मुस्लीम तलाक पीडित महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या सय्यदभाई यांना नुकताच ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कामाची धुरा त्यांच्या पश्चात सय्यदभाई यांनी निरंतरपणे वाहिली. सय्यदभाई यांचं ‘दगडावरची पेरणी’ हे कार्यकथन जून २००९मध्ये अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकाला २०११ साली ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा विशेष ग्रंथ पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी फाउंडेशनच्या स्मरणिकेसाठी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश… लेखकांनी व संपादकांनी या लेखात काही तात्कालिक संदर्भांच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
.............................................................................................................................................
सय्यद मेहबूब शहा काद्री वल्द सय्यद गौस शहा काद्री असे मोठे नाव असणारी व्यक्ती म्हणजेच आपले सर्वांचे ‘सय्यदभाई’. सय्यदभाई यांचा जन्म ६ एप्रिल १९३६ रोजी हैद्राबाद येथे झाला. आई व विधवा मावशी नबाबाच्या घरी स्वंयपाकिणीची, मोलकरणीची कामं करून अकरा माणसांचा प्रपंच दहा बाय दहाच्या घरात सांभाळत. पुढे वडिलांना पुण्यात ब्रिटिश सैन्यातील गोऱ्या अधिकाऱ्याकडे बंगल्यावर काम मिळाले आणि सय्यदभाई वयाच्या चौथ्या वर्षी म्हणजे १९४० मध्ये पुण्याला आले. आर्थिक स्थिती बिकट असतानाही शिस्त, प्रामाणिकपणा, श्रम करण्याची जिद्द आणि पुढे जाण्याची चिकाटी यांचे संस्कार घरातच झाले. शिक्षण घेण्याची इच्छा, अभ्यासातील हुशारी असतानाही परिस्थितीमुळे दिवसा चालणारी उर्दू शाळा गेली, फी देण्यासाठी पाच रुपये नाहीत म्हणून रात्रशाळा सोडावी लागली. याच काळात भारताची फाळणी झाली. सख्खा भाऊ आणि नातेवाईक ‘आम्ही परत येऊ’ म्हणून पाकिस्तानात गेले व जन्माची ताटातूट झाली.
सय्यदभाईंना आयुष्यभराची प्रेरणा देणाऱ्या प्रमुख तीन घटना आहेत. त्यांतील पहिली घटना - बालवयात कामाच्या शोधात फिरताना पडेल ते काम करण्याची मानसिक तयारी ठेवून वयाच्या तेराव्या वर्षी भारत पेन्सिल कारखान्यात गेले, तेथे तात्या मराठेंशी गाठ पडली. त्यांनी छोट्या मेहबूबची अडचण ओळखून कामावर घेतले. तेव्हा तात्यांनी जवळ केले ते कायमचेच. १९६५ मध्ये कारखाना आर्थिक संकटात सापडला, तेव्हा बऱ्याच कामगारांनी काम सोडले, पण अडचणीच्या वेळी हात देणाऱ्या तात्यांची साथ सय्यदभाईंनी सोडली नाही. मराठे व सय्यदभाईंनी परिश्रम घेऊन कारखाना पुन्हा फायद्यात आणला. कारखान्याला नवा लौकिक मिळवून दिला. नंतर तात्यांनी कारखान्याची एकेक जबाबदारी सय्यदभाईंवर सोपवली. तात्यांच्या निधनानंतर त्यांच्या या मानसपुत्राने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वहिनींना म्हणजेच कमलताई मराठेंना कोणतीही चिंता भासू दिली नाही.
परंतु या कारखान्याच्या जागेचा करार संपल्यामुळे, पुणे-मुंबई रस्त्यावरील घर व कारखाना सोडून कोंढव्यात नव्या जागेत त्यांनी कारखाना सुरू केला. या कोंढव्याच्या कारखान्यात सय्यदभाई बसतात त्या खुर्चीमागे एकमेव फोटो आहे तो तात्या मराठेंचा! धर्मनिरपेक्षतेचे, मानवतेचे संस्कार सय्यदभाईंच्या आयुष्यातील प्रेरणा आहेत.
सय्यदभाईंच्या तरुणवयात घडलेली दुसरी घटना म्हणजे त्यांची सख्खी बहीण खतिजा यांचा तलाक. कारण नसताना दिलेला तलाक, तो आक्रोश, त्यातून निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न. पाच वेळा नमाज अदा करणाऱ्या, ‘शोहर आधा खुदा होता है’ अशी श्रद्धा बाळगणाऱ्या बहिणीला घराबाहेर का काढले गेले? तिचा गुन्हा काय? याची उत्तरे शोधण्यासाठी मुल्ला-मौलवी-इमाम-वकील यांच्याकडे ते गेले, परंतु या प्रश्नांना उत्तरे मिळत होती ती - ‘यही अल्लाहतआला की मर्जी होगी तो कोई कुछ नहीं कर सकता, रह इस्लामका मामला है, तुम अभी बच्चे हो, तुम नहीं समझोगे।’ या प्रेरणेतूनच त्यांनी आपले आयुष्य म्हणजेच ‘जिहाद-ए-तलाक’ केले.
सय्यदभाईंच्या जीवनाला कलाटणी देणारी तिसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे हमीद दलवाई यांची ओळख. हमीद दलवाई हेच आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील असा विश्वास व दलवाई यांच्या सहवासातून तयार झालेली कार्यकर्ता म्हणून जडणघडण, मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापना काळात आणि स्थापनेनंतर हमीद दलवाई यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सय्यदभाईंवर पडलाच. शिवाय मुस्लीम समाजातील विचारवंत, नेते, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना होणारे वादविवाद, संघर्ष, तडजोडी, सहिष्णुता या सर्व घटनांतून सय्यदभाई यांचे अनुभवविश्व विस्तारले.
अनेक कारणांनी पारंपरिक शिक्षणापासून वंचित राहाव्या लागलेल्या सय्यदभाईंना बिनभिंतीच्या शाळेतून बरेच शिकता आले. त्यांनी उर्दू, मराठी साहित्य वाचले, वर्तमानपत्रांतून लेखनही केले. सय्यदभाईंना उर्दू, मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तमिळ, गुजराती, मारवाडी अशा अनेक भाषा येतात. त्यांची ही भाषिक, व्यावसायिक, वैचारिक क्षमता पाहून कोणी त्यांच्या शिक्षणाबद्दल विचारलं तर ते ‘माझं शिक्षण एम.एस.एम. आहे’ असं सांगत. ते स्वत:च पुढे विचारतात, ‘एम.एस.एम.’चा अर्थ माहीत आहे का? अर्थात नकारार्थी उत्तर ऐकून ते सांगतात, ‘एम.एस.एम. म्हणजे मुस्लीम सत्यशोधक मंडळ.’ विनोद करून इतरांना हसवत ठेवणे हा त्यांच्या स्वभावाचाच भाग आहे.
शाळेत असताना स्काऊटच्या संस्कारामुळे, सैन्याच्या कॉलनीत राहात असल्यामुळे त्यांना लहानपणी लष्करात जाण्याची इच्छा होती. नौदलात जाण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. परंतु वजन कमी असल्यामुळे नकार मिळाला. त्यामुळे जिद्दीने त्यांनी व्यायाम केला, वेटलिफ्टिंग करून शरीर कमावले. पुढे कारखान्यातच रमल्यामुळे लष्कर भरतीचा विचार बाजूला पडला. सामाजिक कार्य करताना अनेकांना ते पोलीस खात्यातील अधिकारी वाटत. त्यामुळे लोक त्यांना घाबरत. रास्ता पेठेतील मुस्लीम महिला मदत केंद्रात येणाऱ्या केसेस हाताळतानाही त्यांच्या शारीरिक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत असे. अनेक वेळा स्कूटरवरून जाताना रस्त्यात वाहतूक कोंडी झाली असल्यास स्कूटर बाजूला लावून वाहतूक सुरळीत करत.
लहानपणी रेडिओवरची गाणी ऐकताना मुकेश-रफी-लता मंगेशकर यांची गाणी त्यांनी पाठ केली. या गाण्यांचा ते सराव करत राहिले. सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेअगोदर ते ‘एम. सय्यद अँड पार्टी’ या नावाने ऑर्केस्ट्रा करत. त्यात तबला, पेटी, व्हायोलिन, जे हाताला लागेल ते सय्यदभाई वाजवत. पाच-सहा वर्षे या पार्टीने पुण्यात गणेशोत्सवादरम्यान धमाल उडवून दिली. एकदा एका मैफिलीमध्ये त्यांनी गायलेल्या ‘मन तडपत हरीदर्शन को आज...’ या गाण्यास नऊ वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला होता. तेव्हा आम्हा कार्यकर्त्यांच्या वैचारिक शिबिरातही त्यांनी अनेक वेळा ‘सारंगा तेरी याद में... नैन हुए बेचैन....’ हे गाणे आणि गझला ऐकवल्या आहेत.
नक्कल करणे, विनोद सांगणे, किस्से ऐकवणे हे त्यांना मनापासून आवडतं. तसंच ऐकणाऱ्यांनाही ती एक मैफलच वाटे. परंतु हमीद दलवाई यांना जसे समाजसुधारणेचे काम हाती घेतल्यानंतर आपल्यातील सृजनशील साहित्यिकाला बाजूला ठेवावे लागले, तसेच सय्यदभाईंनासुद्धा आपल्या आत असणाऱ्या कलाकाराला बाजूला ठेवावे लागले. वैयक्तिक आनंद देणाऱ्या आपल्या छंदाचा, आवडीचा त्याग करून इतरांचे जीवन सुखी करणाऱ्या सामाजिक समस्यांना त्यांनी वाहून घेतले.
सय्यदभाईंच्या कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यात मनापासून खंबीरपणे उभे राहण्याचे काम त्यांच्या पत्नी अख्तरभाभींनी केले आहे. एखादी अन्यायग्रस्त महिला तिचे कुटुंबीय, कार्यकर्ते, कोणीही घरी आले की त्यांचे स्वागत करून, त्यांच्याशी संवाद करणे, विचारपूस करणे, चहापाणी करणे या गोष्टी नेहमीच्याच असत. परंतु एखाद्या अडचणीत सापडलेल्याला आपल्या घरी ठेवून आधार देण्याचा, दिलासा देण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न त्या करत. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी अडचणींच्या काळात आपल्या घरी ठेवून मदत केली. मंडळामार्फत काढण्यात येणारे मोर्चे, मेळावे, परिषदांमध्ये त्या जमेल तसे आवर्जून उपस्थित राहत. मुस्लीम समाजातील दाम्पत्याला मुस्लीम व्यक्तिगत कायद्यानुसार मूल दत्तक घेता येत नाही. मूल दत्तक घेण्याची कायद्याने तरतूद असावी यासाठी अख्तरभाभीच्या नावाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी दाखल केलेल्या या याचिकेसंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. मूल दत्तक घेण्याची समाजाला कायदेशीर तरतूद असावी त्याबद्दलची खंत सय्यदभाईंच्या मनात अजूनही आहे. नंतर मात्र ऐच्छिक स्वरूपात भारतीयांसाठी हा कायदा २००७ मध्ये करण्यात आला आहे.
सय्यदभाईंच्या सोबत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर विविध राज्यांमध्ये कामानिमित्त प्रवास करण्याची मला अनेक वेळा संधी मिळाली. बस, रेल्वे, विमान प्रवासात त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा, कामानिमित्त चर्चा करताना नेहमीच मुस्लीम समाज प्रबोधन, समाजाची मानसिकता, काम पुढे घेऊन जाण्याची जिद्द हेच विषय, सोबत विनोद, एखाद्या व्यक्तीच्या लकबी, मुस्लीम महिलांचे प्रश्न सोडवताना झालेले किस्से ऐकायला मिळत. त्यातून त्यांच्या जीवनातील काही सूक्ष्म निरीक्षणे करता आली.
रास्ता पेठेतील डॉ. श्री. न. देशपांडे यांच्या दवाखान्यात आम्हा कार्यकर्त्यामार्फत अनेक वर्षे ‘मुस्लीम महिला मदत केंद्र’ चालवले गेले . रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने येथील जागा पाडण्यात आली, आता दुसरी जागा शोधायला पाहिजे म्हणून जागेसाठी ठिकठिकाणी चौकशी केली. मोमीनपुरा या मुस्लीमबहुल भागात जनाब अब्दुल करीम आत्तार यांनी आपल्या बालवाडीची जागा उपलब्ध करून दिली होती भर मुस्लीम वस्तीत, जेथे हमीदभाईंवर त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते संवाद करण्यासाठी गेले असता हल्ला करण्यात आला होता, तेथे आम्ही मुस्लीम महिला मदत केंद्र सुरू केले. मोमीनपुऱ्यात हे होणे अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होते. मुस्लीम सत्यशोधकाच्या कामाला आणि विश्वासार्हतेला मुस्लीम समाजाने दिलेली ही पावतीच म्हणावी लागेल.
सय्यदभाई पुणे-मुंबई रस्त्यावर राहत असतानासुद्धा आजूबाजूच्या मुस्लिमांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे काम सोडून द्यावे असा त्यांचा दबाव होता. मात्र आपल्या कामात खंड पडू न देता, सातत्याने या लोकांच्या संपर्कात राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेथील मस्जीद जेव्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन मस्जिदच्या बांधकामात लक्ष घातले. यामुळे मुस्लीम समाजाचा सय्यदभाईंवरचा विश्वास वाढला आणि सय्यदभाईंचा मस्जिदचे विश्वस्त म्हणून समावेश झाला. विरोधक तर सोडाच परंतु शत्रूही अडचणीत असल्यास त्याला आपण मदत करावी, ही धारणा मंडळाचे काम करतानाही त्यांना अनेक ठिकाणी उपयोगी पडली.
समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेणे, तिची गरज, मानसिकता, भावना, समज-गैरसमज यांचा निचरा होईपर्यंत बोलू देणे, हवे तसे बोलू देऊन सुरुवातीलाच त्याला विश्वासात घेणे व हळूहळू त्याच्यावर प्रभाव पाडून काम साध्य करणे ही हातोटी सय्यदभाईंना कार्यकर्ता म्हणून वावरताना नेहमीच उपयोगी पडली आहे.
वक्तशीरपणा हा सय्यदभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते ठरलेल्या वेळी किंबहुना थोडा वेळ आधीच त्या जागेवर पोहोचतात, आपल्यामुळे कोणाला अडचण येऊ नये याची काळजी ते घेतात. शिवाय, कामानिमित्त कोणाच्या घरी, गावी गेल्यास तेथील लोकांना आपला पाहुणचार, खाणे-पिणे यांचा त्रास होऊ नये याची ते नेहमीच दक्षता घेतात. आपल्यामुळे कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास किंवा ओझे होऊ नये, याची थोडी जास्तच काळजी घेतल्यामुळे अनेकांना त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची हौस भागवता आली नाही.
शहाबानो प्रकरण चालू असताना, त्यानंतर अखिल भारतीय पुरोगामी मुस्लीम परिषदेचे आयोजन करताना, पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी तर्फे पाकिस्तानात होणाऱ्या अधिवेशनासाठी अनेक वेळा आम्हाला दिल्ली येथे जावे लागले. प्रत्येक वेळी स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून कामाच्या संदर्भात बोलणे करून सय्यदभाई आपले काम पुढे कसे जाईल यास प्राधान्य देत. पाकिस्तानात जाता येणार, तेथील सर्वसामान्य माणसांना भेटता येणार, तेव्हा तेथील मुस्लीम नेत्यांबरोबर चर्चा करता येईल ही अपेक्षा ठेवून दोन-तीन वेळा आम्ही दिल्लीला गेलो. परंतु पाकिस्तानकडून वेळोवेळी काही ना काही कारणाने व्हिसा नाकारण्यात आला. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या आपल्या सख्ख्या भावाला आणि नातेवाईकांना अनेक वर्षांनंतर भेटता येईल ही आशा होती, परंतु ते शेवटपर्यंत शक्य झाले नाही.
एकदा दिल्लीत असताना समजले की, पाकिस्तानने आम्हाला व्हिसा नाकारला आहे. आमचे परतीचे तिकीट दोन दिवसानंतरचे असल्याने करायचे काय? यावेळी सय्यदभाईंची तब्बेत थोडी तक्रार करत होती. त्यांचा गुडघा दुखत होता. बाहेर कुठे जायचे नव्हते, उन्हाचा कडाका आणि घामाच्या धारा वहात होत्या. परंतु सय्यदभाई मला म्हणाले, ‘मी अनेक वेळा दिल्लीला आलो, परंतु राजघाटला जाऊन गांधीजींची समाधी पाहिली नाही.’ आम्ही दोघे गांधी समाधी पाहण्यासाठी गेलो. गुडघा दुखत असताना त्याकडे दुर्लक्ष करून राजघाटला भेट देता आली, याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते.
ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लीम कॉन्फरन्सचे अधिवेशन बंगलोर येथे आयोजित करण्याच्या प्राथमिक बैठकीसाठी जेव्हा वीस-पंचवीस तासांचा प्रवास करून मी सय्यदभाईंबरोबर गेलो, तेव्हा तेथील बैठक दोन-तीन तासांत आटोपून लागलीच परतीचा प्रवास केला. स्वारगेटला पोहोचल्यानंतर प्रवासाचा शीण मला जाणवत होता, पण रिक्षाने न जाता पीएमटी बसच्या रांगेत सय्यदभाई उभे राहिले. जिथे शक्य आहे तिथे आपण काटकसर करावी हा धडा मला सय्यदभाईंकडून घेता आला. त्या काळात याच पद्धतीने मेंगलोर, मद्रास, मदुराई, अहमदाबाद व इतरत्र परिषद आयोजनासाठी मोठी धावपळ होत होती. ठिकठिकाणी परिषदा झाल्या, मुस्लीम महिला मदत केंद्रांची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न झाले आणि मुस्लीम महिलांच्या प्रश्नावर देशभरात चर्चा चालू झाली. परिणामी आज देशभरात महिलांमध्ये जागृती होऊन चाळीस-पन्नास संघटना उभ्या राहिल्या आहेत. त्यांचा आपापल्या पद्धतीने समाज व शासनाशी संघर्ष चालू आहे.
अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वाद चालू असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना भेटून सन्मानपूर्वक मार्ग काढावा यासाठी भेटी, निवेदने, पत्रके, सद्भावना अभियान यांसारखे प्रयत्न केले. येथे निर्णायक मार्ग निघू शकत नाही, परंतु प्रयत्न मात्र सुरू होते. मध्यंतरी अयोध्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने आपल्या पद्धतीने निकाल देऊन हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवता येणे शक्य आहे का, याबद्दल चाचपणी करण्याचा सल्ला दिला. या वेळी सय्यदभाईंनी अयोध्या वादातील प्रमुख पक्षकारांना एकत्र आणून संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. प्रमुख पक्षकार अन्सारी आणि निर्मोही आखाड्याचे प्रमुख यांच्याशी फोनवरून संपर्क करून, पुण्यात सन्मानपूर्वक मार्ग काढून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आखला. पण भिन्न मतप्रवाह व मतभेद लक्षात घेऊन निर्णायक भूमिका घेता येणार नाही व या प्रयत्नातून खूप काही हाती लागणार नाही, हे लक्षात घेऊन या संदर्भात जनमत निर्माण करण्याचे धोरणच स्वीकारावे असे ठरवले. त्यानंतर विचारवंत व कार्यकर्त्यांची बैठक बोलावून जावेद आनंद, आफाख खान, जहीर अली यांच्याशी आझम कॅम्पसमध्ये चर्चा केली होती, काश्मीरचा प्रश्न, अयोध्या प्रकरण हे भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरले आहेत. आजही या संदर्भात काही ठोस कार्यक्रम आखण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.
हमीद दलवाई यांनी मुस्लीम समाज प्रबोधनाचे विचार मांडले, इस्लामी जगतात त्यांचे कार्य क्रांतिकारक व ऐतिहासिक आहे. त्यांचा अभ्यास, चिंतन, वैचारिक आवाका हा निश्चितच फार व्यापक होता. दुर्दैवाने त्यांना शारीरिक व्याधींमुळे या महत्त्वपूर्ण कार्यास फार वेळ देता आला नाही. जेमतेम पाच वर्षांमध्ये त्यांनी तुफानासारखे कार्य केले, लेखन केले. प्रबोधनाची मशाल पेटवली. हमीदभाईंनंतर ही मशाल विझणार, सत्यशोधकी विचार संपणार म्हणून विरोधकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्याचा अशोभनीय प्रकार केला. परंतु ही मशाल विझणार नाही, असा निर्धार सय्यदभाईसह अन्य कार्यकर्त्यांनी केला.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाला अनेक वेळा अपयश, निराशा पदरात आली, परंतु कार्यकर्त्यांनी वैफल्य येऊ दिले नाही. प्रतिकूल परिस्थितीतही पांढरे निशाण दाखवले नाही. खास करून १९७७ ते १९९७ या दोन दशकांच्या कालावधीत शहाबानो प्रकरण, तलाकपीडित महिलांच्या पोटगीसंदर्भात नवा कायदा (१९८६), बाबरी मस्जिदीचा पाडाव, बाम्बस्फोट, धार्मिक दंगली, दहशतवाद या निमित्ताने प्रबोधनाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, धार्मिक ऐक्याचा विषय जास्तच गुंतागुंतीचा होऊ लागला. या परिस्थितीतही हतबल न होता कार्य पुढे घेऊन जाण्याचा सय्यदभाईचा प्रयत्न मागे पडला नाही.
हमीदभाईंचे कार्य बुद्धिवाद्यांपर्यंत पोहोचले. परंतु ते तळागाळापर्यंत, सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय मात्र सय्यदभाईं आणि सोबतच्या निवडक कार्यकर्त्यांना द्यावे लागेल.
.............................................................................................................................................
लेखक शमसुद्दीन तांबोळी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
tambolimm@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 10 September 2019
सय्यदभाईंना व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. समाजास अशा कार्यकर्त्यांची ओळख व्हायला हवी. -गामा पैलवान
Sachin Shinde
Wed , 04 September 2019
Great