अजूनकाही
औरंगाबादचे नवे खासदार ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील हे मूळचे पत्रकार. एनडीटीव्हीसाठी ते काम करायचे. ते पत्रकारिता करत असताना प्रस्तुत लेखिकाही औरंगाबादमध्ये पत्रकारिता करत होती. नंतर जलील कामानिमित्त पुण्याला गेले, तर लेखिका मुंबईला. त्यानंतर बराच काळ त्यांचा काही संपर्क नव्हता. काही दिवसांपूर्वी औरंगाबादला गेल्यावर लेखिकनं आपल्या या जुन्या मित्राची मुद्दाम भेट घेतली. तेव्हा त्यांना काय जाणवलं? खासदारकीचा डामाडौल? की लोकांसाठी काम करणारा तळमळीचा खासदार? सर्वसाधारण आमदार, खासदार यांचं वागणं, बोलणं जगणं आणि जलील यांचं वागणं, बोलणं, जगणं यात त्यांना कमालीचा फरक जाणवला. त्यांच्या त्या भेटीची हकिकत...
.............................................................................................................................................
इम्तियाज फोन उचलेल की नाही याबद्दल मला शंका होती, पण तरी फोन लावला. तिसऱ्या रिंगला त्यानं फोन उचलला. म्हणाला – ‘हां बोल’. मी म्हटलं, ‘औरंगाबादला आलेय काल, उद्या मुंबईला जाणार. तू आहेस का, घरी येऊन भेटेन’. ‘अरे, आजा ना तू कभी भी आ.’ त्याचं उत्तर. संध्याकाळी भेटायचं ठरवून मी फोन ठेवला.
इम्तियाज म्हणजे, इम्तियाज जलील. औरंगाबादचा नवा खासदार. आमची मैत्री फार जुनी आहे. आम्ही दोघांनी १९९९च्या सुमारास बातमीदारी सुरू केली. तो ‘झी २४ तास’ आणि मी ‘ईटीव्ही’ या वाहिन्यांसाठी काम करायचो. या दोनच वाहिन्यांचे बातमीदार शहरात होते, बाकी सगळे वर्तमानपत्रांचे वार्ताहर. त्यामुळे लवकरच मैत्री झाली. पुढे तो पुण्याला शिफ्ट झाला, तर मी मुंबईला. अधूनमधून बोलणं व्हायचं, कधीतरी कोणत्या शूटच्या निमित्तानं भेटही व्हायची. पण गेली दहा वर्षं तसा संपर्क कमी झाला.
अचानक इम्तियाजनं एमआयएम या पक्षात प्रवेश केला. बघता बघता तो आमदार झाला. कदाचित त्याला पक्षात घेताना ओवैसी बंधूंनाही त्याला इतकं यश मिळेल याची खात्री नसावी.
एमआयएमची मला झालेली ओळख गंमतशीर आहे. निझामी राजवटीशी लढलेले माझे आजोबा बातम्या फार बारकाईनं बघायचे. त्यात कधीतरी लोकसभेत भाषण करणारे ओवैसी सिनिअर (सलाहुद्दीन ओवैसी) दिसायचे. मग आजोबा मला म्हणायचे, ‘भक्ता, हा माणूस फार अधिकप्रसंगी आहे. फार आगाऊ आहे.’ यापेक्षा अधिक तीव्र भाषेत बोलण्याचा आजोबांचा स्वभाव नव्हता. आजोबा आणि त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी हैदराबाद संस्थानाच्या राजवटीत रझाकारांचे अत्याचार सहन केले. त्यांच्या विरोधात लढा दिला.
एमआयएम किंवा मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन ही संघटना निझामाची खाजगी फौज बनली. पुढे भारत सरकारने पोलीस अॅक्शन या नावानं ओळखल्या गेलेल्या कारवाईतून हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन केलं. रझाकार पकडले गेले आणि कासिम रिझवी दहा वर्षांसाठी तुरुंगात गेला, आणि नंतर पाकिस्तानात.
एमआयएम मात्र टिकली, इतकंच नाही तर पुढे राजकीय पक्ष बनली. या पक्षाचे सर्वेसर्वा सलाहुद्दीन ओवैसी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून सलग निवडून येत, आता त्यांचा मुलगा असद्दुद्दीन ओवैसी खासदार आहे. ज्या पक्षाचा जन्म ‘मुस्लिमांचं वर्चस्व’ हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून झाला आहे, त्या पक्षानं गेल्या काही वर्षांत आपला अजेंडा बदलला आहे. सध्या एमआयएमची भाषा सुधारणावादी आहे. असदुद्दीन यांची लोकसभेतली भाषणं सोशल मीडियावर गाजत आहेत.
असं असलं तरी इम्तियाजसारख्या पत्रकाराला या पक्षात पाय रोवणं सहज शक्य नव्हतं. त्याचे वडील शहरातले जुने जाणते डॉक्टर. घरात वातावरण धार्मिक पण सुधारणावादी. घरी वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांचं येणं-जाणं. घरात शिक्षणाला महत्त्व. इम्तियाजनं पत्रकारितेचं क्षेत्र निवडलं. आधी औरंगाबादला आणि नंतर एनडीटीव्हीसाठी काम करायला तो पुण्याला शिफ्ट झाला. गावी परतला ते थेट राजकारणात उडी घेण्यासाठी. राजकारणी झाल्यानंतर मी त्याला भेटले नव्हते. एक दोन-वेळा फोनवर बोलणं झालं होतं.
मिल कॉर्नर भागातल्या त्याच्या घराचा पत्ता मला थोडा फार आठवत होता. मी अंदाजानं तिकडे गेल्यावर नाक्यावरचा एक माणूस मला जलील कुटुंबाबद्दल माहिती द्यायला लागला, ‘अभी यहां पर इम्तियाज भाई नहीं रहते, वो तो दुसरी जगह पर रहते है. यहां पर उनके मां-बाप रहते है. वैसे आज शायद आए होंगे...वगैरे वगैरे. लहान गावांत लोक फक्त पत्ताच सांगत नाहीत, तर ज्याचा पत्ता विचारला जातो, त्याच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास सांगतात याचा अनुभव असल्यानं मी त्याच्या नव्या घराचा पत्ता विचारला आणि जुन्या औरंगाबादला वळसा घालून दिल्ली गेटच्या पुढे पोचले. आता मला कुठे तरी ‘खासदारांचं निवासस्थान’ असा बोर्ड दिसेल असं वाटलं, पण काहीच दिसलं नाही, शेवटी पुन्हा एकदा पुढच्या नाक्यावर उभ्या असलेल्या एका माणसाला विचारलं आणि त्यानं आधीच्या माणसासारखीच इत्यंभूत माहिती दिली. मी एका बंगल्यासमोर पोचले. तिथंही कुठे मोठा बोर्ड दिसला नाही. घरासमोर ना पोलिसांची गाडी ना कॉन्स्टेबल्स. इतर बंगल्यांसारखा बंगला. पण नावाचा बोर्ड दिसला आणि घराची बेल दाबली.
घराचं दार कुणीच उघडलं नाही. बाजूच्या बोळीतून एक मुलगा पळत आला आणि कुणाला भेटायचं आहे असं विचारलं. त्यानं माझा येण्याचा उद्देश विचारला आणि लगोलग घराचं दार उघडलं गेलं. इम्तियाजच्या पत्नीनं, रूमीनं स्वागत केलं. घराच्या प्रवेश भागातील बैठकीत तिघी-चौघीजणी गप्पा मारत होत्या. समोर एका मोठ्या टीव्ही स्क्रीनवर सीसीटीव्हीचं फीड सुरू होतं. त्याच्यासमोर रांगेत रचून ठेवलेले पुष्पगुच्छ. माझ्यानंतर पाचेक मिनिटांनी तिथं माझे एक जुने स्नेही आणि त्यांचा वकील मुलगा आला. तेही त्याची वाट बघत बसले.
पाचेक मिनिटांत पठाणी वेषातल्या इम्तियाजनं घरात प्रवेश केला. बरोबर पाच-दहा लोक आले होते, पण ते बाहेरच थांबले. (सीसीटीव्हीवर सगळं कळत होतं). थोडा वेळ जुजबी गप्पा झाल्या. बाकी पाहुणे रवाना झाल्यावर जुन्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. टीव्ही न्यूजची दुनिया फार विचित्र आहे. कामाचं व्यसन लावणारी आहे. या कामाचा वीट येतो, पण नशा अशी आहे, की सहजासहजी सोडवणारी नाही. माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक स्त्रियांनी हे क्षेत्र सोडलं आहे, पण पुरुषांचं प्रमाण मात्र कमी आहे. पण इम्तियाजनं पत्रकारितेला रामराम केला. आम्ही नोकरी का सोडली, याबद्दल गप्पा सुरू झाल्यावर तो म्हणाला,“‘एकदा एका राजकीय सभेच्या गर्दीत उभा होतो. अचानक सगळ्याचा उबग आला आणि त्याच क्षणी हे सगळं सोडून द्यायचं ठरवलं.’’
“राजकारणात प्रवेशही अलगद झाला. मोठमोठ्या लोकांचं घरी येणं-जाणं होतंच. ओवैसी कुटुंबाशीही संबंध होते. ताकदवान, धनवान लोकांनी गजबजलेल्या इतर राजकीय पक्षांत प्रवेश करणं सोपं नव्हतं. त्या तुलनेत इथं प्रवेश सोपा झाला. तरी पुढचा मार्ग कसा असेल हे निश्चित नव्हतं. पण बकाल व्यवस्थेला कंटाळलेल्या नागरिकांनी पाठिंबा दिला. आधी विधानसभेवर निवडून दिलं आणि आता लोकसभेवर.” इम्तियाज सांगत होता. राजकारणात करिअर करण्याचा निर्णय घेताना इतक्या कमी काळात इतकं यश मिळेल असा अंदाज त्यालाही नसेल.
धार्मिक दुफळी असलेल्या शहराचं नेतृत्व करणं सोपं नाही. पण इम्तियाजचं म्हणणं वेगळं आहे. तो म्हणतो, “लोकांना भ्रष्टाचार आणि नागरी समस्यांनी ग्रासलं आहे. आणि या समस्यांवर तोडगा सापडणं पक्षीय राजकारणापेक्षा किंवा धार्मिक चर्चांपेक्षा महत्त्वाचं आहे. आपण प्रामाणिकपणे या समस्यांकडे लक्ष दिलं तर ते लोकांपासून लपून राहत नाही. कित्येक वेळा सरकारी कामांसाठी कंत्राट घेणारे लोक येतात आणि राजकारण्यांना लाच दिल्याशिवाय कंत्राट मिळत नाही अशी तक्रार करतात, तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘लाच मागणारा, मग तो कोणत्याही पक्षाचा, अगदी माझ्या पक्षाचाही का असो, मला सांगा. मी पोलिसांत तक्रार देईन.’ या शहराचा विकास खुंटला आहे, आणि जोपर्यंत शिकलेले, चांगली समज असलेले लोक राजकारणात येत नाहीत, तोपर्यंत शहराचा विकास होणार नाही.”
आपल्या वेगळ्या भूमिकांमुळे तो लोकांचे लक्ष वेधून घेतोय. उच्च शिक्षणातल्या राखीव जागांबद्दल त्याचं म्हणणं वेगळं आहे. तो म्हणतो, “राखीव जागा ठेवा पण मग मेरिट स्टुडंट्स किंवा गुणवत्ता सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे यासाठी काही तरी तजवीज करा.”
