अजूनकाही
आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या शिक्षकांबद्दल, शिक्षणपद्धतीबद्दल बरंच काही उलटसुलट बोललं जातं. त्यातही ‘पूर्वीसारखे तळमळीचे, सचोटीचे शिक्षक आता राहिले नाहीत’ असे उमाळे-उसासेही मोठ्या प्रमाणावर टाकले जातात. मात्र तालुका, जिल्हा आणि गावपातळीवर आजही अनेक शिक्षक तळमळीने, सचोटीने आपले काम करत असतात. पैठण येथील अशाच एका शिक्षकाची तळमळ, तगमग आणि तडफड आजच्या शिक्षक दिनानिमित्त...
संदीप जगदाळे या तरुण कवीचा नुकताच ‘असो आता चाड’ हा कवितासंग्रह लोकवाङ्मयगृहाच्या वतीने प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत कविता या संग्रहातून घेतली आहे. या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर प्रसिद्ध कादंबरीकार राजन गवस यांनी लिहिलं आहे - “माती, नाती आणि भवताल हे संदीप जगदाळे यांच्या कवितेचं भावविश्व आहे. मातीत जन्मणं, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या प्रवासातील वेदनादायी, दु:खदायक प्रवास म्हणजे ही कविता आहे... या कवितेत प्रतिमाप्रतिकांना जागा नाही. अनुभवालाच प्रतिमाप्रतिकांचं सामर्थ्य प्राप्त करून देण्याची नवी शक्यता या कवीने शोधलेली आहे. त्यामुळे हा कवी पांडित्यप्रचुरतेला फाट्यावर मारतो. शब्दाला काटेफडाच्या बोंडाचं अस्तित्व बहाल करतो. काटेफडाचं बोंड तीक्ष्ण काट्यांनी भरलेलं असतं, पण ते काटे वेगळे करून गराला भिडलं की, अप्रतिम गोडव्याचं आयुर्वेदिक सत्त्व देणारं औषध प्राप्त होतं. अशीच ही कविता आहे.”
.............................................................................................................................................
एवढीच एक गोष्ट आहे माझ्याजवळ
माझ्याजवळ काहीच नाहीय
तुम्हाला देण्यासाठी
मी शिकवू शकत नाही
असा एखादा शब्द
की तो शिकून
तुमच्या ओठावरचं निरागस हसू
शाबूत राहील आयुष्यभर
मी प्रार्थना वदवून घेतो पुन्हापुन्हा
खरा तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे…
तपासतो प्रत्येक शब्दोच्चार
आवाजातला चढउतार
एक दिवस या प्रार्थनेची लय
तुम्ही सोडून देतान
या भीतीनं धादरून जातोय
हिच्यातल्या एका तरी ओळीचा अर्थ
बिलगून राहावा शेवटपर्यंत तुमच्या श्वासांना
याच्यासाठी मी काय करू?
इळनमाळ मरमर करून
पाठ काळीठिक्कर पडलेले आईबाप
त्यांचं सगळ्यात आवडतं फूल
किती आशेनं ठेवून गेलेत माझ्या ओंजळीत
मी धडपडत राहतो
आईबापाची ही पाठ
निदान येऊ नये तुमच्या तरी वाट्याला
पण कधी कधी तुम्ही
असे उभे राहता माझ्यासमोर
अन् माझा जीव तुटत जातो.
एक मुलगा वडील मेलेत मागच्याच वर्षी
तो मागतोय एक दिवसाची सुट्टी
त्याला करायचीय मदत
शहरात गल्लोगल्ली हिंडून बांगड्या विकणाऱ्या आईला
माझ्याजवळ नाहीय कुठलीच जडीबुटी
जी वाचवू शकेल त्याच्या कोवळ्या हातांना
हे ओझं उचलण्यापासून
नुसतीच उदास बसलीय पोरगी
बिनरंगवलेल्या चित्राकडं बघत
मी खिशातून दहा रुपये काढतो
तिला देतो
रंगखडू विकत घेण्यासाठी
पण जेव्हा सरत जाईल हळूहळू
तिच्या नजरेतील चमक
तेव्हा हे दहा रुपये
काहीच कामात येणार नाहीत
चारी बाजूंनी आत शिरणाऱ्या धुरानं
दिवसेंदिवस अंधूक दिसत जातील
फळ्यावर स्पष्ट लिहिलेली अक्षरं
काजळी वाढत जाईल
ती पुसण्यासाठी
माझे हात आखूड पडतील
मी हतबल होईन
तरी तडफडत राहीन
ही अवदसा थोपवण्यासाठी
माझ्या लेकरांनो
कितीही ठेचकाळलात, वावटळीत गुरफटलात
तरी मी सोबत दिलेली
प्रार्थनेची ओळ
जीवतोड धरून ठेवा
एवढीच एक गोष्ट आहे माझ्याजवळ
तुम्हाला देण्यासाठी
.............................................................................................................................................
लेखक संदीप जगदाळे हे तरुण कवी व कथाकार आहेत.
sandipjagdale2786@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment