अजूनकाही
२६ ऑगस्ट हा ‘जागतिक श्वान दिन’ (International Dog Day). त्यानिमित्तानं कुत्र्यांविषयी काही रंजक व रोचक माहिती देणारी ही लेखमालिका सुरू झाली. त्यातला हा चौथा आणि शेवटचा लेख.
.............................................................................................................................................
२ जानेवारी २०१६. पठाणकोट, पंजाब इथल्या वायुसेनेच्या तळावर पहाटे साडेतीन वाजता पाच सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. हे अतिरेकी AK 47 बंदुका, हॅनग्रेडेस, Improvised Explosive Devices (IED) इत्यादींनी सुसज्ज होते. अचानक झालेल्या या हल्ल्यानं वायुसेनेच्या तळावर चांगलीच तारांबळ उडाली. अतिरेकी मोक्याच्या जागा पकडून टपून बसले. आपल्या सुरक्षा रक्षकांवर त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. परिणामी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज अशा राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (NSG) स्पेशल फोर्स ब्लॅक कॅट कमांडोजना पाचारण करावं लागलं. अतिरेक्यांनी लपण्यासाठी बंकर्सचा आश्रय घेतला होता. त्यांना या कमांडोजनी वेढा दिला. मात्र नेमक्या कुठल्या बंकरमध्ये अतिरेकी लपलेत हे काही समजत नव्हतं. काही बंकर्सना बॉम्ब विस्फोटांमुळे आगी लागल्या होत्या. अशा वातावरणात कमीत कमी जीवितहानी होऊ देता अतिरेक्यांना शोधणं महाकठीण होतं. त्यामुळे अशा कामात माहीर असणाऱ्या एका विशेष कमांडोला पाचारण करण्यात आलं. हा धाडसी कमांडो आगीची वगैरे कसलीही पर्वा न करता लपतछपत या बंकर्समध्ये घुसला आणि अतिरेकी असल्याचा एक महत्त्वाचा पुरावा घेऊन आला. त्यावरून जवानांना अतिरेकी नेमके कुठे लपलेत याचा पत्ता लागला आणि त्यांनी पुढची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या बहादूर जवानाचं नाव होतं- dog squad मधला belgian malinois जातीचा श्वान कमांडो. ज्याला नंतर NSG तर्फे शौर्य पदक देऊन गौरवण्यात आलं.
‘War Dogs’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुत्र्यांचा युद्धात वापर पहिल्या महायुद्धापासून सुरू झाला. त्या वेळी ही कुत्री संदेशवहनाचं काम करायची. गळ्यात संदेश बांधून त्यांना सोडलं जायचं. ती बरोबर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीपर्यंत तो संदेश घेऊन जायची. नंतर कुत्र्यांच्या तीक्ष्ण नाकाचा वापर लक्षात येऊन त्यांना विस्फोटक, भुसुरूंग इत्यादींच्या शोधासाठी (Sniffer dogs) वापरलं जायला लागलं.
.............................................................................................................................................
वॉर डॉग्जच्या प्रकारांविषयी अधिक माहितीसाठी पहा -
https://www.uswardogs.org/war-dog-history/types-war-dogs/
.............................................................................................................................................
इराक युद्धाच्या काळात या कुत्र्यांनी जमिनीत पेरलेले कितीतरी बॉम्ब शोधून काढले आणि हजारो अमेरिकी सैनिकांचे प्राण वाचवले. अतिरेक्यांना या कुत्र्यांची एवढी धडकी बसली की, आधी कोणत्याही परिस्थितीत अमेरिकी सैन्याच्या कुत्र्यांना निशाणा बनवणं आणि मग सैनिकांचा समाचार घेणं सुरू झालं. पुढं पुढं तर परिस्थिती एवढी टोकाला गेली की, अमेरिकेच्या कॅम्पजवळ जाऊन कुत्र्यांना नावानिशी हाक मारणं आणि तो कुतूहलानं जवळ आला की, त्याला ठार करणं असे प्रकार चालू झाले. त्यामुळे अमेरिकी सैनिकांनशिवाय इतर कोणालाही कुत्र्यांची नावं सांगायची नाहीत, असा नियम केला गेला. इतके हे अतिरेकी या कुत्र्यांना घाबरून होते.
आज जगात जवळ जवळ सगळ्याच देशात असे विशेष प्रशिक्षण दिलेली कुत्री सेना आणि पोलीस दलात वापरली जातात. वासावरून बॉम्ब, विस्फोटक, दारूगोळा इत्यादी शोधून काढणं, चोराचा मग काढणं, अगदी वेळ पडलीच तर चोरावर हल्ला करून त्याला नामोहरम करणं, अशी अनेक महत्त्वाची कामं कुत्री पार पाडतात. तसंच नैसर्गिक आपत्ती, जसं की भूकंप, भुस्खलन, हिमस्खलन इत्यादी आपत्तीच्या वेळी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या माणसांचा शोध घेणं, अशा महत्त्वाच्या कामात कुत्र्यांचा वापर होतो.
German Shepherd, Belgian malinois, Doberman, Labrador retriever इत्यादी जातीची कुत्री यासाठी वापरली जातात. अचूक वास घेण्याची क्षमता, उपजत हुशारी, कोणतंही काम कमीत कमी वेळात शिकण्याची क्षमता (trainability), एकनिष्ठता, कोणत्याही परिस्थितीत कामापासून विचलित न होण्याची क्षमता, इत्यादी गुणांमुळे या प्रकारच्या कुत्र्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. तरीही न्हा सैनिकी ढंगाच्या विशेष प्रशिक्षणात उत्तीर्ण झाली तरच त्यांना सैन्य दलात दाखल केल जातं.
व्हिक्टोरियन काळात माणसांनी जेव्हा breed standard नुसार कुत्र्यांची शास्त्रशुद्ध पैदास चालू केली, त्यावेळी त्यांच्या बाह्य रूपाबरोबरच त्यांचं temperament (स्वाभाविक गुणवैशिष्ट्यं) हेही तितकंच महत्त्वाचं समजलं गेलं. त्यामुळे selective breeding होत होत, अशी गुणवैशिष्ट्यं असणाऱ्या कुत्र्यांच्या जाती तयार झाल्या. गावठी कुत्री genetic diversity जपली गेल्यामुळे कितीही निरोगी असली तरी त्यांच्यामध्ये स्वभावत: वरील सर्व गुणवैशिष्ट्यं असण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अशा कुत्र्यांना प्राधान्य दिलं जात नाही.
Labredor बरोबरच golden retriver आणि begel या जातीची कुत्री विमानतळावर अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी वापरली जातात. इतकंच नव्हे तर माणसांच्या मूत्राच्या वासावरून त्या माणसाला कॅन्सर आहे का नाही, हेही कुत्र्यांना समजू शकतं. तशा प्रकारे कुत्र्यांना प्रशिक्षण देता येतं.
............................................................................................................................................
कॅन्सर सांगणाऱ्या कुत्र्यांच्या अधिक माहितीसाठी पहा
https://www.nationalgeographic.com/news/2016/03/160319-dogs-diabetes-health-cancer-animals-science/
............................................................................................................................................
labredor आणि golden retriver ही अगदी प्रेमळ आणि हुशार कुत्री guide dog म्हणूनही काम करतात. त्यांना प्रशिक्षण देऊन अंध लोकांच्या मदतीसाठी देता येतं, तसंच अपंग, विकलांग लोकांनाही अशा कुत्र्यांची मदत होते. त्यांना विविध गोष्टी आणून देण्यापासून त्यांची wheelchair ओढणं, दारं उघडणं, पडलेली वस्तू उचलून देणं इत्यादी अनेक प्रकारची मदत ही कुत्री करतात. तसंच अपस्मारासारख्या रोग्यांसाठी तर ती वरदान ठरतात. शरीरातील कंपनातील बदल हेरून ही प्रशिक्षित कुत्री अप्समाराचा झटका येण्याच्या काही मिनिटं आधी ओरडून रुग्णाला आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सावध करतात, जेणेकरून रुग्णाला वेळेत योग्य ठिकाणी नेऊन झोपवणं शक्य होतं आणि पुढचे अपघात टळतात. PTSD सारख्या मनोकायिक विकारांच्या रुग्णांनाही त्यांचा उपयोग होतो. हृदयाची वाढलेली गती, शरीरात निर्माण होणारी कंपनं इत्यादी हेरून कुत्री ताणतणाव, नैराश्य इत्यादी मानसिक अवस्थांमध्ये माणसांच्या जवळ राहतात. ऑक्सिटोसीनसारखी रसायनं शरीरामध्ये तयार झाल्यामुळे अशा रुग्णांना मानसिक आधार मिळतो.
हे सगळे Standardizetionचे फायदे आहेत. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. हजारो वर्षांपूर्वी चालू झालेला माणूस आणि त्याच्या या मित्राचा प्रवास आज इथपर्यंत आलाय. निरपेक्षपणे प्रेम आणि मदत करणाऱ्या कुत्र्यांशिवाय आज माणसाच्या आयुष्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही!
............................................................................................................................................
या मालिकेतले आधीचे लेख -
१) प्रमाणीकरणाच्या हव्यासामुळे खूप कुत्र्यांचे बळी जातात, जगभर!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3585
२) लांडग्याचा ‘कुत्रा’ झाला, तो कुत्रा ‘माणसाळला’, त्याचा माणसाला प्रचंड ‘फायदा’ झाला, त्या गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3598
3) माणसाच्या हस्तक्षेपामुळे कुत्र्यांमध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त जाती तयार झाल्या!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3615
............................................................................................................................................
............................................................................................................................................
लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.
saurabhawani@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment