सय्यदभाई : अस्सल कार्यकर्ता, उत्कृष्ट संघटक
पडघम - सांस्कृतिक
सुभाष वारे
  • सय्यदभाई
  • Wed , 04 September 2019
  • पडघम सांस्कृतिक सय्यदभाई Sayyadbhai दगडावरची पेरणी Dagdavarchi Perni चतुरंग प्रतिष्ठान Chaturang Pratishthan हमीद दलवाई Hamid Dalwai मुस्लीम सत्यशोधक मंडळ Muslim Satyashodhak Mandal जुबानी तलाक ट्रिपल तलाक तिहेरी तलाक Triple talaq

मुस्लीम तलाक पीडित महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या सय्यदभाई यांना नुकताच ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कामाची धुरा त्यांच्या पश्चात सय्यदभाई यांनी निरंतरपणे वाहिली. अशा या मुस्लीम तलाक पीडित महिलांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटलेल्या आणि त्यासाठी समाजापासून सरकारपर्यंत निकराने लढणाऱ्या सय्यदभाईंचे ‘दगडावरची पेरणी’ हे कार्यकथन (आत्मकथन नव्हे ‘कार्यकथन’च!) जून २००९मध्ये अक्षर मानव प्रकाशन (पुणे)तर्फे प्रकाशित झाले आहे. सय्यदभाईंविषयीचा हा एक लेख...

.............................................................................................................................................

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’च्या सय्यदभाईंची आणि माझी ओळख साधारण पंचवीस वर्षांपूर्वी कोल्हापूरला तलाकपीडित महिलांच्या मेळाव्यात झाली. एखाद्या कमांडोला शोभेल अशी भरदार आणि उंचीपुरी शरीरयष्टी. केसही तसेच बारीक कापलेले. शालेय शिक्षण उर्दूतून झाल्याने त्याचा परिणाम मराठी बोलण्यावर स्पष्टपणे जाणवणारा. हे सय्यदभाई सतत आपला मुद्दा कुणाला तरी पटवून देताना दिसायचे. त्या परिषदेत मुस्लीम समाजाबद्दल, त्याच्या धार्मिक समजुतींबद्दल, मुस्लीम महिलांबद्दल, जुबानी तलाकबद्दल आणि शरियतचा कायदा मुस्लीम महिलांसाठी एकतर्फी व अन्यायकारक कसा आहे, याबद्दलच चर्चा झडत होत्या. राकट शरीरयष्टीचे सय्यदभाई मुस्लीम महिलांवरील अन्यायाबद्दल बोलताना एकदम हळवे होऊन जात. समोरच्याला पोटतिडकीने आपला मुद्दा समजावून देताना त्यांच्यात एखाद्या अस्सल प्रबोधनकाराचा संचार होत असे. आजही समाजाचे प्रबोधन महत्त्वाचे असे सतत म्हणणारे सय्यदभाई ‘प्रबोधन’ या शब्दाचा उच्चार ‘परबोधन’ असा करतात, तेव्हा उच्चारापेक्षाही त्या शब्दामागच्या त्यांच्या तळमळीकडेच ऐकणाऱ्याचे जास्त लक्ष जाते.

हैदराबादमध्ये जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या सय्यदभाईंचे बालपण तसे कष्टातच गेले. जेमतेम उर्दू शाळेच्या चौथीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सय्यदभाईंना पाच रुपये शालेय फी भरता येत नाही म्हणून शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शिक्षण पूर्ण करण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. परंतु प्रत्येक वेळी गरिबी आडवी आली. शिक्षण सोडून देऊन घरच्या फाटक्या संसाराला हातभार लावण्यासाठी लहानपणापासूनच कष्टाची व श्रमाची कामे करावी लागलेले सय्यदभाई सार्वजनिक जीवनात मात्र आयुष्यभर समाजशिक्षकाची भूमिका जगत आले आहेत.

सय्यदभाई लहानपणी सच्चे धार्मिक मुसलमान होते. पंचनमाजी मुसलमान होते. समाजात शांतता आणि सुबत्ता नांदायची असेल तर इस्लामशिवाय तरणोपाय नाही असे मानणारे होते. या त्यांच्या श्रद्धेला तरुणपणीच तडा गेला तो त्यांच्या खतिजाला – खतिजाआपाच्या – तलाकच्या प्रकरणामुळे. दोन मुले पदरी असलेल्या खतिजाला जेव्हा तिच्या नवऱ्याने जुबानी तलाक देऊन वाऱ्यावर सोडून दिले, तेव्हा मुळापासून हादरलेल्या सय्यदभाईंनी खतिजाच्या नवऱ्याची – अब्दुलची – विनवणी केली. समाजातील शहाण्यासुरत्या माणसांना साकडे घातले. इस्लामचा व शरियतचा अर्थ सांगणाऱ्या मुल्ला-मौलवींचे पाय धरले. प्रत्येक ठिकाणी त्यांना इस्लामी कायद्याचा आणि शरियतचा वास्ता देऊन अब्दुल खतिजाला एकतर्फी सोडून देऊ शकतो आणि स्वत:च्या मर्जीनुसार दुसरे लग्नही करू शकतो, हे ऐकावे लागले. या प्रत्येक ठिकाणी सय्यदभाईंनी बंडखोरपणे जेव्हा ‘शरियतचा कायदा मुस्लीम महिलांबाबत इतका एकतर्फी व अन्यायकारक कसा?’ असा प्रश्न विचारला, तेव्हा ‘तुम अभी बच्चे हो’ असे उत्तर देऊन त्यांना गप्प बसवले गेले. एका मौलवीने त्यांची समजूत घालताना ‘तुम्हारी बहनने जुल्मा सहा है, तो मरने के बाद उसे जन्नत मिलेगी’ असे अस्सल आध्यात्मिक उत्तर देताच इदवाद वगैरे शब्दही ज्यांच्या कानावर आजवर पडले नव्हते असे सय्यदभाई उसळून म्हणाले, “लेकिन आज मेरी बहन दोजख (नरक) में है उसका क्या?”

स्वत:च्या बहिणीचा संसार वाचवण्यात अपयशी ठरलेल्या सय्यदभाईंनी पुढे तिला स्वत:च्या पायावर उभे केले. तिला आणि तिच्या मुलांना सन्मानाने जगण्याची हिंमत दिली. हे झाले एखाद्या सामान्य भावासारखे वागणे, पण सय्यदभाई इथेच थांबले नाहीत. एकतर्फी जुबानी तलाकच्या बळी ठरलेल्या सर्वच मुस्लीम भगिनींना न्याय मिळाला पाहिजे, या एकाच ध्यासाने ते मग झपाटले गेले आणि ‘मुस्लीम समाजाचे प्रबोधन’ हे त्यांनी त्यांच्या आयुष्याचे मिशन मानले.

सय्यदभाई २० वर्षे आपल्या परीने या मुद्द्यांना पुढे रेटण्यासाठी झटत राहिले. पण त्यांच्या या कार्याला खरी गती आली ती १९७०नंतर जेव्हा त्यांना हमीद दलवाईसारखा नेता आणि भाई वैद्य, बाबा आढावासारखे मार्गदर्शक मिळाले तेव्हा. २२ मार्च १९७० रोजी राष्ट्र सेवा दलाच्या सहकार्याने ‘साधना’ साप्ताहिकाच्या सभागृहात ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना झाली. म. फुलेंच्या सत्यशोधक परंपरेचा वारसा मुस्लीम समाजात रुजवण्यासाठी सुरू झालेल्या या कामासाठी सय्यदभाईंनी स्वत:ला झोकून दिले. तलाक मुक्ती मोर्चा, तलाकपीडित महिला परिषद अशा कार्यक्रमांचे आयोजन करतानाच या अन्यायग्रस्त महिलांना घेऊन सय्यदभाईंनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनापर्यंत मजल मारली. हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखाली ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’च्या प्रत्येक आंदोलनाचा, अभिमानाचा भार सय्यदभाईंनी आपल्या खांद्यावर वाहिला. हा प्रवास जितका किचकट तितकाच धोकादायक. कर्मठ मुस्लिमांनी समाज प्रबोधनाला केवळ विरोधच केला असे नाही, तर अनेक वेळा कार्यकर्त्यांवर शारिरीक हल्लेही केले. या सगळ्या हल्ल्यांना पुरून उरत सय्यदभाईंचे काम आजही सुरू आहे.

सय्यदभाई विचारवंत नाहीत. ते स्वत:ला नेतेही मानत नाहीत. परंतु सय्यदभाई अस्सल कायकर्ता आहेत, उत्कृष्ट संघटक आहेत. मध्य प्रदेशमधील भोपाळच्या शाहबानो यांना भारतीय दंड संहितेच्या १२४च्या कलमानुसार पोटगी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्या देशभर चर्चेचा आणि मुस्लीम धार्मिक पुढाऱ्यांच्या तीव्र विरोधाचा विषय झाल्या. अशा शाहबानोंना पुण्यात आणून त्यांची सभा आयोजित करण्यासाठी सय्यदभाई ज्या पद्धतीने भोपाळला गेले, शाहबानोच्या नातेवाईकांना पटवून त्यांना पुण्यात आणले आणि प्रचंड विरोधाचा सामना करत त्यांच्या मुखातून एकतर्फी जुबानी तलाकचा मुद्दा जगासमोर आणताना सय्यदभाई यांचा धाडसी स्वभाव आणि त्यांच्यातला उत्कृष्ट संघटक दोन्हींचे दर्शन होते.

सय्यदभाईंचे काम सभा-संमेलन-परिषदा आणि धरणे-मोर्चे-आंदोलनातून जितके पुढे गेले, त्याहीपेक्षा त्यांनी स्वत: अनेक तलाकपीडित महिलांचे आणि अन्यायग्रस्त कुटुंबीयांचे प्रश्न सोडवून पुढे नेले आहे. सय्यदभाईंच्या वैचारिक विरोधकांनीही अनेक वेळा स्वत:च्या बहिणीच्या, मुलीच्या तलाकचा प्रश्न सोडवण्यासाठी सय्यदभाईंची मदत घेतली आहे. प्रश्नाशी बांधीलकी असल्याने सय्यदभाई त्यांना मदत करतात, पण त्यांच्या दुटप्पी वागण्याचा त्यांना फार राग येतो. असाच राग त्यांना येतो समाजातील मान्यवरांच्या ढोंगीपणाचा. समाजात व्यासपीठावरून इस्लाम आणि समतेचा, इस्लाम आणि मानवतेचा, इस्लाम आणि नीतीमत्तेचा जयघोष करणारे अनेक महाभाग खाजगी जीवनात जेव्हा पुरुषी अरेरावीने वागतात, लबाड्या करतात, दोन दोन लग्ने करतात, अशांविषयी सय्यदभाई जेव्हा संतापून बोलतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याची नसननस फुलून येते. असा संताप व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. कारण समतावादी, मानवतावादी मूल्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी पुरेपूर जपली आहेत. सय्यदभाईंचे वैयक्तिक जीवन जितके संघर्षमय, लढाऊ तितकेच पारदर्शी आणि नैतिक आहे.

समाजातील अन्यायाच्या विरोधात प्रत्यक्षात जमिनीवरचा संघर्ष आणि तोही समोरासमोर करताना सय्यदभाईंचा बेडरपणा आणि अशिक्षित शहाणपणातून मिळालेले युक्तिवादाचे सामर्थ्य अनेक प्रसंगांत कामी आलेले आहे.

रफी सय्यद नावाचे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते अतिसंवेदनशील स्वभावामुळे आणि आजूबाजूच्या बिघडलेल्या वातावरणामुळे मानसिक संतुलन गमावून बसले आणि त्यांनी जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या दफनासाठी कबर खोदली गेली. परंतु काही कडव्या धर्मांध विरोधकांनी आत्महत्या करणाऱ्या मुसलमानाचा दफनविधी होऊ शकत नाही, असा पवित्रा इस्लामचा दाखला देऊन घेतला. त्या वेळी सय्यदभाईंनी दफनभूमी गाठली. सवाल-जवाब झाले. सय्यदभाईंनी तडक प्रश्न विचारला, “अब इस खोदी हुई कबर का क्या करोगे? इसे अब मय्यत की आस लगी है. इसे ऐसेही बुझा नहीं सकते. इसमें किसी को तो दफनानाही होगा.” सय्यदभाईंचा हा अवतार बघून विरोधकांनी माघार घेतली. त्यामुळे रफी सय्यद यांचा दफनविधी होऊ शकला. सय्यदभाईंनी आपल्या आयुष्यात अशी अनेक अवघड प्रकरणे मार्गी लावली आहेत. त्याच्या चीड आणणाऱ्या आणि सय्यदभाईंच्या धडपडीची साक्ष देणाऱ्या कहाण्या त्यांच्याच ‘दगडावरची पेरणी’ या पुस्तकात वाचायला मिळतात.

मुस्लीम समाजातील प्रबोधनाचे सय्यदभाईंचे मिशन अजूनही संपलेले नाही. वयाच्या ७५व्या वर्षीही अखंडपणे ते सुरू आहे. या प्रवासात कौतुकाचे क्षण कमी आणि उपेक्षेचे आणि अवहेलनेचे क्षण अधिक वाट्याला आले. आज एका एका जातीपुरत्या, एका एका भाषेपुरत्या, एका एका धर्मापुरत्या संघटना बांधून, खोट्या अस्मितांना चेतवत, दांभिकपणाला बढावा देत हजारोंनी माणसे जमवण्याचा धंदा जोरात सुरू आहे. द्वेष आणि हिंसेवर आधारित राजकारणात एकदा का हजारो माणसे तुमच्या पाठीशी आली की, तुम्ही मीडियाचे लाडके बनता. त्यातून स्वार्थी राजकारणाचा धंदा आणखी जोरात चालतो, अशा वातावरणात आपल्यासोबत किती लोक आहेत? आपण अल्पमतात आहोत याची फारशी फिकीर न करता आपल्या सदसदविवेकबुद्धीला साक्षी मानून जी बाब अंतिमत: समाजाच्या हिताची आहे तिच्या पूर्ततेसाठी आपले आयुष्य पणाला लावायची साधना सोपी नाही. सय्यदभाईंसारखी माणसे अशी साधना करतात. त्यातूनच उद्याच्या समाजात समतेचे आणि मानवतेचे धुमारे फुटण्याची शक्यता शाबूत राहते.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ हे मुस्लीम समाजातील विषमतावादी आणि उघडपणे शोषणाला बढावा देणाऱ्या परंपरांविरुद्ध काम करते. पुरोगामी वर्तुळात असा एक समज आहे की, ज्याने त्याने आपापल्या धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्द बोलावे-लिहावे. ज्यामुळे धार्मिक तणाव वाढणार नाहीत. परंतु अशा सुट्या सुट्या कामांमुळे बऱ्याचदा धर्मांध व कट्टर मंडळींचे फावते. उदाहरणार्थ ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ जेव्हा मुस्लीम कट्टर मानसिकतेबद्दल किंवा समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांबद्दल काही मांडणी करते, तेव्हा याच मांडणीचा उपयोग बऱ्याचदा हिंदुत्ववादी मंडळी आपल्या समर्थनार्थ आणि मुस्लीम द्वेष पसरवण्यासाठी करते असा अनुभव आहे. याच्या उलटही अनेक वेळा वैदिक ब्राह्मणी धर्मावरील टीकेचा उपयोग मुस्लीम धर्मांधांकडून आमचेच खरे असे म्हणण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे सर्व धर्मांतील पुरोगामी मंडळींनी एकत्रितपणे सर्वच धर्मांतील विषमतावादी आणि शोषण वाढवणाऱ्या प्रश्नांच्या विरोधात बोलले पाहिजे आणि स्वत:चे समतावादी, संवेदनशील, समंजस समाजनिर्मितीचे सकारात्मक स्वप्नही एकत्रितपणे सर्व समाजासमोर आणले पाहिजे. याचा उपयोग सर्वत्र समाजात पुरोगामी विचार वेगाने रुजायला होऊ शकतो.

आज मुस्लीम समाज बेरोजगारी, गरिबीच्या प्रश्नाशी झुंजत आहे. मुस्लिमेतरांच्या आणि म्हणूनच प्रशासनाच्या मनात मुस्लिमाबद्दल जो मोठ्या प्रमाणावर संशय व अविश्वास आहे, त्याचाही जाच मुस्लीम समाज सहन करतो आहे. अशा वेळी केवळ प्रबोधनाचा मुद्दा घेऊन या समाजात काम करणाऱ्यांना पुरेसे समर्थन मिळेल का? केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या गोष्टींचा निषेध करणाऱ्यांचे समाज ऐकून घेईल का? समाजाच्या भूकेचा प्रश्न, रोजीरोटीचा प्रश्न, अस्तित्वाचा प्रश्न मांडत, सोडवण्याची दिशा दाखवत, यातून संघटनेबद्दल समाजात विश्वासाची भावना निर्माण करत मग प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला तर लोक कदाचित अधिक ऐकून घेण्याच्या स्थितीत असतील.

सय्यदभाई आणि ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ने या दिशेने विचार केला तर कट्टर मुस्लिमांच्या बरोबरही संवादाच्या अनेक शक्यता शिल्लक आहेत, हे लक्षात येईल!

(‘कर्ती माणसं’ या पुस्तकातून साभार)

.............................................................................................................................................

सय्यदभाईंसह मोहन हिराबाई हिरालाल, वाहरू सोनवणे, तिस्ता सेटलवाड, पोपटराव पवार, विलास भोंगाडे, आनंद पटवर्धन, उल्का महाजन, दत्ता इस्वलकर, विवेक माँटेरो, रेहाना बैलिम, सुरेखा दळवी, अर्जुन कोकाटे इत्यादी महाराष्ट्रातील २३ सामाजिक कार्यकर्त्यांविषयीचे लेख असलेल्या ‘कर्ती माणसं’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5077/Karti-Manasa

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......