त्याच्या या भूमिकेला बाकी पक्षांचा विरोध आहे. पण तो म्हणतो, “ज्यांना शिक्षणासाठी अडचणी येतात, त्यांच्यासाठी राखीव जागा असणं महत्त्वाचं आहे. पण त्या विद्यार्थ्यांचा विचार जरूर व्हावा, जे हुशार आहेत, पण त्यांच्याकडे खाजगी कॉलेजात जाण्याइतका पैसा नाही. आपल्या समाजाला चांगले डॉक्टर्स, स्पेशलिस्ट्स हवे आहेत. मग त्यासाठी अशा मुलांची बाजू कोणताही पक्ष का घेत नाही? किती दिवस आपण फक्त मतांसाठी राजकारण करणार आहोत?”
शहराची पाणी आणि कचरा समस्या दूर व्हावी म्हणून कंटाळलेले लोक आता इतक्या वर्षांनंतर वेगळ्या पक्षाचा खासदार झालाय, आता यानं तरी आपल्यासाठी काही तरी काम करावं ही आशा बाळगून आहेत. दुसरीकडे धर्माच्या पलीकडे जाऊन स्वतःची प्रतिमा बनवण्याचा इम्तियाजचा प्रयत्न सुरू आहे. ‘मला तुमचा खासदार म्हणा. मी फक्त मुस्लीम समाजाचा खासदार नाही’, हे तो जिथं संधी मिळेल तिथं सांगतो.
राजकारण महत्त्वाचं आहे, पण समाजकारणही तितकंच महत्त्वाचं आहे, असा त्याच्या बोलण्याचा रोख होता. शेवटी कितीही चांगलं राजकारणी बनण्याचा प्रयत्न केला तरी आजचं राजकारण झेंड्यांचं राजकारण झालं आहे. कोणत्या ना कोणत्या झेंड्याखाली उभं राहणं नेत्यांना भाग आहे. मला झेंड्याचा आडोसा घेणं मान्य नाही, मग तो झेंडा कोणत्याही रंगाचा का असेना. धर्म आणि जातीच्या पुढे जाणारी समाजव्यवस्था अवघडच नाही तर अशक्य आहे ही जाणीव कुठेतरी आहे, पण तरी एक आशा आहे, की पाच-दहा टक्के लोक अशा प्रकारचं राजकारण करतील.
इम्तियाज ज्या पक्षाच्या साहाय्यानं उभा आहे, त्याच्या नावातच धर्म आहे. पण तो म्हणतो, ‘‘मी कुठे आयुष्यभर इथं टिकून राहणार आहे? राजकारण ना माझ्या घरात आहे, ना माझ्या स्वभावात. त्यामुळे माझी कारकीर्द किती काळासाठी आहे, याची मला कल्पना नाही. पण ती चमकदार करणं माझ्या हातात आहे. माझा मतदार ठरावीक आहे, याची मला कल्पना आहे, पण इतर मतदारांच्या भल्यासाठीही काम करणं माझ्या हातात आहे. ते मी करत राहीन. आता हळूहळू लोकांचाही माझ्यावर विश्वास बसतोय. आधी मला भेटायला येणारे बहुतांश मुस्लीम असत, आता सगळ्या जातीधर्माचे लोक येतात.”
माझी निघायची वेळ होते. मी इम्तियाज आणि त्याच्या बायकोचा निरोप घेते. घराबाहेर पडता पडता मी म्हणते, ‘बघ, आपण कुठून कुठे आलो! दोघेही टीव्ही न्यूजच्या बेगडी जगाला कंटाळलो. मी जवळजवळ संन्यासच घेतलाय...”, तो मला थांबवत म्हणतो, “लेकिन भक्ती, मैने कर दिखाया. किसीने सोचा नहीं होगा, मेरे जैसा पत्रकार लीडर बनेगा और वो भी खुद के बलबुतेपर. मैने कर दिखाया”.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment