‘खतिजा’ ही माझ्या बंडखोरीची प्रेरणा होती!
पडघम - सांस्कृतिक
सय्यदभाई
  • सय्यदभाई
  • Tue , 03 September 2019
  • पडघम सांस्कृतिक सय्यदभाई Sayyadbhai दगडावरची पेरणी Dagdavarchi Perni चतुरंग प्रतिष्ठान Chaturang Pratishthan हमीद दलवाई Hamid Dalwai मुस्लीम सत्यशोधक मंडळ Muslim Satyashodhak Mandal जुबानी तलाक ट्रिपल तलाक तिहेरी तलाक Triple talaq

मुस्लीम तलाक पीडित महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या सय्यदभाई यांना नुकताच ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कामाची धुरा त्यांच्या पश्चात सय्यदभाई यांनी निरंतरपणे वाहिली. अशा या मुस्लीम तलाक पीडित महिलांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटलेल्या आणि त्यासाठी समाजापासून सरकारपर्यंत निकराने लढणाऱ्या सय्यदभाईंचे ‘दगडावरची पेरणी’ हे कार्यकथन (आत्मकथन नव्हे ‘कार्यकथन’च!) जून २००९मध्ये अक्षर मानव प्रकाशन (पुणे)तर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील सय्यदभाईंच्या आयुष्यात ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेल्या भागाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

एक दिवस संध्याकाळी घरी गेलो. अम्मा, अब्बा, बडेभाई व इतर सगळ्यांचे चेहरे पडलेले, घाबरलेले दिसत होते. सगळे अस्वस्थ वाटत होते. विचारल्यावर समजलं, तीन दिवस झाले खतिजा (माझी धाकटी बहीण) दोन मुलांसह अब्दुलच्या (तिचे पती) घरातून बाहेर पडली. कारण काय होतं ते काहीच समजलं नाही. काय करावं, तिला कुठं शोधावं, कुणाला काही सुचत नव्हतं. अम्मा सारखी रडत होती. बडेभाई आणि मी गणेश पेठेतल्या अब्दुलच्या घरी गेलो. तो म्हणाला,

“मैं सुबह कामकू गया और वह दोपहर बच्चे लेकर भाग गई.”

“तुम्हारा कोई झगडा हुआ क्या?” बडेभाईंनी विचारलं.

अब्दुल उत्तरला,

“नहीं, नहीं, झगडावगडा कुछभी नहीं. आजकल वो घरमें अच्छी नहीं रहती थी. उसकी नजर खराब हो गई थी. होना तो ये बाजूवाली आपासे पुछो.”

बाजूवाली आपा म्हणाली,

“तुम्हारी बहन अपने मर्द की बात मानती नहीं थीं. भोत अगाऊपणा करती थी. मैंभी भोत बार समझाई. वो मानतीच नहीं थी.”

बाजूवाली आपा हिचा तलाक झालेला होता. ती आपल्या दोन लहान मुलींसह वाड्यात अब्दुलच्या शेजारी राहत होती. ती पुढं म्हणाली,

“देखो ना, मैं और अब्दुल उसको तीन दिनसे ढूंढ रैले हैं. कईच मिली नई.”

काय करावं काही सुचेना. तिला आम्ही पुण्यातल्या सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन शोधली. काही उपयोग झाला नाही. आम्ही रहात होतो त्या रेंजहिल्स भागातच खतिजाची नणंद म्हणजे अब्दुलची बहीण राहात होती. तिला खतिजाची हकिकत सांगायला आम्ही गेलो तर खतिजा मुलांसह तिच्या घरी होती!

आम्हाला पाहून ती आणि मुलं ओक्याबोक्सी रडू लागली. आम्ही काही विचारायच्या आधी तिची नणंद सकिना तिला धीर देत म्हणाली,

“तू क्यूं फिकर करती? हम हैं ना तेरे साथ. उसकू क्या करना है करने दे.”

बडेभाईंनी दरडावून खतिजाला विचारलं,

“आज चार दिन हो गये, तू अपने घरसे निकलकर कहां गई थी? क्यू गई थी? तू यहां कब और कैसी आई? तू क्या हमारी नाक कटानेवाली है? हमारे मुंहको कालिख लगानेवाली है?”

बडेभाईंच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. तसतशी खतिजा अधिक बेभानपणे रडू लागली. दोन्ही मुलं तिला बिलगून बसली होती. आता बडेभाईंनी अधिक आवाज चढवून खतिजाला पुन्हा तेच प्रश्न विचारले. तशी सकिना म्हणाली, ‘ती सांगणार नाही. मी सांगते.’ सकिना सांगू लागली, तसा मी श्वास रोखून ऐकू लागलो. कारण मी असं मानत होतो की, मी स्वत: इतका धार्मिक, इस्लामचं पालन करणारा, त्यामुळे आमच्या कुटुंबावर संकट येणारच नाही. पण झालं नेमकं त्याच्या उलटं.

सकिना म्हणाली,

“अब्दुल के पडोस में रहनेवाली, वो नई क्या मासूमबी, उसको दो बच्चे हैं, उसको उसके मर्दने छोड दिया है. उसको सहारा देना ऐसा अब्दुलको लगता और खतिजा नको बोलती, इतनीच बात है. देखो, दुसरा कुछ नहीं. खतिजानेभी समझके लेने होना ना? वो मर्द आदमी है, उसको ज्यादा समझता क्या अपनेको? समझाव तुम्हारी बहनको. ये कहींच नई गई. सिधा मेरे घरकू आयी.”

आतापर्यंत नुसती रडत राहणारी खतिजा किंचाळली,

“इन्हो और मासूम, दोनो मिलकर मेरेको जलानेको निकले थे. मैं मरने तयार हूं, मगर मेरे दोनो बेटोंको कौन देखेगा? मेरा गुन्हा क्या? मैं पुछती थी, औरत-दो लड़के उसको है, फिर दुसरा निकाह क्यू? तुमको उसकाया गया है. फिकर है तो इसको मदद करो. घर में औरत बोलके मत लाव.”

सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. बाजूवाली आपा (मासूमबी) आणि अब्दुल खतिजाला शोधायला संगम पूल, बंडगार्डन, ससून हॉस्पिटलमध्ये का गेले होते ते! खतिजाचं वय एकोणीस. तिला दोन लहान मुलगे. खतिजाला इथं सोडून जाणं बरोबर नाही असं मी बडेभाईंना सांगितलं. त्यांनीही मान्य केल्यावर सकिनाला सांगून खतिजा आणि तिच्या लहान मुलांना आम्ही आमच्या घरी घेऊन आलो. खतिजाला पाहताच अम्माची दातखिळी बसली. ती बेशुद्ध झाली. घरात सगळ्यांची रडारड सुरू झाली. शुद्धीवर आल्यानंतर अम्माला सगळी हकिकत सांगितली. या बाबतीत अब्दुलला आणि त्याच्या वडिलांना जाब विचारावा असं ठरलं. बडेभाई आणि रेंजहिल्समधल्या जमातीचे दोघंतिघं अब्दुलच्या वडलांना भेटले. ते म्हणाले,

“वो मेरे साथ नहीं रहता. मेरेकू मत पूछो.”

ही मंडळी अब्दुलकडं गेली. त्यावर अब्दुल म्हणाला,

“देखो, मैं है ऐसा है. मैं दुसरी शादी करनेवाला हूं. मेरेकू कोई नहीं रोक सकता. मैंने पुरी इन्क्वायरी करके रखेली है. ऐसेमें खतिजाकू यहां आके रहना है तो रह सकती है, नई तो मैं उसको तलाक देनेवाला हूं.”

बडेभाई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.

तो म्हणाला,

“मेरेकू सब मालूम है. मेरेकू मत सिकाव. मैं सब कायदेसे कररैला हूं.”

अब्दुलला वठणीवर कसं आणावं, कुणाला काही सुचेना. त्याच्या घरातून आम्ही बाहेर पडलो. एकजण म्हणाले,

“आपण मुस्लीम वकिलाचा सल्ला घेऊ. इथं जवळच आहे त्याचं ऑफिस. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”

आम्ही वकिलांना भेटलो. हकिकत सांगितली, ते म्हणाले...

“अपने शरीयत कायदे में तलाक देने का हक सिर्फ शोहर को है. औरत की मर्जी हो या नहीं. इससे तलाक नहीं बदलता. शरीयत कायदा इस बारे में मर्द के बाजूसे है. तुम उसे कानूनन नहीं रोक सकते. रही बात दुसरी शादी की. शोहर एक वक्त में चार तक शादीयां कर सकता है. अपना कानून मर्द को इसकी इजाजत देता है. उसे कोई नहीं रोक सकता.”

आम्ही सगळे एक-दुसऱ्याच्या तोंडाकडं पाहत राहिलो. मला राहवलं नाही, म्हणून मी विचारलं,

“वकीलसाब, हमारा ये कानून इतना इकतर्फा कैसा है?”

वकीलसाहेब एकदम चमकले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले,

“तुम अभी बच्चे हो. तुम नहीं समझोगे.”

वकिलांच्या उत्तरानं माझ्या डोक्यावर हातोडा पडल्यासारखं झालं. मेंदूला झिणझिण्या आल्या. मुसलमान आणि इस्लामचे सगळेच आदर्श असताना इस्लामी कायदा या बाबतीतच इतका वाकडा कसा, हा प्रश्न माझ्या डोक्यात ठाण मांडून बसला. मला उगीच वाटायचं की, वकील आपल्याला बनवतोय, तो खोटं बोलत असेल.

दुसऱ्या दिवशी मी खडकीच्या मशिदीच्या इमामाला गाठून त्यांना सर्व हकिकत सांगितली. त्यावर ते म्हणाले,

“यही अल्लाहतआलाकी मर्जी होगी तो कोई कुछ नहीं कर सकता.”

यावर मी त्यांना परत विचारलं,

“अपना शरीयत का कायदा मर्दों के बाजूका है?”

हे ऐकताच इमामसाब माझ्यावर खवळले,

“ये इस्लाम का मामला है, तुम नहीं समझोगे. बेतुके सवाल मत करो. तुम अभी बच्चे हो.”

सगळ्या ठिकाणी ‘तुम बच्चे हो’ म्हणून मला गप्प केलं गेलं. बरं, बच्चा आहे ना मी! मला कळत नाही म्हणून तर प्रश्न विचारतो. त्याची उत्तरं द्यायच्या ऐवजी माझ्यावरच चिडतात, रागावतात! नेमका हा काय प्रकार आहे हे मला कोण सांगणार, असा प्रश्न सतत मला भेडसावत होता.

इकडं बडेभाईंनी प्रयत्न करून आमच्याच घरी खतिजा-अब्दुलबद्दल बैठक घेतली होती. बैठकीत अब्दुलने आपली आठ-दहा माणसं आणली होती. रेंजहिल्सला आम्ही चाळ क्रमांक एकशे तेराच्या खोली क्रमांक पंधरामध्ये राहत होतो. दोन खोल्याचं घर. संध्याकाळी सातच्या सुमारास सगळे जमले. चर्चा सुरू झाली. खतिजा आमच्यातच बसली होती. कुणीतरी बोललं,

“औरतोंने मर्दों में नहीं बैठना.”

बडेभाईंनी खुणावलं तशी खतिजा उठून दुसऱ्या खोलीत बायकांच्यामध्ये जाऊन बसली.

अजब प्रकार होता. जिच्यासाठी बैठक घेतली तिला बाहेर घालवून दिली! बडेभाईंनी खतिजाची हकिकत सविस्तर सांगितली. हिला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला, हेही सांगितलं. ही आपली दोन मुलं घेऊन आमच्या वस्तीत आली; परंतु माहेरी न येता नणंदेच्या घरी गेली. समाजातल्या थोरामोठ्यांनी अब्दुलला याप्रकाराबद्दल विचारावं.

गणेश पेठेतले जाणते मुस्लीम पुढारी जनाब अन्सारीसाब (बदललेले काल्पनिक नाव) यांनी अब्दुलला झाल्या प्रकाराबद्दल खुलासा करायला सांगितलं.

अब्दुल म्हणाला,

“खतिजा मेरे दिलसे उतर गई.”

“क्यूं?”

“वो मेरी बात नहीं मानती.”

“कौनसी बात?”

“कौनसीभी बात.”

“ये दो बेटे तुम्हारे हैं?”

“हां.”

“तुम और मासूमने खतिजाको जलाके मारनेकी कोशिश की?”

“हम क्यों मारेंगे? चिमणी उसके आंगपर गिरी.”

“तुम्हारा मासूम के साथ क्या लफडा है?”

“कैसा लफडा! उसका मर्द नहीं है. उसको दो बच्चे हैं. उससे मैं शादी करनेवाला हूं. शादी करने के बाद कायका लफडा? और देखो, खतिजा बच्चे लेकर घरसे भाग गई. अब ये मेरेको नहीं होना. मैं इसको तलाक देनेवाला हूं.”

कुणीतरी विचारलं,

“बच्चोंका क्या करनेवाला है?”

“बच्चे मेरे हैं, मेरेको दे दो. मासूम उनको संभालेगी.”

काही केल्या अब्दुलच्या मानगुटीवरून खतिजाला तलाक देऊन मासूमशी शादी करण्याचं भूत जाईना. दोन-अडीच तास वादविवाद, चर्चा झाली. तडजोड झाली नाही. मी एका कोपऱ्यात बसून ऐकत होतो. शेवटी अन्सारीसाब म्हणाले,

“यही अल्लाहको मंजूर होगा तो हम-तुम क्या करेंगे?”

त्यांच्या या वाक्यानं माझं रक्त उसळलं. मी ओरडलो,

“यह कैसा इन्साफ है? यह आदमी मेरे बहनको दोन बच्चों के बाद तलाक देकर दुसरी औरत करेगा!”

त्यावर अन्सारीसाब म्हणाले,

“तुम्हारी बहनने जुल्म सहा है, तो उसे मरने के बाद जन्नत मिलेगी.”

त्यांचं हे निराधार तत्त्व मला अजिबात मान्य झालं नाही आणि मी ओरडलो,

“अन्सारीसाब, आज मेरी बहन दोजकमें (नरक) है, उसका क्या?”

माझ्या चिडण्यानं अन्सारीसाब बडेभाईंवर खेकसले.

“ये लडका कौन है? इसे यहांसे बाहर निकालो. फालतू बातें करता है.”

त्यांचं ऐकून बडेभाईंनी मला बाहेर जायला सांगितलं. मी बाहेर थांबून आतली चर्चा ऐकत राहिलो. अब्दुल आणि त्याच्याबरोबरचे लोक बाहेर येऊन काही चर्चा करून परत आत गेले.

आतापर्यंत नुसती दुसऱ्या बायकोची परवानगी मागणारा अब्दुल एकदम उलटला आणि म्हणाला,

“मैं दुसरी शादी करूंगा या नहीं करूंगा, मगर खातिजाको मैं यहीं तलाक देता हूं. जो मेरी बात नहीं मानती, मेरी इज्जत नहीं करती. किताबों मे लिखा है शोहर आधा खुदा होता है. ये मानती क्या, उसको पूछो. ऐसी औरत मेरेकू नहीं होना. मैंने उसको तुम सबके सामने बच्चों के साथ तलाक दे दिया.”

हे ऐकताच आम्हा सगळ्यांवर आभाळ कोसळलं. आमच्यापैकी खतिजासह कुणालाच हा तलाक मंजूर नव्हता. आम्ही अधिक काही विचारायच्या आधी अब्दुल आपल्या हिमामतींसह (समर्थकांसह) आमच्या घराबाहेर पडला. नंतर अनेकांच्या मध्यस्थीनंसुद्धा खतिजाला अब्दुलकडं नांदायला पाठवायचे केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. खतिजाच्या संसाराचा खेळखंडोबा झाला. प्रश्न सुटेपर्यंत खतिजा आमच्याकडं तिच्या दोन मुलांसह राहणार असं ठरलं.

माझ्या मनात अब्दुल आणि रेंजहिल्सला राहणारी तिची बहीण सकिना हिच्याबद्दल भयंकर चीड निर्माण झाली. ते दिसतील तिथं उभं राहून मी त्यांना शिव्या देत त्यांच्या मागं बऱ्याच लांबपर्यंत जात असे. एवढ्यानंही माझं मन शांत झालं नाही, तर त्यांना मी दगड फेकून मारत असे. हा माझा कार्यक्रम बराच काळ चालला. खतिजाच्या उद्ध्वस्त संसाराची माझ्या मनावर खोलवर जखम झाली. खूप विचार करून करून मी काही गोष्टी मनाशी ठरवल्या. मला जसजसा जमेल-समजेल तसतसा एकतर्फी तलाकचा छडा लावीन. मुळात एकट्या पुरुषालाच हा अधिकार कुणी दिला, का दिला, हे शोधून काढीन.

पण हे आपल्याला कसं जमणार? कारण सामान्य मुस्लीमापासून ते मुल्ला-मौलवींपर्यंत कुणालाही तलाकबद्दल विचारलं तर ते अंगावर धावून येत असत. तरी आपण माघार घ्यायची नाही. माझ्या डोक्यात हा विषय कायमचा बसला होता. चोवीस तास एकच ध्यास. दिसेल त्याला तलाकबद्दल विचारणं. मी इस्लामी उपासनेचा अभ्यास केला होता. स्वर्ग, नरक यासंबंधीचा अभ्यास केला होता. मात्र इस्लामी सामाजिक प्रश्नांचा अभ्यास अजिबात केला नव्हता. त्याची कधी गरजही भासली नव्हती.

मी पुणे शहराच्या प्रत्येक मशिदीत आलटून-पालटून नमाजला जात असे. नमाजनंतर नमाज पढवणारे तिथले इमामसाब व इतर इस्लामचे जाणकार म्हणवणाऱ्यांना फक्त तलाक एके तलाकबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारी. ‘पुरुषालाच तलाक द्यायचा एकतर्फी अधिकार का?’ या प्रश्नावर सगळ्यांची तोंडं बंद होत असत. ‘तुम अभी बच्चे हो’ म्हणून मला वाटेला लावायचे.

तलाकच्या प्रश्नांनी माझी झोप उडवली. या शोधकार्यामध्मे एक गोष्ट लक्षात आली. तोंडी एकतर्फी तलाकला मुस्लीम सोडून इतर धर्मीयांचा विरोध असायचा. धार्मिक शिक्षण देताना आपल्याकडे सगळे आबादीआबाद आहे असं शिकवण्यात आलं. आता एकतर्फी तलाकचा शोध घेताना सारं काही बरबादच आहे असं जाणवलं. तलाक विषय डोक्यात शिरल्यापासून माझा सिनेसंगीत गाण्याचा नाद कमी झाला. किंबहुना हा नाद मी सोडूनच दिला, असं म्हणणं जास्त बरोबर होईल. कारण एकाच वेळी दोन्ही गोष्टी मला जमण्यासारख्या नव्हत्या.

घरी खतिजाबाबतीत असा विचार केला की, तिनं स्वत:च्या पायावर उभं राहावं. त्यामुळं तिला स्वाभिमानानं कुटुंबात राहता येईल. तिचीही उर्दू तिसरी झाली होती. अशा परिस्थितीत तिनं काय करावं याचा मी विचार करू लागलो. खतिजा मनाची फार खंबीर होती. तिनं दुसरी शादी करायचं नाकारलं. एक दिवस मी खतिजाशी निवांतपणे बोललो. तिने शिवणकाम शिकून आपल्या पायावर उभं राहावं असं मला वाटतं हे मी तिला सांगितलं. ती म्हणाली,

“मला हे कसं जमणार? मला कोण परवानगी देणार?”

मी म्हणालो,

“हे बघ, त्यात काही अवघड नाही. कुणी काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. तू जिद्द ठेव. प्रयत्न कर. सगळं काही ठीक होईल. मी घरच्यांना सांगतो. तुला कुणी अडवणार नाही. मी तुझ्या क्लासची फी भरीन. (फी होती ‘पाच रुपये’) मी तुझ्या पाठीशी आहे. रडत बसू नको. आपल्याला इतिहास घडवायचा आहे.”

आता खरी खतिजाची परीक्षा होती. उर्दू फक्त तिसरी शिकलेली. मराठीचा गंध नाही. मराठी शिकण्यात तिचा काही काळ गेला. कारण शिवणकामाची पुस्तकं मराठी, हिंदीत होती.

असंच एक दिवस अम्मा, अब्बा, बडेभाई, भाभींना (बडेभाईंची पत्नी) बसवून मी खतिजाला शिवणकाम शिकवायची मोजना सांगितली. सगळे चमकले. बडेभाई म्हणाले,

“ये क्या नया तमाशा है? हम सय्यद हैं. हमारी बहन दो-चार रुपये के लिए सिलाई काम करेगी? लोग हमको नाम रखेंगे.”

मी म्हणालो,

“खतिजा को घर से निकालनेवाले अब्दुल को कोई नाम नहीं रखता, मगर मेहनत करनेवाले खतिजा को नाम रखेगा. ये कैसा इन्साफ है? मुझे ऐसे जमानेकी परवाह नहीं. मैं खतिजा को सिलाई काम सिखाऊंगा. चाहे कुछभी हो.”

खतिजा बुरखा वापरत होती. सर्वप्रथम मी या बुरख्याला खतिजाच्या संमतीनं कायमचा ‘तलाक’ दिला. याचं कारण असं की, बाईला बुरखा किंवा लोखंडी भिंतीच्या आड ठेवण्याची पुरुषी वृत्ती तशी सहजासहजी बदलणार नाही. हजारो वर्षांपासून हेच चालत आलं आहे. खतिजावरल्या अत्याचारांनी माझी भविष्यातली दृष्टीच बदलून टाकली. माझ्या विचारांची दिशा बदलली. मला आजही समजत नाही की, पुरुष स्वत:ला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ का मानतो? शेवटी त्याचा जन्म तर बाईच्या पोटीच झाला आहे. तिनं त्याला लहानाचा मोठा केला तरी तो तिला दुय्यम मानतो. मला ही वृत्तीच नष्ट करायची आहे.

खतिजा या लढवय्या तरुणीनं बुरखा भिरकावला अन शिलाईकाम शिकायला गेली. मुस्लीम समाजात हे समजल्यावर काही अतिशहाणे म्हणाले,

“ये सिलाईविलाई करने की क्या जरूरत है? खतिजाने बच्चे संभालना. उसके बाहर निकलने से मुस्लीम मर्द की इज्जत खत्म होतीहै.”

लोक असं बोलतात, हे मला समजल्यावर मी त्या माणसांना भेटून खतिजाची सर्व हकिकत सांगितली आणि म्हणालो,

“अब्दुल असा का वागला? त्याची समजूत घालून खतिजाला त्याच्या घरी पाठवून देऊ.”

यावर ती सभ्य नमाजी दोन-चार माणसं मला म्हणाली,

“वो तुम्हारा घरेलू मामला है. हम कुछ नहीं कर सकते.”

मग माझ्या लक्षात आलं की, मुस्लीम समाजात स्त्रीला सहजासहजी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क मिळणार नाही. यासाठी आहे त्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड केलं पाहिजे. ठीक आहे. पण एकट्यानंच बंड करण्याची माझी कुवत नाही. त्यासाठी मी कुणाचा तरी आधार शोधत होतो. मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा ही माझी मानसिकता बनली. खतिजा ही माझ्या बंडखोरीची प्रेरणा होती!

आता खतिजाला थोडंफार कटिंग आणि शिलाई येऊ लागली होती. घरी तिला कायमची शिलाई मशीन पाहिजे होती. मी तसा फार भावनाशील आहे. खतिजाला त्या काळी दोनशे पंच्याहत्तर रुपयांची उषा फोल्डींग शिलाई मशीन आणून दिली. आज त्या मशीनची किंमत पाच हजार रुपये आहे असं म्हणतात. दिवसेंदिवस खतिजाची शिवणकलेत प्रगती होत गेली. या माऊलीनं आपली जिद्द, ऊर्मी सोडली नाही. आणि शिवणकामात महारत मिळविली.

खतिजानं दोन ब्लाऊज शिवून दहा रुपये शिलाईची पहिली कमाई मिळवली. संध्याकाळी कारखान्यातून मी आल्यावर खतिजानं ते दहा रुपये माझ्या हातावर ठेवून ‘शिलाईची पहिली कमाई’ म्हणाली. तसं माझं मन भरून आलं. मी तिला कवेत घेऊन खूप रडलो. हे आम्हा दोघा बहीण-भावाच्या अन्याय्य परंपरेच्या विरुद्ध संघर्षाच्या पहिल्या पायरीचं फळ होतं. दहा रुपये. हे दहा रुपये खतिजाला लाख मोलाचे होते. तिला आता शिलाई कामापलीकडचं जग माहीत नव्हतं. ती आपल्या कामात पूर्ण रमून गेली.

दरम्यान, फॅक्टरीच्या नोकरीत बडेभाईंना बढती मिळाली. तसं रेंजहिल्समध्मे त्यांना दोन बेडरूमचं मोठ्या आकाराचं घर बदलून मिळालं आणि आम्ही तिथं रहायला गेलो. इथं आल्यावर खतिजाचं शिलाईकाम वाढलं. तिनं मिळवलेल्या पैशातून अजून दोन शिवणमशीन विकत घेतल्या आणि धाडसानं स्वत:चा शिवणक्लास सुरू केला. ती स्वत: पोळली गेली असल्यामुळे फी अगदी कमी घेत असे. अनेक मुलींकडून ती फीही घेत नसे. रेंजहिल्सला त्या काळी हा एकमेव शिवणक्लास होता. खतिजा, खतिजापासून खतिजाआपा झाली. खतिजाआपापासून ‘क्लासवाली आपा’ ही पदवी तिला मिळाली. ती अद्याप आहे. खतिजाचे कष्ट, निष्ठा, जिद्द यामुळंच ती सगळ्या संकटांवर मात करून पुरुषी वृत्तीवर विजय मिळवू शकली. तिला दोन मुलगे. मुलांच्या लग्नाच्या वेळी लग्नपत्रिकांवर अब्दुलचं नाव टाकलं नाही. मुलांच्या नावापुढं बडेभाईचं नाव सय्यद अल्लाउद्दीन आम्ही लावलं. अजूनही तेच चालू आहे.

खतिजाचा विचार करताना असं दिसतं, की तिनं कष्ट करून दोन पैसे मिळवून पतीशिवाय सगळं मिळवलं; परंतु तिला सामाजिक न्याय मिळाला नाही. अशा लाखो महिला असतील, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली पाहिजे असं माझ्या मनात आलं. परंतु स्वत:कडं पाहताना असं जाणवायचं की तेवढी माझी ताकद नाही. ऐपत नाही. विद्वत्ता नाही. हे जरी खरं असलं तरी का कुणास ठाऊक, कधी तरी कुणी तरी ‘गाईड’ मिळेल माची मला खात्री होती. म्हणून भेटेल त्याला तोंडी एकतर्फी तलाकबद्दल विचारत होतो. अशातच जुन्या टिळक स्मारक मंदिरात युवक क्रांतीदलातर्फे तीन दिवस संध्याकाळी हमीद दलवाई यांची ‘समाज प्रबोधन’ या विषयावर व्याख्यानं होती. ते मला वर्तमानपत्रांतून कळलं. तोवर माझ्या कानांवर ते मुस्लीम प्रश्नांवर इतरांपेक्षा वेगळं बोलतात असं थोडंफार आलं होतं. मी दलवाईंची तिन्ही व्याख्यानं ऐकली. दलवाई हे विचारानं नास्तिक होते. त्यांची कोणत्याच धर्मावर श्रद्धा नव्हती. ‘जगातील सर्वच धर्म मानवनिर्मित आहेत, वरून काहीच आलं नाही, वर काही नाही, सगळं इथंच पिकतं’ असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हिंदू धर्मावर टीका केलीच; परंतु इस्लामवरही हल्ला चढवला. तरी या माणसाशी तलाकबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटत होतं.

तीन व्याख्यानानंतर ‘युक्रांद’च्या कार्यकर्त्यांची जंगली महाराज रस्त्यावर एके ठिकाणी चर्चा होती. डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अनिल अवचट यांना भेटून मी माझी ओळख सांगितली व चर्चेला हजर रहायची परवानगी त्यांच्याकडून मिळवली. बैठक सुरू होण्यापूर्वी सगळ्यांचा परिचय कार्यक्रम झाला. सुरुवात दलवाईंपासून झाली. यावेळी युक्रांदमधल्या कुणाचंच लग्न झालेलं नव्हतं. परंतु डॉ. अनिल अवचट, डॉ. अनिता अवचट, डॉ. कुमार सप्तर्षी, उर्मिला सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये, डॉ. रत्नाकर महाजन यांच्याशिवाय चाळीसएक कार्यकर्ते बैठकीला हजर होते. अशा बैठकीला हजर रहायची माझी ही पहिलीच वेळ. युक्रांदच्या कार्यकर्त्यांची शिस्त, त्यांचे पुरोगामी विचार ऐकून माझ्यात रुजणाऱ्या विचारांना फार मोठा आधार मिळाला. ‘पुरोगामी-प्रतिगामी’ या शब्दांची ओळख मला प्रथम इथंच झाली.

चर्चेच्या शेवटी दलवाईंनी आपलं मनोगत मांडताना सांगितलं की, “माझ्या तीन व्याख्यानांना एखादा जरी मुस्लीम आला असता आणि मला भेटून त्यानं चर्चा केली असती तर मला बरं वाटलं असतं.”

लगेच कुमार सप्तर्षी उभं राहून म्हणाले,

“दलवाई, एक मुस्लीम तरुण तुमची तिन्ही व्याख्यानं शांतपणे ऐकून इथं चर्चेलाही आला आहे. सीआयडी पोलिसासारखा दिसणारा हा सय्यद महबूब, तात्यासाहेब मराठे यांच्या भारत पेन्सिल कारखान्यात नोकरी करतो. त्याला तुमची बरीच मतं पटतात. तर काही मतं अजिबात पटत नाहीत. त्याला तुमच्याशी खासगीत चर्चा करायची आहे.”

तीन तास ती बैठक चालली. त्यानंतर दलवाईंना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. ते घाईनं निघून गेले. मला त्यांच्याशी तेव्हा काहीच बोलता आलं नाही. ‘दलवाई परत पुण्याला आले की तुझी त्यांच्याशी गाठ घालून देईन,’ असं कुमार आणि अवचटांनी मला सांगितलं. या आशेवरच मी युक्रांदच्या दर रविवारी होणाऱ्या साप्ताहिक बैठकांना मुद्दाम हजर राहायला लागलो. युक्रांदच्या बैठकीला दलवाई परत आले नाहीत; परंतु या बैठकांमुळे माझ्या मनातल्या विचारांना मात्र पुरोगामी आकार मिळू लागला, चालना मिळू लागली!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Sachin Shinde

Wed , 04 September 2019

Parivartan vichar kaaryala manacha salam sir.


Alka Gadgil

Tue , 03 September 2019

सैयदभाईंच्या कार्याला सलाम. स्रीद्वेष सर्वच धर्मांमध्ये आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......