यावर सरिता यांना नंतर लग्नातंर्गत लढाई लढावी लागली. पती रमेश आवाड व त्यांचे कुटुंबीय यांच्याशीही त्यांनी विविध वेळा, विविध पद्धतीने संघर्ष केला. पण इथेही त्या माहेरच्या माणसांप्रमाणेच, समाजातील इतर अभिजनांसह काही वेळा बहुजनही जो ‘हे नाही सुधारणार...संस्कार..वगैरे’ पश्चातापापर्यंत न पोहचता या सर्वांना माणूस म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करताना दिसतात. यात घाव पडले, चरे राहिले, पण कटुता नाही ठेवली. पती रमेश आवाड यांना तर पदव्युत्तर शिक्षण (तेही आयआयटी, मुंबई येथील.) ते लग्न, पुढे त्यांची बॅंकेची बदलीची नोकरी, पहिले मूल आणि पुढे त्यांच्या गंभीर आजारापर्यंतच्या काळात त्यांनी जी सर्वपातळ्यावर सोबत केली, जे ताण, आरोप मूकपणे सोसले, ते शेवटच्या दिवसात रमेश यांनी जे कबुलीजबाब दिले, त्यावेळीही सरिता संयत राहतात. उलट रमेशची कातर अवस्था समजून घेत जुने हिशोब चुकते करण्याचे टाळतात. त्या ब्र ही काढत नाहीत.
प्रचलित चित्रपट प्रतिमांच्या भाषेत सांगायचं तर अनेकदा ‘अलका कुबल’ भासणाऱ्या सरिता क्षणात वीज चमकावी तशा ‘स्मिता पाटील’ होऊन जातात!
हे आत्मकथन महत्त्वाचं अशासाठी आहे की, यात जवळपास पाच दशकातील सामाजिक, राजकीय, सांस्कॄतिक, स्थित्यंतरांचा पैस आहे. नवी स्वप्ने, आकांक्षा, यांचे रुजणे, फुलणे आणि नंतर संपून जाणे आहे. वैयक्तिक जगण्याच्या लढाईसोबत, राजकीय, सामाजिक परिवर्तनासाठीचा सक्रिय सहभाग, राग, लोभ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा एका भानावर आलेल्या स्त्रीचा कौटुंबिक ते सामाजिक पातळीवरचा लढा आहे. स्त्री चळवळीने दिलेलं आत्मभान हा या कथनाचा कणा आहे. या आत्मभानामुळेच सुरुवातीला आई, भाऊ, पुढे पती रमेश त्याचे कुटुंबीय, कामाच्या ठिकाणचे अनपेक्षित अनुभव ते आता साठीनंतर स्वीकारलेल्या खुल्या नातेसंबंधांचे आपल्या तरूण मुलांसह, त्यांच्या जोडीदारांनाही खुलेपणानं सांगण व क्रिया प्रतिक्रियानंतरही आपल्या निर्णयावर ठाम राहणं हे केवळ विचारांचा पाया भक्कम केल्यावरच जमू शकते. सरिता यांच्या आत्मकथनात हा विचारांचा पाया सुरुवातीपासून दिसतो. सुरुवातीला तो न्याय-अन्याय या पातळीवरून व पुढे प्रबोधनातून ठाम झाल्यामुळे तो उत्तरोत्तर अधिक विस्तारत जातो.
या आत्मकथनात एका स्त्रीसोबत अनेक स्त्रियांचा प्रवास आहे. मात्र सरिता यांचे वडील (अण्णा) आणि पती रमेश या दोन पुरुष व्यक्तिरेखा म्हणजे सामाजिक, सांस्कॄतिक दोन ध्रुवावरील व्यक्तिरेखा आहेत. त्यातही वडिलांची व्यक्तिरेखा ही एखाद्या समांतर चित्रपटातील ‘मूक’ नायकाच्या व्यक्तिरेखेसारखी शेवटपर्यंत आपल्याला वेगळ्या अर्थाने छळत राहते. आपण आजवर स्त्री घुसमट पहात आलो इथे एका पुरुषाची घुसमट दिसते. पती रमेश आवाडांमधून तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’मधील नायक आठवू शकेल अनेकांना. फरक एवढाच आहे, तेंडुलकरांची नायिका शेवटी हतबल होत म्हणते- ‘मी महार झालेय!’ इथे सरिता ना हतबल होत, ना पश्चातापदग्ध होत, ना आजच्या भाषेप्रमाणे डीप डिप्रेशनमध्ये जात. त्यांनीच कुठे तरी म्हटल्याप्रमाणे त्या आपल्या सरिता या नावाला सार्थ असं जगत आल्यात.
आत्मकथनातलं शेवटचं प्रकरण आणखी एका पुरुषाला भेटवतं... आनंद करंदीकर यांना. पण हा भाग वाचताना वाटत राहतं या भागाच्या समावेशाबाबत कदाचित लेखिकेच्या मनात दुविधा असावी. कारण म्हटलं तर त्यात एक खुलेपण आहे, तरी आखडता हात जाणवत राहतो. सरिता या पर्वाची नोंद करून थांबताहेत असे वाटून जाते. कदाचित आयुष्याचे हे पर्व सर्वार्थाने जगल्यावर त्या कदाचित तो अनुभव पुढेमागे नोंदवतीलही.
तूर्तास एका मोठ्या वाचक वर्गाने पाहिलेला, अनुभवलेला काळ सरिता आवाड यांच्या नजरेतून पुन्हा मागे वळून पाहतांना... त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यासह त्यावेळचे राजकीय, सामाजिक, सांस्कॄतिक जगणेही पुनरावलोकनासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेय. ते वाचनीय आहे तेवढेच संस्मरणीयही.
...............................................................................................................................................................
‘हमरस्ता नाकारताना’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5071/Hamrasta-Nakartana
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment