अजूनकाही
“Do not follow the majority, follow the right way” असे इंग्रजीमध्ये एक सुभाषित आहे. ‘गर्दीच्या मार्गाने नाही तर योग्य /अचूक दिशेने वाटचाल करावी,’ असा त्याचा अनुवाद करता येईल.
यातील ‘योग्य’ आणि ‘अचूक’ या शब्दांचे अर्थ व्यक्तिपरत्वे आणि स्थळ-काळ परत्वे बदलत असतात. कुठलेही हितसंबंध नसताना वरील विधान तत्त्वज्ञानाचे वाटते, तर व्यवहार आणि लाभाच्या स्वारस्याने व्यवहार करणाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरते. याचा प्रत्यय आपल्या सभोवती येतो आहे. तो म्हणजे राजकीय पक्षांतराच्या निमित्ताने. आज राज्यभरात होत असलेले पक्षांतर गर्दीच्या प्रवाहासारखे वाटत असले तरी पक्षांतरितांना मात्र हाच मार्ग ‘अचूक’ आणि ‘योग्य’ वाटत आहे. परिणामी ‘कोटीच्या कोटी उड्डाने सत्तेकडे’ घेतली जात असल्याचे रोज पहायला मिळत आहे. राजकारणाबाहेरील लोकांना हे ‘अयोग्य’ वाटत असले तरी पक्षांतर करणाऱ्यांना मात्र ‘अशी संधी पुन्हा येणे नाही’ असे वाटत आहे. म्हणूनच विरोधी पक्षात आणि सत्तेबाहेर असलेल्यांचे जत्थेच्या जत्थे सत्ताधारी पक्षात सामील होताना दिसत आहेत.
या पक्षांतरितांच्या प्रेरणा कुठेही लोककल्याणाच्या दिसत नाहीत. त्यात ना विचार आहे, ना विचारसरणी आहे, ना कुठल्या तत्त्वाशी असलेली बांधीलकी आहे. ही मंडळी फक्त सत्तेची पाईक आहेत. सत्तेच्या बाहेर राहिलेला कुणीही विचारी आणि स्वत:चा भक्कम जनाधार असलेला नेता, या लाटेत पक्षांतर करताना दिसत नाही. पक्षांतर करताहेत ते सातत्याने सत्तेच्या आश्रयाला राहून आपली सरदारकी आणि आपली सुभेदारी राखलेले लोक. उदाहरणच द्यायचे तर तब्बल १२ वेळा आमदार राहिलेले सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. सत्ता असेल-नसेल, पण गणपतराव विचार आणि पक्षनिष्ठा जोपासत आजही सन्मानाने भक्कमपणे आपल्या पायावर उभे आहेत.
फक्त सत्तेत राहण्यासाठी आणि सत्तेची फळे चाखण्यासाठी आपली सरदारकी टिकवून ठेवणाऱ्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश राजवटीत आणि आता स्वातंत्र्यानंतरच्या प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेत, या पारंपरिक सत्ता मनोवृत्तीने प्रत्येक नव्या राजकीय वळणावरच्या प्रवाहाशी जुळवून घेत आपले स्थान टिकवून ठेवलेले आहे.
विविध भाषा, प्रांत, जातीसमूह व विचार यांनी नटलेल्या भारतीय परंपरेसाठी आणि त्याच्या मुळाशी असलेल्या भिन्न विचारप्रवाहाच्या बहुपक्षीय लोकशाहीसाठी असा विचारविहीन सत्तालोलूप प्रवाह घातक आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘या देशाला विचारभिन्नतेपासून नाही तर विचारशून्यतेपासून धोका आहे. जिकडे सत्ता तिकडे लोक पळताना दिसत आहेत. जहाज बुडायला लागलं की उंदरं उड्या मारायला लागतात. तसे या लोकांचे झाले आहे. सत्तेशिवाय या लोकांना करमत नाही. सत्तेच्या मागे धावणारे असे लोक इतिहास लिहू शकत नाहीत. इतिहास तेच लिहू शकतात, जे आपल्या विचारावर ठाम असतात. सत्ता असो अथवा नसो, आपण आपल्या विचाराशी प्रामाणिक राहिले पाहिजे.’’
गडकरींचे हे बोल आजच्या विचारविहीन राजकीय पक्षांतर-प्रवाहाचे स्पष्ट दर्शन घडवतात, तसेच दलबदलू नेत्यांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीला टांगतात. परंतु म्हणतात ना ‘सत्तातुरानाम न भयं न लज्जा’! या पक्षांतर गर्दीतल्या लोकांना कुठल्याही मूलगामी विचारसरणीचं अधिष्ठान नाही. वैचारिक राजकीय जडणघडण झालेला एकही चेहरा या गर्दीत दिसत नाही. ज्यांना सत्तेशिवाय इतर कुठल्याही वैचारिक मूल्यांचा नि विचारपरंपरेचा वारसा नाही, अशांकडून पक्ष बांधीलकी आणि वैचारिक बांधिलकीची अपेक्षा करणेच मुळी अवास्तव आहे. अशा लोकांच्या असण्याने-नसण्याने एखाद्या पक्षाला संख्यात्मक फरक पडत असला तरी गुणात्मक फरक पडत नाही. मात्र लोकशाहीत ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ हे तत्त्व स्वीकारले गेले असल्याने या गर्दीचा लाभ मतपेटीतून सत्तेपर्यंत पोचण्यासाठी होतो, होऊ शकतो.
व्यापक हिताचा विचार करता असे एक पक्षीय बळ वाढणे सर्वसमावेशक लोकशाहीसाठी घातक आहे. भारतीय समाजाची विविधतेने नटलेली वीण, यातून अशक्त होत आहे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा’ हे भारतीयत्वाचे एकात्मिक मूल्य अशक्त होत आहे. बहुलतावाद (pluralism) पराभूत होत आहे. भाषिक आणि सांप्रदायिक बहुसंख्याकवादाला (Mejoritarianism) खतपाणी मिळत आहे. सर्वांत धोकादायक बाब म्हणजे आपल्या समाजातला एक मोठा वर्ग गप्प आहे. हा तोच विचारविहीन वर्ग आहे, ज्याला आपला समाज ‘सुशिक्षित’, ‘चांगले’, ‘गुणी’ आणि ‘सभ्यते’ची विशेषणे लावतो. हा वर्ग ‘राजकारण हे आपल्यासारख्या चांगल्या सुशिक्षित लोकांचे काम नाही,’ असा संस्कार स्वत:वर आणि एकूणच भारतीय समाजावर करत आला आहे.
या संस्काराचे दुर्दैवी फलित म्हणून की काय, संख्येने मोठ्या प्रमाणावर असलेला आणि सत्तांतर घडवण्याचे प्रचंड सुप्त सामर्थ्य असलेला हा वर्ग देशाच्या राजकारणात आणि सत्ताकारणात उदासीन असल्याने देशसंचालनात कुठेही अग्रस्थानी नाही. म्हणूनच आपल्याकडे उच्च विद्येशी फारकत असलेले नेतेमंडळी शेवटच्या श्वासापर्यंत कायदेनिर्माते म्हणून संसदेत आणि विधिमंडळात देशाची व राज्याची धोरणं ठरवतात, तर उच्च शिक्षण घेत स्वत:ला चांगले म्हणवून घेणारे लोक चाकरमाने होऊन या कायदेनिर्मात्यांनी ठरवलेली धोरणे इमानेइतबारे राबवण्याची तालीम बजावताना दिसतात.
‘सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा अंगठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुशिक्षित वर्गाला हा संदेश दिला होता. आज या सुशिक्षित वर्गाची राजकीय निरक्षरता, निष्क्रियता आणि निरसता अशिक्षितांच्या झुंडीला सहाय्यभूत ठरत आहे. विचारवंत ब्रेख्त यांनी या वर्गाच्या प्रकृतीची चिरफाड करताना म्हटले आहे की - “सर्वांत भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की, जगण्याची किंमत, औषधांच्या किंमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमानसुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत राहतो की, मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की, त्याच्या राजकीय अज्ञानातूनच शोषणकारी व्यवस्था जन्माला येते.”
म्हणून आजच्या स्थितीत विचारी भारतीयांना गर्दीच्या मागे नाही तर एकात्मिक आणि सर्वसमावेशक भारतीयत्वाच्या विचारामागे वाटचाल करण्याची गरज आहे!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment