अजूनकाही
आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी घडवताना खरं तर शिक्षक स्वतःलाही घडवत असतो. त्या दृष्टीनं आजन्म विद्यार्थी असणं ही खऱ्या शिक्षकाची ओळख असते. काळाबरोबर होणारे बदल टिपत त्यानं भविष्यात येऊ घातलेल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जुळवून घ्यायला हवं. तरच शिक्षक म्हणून तो अधिक सक्षमपणे उत्तम काम करू शकेल. त्यानिमित्तानं एका शिक्षकानं मांडलेली भूमिका…
...............................................................................................................................................................
माणसाचे सर्व प्राणीमात्रांत असलेले वेगळेपण म्हणजे त्याची विचारशक्ती व ज्ञान संपादनाची इच्छा! शिक्षण हे केवळ चार भिंतीतच मिळते असं नाही. कारण अनौपचारिक शिक्षणाचे धडे व्यक्ती जन्माला आल्यापासून मिळत असतात. चांगलं, सुदृढ आणि संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या प्रक्रियेत केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसं नाही, तर जीवनासाठी लागणारी कौशल्यं व व्यवहारोपयोगी ज्ञान मिळवणं अपरिहार्य आहे. आचार-विचारांचं शिक्षण देत सुदृढ आणि संपन्न नागरिक घडवणं, ही महत्त्वाची जबाबदारी अंतिमतः शिक्षकांवरच येते.
विद्यार्थीकेंद्री अध्यापन गरजेचं
शिक्षण प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल काळानुरूप होत गेले. त्यामुळे आज केवळ माहिती देणं, पुस्तक शिकवणं, परीक्षा घेणं आणि मूल्यमापन करणं एवढीच जबाबदारी आता शिक्षकांची राहिलेली नाही. मूळ ज्ञानस्त्रोतापर्यंत विद्यार्थ्यांना जो घेऊन जातो, तोच ‘खरा शिक्षक’ अशी अपेक्षा आता शिक्षकांकडून आहे. समकालीन वास्तव समजून घेत प्रश्नांची ओळख करून देत योग्य किंवा अयोग्य काय, याची शहानिशा करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा शिक्षकच भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे.
मिळणारी माहिती-ज्ञान तपासून घेतले पाहिजे, त्याबद्दलची जाणीव अध्ययन-अध्यापनातून करून दिली पाहिजे आणि अर्थातच त्यासाठी स्वतः शिक्षक या प्रक्रियेमध्ये सक्रिय असला पाहिजे. ज्ञानसागरात केवळ डुबकी मारून आता चालणार नाही, तर त्याच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिक्षकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आपल्या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थीच असायला हवा. दुर्दैवानं मात्र आज वस्तुस्थिती तशी नाही. शिक्षणबाह्य अनेक गोष्टींमुळे नवे, जटील प्रश्न निर्माण झाले आहेत.
सजगता अधिक महत्त्वाची
काळानुसार शिक्षण प्रक्रिया बदलत गेली. या प्रक्रियेतील विद्यार्थीही आता काळाबरोबर बदलला आहे. वर्गातलं प्रत्येक मूल हे आपापल्या क्षमतेनुसार शिकत असतं. मात्र त्याच्या मनात बिया टाकण्याचं, त्यापासून उगवलेल्या रोपाचं संगोपन करण्याचं महत्त्वपूर्ण काम शिक्षकाला करावं लागतं. विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याची प्रेरणा निर्माण करणं, आवड जोपासणं आणि या शिकण्यातली मजा घेत आनंद देणं, हे आजच्या शिक्षकाचं महत्त्वाचं काम आहे, असं वाटतं. त्यामुळे ‘शिकणं आणि शिकवणं’ या प्रक्रियेबद्दल शिक्षकालाच अधिक आस्था असणं गरजेचं आहे.
वर्गात विद्यार्थी सक्रिय कसे राहतील, त्यांच्यातील नकारात्मक भावना दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोनातून ते जीवनाकडे कसे पाहतील, या दृष्टीनं प्रयत्न करणं, ही आजच्या शिक्षकाची मुख्य जबाबदारी ठरते. आपली वर्तवणूक व सहभागातून शिक्षकाला ‘ये हृदयीचे ते हृदयी’, या भूमिकेतून अध्यापन कार्य करता आलं पाहिजे. त्यासाठी अध्ययन - अध्यापनात नवे, पूरक बदल शिक्षकाला करावे लागतील. नाहीतर ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून’ या म्हणीप्रमाणे शिक्षकाची अवस्था होईल. म्हणून शिक्षकानं सतत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे.
आज ई-माध्यमांचा जमाना आहे. या काळात येणाऱ्या नव्या बदलांचा शोध घेत शिक्षकानं ‘डिजिटल टीचर’ होणं जास्त उपयुक्त ठरेल. नव्या शिक्षणप्रक्रियेमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासाला महत्त्व प्राप्त होतंय. त्यामुळे विद्यार्थी एकाच वेळी भाषा, गणित, सामाजिक शास्त्रं आणि संगीत विषय घेऊन ज्या वेळी शिकू पाहतोय, त्यावेळी शिक्षकांनाही त्याच्याबरोबर अष्टावधानी व अष्टपैलू व्हावं लागेल.
शिक्षक म्हणून जबाबदारी
आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे पुरेसं नाही, कारण ती माहिती तर आज एका क्लिकवर त्यांना सहज उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती संकलनापुढे जाऊन माहितीचं सूक्ष्म वाचन कसं करावं, त्याचं विश्लेषण करून नेमकं काय घ्यावं आणि ते कुठे आणि कसं वापरावं? याबद्दलचा साधक-बाधक विचार विद्यार्थ्यांना देणं, ही आधुनिक शिक्षकाची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. या पद्धतीनं जो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवेल, तोच आजचा सक्षम शिक्षक ठरणार आहे. त्यामुळे काळाबरोबर नवी आव्हानं पेलत शिक्षकांनाही आता ‘सजग’ होणं गरजेचं आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ‘शिक्षक डिलीट’ होणार नाही, याची काळजी त्याने स्वतः घ्यायला हवी. कितीही साधनं उपलब्ध असली तरी जे ध्येय साध्य करायचं आहे, त्यासाठी शिक्षकच केंद्र ठरणार आहे. त्यामुळे आपली गरज व स्वतंत्र जागा आधुनिक शिक्षणव्यवस्थेत निर्माण करणं, हे शिक्षकापुढील आव्हान आहे, असं वाटतं.
तरच ज्ञानाचं सामाजीकरण होईल
आजचा काळ हा डिजिटल तंत्रज्ञानाचा काळ आहे. शिक्षणक्षेत्रात नव्यानं होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांना अध्यापन कार्याबरोबरच डिजिटल स्वरूपाचं शैक्षणिक लेखन करावं लागेल. ई कन्टेंटचा वापर करून आपलं वर्गाध्यापन अधिक आनंददायी बनवता येईल. ज्ञान-माहितीचं संक्रमण नव्या पिढीत करताना सूक्ष्म वाचनातून त्याचं वर्गीकरण, विश्लेषण झालं तर ज्ञानाचं सामाजिकीकरण होईल. समोर असणारा प्रत्येक विद्यार्थी हा विचार, बुद्धी, ज्ञान व क्षमता याबाबतीत वेगळा असणार आहे, याची जाणीव ठेवून अध्यापन कार्यात ‘विद्यार्थी फोकस’ करता आला पाहिजे.
शिक्षकाला विद्यार्थ्यांबरोबर समाज व समाजपरिस्थितीही वाचता येणं आवश्यक आहे. कारण समाजाचं ‘चरित्र’ घडवण्याचं काम शिक्षकच करत असतात. आजूबाजूला कितीही आव्हानात्मक परिस्थिती असली तरी ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ असं न म्हणता नवे प्रकाश किरण दाखवण्याचं महत्त्वपूर्ण कार्यही शिक्षकालाच करावं लागेल, हे निश्चित.
सावध ऐका पुढल्या हाका
आजचा काळ अत्यंत वेगानं बदलतो आहे. शिक्षण क्षेत्रात होणारे अमूलाग्र बदल, येणाऱ्या नव- नव्या संकल्पना या दृष्टीनं शिक्षकाला स्वतःही बदलावं लागेल. सारं काही आलबेल आहे, असं न मानता काळाची गरज लक्षात घेऊन आपल्या अध्ययन-अध्यापन कार्यात नवे बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरजही आहेच. ‘मळलेल्या वाटा आपल्याला अधोगतीला नेत नाहीत, हे खरं; तेवढंच त्या कधीच पुढचा नवा विकास, मार्गही दाखवत नाहीत, हेही खरं. त्यामुळे उत्तम शिक्षकाला स्वतःची वेगळी वाट शोधावी लागेल.
विद्यार्थी घडवताना खरं तर शिक्षक स्वतःलाही घडवत असतो. त्या दृष्टीनं आजन्म विद्यार्थी असणं ही खऱ्या शिक्षकाची ओळख असते. काळाबरोबर होणारे बदल टिपत त्यानं भविष्यात येऊ घातलेल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जुळवून घ्यायला हवं. तरच शिक्षक म्हणून तो अधिक सक्षमपणे उत्तम काम करू शकेल.
नवी आव्हानं
ज्ञान प्रक्रिया ही अखंड चालणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यात एकदा संपादन केलेलं ज्ञान हे अंतिम किंवा परिपूर्ण असू शकत नाही. ज्ञान म्हणजे केवळ माहिती संकलन नव्हे. विचारांना सक्षम पद्धतीनं आत्मसात करून त्याचा विनियोग सकारात्मक दृष्टिकोनातून करणं म्हणजे ज्ञान होय. माहितीचं ओझं कमी करून अधिक ‘आनंददायी व सहज शिक्षण’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षकांवर येते. काळाबरोबर येणारी नवी आव्हाने पेलताना त्यांच्याकडे केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिल्यास त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत छान उपयोग करून घेता येईल. ‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा’ ही भूमिका इथं दिशादर्शक ठरेल. मरगळ झटकून कायम नावीन्यपूर्णतेचा ध्यास असणं अधिक महत्त्वाचं. ध्यास, आत्मविश्वास, कयास आणि अभ्यास ही चतुःसूत्री शिक्षक म्हणून आम्हाला आत्मसात करायला हवी. तरच नव्या शिक्षकाला नवा ‘शिक्षक दिन’ साजरा केल्याचं समाधान मिळेल!
...............................................................................................................................................................
गांधीबाबा हा तर जगाचा शिक्षक. त्याच्याविषयीचं हे नुकतंच प्रकाशित झालेलं उत्तम पुस्तक.
लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi
...............................................................................................................................................................
लेखक बी. एम. नन्नवरे खोपोलीच्या के.एम. सी.महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.
bmnannaware363
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Mahesh Khanvilkar
Fri , 13 September 2019
प्रा. नन्नावरे, लेख खुपच छान अप्रतिम आसा आहे. आनंदायी शिक्षणा ची जबाबदारी नक्कीच शिक्षकांची आहे. डॉ. खानविलकर महेश.
Gamma Pailvan
Wed , 11 September 2019
प्राध्यापक ननावरे, लेख पटला. अननुभवी विद्यार्थ्यांना शिकावं कसं हे दाखवून देणारा अनुभवसंपन्न विद्यार्थी म्हणजे शिक्षक. माझ्या मते ही शिक्षकाची खरी व्याख्या आहे. आपला नम्र, -गामा पैलवान