अजूनकाही
'हजारों ख्वाहिशें ऐसी' या सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपटात अगदी सुरुवातीलाच एक स्वगत आहे. नक्षलवादी चळवळीतला एक कार्यकर्ता (जो या चित्रपटातल्या तीन प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक आहे) स्वतःच्या प्रेयसीशी पत्रातून बोलतो आहे. मोर्चा आणि आंदोलनाच्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर त्याचा आवाज आपण ऐकतो. तो स्वतःला आणि एकूणच त्याच्या कॉलेज-वर्तुळातल्या मित्रांना उद्देशून म्हणतो, ‘चळवळीत भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या कथा ऐकून मी स्तब्ध झालो. स्वतःबद्दल विचार करायला लागलो. आपण स्वतःला काय समजतो? थोडी रॅडिकल जारगन, थोडं राजकारण, थोडं रॉक अँड रोल - पण मुख्यत्वे शॉक व्हॅल्यू!’ चित्रपट पाहताना मी त्याच्या या मनोगतापाशी अडखळलो होतो. ‘हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं?’, याचा विचार आज वर्षाखेरीस करताना हे मनोगत आठवून पुन्हा अडखळायला होतं आहे.
चार्ल्स डिकन्सच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ या गाजलेल्या कादंबरीतलं पहिलं विधान प्रसिद्ध आहे. ‘इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द एज ऑफ विस्डम, इट वॉज द एज ऑफ फूलिशनेस...’ अशी त्या विधानाची सुरुवात आहे. मला हेच विधान ‘अ टेल ऑफ वन नेशन’ म्हणून भारताविषयी म्हणावं असं वाटतं. गेलं एकच वर्ष नव्हे, तर गेली दोन-तीन वर्षं हा देश सतत ढवळून निघतो आहे. केंद्रातलं सत्तांतर हा एक मुद्दा झाला, पण समाजमाध्यमांच्या ‘स्फोटा’मुळे, टीव्हीच्या अतिरेकामुळे, एकाच वेळी अभिव्यक्तीच्या होणाऱ्या स्वागतार्ह आणि भयावह लोकशाहीकरणामुळे आपण बहुधा कधी नव्हे अशा चालत्या-बोलत्या-गात्या-नाचत्या-हलत्या-वाहत्या समाजात राहतोय, तसंच कधी कुठल्या धारेबरोबर पुढे जातोय हे आपलं आपल्यालाच कळत नाहीये, असं काहीसं वाटतं.
‘मी कोण आहे? मी स्वतःला काय समजतो? आजच्या माध्यमबहुल काळात ‘शॉक व्हॅल्यू’ हे माझ्याही कृतीचं मुख्य अंग होऊ पाहतंय का?’ या प्रश्नांना सामोरं जाण्याचा प्रयत्न मी सध्या करतो आहे; गेल्या वर्षात करत होतो. अनेकांना अनेक टप्प्यांवर अस्तित्वविषयक प्रश्न पडत असतात. या प्रश्नांनी ज्यांचं विचारविश्व व्यापलं होतं, असे तत्त्वज्ञ, अभ्यासक, त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवाह माणसाच्या आत्मचिंतनाची साक्ष देतात. माझं आत्मचिंतन (आणि आत्मपरीक्षण) मला काय सांगतं? मला हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटायला लागला आहे.
आपण सगळे या पृथ्वी नामक ग्रहावरच्या निसर्गाचा, पृथ्वीवरच्या एका देशाचा, तिच्यावरच्या एका गावाचा-शहराचा, समूहाचा, कुटुंबाचा, सरमिसळ असलेल्या एका जाड्या-भरड्या, ‘फंक्शनल-डिसफंक्शनल’ (समृद्ध अडगळ!) संस्कृतीचा, एका राज्यव्यवस्थेचा, न्यायव्यवस्थेचा, जात-वर्ग-विचारव्यवस्थेचा, लिंगसापेक्ष घडणीचा, लिंगनिरपेक्ष वैचारिकतेचा, लवचीक नैतिकतेचा आणि आणखीही कशाकशाचा भाग असतो. यांमधल्या बऱ्याचशा व्यवस्थांचे आपण उपभोक्ते असतो. अर्थव्यवस्थेच्या महाकाय चक्रातला एक सांधा म्हणून ही अर्थव्यवस्था ‘चालवत’ही असतो (भांडवली अर्थव्यवस्थेचा भाग असलेला माणूस ती व्यवस्था ‘चालवल्याशिवाय’ जगूच शकत नाही). एकमेकांना अशा प्रकारे छेद देणाऱ्या वर्तुळांचा मी जेव्हा भाग असतो, तेव्हा माझी ‘भूमिका’ काय असावी? आणि एवढंच नव्हे, तर कुठल्या व्यवस्था-घटकाबाबत माझी काय भूमिका असायला हवी?
हे प्रश्न थोडे थकवणारे आहेत.
पण सृष्टी आणि समाजाचं तात्त्विक आकलन करून घ्यायच्या ओढीमध्ये आपल्याला व्यवस्था-घटकांबाबतच्या भूमिकेतून सुटता येत नाही. का सुटता येत नाही? किंवा का सुटू नये? याचं मला दिसणारं कारण म्हणजे, या अफाट विश्वात आपण माणूस म्हणून आपल्या वैचारिक आणि शारीरिक क्षमतेसह उभ्या असण्यामागे माणसाची महाकथा आहे, आणि आपण प्रत्येक जण या महाकथेत आपल्या नकळत योगदान देत असतो. त्यामुळे नैतिक दृष्टिकोनातून नव्हे, तर अगदी व्यवहारवादी दृष्टिकोनातूनदेखील आपली एक भूमिका असणं आवश्यक असतं.
आता पुढचा प्रश्न. भूमिका असणं पुरेसं आहे का? बिस्मार्कचं एक प्रसिद्ध वचन आहे – ‘एखादा मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट तत्त्वतः मान्य करतो, तेव्हा ती अमलात आणण्यात त्याला काडीचाही रस नसतो.’ मी भूमिकेबाबत या ‘विचार-कृती’ द्वैताचा विचार करतो आहे. मी समतावादी असणं किंवा मी व्यक्तिस्वातंत्र्य मानणं एवढं पुरेसं आहे का? मी तत्त्वतः समतेचं तत्त्व मान्य केलं आहे, पण स्वतःच्या मर्यादेमुळे समतेच्या चळवळीत भाग घेऊ शकत नाही, हेही ठीक आहे; पण माझ्या ‘समता मान्य करण्याने’ मला समता म्हणजे काय हे समजतं का?
‘तत्त्वविचार’ बऱ्याचदा आपल्याला गप्प बसवतो. कारण तत्त्वविचार आपल्या समोरचे मार्ग ‘ब्लॉक’ करू शकतो. तत्त्वज्ञ कृती करायला धजावत नाही, कारण त्याला एकाच वेळी अनेक ‘परिणामस्वरूप शक्यता’ दिसत असतात. सरत्या वर्षातला माझा अनुभव, माझ्या विचारांच्या दिशांनी घेतलेली वळणं आणि कृतीच्या पातळीवर मला जाणवणारं अपुरेपण असं काय काय या परिणामस्वरूप शक्यतांशी जोडलेलं आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मी फेसबुकवर काय काय लिहीत होतो; या वर्षीही लिहिलं. दीर्घ स्वरूपाचे लेखही लिहिले. आता थांबलो आहे. ३ सप्टेंबर २०१५ रोजी मी एक लेख लिहिला होता. घरी उदारमतवादी विचारांच्या सान्निध्यात वाढल्याने आणि बाहेर हिंदू पर्यावरणात वाढल्याने कट्टर हिंदुत्ववादाविषयी मनात असलेला राग, त्या तुलनेत मुस्लीम धर्माविषयीचं माझं तोकडं आकलन आणि त्यामुळे मुस्लीम धर्माची न केलेली चिकित्सा (यात एक भाग हिंदू समाज आपला वाटणं आणि जाणत्या वयात मुस्लीम समाजाशी मर्यादित संपर्क आल्याने मुस्लीम समाज काहीसा परका वाटणं हाही भाग आहे), पुरोगामी विचारविश्वातून इस्लामिक मूलतत्त्ववादाविषयी म्हणाव्या इतक्या ठळकपणे न उमटणाऱ्या प्रतिक्रिया अशा काही गोष्टींचा धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न केला होता. त्यावरच्या चर्चेतून मला काही नवीन धागे मिळाले. पुढे मी काही हिंदुत्ववादी मंडळींशी प्रत्यक्षही बोललो. प्रामुख्याने २०१६मध्ये या विषयावर माझा बराच विचार झाला. ‘धर्मश्रद्धा’ हा विषय मला कायम चिकित्सेचा वाटत असला आणि संघटित धर्माशिवाय लोक एकत्र येऊ शकतात, त्यासाठी माणसांच्या मनात अस्तित्वविषयक आणि व्यवस्थाविषयक जिज्ञासा जागी असायला हवी असं मला वाटत असलं, तरी धर्मश्रद्धेने लोकांना प्रभावित केल्यामुळे त्याबाबत विचार तर करावाच लागतो. मला असं जाणवलं की, उजव्या विचारसरणीत परिवर्तनाच्या काही खुणा दिसत असल्या, तरी गेल्या काही वर्षांमध्ये उजव्या विचाराला मिळालेलं वाढतं पाठबळ आणि धर्मकेंद्री विचारपद्धतीमुळे आधुनिकेतचं (विचारातली आधुनिकता) आव्हान पेलण्यातील अडचणी, यामुळे हा परिवर्तनाचा प्रवास ऊर्ध्वगामी होण्यापेक्षा अधोगामीच होईल की काय अशी भीती वाटते. यातली मला दिसलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे उजव्या विचारधारेचे धुरीण या विचारसरणीतल्या कच्च्या दुव्यांवर लक्ष देऊन ते बळकट करण्याऐवजी अजूनही परंपरा-श्रेष्ठत्वाला उजाळा देताना दिसतात. कार्यात्मक पातळीवर ते नव्याचा स्वीकार करतात, त्याचा प्रसारही करतात, पण धार्मिकतेमुळे मूळ वैचारिक बैठक काहीशी आक्रसलेलीच राहते. उजवा विचार स्वबळावर स्वतःची कक्षा वाढवू शकेल, का याबद्दल मला शंका वाटते. कारण हा विचार आज तरी धर्म, राष्ट्र अशा चौकटीमध्ये बंदिस्त आहे. ‘संथ गतीने परिवर्तनाकडे’ असं जरी त्याचं वर्णन केलं जात असलं (‘न्यू राईट’ हा शब्दप्रयोगही अलीकडे ऐकला), तरी त्याच्या अंगभूत क्षमतेविषयी मला प्रश्न आहेत. २०१६मध्ये त्या दूर झाल्या नाहीत. शिवाय ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाने ‘उजव्या अर्थदृष्टी’नेही हादराच दिला आहे.
माणसाच्या अस्तित्वाला काहीही प्रयोजन नाही; जगात दगड-धोंडे आहेत, तसाच माणूसही आहे, असं मानवी उत्क्रांतीचा अभ्यास सांगतो; पण तरीही माणसाबद्दलचे अनेकानेक प्रश्न अनुत्तरितही आहेत, विशेषतः मानवी जाणिवेविषयीचे. असं असलं तरी अस्तित्वाचा शोध घ्यायची उत्क्रान्तीची दिशा मला योग्य वाटते. ‘जाणीव’ हेदेखील कायमचं गूढ आहे, असं समजायचं कारण नाही (‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ हे मनोविकास प्रकाशनाचं पुस्तक जरूर वाचावं. 'आजचा सुधारक'च्या डार्विन विशेषांकाचं पुस्तकरूप). आपल्याला असं दिसेल की, पूर्वी जे प्रश्न तत्त्वज्ञानाचे होते, ते काळाच्या प्रवाहात विज्ञानाच्या कक्षेत आले आणि विज्ञानाने त्याला उत्तर दिलं. मग धर्म आणि देव यांसारख्या संकल्पनांचा आपल्यावरचा प्रभाव कमीकमी होत गेला आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. या संकल्पनांची प्रासंगिकता होतीच, अजूनही ती संपलेली नाही, पण सोळाव्या शतकातला श्रद्धावान आणि आजचा श्रद्धावान यांच्यात आपल्याला सहज फरक दिसेल. त्या वेळच्या श्रद्धावानापेक्षा आजचा श्रद्धावान जास्त तार्किक विचार करणारा आहे. सोळाव्या शतकातली पूजाअर्चा आणि आजची पूजाअर्चा यांच्यात फरक आहे. पूजाअर्चा ही प्रतीकात्मक आहे. त्यामुळे ती टाळता येऊ शकते, कमी-जास्त करता येऊ शकते, त्यात शॉर्टकट्स घेता येऊ शकतात हे आजचा श्रद्धावान मानतो आणि तसं करतोदेखील. आपण जर माणसाचा ऐतिहासिक प्रवास पाहिला, तर तो अज्ञानातून ज्ञानाकडे, धर्माकडून विज्ञानाकडे, गूढाकडून स्पष्टीकरणाकडे असाच आहे; धर्माचं स्थान कमीकमीच होत गेलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिकतेचा आग्रह धरणाऱ्या उजव्या विचाराला समजून घेणं मला अवघड जातं.
आणखी एक मुद्दा. धार्मिकता आणि माणसाचा आत्मशोध यांच्यात मी फरक करतो. मोठ्याच्या मोठ्या समूहाला घालून दिलेली एक चौकट, माणसांनी ‘रुळावर’ राहावं म्हणून केलेले नियम या आधारे धर्माचं स्पष्टीकरण दिलं जातं. ते अगदीच चुकीचं नाही. माझी अडचण धर्माच्या प्रवासाबद्दल आहे. मी पुण्यासारख्या शहरात राहत असल्याने मला बौद्धिकतेचा आग्रह धरणं शक्य आहे. मागे एकदा मी पाचगणीजवळ एका अगदी लहानशा गावात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. काही बायका सार्वजनिक नळावर धुणी-भांडी करत होत्या. गावात एक मंदिर होतं. गाई-गुरं परत येत होती. त्या क्षणी माझ्या मनात विचार चमकला, ‘इथल्या जीवनाच्या संदर्भात मी माझ्याच देवा-धर्माविषयीच्या दृष्टीकोनाकडे कसं पाहतो? इथल्या माणसाच्या जीवनदृष्टीशी मला जोडून घ्यायचं असेल, तर मला इथे राहावं लागेल. तो जे काम करतो, ते करावं लागेल. इथल्या मंदिरात जावं लागेल. इथल्या पर्यावरणात देव आणि धर्म याला जे ‘डायमेंन्शन’ मिळतं, ते मला इथे राहिलो तरच मिळेल.’ असं असलं, तरी अशाच छोट्या खेड्यात काही शतकांपूर्वी जी कर्मकांडं केली जात होती, त्यांतली बरीचशी आज नाहीशी झालेली दिसतील; आधुनिकतेच्या खुणा दिसतील. मग भौतिक आधुनिकता आत्मसात केली गेली, तशीच वैचारिक आधुनिकता आत्मसात करणं अशक्य आहे, असं मानायचं कारण नाही. त्यामुळे धार्मिकतेचं स्तोम कमी करून आत्मशोध सुरू ठेवणं शक्य आहे.
उजव्या विचारातल्या अपुरेपणाच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचारविश्वावर आज जी टीका-टिप्पणी होते आहे, ती पूर्णपणे मोडीत न काढता त्यावर सुधारकी दृष्टीने (जी पुरोगामी विचारांचीच ठेव आहे) विचार करणंही गरजेचं आहे. संक्रमण काळातही आपण फक्त ‘रॅडिकल जारगन’ वापरतो आहोत का, शॉक व्हॅल्यूपुरतंच लिहीत-बोलत आहोत का हा विचार जरूर व्हावा. आज सार्वजनिक चर्चाविश्वात जे वातावरण दिसतं आहे, ते आश्वासक नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे, ‘पुरोगामित्व’ हीच मुळात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे, ती आपल्या समाजात ‘फिट’ होऊ शकणार नाही अशी समजूत पसरते आहे. ती धोकादायक आहे. दि.के.बेडेकर ‘मानव सान्त आहे’ असं म्हणतात. मानवी बुद्धी, मानवी मन, मानवी कर्तृत्व, मानवी समज या सगळ्याला मर्यादा असते. तिला त्यांनी ‘मानवी सांतत्व’ म्हटलं आहे; पण म्हणून मर्यादेची कक्षाच न विस्तारणं त्यांना मान्य नाही (धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार - दि. के. बेडेकर, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई). पुरोगामी विचार हा भक्कम विचार असेल, त्यात माणसाविषयी आस्था असेल तर या विचाराच्या पुरस्कर्त्यांनी गडबडून न जाता स्वतःच्या मार्गाची पुनर्रचना, नव्या मार्गाची आखणी यांवर भर दिला पाहिजे. दुसरं एक म्हणजे, आज विविध माध्यमांमधून ‘पुरोगामी-प्रतिगामी’, ‘उजवे-डावे’ असे शब्दप्रयोग सरसकट वापरून ध्रुवीकरण केलं जात असल्याने अनेक सूक्ष्मभेद (nuances) लक्षातच घेतले जात नाहीत; आणि हा गुंता सोडवायची मोठी जबाबदारी आजच्या अभ्यासक-विचारवंतांवर आहे. अनेक कळीच्या प्रश्नांवर देशभर कार्यरत असणारे पुरोगामी कार्यकर्ते माध्यमचर्चांमध्ये दुर्लक्षित राहतात आणि ‘पुरोगामी लोक’ म्हणून सरसकट टीकाटिप्पणी सुरू राहते. लोकशाही व्यवस्थेतल्या सुधारणेच्या जागा, निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणेच्या जागा, विकेंद्रीकरण, नैसर्गिक साधन-संपत्तीवरचा अधिकार अशा मूलभूत मुद्द्यांवर फारशा प्रभावीपणे चर्चा होत नाहीत. देव, धर्म असलं कुठलंही अधिष्ठान नसताना लोकांनी शासनव्यवस्थेच्या मूल्यमापनाच्या पद्धती विकसित करणं, स्वतःच्या प्रश्नांकरता, प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांकरता एकत्र येणं मला महत्त्वाचं वाटतं. समूहाने एकत्र येऊन समूहापुढचे प्रश्न सोडवणं; स्वशासनासारख्या दीर्घ पल्ल्याच्या, अवघड, पण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे समूहाच्या उन्नतीचं लक्षण आहे; आणि समूहाच्या चर्चेत ‘स्वशासनच’ नाही, तर इतर अनेक मुद्दे येऊ शकतात. यात स्त्री-पुरुष-संबंध येतील; नैतिकता म्हणजे काय, समता म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय हे मुद्दे येतील; व्यक्तिस्वातंत्र्य आणि समूहजीवनातली अपरिहार्यता यांची सांगड कशी घालायची हा मुद्दा येईल... अनेक मुद्दे येतील. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांपेक्षा अशी चर्चा, वैचारिक घुसळण (मतभेदांसह) आज हवी आहे.
२०१६मधल्या राजकीय-सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांबाबत भाष्य होतच राहील. ते व्हावंच. माझ्यासाठी हे वर्ष माझा आंतरिक प्रवास अधिक वेगाने सुरू होण्याचं वर्ष होतं. ‘ज्ञान अमर्याद आहे, जाणीव प्रवाही आहे आणि त्यामुळे आपण कायमच प्रवासात असणार आहोत’, हे या वर्षातलं माझं मुख्य शिक्षण होतं!
लेखक 'आंदोलन' व 'आजचा सुधारक' या मासिकांसाठी संपादन सहायक म्हणून कार्यरत असून व्यवसायाने मराठी व इंग्लिश कॉपीरायटर आहेत.
utpalvb@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment