बाबरी मसजिद आणि रामजन्मभूमी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जमीन वादाचा निकाल महिन्याभरात येण्याची अपेक्षा आहे. बाबर आणि त्याचा इतिहास या प्रकरणाशी संबधित आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा इतिहास चर्चिला जाणार आहे. त्यानिमित्ताने बाबर आणि बाबरी मसजिदच्या अनुषंगाने ही पाच लेखांची मालिका. त्यातील हा तिसरा लेख... पुढचा लेख येत्या गुरुवारी प्रकाशित होईल.
.............................................................................................................................................
‘बाबरनामा’मधील भारताविषयीचं लिखाण, त्यातील निरीक्षणं, निसर्गाची आणि जीवनाची वर्णनं बाबरच्या परहितसहिष्णू विचारांना अधोरेखित करतात. सामान्य शेतकऱ्यांविषयी बाबरला प्रचंड आस्था वाटे. कृषिपद्धती, सिंचनातील बदल, वातावरणानुसार होणारा पिकांमधला बदल यांची बाबरनं अत्यंत बारकाईनं माहिती घेतली होती. मुळात फिरस्ता असणारा बाबर कृषिविषयक निरनिराळ्या प्रदेशातला अनुभव शेतकऱ्यांना सांगायचा. शेतकऱ्यांनी नव्या पद्धती स्वीकाराव्यात. उत्पादन वाढवावं म्हणून तो नेहमी प्रयत्नशील राहिला. त्याने अफगाणिस्तानात बियाणं वाटण्याचा उद्योगही करून पाहिला. मात्र त्यातून राज्याच्या महसुली उत्पन्नात वाढ झाली नाही. अथवा कोणता सकारात्मक परिणामही झाला नाही. त्याचा हा प्रयोग काहीसा अपयशी ठरला. कृषी सुधारणेत त्याला प्रचंड रस होता. लष्करी मोहिमांवर असतानाही त्याने याकडे दुर्लक्ष केलं नाही.
पूर्व आणि पश्चिमेच्या अभियानात व्यस्त असतानाही बाबरने केलेल्या कृषी सुधारणेची माहिती राधेश्याम यांनी दिली आहे. ते लिहितात, ‘‘बाबरने काबुलला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. या राज्याचे वार्षिक महसुली उत्पन्न वाढावे म्हणून त्याने प्रयत्न केले. याच हेतूने कृषी क्षेत्रात काही सुधारणादेखील केल्या. काही नव्या पिकांच्या उत्पादनाला सुरुवात केली. तुमानमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात आहे. तेथे त्याने काही बागा लावल्या. फळांच्या या बागा सुखरुद आणि अदीनापुर किल्याच्या दरम्यान लावल्या होत्या. त्या ‘बाग-ए-वफा’ या नावाने विख्यात होत्या. लाहौर आणि दिपालपूर जिंकल्यानंतर बाबरने तेथे उसाची शेती केली. केळीची बाग लावली. उसाची शेती इतकी उत्तम होती की, अधिकाधिक साखर तयार करून बुखारा आणि बंदख्शा येथे पाठवली जायची.’’१
कृषी सुधारणेमागे त्याचा हेतू महसुली उत्पन्नातील वाढीपुरता मर्यादित नव्हता. त्याला सामान्य शेतकऱ्याच्या जगण्याचीदेखील काळजी होती. त्याने शेतकऱ्यांवर अवाजवी बोजा लादला नाही. एकदा फरगण्याच्या बहुतांश प्रदेशावर शत्रूंनी हल्ले केले. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट बनली. तेव्हा शेतकऱ्यांकडून कर गोळा करणे त्याने टाळले होते. ‘बाबरनामा’मध्ये त्याविषयी तो लिहितो, ‘‘या ठिकाणच्या (दुर्दैवी) लोकांकडून काय वसूल करावे?’’२
बाबर हा मूळचा सुफी परंपरेतला. त्याची नक्शबंदी पंथावर निष्ठा होती. सुफींच्या औदार्याचे विचार त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसत होते. अब्दुल कुद्दुस गंगोही हे त्यावेळेसचे प्रख्यात सुफी होते. त्यांच्याविषयी बाबरला प्रचंड आदर वाटायचा. त्यांनी बाबरला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे.३ त्यामध्ये ते बाबरला म्हणतात, ‘‘प्रार्थना आहे की, सर्व सर्वसन्मानित सम्राटाच्या काळात सर्व काही योग्य आणि सन्मार्गाने घडत आहे. विद्वान, संत, उलेमा आणि असहाय्य लोकाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे. त्यांना ‘मदद-ए-मआश’ (महसूल मुक्त जमीन) द्यावी. त्यांच्याकडून ‘उश’ (महसूल) वसुल करू नये. कारण अशा प्रकारचा कर अत्यंत घृणित आणि अन्यायी आहे. संताकडून काहीही मागणे विवेकाच्या विरोधी आहे. गरिबांकडून सरकारी कर वसूल करून आणणे योग्य नाही. हे शरियतचे उल्लंघन आहे. त्याच्या वसुलीने जगात घोर अंधकार फैलावेल. निर्धन आणि शोषित लोक आक्रोष करायला लागतील. एखाद्या खाईत कोसळण्यासारखे हे कार्य असेल. अनुकंपा दाखवून ते माफ केले जावे.’’
याच पत्रात गंगोही यांनी बाबरला कोणावरही अत्याचार न करण्याची सूचना दिली आहे आणि बाबरनेदेखील या पत्रातल्या सूचना मान्य केल्याचे दिसते. त्याने गरिबांना छळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने त्याच्या सहकाऱ्यांना आणि सैनिकांनादेखील प्रचंड औदार्याने वागवले. त्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्यात सुधारणा घडवण्याकडे त्याचा कल होता. त्याने सहकाऱ्यांची मदत घेतली. त्यांना आपल्यापासून त्याने कधीही दूर लोटले नाही. औदार्य हा बाबरच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा घटक होता.
बाबरच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात माहिती देताना राधेश्याम यांनी त्याला अधोरेखित केले आहे. ते लिहितात, ‘‘त्याच्या ममत्वाने आणि मृदू स्वभावाने अनुयायी आणि समर्थकांमध्ये आत्मबळ निर्माण केले होते. मृदुलता आणि कठोरता यांचा मोठ्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्त्वात समावेश होता. त्यामुळेच लोक त्याच्या आज्ञांचे सुलभतेने पालन करत.’’४ आपल्यानंतर मोगलसत्ता याच पद्धतीनं चालावी यासाठी त्याने प्रयत्न केले. आपल्या मुलांना त्यानं त्या पद्धतीनं उपदेश करणारी पत्रं लिहिली. कामरान आणि हुमायुन यांना लिहिलेल्या पत्रातून त्याची मोगल सत्तेविषयीची संकल्पना त्यानं मांडली आहे.
कामरानला लिहिलेलं पत्र
बाबरने आपल्या मुलांना अनेक पत्रं लिहिली. त्यातील हुमायुनला लिहिलेली दोन्ही पत्रं त्याने ‘बाबरनामा’मध्ये नमूद केली आहेत. इतिहासाच्या अभ्यासकांकडून त्याविषयी खूप चर्चा केली जाते. मात्र बाबरने त्याच्या दुसऱ्या मुलाला लिहिलेल्या पत्राची इतिहाससंशोधक बेवरीज यांच्याव्यतिरित इतर अभ्यासकांनी दखल घेतली नाही. बेवरीज यांनी या पत्रावर एक शोधनिबंध लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी मूळ पत्र दिलं आहे. कामरानला लिहिलेल्या त्या पत्रात५ बाबर म्हणतो, ‘‘हे पहा, तू चांगल्या मार्गापासून कधीही भटकू नये. आणि तुझ्या बुद्धीत ख्वाजा हाफीज यांचे हे शब्द सतत स्मरले जावेत. ‘वृद्ध पुरुष अनुभवाच्या गोष्टी सांगतात.’ हो, हेच मी माझ्या मुला तुला सांगतोय. या बुजुर्गाचे मार्गदर्शन ऐक. तू कधीही तरुणवर्गातील लोकांच्या सूचना सहजतेने ऐकू नकोस. त्यांना राजकार्य देऊ नकोस. तू सदैव वृद्ध, अनुभवी, उदार आणि निष्ठावान तथा सत्यवादी बेग जे तथ्यांची पडताळणी चांगल्या पद्धतीने करतात. त्यांच्या इच्छा आणि सूचनांप्रमाणे कार्य करावे. तू त्या लोकांच्या भूमिकांच्या पुढे जाऊ नयेस, जे लोक हुशार, मृदुभाषी आणि तर्क करण्यात कुशल आहेत. कधीही चापलूस आणि कपटी लोकांच्या भुलथापांमध्ये अडकू नकोस.’’
हुमायुनला लिहिलेल्या वसिहतनाम्याच्या बरोबरीचे हे पत्र आहे. पण कामरान हा हुमायुंऐवजी सत्तेत आला नाही. म्हणून त्याला लिहिलेल्या या पत्राची चर्चा इतिहासात हुमायुंच्या वसिहतनाम्याप्रमाणे होऊ शकली नाही. आणि हुमायुंला लिहिलेला वसिहतनामादेखील या पत्रापेक्षा विस्तृत आहे.
हुमायुनला बाबरने लिहिलेला ‘वसिहतनामा’
‘वसिहतनामा’मध्ये बाबरने भारताविषयी त्यानं मांडलेल्या मतांचं सार आहे. एकात्मता, धार्मिक सहिष्णुता वगैरे मूल्यांचा उल्लेख बाबरने त्यात केला आहे. त्यामुळे बाबरचा ‘वसिहतनामा’ मुळातून अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानं लिहिलेला वसिहतनामा६
‘‘हे पुत्र, या भारत देशात विभिन्न संप्रदाय विद्यमान आहेत. ईश्वरला धन्यवाद. त्याच्या इश्वरी कृपेने हे (राज्य) तुला मिळाले आहे. तू तुझ्या हृदयाला सांप्रदायिक पक्षपातापासून मुक्त ठेवावे. प्रत्येक संप्रदायाशी योग्य न्याय करावा. विशेषतः गोहत्येपासून तू दूर राहायला हवे. यामुळे तू हिंदुस्तानातील प्रजेची मने जिंकू शकशील. प्रजा अथवा जनता शाही शुभ व्यवहारामुळे राज्याशी जोडली जाईल. कोणत्याही धर्माच्या जे शासनाच्या अधिपत्याखाली आहेत, मंदिरांना आणि प्रार्थनागृहांना उद्ध्वस्त करू नकोस. न्याय अशा पद्धतीने कर की, प्रजा राजामुळे आणि राजा प्रजेमुळे आनंदी राहतील. इस्लामची प्रगती अत्याचाराच्या तलवारीऐवजी सहिष्णुतेच्या तलवारीने करणे अधिक हितकर आहे. आणि शिया–सुन्नींच्या पारंपरिक भांडणाकडे लक्ष देऊ नकोस. कारण त्या इस्लामच्या शाखा आहेत. विभिन्न संप्रदायांना मानणाऱ्या प्रजेचे चार तत्त्वांद्वारे संघटन करावे, जेणेकरून राज्य त्याच्या शरीराच्या व्याधींपासुन सुरक्षित राहिल. आदरणीय अमीर तैमुर साहेबांचे शासन आपल्या नजरेसमोर ठेवावे. त्यामुळे शासनकार्य योग्य होईल.’’
बाबरच्या धार्मिक दृष्टीचा, त्याच्यावर असलेल्या सुफी परंपरेच्या आणि त्याच्या धार्मिक धोरणाचा बऱ्यापैकी परिचय या ‘वसिहतनामा’तून होतो.
बाबर आणि धर्म
बाबरला उदार सुफी विचारधारा त्याचा पिता शेख उमरकडून वारश्यात मिळाली होती. शेख उमर हा ख्वाजा बहाउद्दीनच्या नक्शबंदी परंपरेला मानणारा होता. ही परंपरा सत्ता आणि राजकारणाला अध्यात्मातून वर्ज्य करत नाही. त्याउलट सत्तेच्या माध्यमातून मानवकल्याणाच्या उद्देशाला महत्त्व देते. बाबरच्या पित्याने हयातभर या नक्शबंदी परंपरेची निष्ठेने सेवा केली. त्याच्यानंतर बाबरने ही परंपरा पुढे चालवली. उदार आणि सहिष्णु दृष्टीने सत्ता राबवली. त्याच्या धार्मिक दृष्टिकोनाची माहिती देताना राधेश्याम लिहितात,७‘‘बाबरने आपल्या पुर्वजांकडून उदार धार्मिक दृष्टिकोन घेतला होता. आपल्या पुर्वजांप्रमाणे त्याला महान इश्वराच्या शक्तीवर विश्वास होता.’’
बाबर कधीही धर्माच्या तत्त्वांना चिकटून बसला नाही. धर्मतत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी त्याने बळाचाही वापर केला नाही. उलट त्याने स्वतः धर्मनिष्ठाही बदलत ठेवल्या. राजकीय परिस्थितीनुसार या धर्मनिष्ठांमध्ये त्याने लवचीकता आणली होती. परिस्थिती पूर्णतः विरोधात गेल्यानंतर त्याने इराणच्या शाहची मदत घेतली. शाहच्या मर्जीप्रमाणे त्याने स्वतःला शिया पंथात परावर्तीत केले. आपल्या नाण्यांवर शिया धर्ममतांची मूल्ये लिहून घेतली. समरकंदची सत्ता हातातून जाऊ नये म्हणून त्याने शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामध्ये धार्मिक मतांमधल्या परिवर्तनाचाही समावेश होता. पण त्याच्या या सर्व प्रयत्नांपश्चातही समरकंद त्याला वाचवता आले नाही. तेव्हा तो पुन्हा त्याच्या पूर्वजांच्या मूळ धर्मात परतला. पण त्याने शिया पंथीयांविरोधात सूड उगवला नाही.
भारतात आल्यानंतरही त्याचा हा उदार धार्मिक दृष्टिकोन कायम होता. पानिपतच्या युद्धातही त्याने अनेक सुफींशी संपर्क केला. त्यांच्या सान्निध्यात राहण्यात त्याला मोठा गर्व वाटे. त्यांच्याकडून तो नेहमी मार्गदर्शन घेत असे. अनेक हिंदू सरदारांची त्याने पानिपतमध्ये मदत घेतली. हिंदूंच्या मदतीवरच त्याला भारतात पाऊल ठेवता आले. त्यामुळे पानिपतच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर त्याने भारताची माहिती घेतली. तिथल्या समाजजीवनासह धर्मव्यवस्था समजून घेतली. हिंदूंच्या मदतीशिवाय आपण या देशावर राज्य करू शकत नाही, याची त्याला जाणीव होती. म्हणून तो नेहमी हिंदू धर्ममतावलंबी सहकाऱ्यांशी आणि प्रजेशी सहिष्णूतेने वागत आला. त्याने अनेक मंदिरांना भेटी दिल्या. पण अपवाद वगळता मंदिरांना पाडण्याचे आदेश दिले नाहीत.
राधेश्याम म्हणतात, ‘‘हिंदू राजा, जमीनदार, जहागिरदारांनी आणि स्थानिक आधिकाऱ्यांनी त्याची मदत केली. मध्युयगातील धर्मांध विजेत्यांप्रमाणे त्याने हिंदूंना मुसलमान बनवण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि हिंदू संत तथा योगींवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध लादले नाहीत, अथवा त्यांना मृत्युच्या खाईतही लोटले नाही. ना त्याने असे आदेश दिले, ज्यामुळे त्याच्या धार्मिक विचारात असहिष्णुतेचा अंश सापडतो. त्याच्या शासनकाळात हिंदू संत एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्वतंत्रतापूर्वक भ्रमण करू शकत होते. पंजाबवर त्याचे पूर्ण रूपात अधिपत्त्य होते. गुरुनानकांना आपल्या उपदेशांचा प्रचार करण्याची स्वतंत्रता होती.’’८
मंदिरांबाबतीतही त्याचे हेच धोरण होते. त्याने मंदिरांना लुटले नाही अथवा त्यावर धार्मिक प्रत्याक्रमण केले नाही. मात्र त्याच्या काळात काही मंदिरांचा विध्वंस झाला, हे वास्तव आहे. यापैकी दोन ठिकाणची मंदिरे त्याच्या सरदारांनी पाडली आहेत. त्या सरदारांना बाबरने मंदिरांना तोडण्याचे आदेश दिले नव्हते. त्यामुळे त्या मंदिरांच्या विध्वंसाची जबाबदारी बाबरवर लादता येणार नाही. मात्र उरवाच्या मूर्ती स्वतः बाबरने तोडल्या होत्या. त्या मोडतोडीची माहिती स्वतः बाबरने ‘बाबरनामा’मध्ये दिली आहे. तो लिहितो, ‘‘उरवाच्या तिन्ही बाजूला मोठ्या डोंगररांगा आहेत. या डोंगरावर लोकांनी मूर्ती कोरल्या आहेत. लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या मूर्ती आहेत. एक मोठी मूर्ती जी दक्षिणेच्या बाजूला आहे. २० गज उंच असेल. ही मूर्ती पूर्णतः नग्न आहे. आणि गुप्तअंग देखील झाकलेले नाहीत. नग्न मूर्तीच या ठिकाणाचा मोठा दोष आहे. मी त्याला नष्ट करण्याचा आदेश दिला.’’९
बाबरने उरवाच्या डोंगरावरील मूर्ती नष्ट करण्यासाठी दिलेला आदेश हा धर्मद्वेषावर आधारीत नव्हता. त्याच्या मागे मूर्तीविरोधी प्रेरणाही नव्हत्या. नग्नतेचा एक दोष त्या मूर्तीमध्ये होता. त्यामुळे मी त्या हटवल्याचे त्याचे म्हणणे त्याने स्पष्टपणे ‘बाबरनामा’मध्ये मांडले आहे. बाबरने पानिपत जिंकल्यानंतर अनेक मंदिरे पाहिली. ज्या कुतूहलाने बाबरने भारताच्या विविध प्रदेशाची, वातावरणाची माहिती बाबरनाम्यात दिली आहे. त्याच कुतूहलाने त्याने मंदिरे पाहिल्यानंतर लिहिले आहे.
त्यामुळे बाबरवर मंदिरांच्या विध्वंसाचा अथवा धर्मांधतेचा आरोप लावता येणार नाही. मात्र बाबरच्या काही अधिकाऱ्यांनी मंदिरे तोडल्याचे वास्तव आपण नाकारू शकत नाही. तरीही मंदिर तोडल्याच्या या एक-दोन घटना वगळता बाबरची राजवट अत्यंत सहिष्णू होती. त्याच्या धार्मिक दृष्टीकोनातही संकुचितता नव्हती. त्याने कोणत्याही प्रसंगात अमानवीयता दाखवल्याचेही आढळत नाही.
बाबरी मसजिदीच्या प्रकरणावरून त्याच्यावर अनेकदा धर्मांधतेचा आरोप लावला जातो. पण त्या बाबरी मसजिदीशीही बाबरचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. त्याच्या अधिकाऱ्यांनी बाबरला न कळवता, स्वतःहून घेतलेल्या अशा पद्धतीच्या निर्णयासाठी बाबरला जबाबदार धरता येणार नाही.
बाबर मध्ययुगीन राज्यकर्त्यांच्या तुलनेत सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता होता. त्याने धर्माला राज्य राबवताना खूप कमी स्थान दिले. त्याच्या धार्मिक निष्ठा त्याने राजकारणावर लादल्या नाहीत. राधेश्याम त्याच्या व्यक्तित्वाची प्रशंसा करताना लिहितात, ‘‘…तर बाबरचे व्यक्तित्व असे होते. जरी आज तो नसला तरी त्याचे प्रेरणा देणारे कार्य, त्याचे साहसी जीवन, सैनिकी यश, उत्तम चरित्र, आणि साहित्यिक प्रेरणा, इतिहासाच्या पानांवर सदैवर त्याचे नाव अंकित करत राहतील.’’ १०
.............................................................................................................................................
या मालिकेतील आधीच्या लेखांसाठी पहा -
१) बाबर जसा होता, तसा कधी मांडला गेला नाही. बाबर जसा हवा, तसा मात्र मांडला गेला!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3574
२) बाबरच्या ‘बाबरनामा’मधून दिसणारा भारत नेमका कसा आहे?
https://www.aksharnama.com/client/article_detail/3589
.............................................................................................................................................
संदर्भ
१) राधेश्याम, बाबर, पृष्ठ क्र. ३८३,३८४, पटना, १९८७
२) अ) कित्ता, पृष्ठ क्र. ३७४, ब) सय्यद अतहर अब्बास रिजवी, मुगलकालीन भारत, बाबरनामा, पृष्ठ क्र. ८६
३) मक्तुतात ए अब्दुल कुद्दुस गंगोही, हस्तलिखित प्रत क्र. १०४, विद्यापीठ संग्रह, मौलाना आझाद लायब्ररी अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगड
४) राधेश्याम, पुर्वोक्त, पृष्ठ, क्र. ४१९
५) एच. बेवरीज, शोधनिबंध, ‘ए लेटर ऑफ दि एम्परर बाबर टू हिज सन कामरान’, जनरल ऑफ एशियाटीक सोसायटी ऑफ बंगाल, (न्यु सिरिज), १९१०
६) अ) शाह, नासिरखाँ, बाबर, पृष्ठ क्र. ३००, अलिगड, १९५५ ब) राधेश्याम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ४६७
७) राधेश्याम, पुवोक्त, पृष्ठ क्र. ४२९
८) कित्ता, पृष्ठ क्र. ४३९
९) सय्यद अतहर अब्बास रिजवी, पुवोक्त, बाबरनामा, पृष्ठ, क्र. ६१२
१०) राधेश्याम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ४६६
.............................................................................................................................................
लेखक सरफराज अहमद हे टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आणि गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूरचे सदस्य आहेत.
sarfraj.ars@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 11 September 2019
सरफराज अहमद, बाबर जर एव्हढा उदार होता तर अफगाण लोकं त्याला आपला का मानंत नाहीत? त्याने काबूल सुधारायचा प्रयत्न केला तरीही स्थानिक अफगाण त्याला शत्रू का समजतात? कारण उघड आहे. बाबर तुर्क आहे. तो एखाद्या तुर्काला साजेसं वागला. म्हणजे गरज पडेल तेव्हा इस्लामचा अंगीकार केला. वारा येईल तशी पाठ फिरवली. याउलट पख्तून लोकं एकदा घेतलेल्या शपथेशी एकनिष्ठ असतात. इस्लाम म्हणजे बाबरासाठी गाजराची पुंगी होती. शिया तर शिया, सुन्नी तर सुन्नी, सूफी तर सूफी, प्रत्येक पुंगी वाजवून पाहिली. तो फक्त राजकीय दृष्ट्या फायद्याचा पंथ स्वीकारीत होता. गरज पडली तेव्हा इस्लामिक स्वर्गात जागा राखून ठेवण्यासाठी म्हणून जणू राममंदिर बाटवलेलं दिसतंय. इस्लामचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करण्याची पद्धत होतीच त्या काळी तुर्क व मंगोल लोकांमध्ये. मग तुम्ही त्याची एव्हढी भलामण कशासाठी करताय, असा प्रश्न पडतो. बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना? लगीन हाय लोकाचं अन नाचतंय येड्या भोकाचं, असं काही आपलं होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगायला हवी ना? बाकी, तुर्क आणि इस्लाम हे मिश्रण भारताला भयंकर घातक ठरलं आहे. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. या धर्तीवर आधीच तुर्क त्यात इस्लाम सेविला. कसली सीमा उरली, मग त्याच्या क्रौर्याला ! आपला नम्र, -गामा पैलवान