टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, मुलायम-अखिलेश यादव, अरुण जेटली आणि जयललिता
  • Fri , 30 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi अरुण जेटली Arun Jaitley मुलायमसिंह यादव Mulayam Yadav अखिलेश यादव Akhilesh Yadav जयललिता Jayalalitha

१. नोटाबंदीच्या कठोर निर्णयानंतर निर्माण झालेली आर्थिक दु:स्थिती जवळपास संपुष्टात आल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा. हा दावा करताना त्यांच्या भाषणाचा सूर ‘हत्ती गेले अन शेपूट राहिले’ असा होता.

भले रे शाब्बास, खोटे बोलावे तर ते असे रेटून बोलावे. ‘चहापेक्षा किटली गरम’ यातलाच हा प्रकार आहे. तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी ५० दिवसांचा वायदा केला होता. ते पूर्ण झाले. आजची स्थिती ही ‘शेपूट गेले आणि हत्ती राहिला’ अशी आहे हो!

................................................

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी तालकटोरा स्टेडियममधील टाउन हॉल कार्यक्रमात दुपारी तीन वाजता बोलतील, उद्या सायंकाळी साडेसात किंवा आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करतील आणि येत्या सोमवारी लखनौत होणाऱ्या भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेळाव्यात भाषण करतील. नंतरच्या दोनपैकी एका भाषणात ते अजून एक धमाका करणार असल्याची चर्चा चालू आहे.

मोदी पंतप्रधान आहेत की, भाषणबाज? रोजच्या रोज भाषण ठोकत बसत असतील तर देशाचा कारभार कधी आणि कसा करणार? नाहीतर म्हणा, ‘द मॅन हू किल्ड इंडियन इकॉनॉमी’, हा लौकिक त्यांनी गेल्या पन्नास दिवसांत मिळवलाच आहे. आता नवीन किताब मिळवण्यासाठी नवा धमाका करावा म्हणावा!

................................................

३. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष कितीही टीका करत असले, तरी हा निर्णय देशाचे व्यापक हित लक्षात ठेवूनच घेण्यात आला आहे – नरेंद्र मोदी

अगदी बरोबर आहे!  रांगेत उभे राहून लोक मरावेत, यातही देशहित आहे. शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने त्यांचा भाजीपाल विकावा यातही देशहितच आहे. उद्योगधंद्यांनी कामगारकपात करावी यातही देशहितच आहे. बाजारपेठेतील खरेदी-विक्री मंदावण्यातही देशहितच आहे. उद्या तुम्ही म्हणाल की, तीन वेळा जेवण्याऐवजी लोकांनी एकवेळच जेवावे. कारण त्यातच देशहित आहे.

................................................

४. तामिळनाडू सरकार जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मद्रास उच्च न्यायालयाने खरे कारण शोधून काढण्यासाठी त्यांचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात का येऊ नये असा सवाल उपस्थित केला आहे.

जयललिता याच एक गूढ होत्या, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमध्ये काही गूढ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उगाच नाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीने पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता त्यांचे पार्थिव तपासासाठी बाहेर काढले जाईल आणि ते परत दफन करताना अजून काही लोकांचा मृत्यू होईल.

................................................

५. विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी बुधवारी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री असलेला त्यांचा मुलगा, अखिलेश यांनीही २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यादवांची ही यादवी तशी अपेक्षेनुसारच आहे, त्यात अनपेक्षित असे काही नाही. अखिलेशला पुन्हा सत्तेत यायचे आहे आणि त्याच्या वडलांना त्याला सत्तेतून घालवायचे आहे. त्यामुळे हे असे होणे अटळ आहे.

................................................

६. सरकार भाजपचे किंवा नरेंद्र मोदींचे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढ निश्चय करून सत्तेत आलेले हे लोक ‘सब का साथ, सब का विकास’ ही निव्वळ धूळफेक करीत आहेत. या धर्मभेदी लोकांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा. – समाजवादी नेते भाई वैद्य

भाई, तुमचे सगळे बरोबर आहे. पण तुम्ही इतकी वर्षं बंधुतेचा विचार पुढे नेण्याचे काम करत होतात, त्यापासून समाजाचे किती रक्षण झाले हो? उलट तुम्ही अल्पसंख्य होत गेलात आणि समाज आहे तिथेच राहिला. मोदींच्या राज्यात पहा, समाज कसा पुढे जातोय. मग सरकार कुणाचे का असेना, त्याने काय फरक पडतोय!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......