अजूनकाही
१४ सप्टेंबर हिंदी दिवस. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचं ‘एक देश एक भाषा’ हे स्वप्न साकार करायचं असेल तर हिंदीशिवाय पर्याय नाही, या आशयाचं ट्विट देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. ‘एक देश एक भाषा’ अशी स्थिती भारतात कधीही नव्हती. आजही आपल्या देशातील कोणत्याही व्यक्तीला किमान दोन भारतीय भाषांमध्ये संवाद साधता येतो. किंबहुना भाषिक विविधता हे आपलं सामर्थ्यस्थळ आहे.
अमित शहा यांच्या ट्विटला दक्षिण भारतातून विशेषतः द्रविड मुनेत्र कळहम या पक्षाचे नेते स्टालिन यांनी प्रत्युत्तर दिलं. हिंदी भाषेच्या सक्तीला द्रविड आंदोलनाने विरोध केला होता. या आंदोलनामुळे तामीळनाडू राज्यातून काँग्रेस सत्ताच्युत झाली. त्यानंतर आजतागायत काँग्रेसला या राज्यात सत्ता मिळणं, सोडाच परंतु सत्तास्पर्धेतही कधी स्थान मिळालं नाही.
राष्ट्रभाषा कोणती असावी, असा प्रश्न घटना परिषदेत चर्चिला गेला होता. ‘हिंदी की हिंदुस्थानी?’ असा प्रश्न होता. हिंदुस्थानीमध्ये उर्दू आणि खडी बोली यांना सामावून घेण्यात आलं आहे. हिंदी म्हणजे संस्कृतप्रचुर हिंदी. नेहरू व गांधींचा कल हिंदुस्थानीकडे होता. मात्र घटना परिषदेत केवळ एका मताने हिंदीचा विजय झाला. अर्थात ‘राष्ट्रभाषा’ हा दर्जा हिंदीला मिळाला नाही. आजची संस्कृतप्रचुर हिंदी बोलीभाषा कधीही नव्हती. या संस्कृतप्रचुर हिंदीला स्वतःचा प्रदेश नव्हता. या हिंदी भाषेत साहित्याची मोठी परंपराही नाही. खडी बोली, भोजपुरी, मगधी, छत्तीसगढी अशा अनेक भाषा सध्याच्या हिंदी भाषिक प्रदेशात बोलल्या जात, या भाषांमध्ये साहित्याची परंपरा आहे. उदाहरणार्थ तुलसीदास आणि कबीर यांच्या रचना खडी बोलीतल्या आहेत. लोकभाषा, लोकसंगीत यामध्ये संस्कृतप्रचुर हिंदी भाषेला स्थान नाही.
मात्र आजच्या हिंदी भाषेची सर्वसमावेशकता स्तिमित करणारी आहे. चित्रपट बोलू लागल्यानंतर हा बदल घडला असावा. ‘आलम आरा’ हा पहिला हिंदी बोलपट. या चित्रपटापासून ते थेट ‘मुघले आझम’पर्यंत हिंदी चित्रपटांच्या भाषेवर उर्दूचा प्रभाव आहे. ‘मुघले आझम’ या चित्रपटांतील संवादांची खुमारी उर्दूचं ज्ञान असेल तरच कळते. लोकांच्या भाषेपासून हे बोलपट खूप दूर होते.
इंग्लंड आणि फ्रान्समध्येही उमराव आणि सामान्य जनतेच्या भाषा वेगळ्या होत्या. त्यामुळे चित्रपट बोलू लागल्यावर भाषा कोणती वापरायची असा प्रश्न तिथल्या चित्रपट निर्मात्यांसमोर उभा राहिला. अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्षापासून ते सफाई कामगारापर्यंत सर्वजण एकच इंग्रजी भाषा बोलत होते. त्यामुळे बोलपटांपासून हॉलिवुडचा दबदबा वाढू लागला.
हिंदी चित्रपटांची लोकप्रियता वाढू लागल्यावर हिंदी चित्रपटांनी भारतातील विविध भाषांना, त्यातल्या अभिव्यक्तीला (आता माझी सटकली—सिंघम), शब्दांना सामावून घ्यायला सुरुवात केली. पंजाबी, बांग्ला, बिहारी, भोजपुरी, मराठी, तमिळ, कानडी अशा अनेक भाषांमधील शब्दांना चित्रपटातील हिंदी भाषा सामावून घेऊ लागली. अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेत बम्बय्या हिंदीचा वाटा मोठा आहे. गब्बरसिंगचे डायलॉग संस्कृतप्रचुर हिंदीमध्ये प्रभावी ठरणार नाहीत. ‘तिसरी कसम’ या चित्रपटातील संवादांवर बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील भाषेचा प्रभाव आहे. फणिश्वरनाथ रेणु यांच्या कथेवर तो चित्रपट बेतला आहे. त्यातली गाणीही लोकभाषेतच आहेत. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि अन्य चित्रपटांमधून भेटणारी हिंदी प्रादेशिक संस्कृती मिरवणारी असते.
स्थानिक, प्रादेशिक, उर्दू, संस्कृतप्रचुर अशा अनेक शब्दांनी आणि अभिव्यक्तींनी आजची हिंदी भाषा समृद्ध झाली आहे. ही भाषा विसाव्या शतकात विकसित झाली. त्यामुळे भारतातील दोन भिन्न भाषिक अनोळखी व्यक्ती एकमेकांना भेटल्या की, हिंदी या एकमेव भारतीय भाषेत परस्परांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आजची हिंदी भाषा देशातील सर्व धर्म, वंश, जाती, प्रांत यांना जोडणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्रातील राजकीय पुढारी अतिशय कृत्रिम भाषा वापरतात. प्रमाण भाषा वापरण्याची हौस त्यांना असते. ही हौस अर्थातच न्यूनगंडातून येते. विधिमंडळातील भाषणं आणि राजकीय नेत्यांचे बाईटस् ऐकल्यावर हे सहजपणे ध्यानी येतं.
लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, मायावती इत्यादी हिंदी प्रदेशातील नेते प्रमाण हिंदी वा संस्कृतप्रचुर हिंदी क्वचित वापरतात. त्यांचा आपल्या भाषेवर विश्वास असतो. असा विश्वास वा आत्मविश्वास मराठी राजकीय पुढार्यांमध्ये अभावानं दिसतो.
महाराष्ट्रात बोलभाषेचा वापर प्रामुख्याने करमणुकीसाठी, विनोदासाठी केला जातो. कोणताही गंभीर विचार मांडण्यासाठी वा राजकीय विधान करण्यासाठी केला जात नाही (संसोपानं ‘बांधी गाँठ पिछडा पावे सौ में साठ’, ‘रोजी रोटी दे न सके तो ये सरकार निकम्मी हैं’, ‘जो सरकार निकम्मी हैं वो सरकार बदलनी हैं’ या घोषणा बोलभाषेतल्या आहेत. अशा बोलभाषेतल्या राजकीय घोषणा मराठी भाषेत अपवादानेच आहेत). त्याचा राग ब्राह्मणांवर वा पुणेरी भाषेवर काढणं, हे न्यूनगंडाचं लक्षण आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर ‘गुरु ग्रंथसाहेबा’ हा ग्रंथ अद्वितीय आहे. पर्शियन, संस्कृत, सिंधी, पंजाबी, लहेंदा, खडी बोली, बंगाली इत्यादी भाषांमधील संतांच्या काव्यरचना त्यांच्या भाषेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केवळ लिपी बदलली आहे. भारत हे एक राष्ट्र-राज्य नसेलही, पण राष्ट्र आहे. ही राष्ट्राची कल्पना ‘गुरु ग्रंथसाहेबा’त आहे. हा ग्रंथ आधुनिक भारताच्या भाषाधोरणाची प्रेरणा असायला हवा.
.............................................................................................................................................
लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत.
suniltambe07@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Eknath Murkute
Mon , 16 September 2019
"गुरू ग्रंथ साहिब" बाबत आणखी तपशील असायला हवा होता.