लैंगिकतेचे राजकारण (भाग १- पूर्वार्ध)
सदर - लक्ष्मणरेषेवरून
डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Thu , 29 December 2016
  • जहाल स्त्रीवादी Radical Feminist स्त्रीसमलिंगी चळवळ lesbianism स्त्री-पुरुष असमानता Gender inequality लिंग लैंगिकता आणि लिंगभाव Sex sexuality and gender

अलीकडच्या काळात शिवसेना आणि त्यांच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी काही नाटक आणि सिनेमांच्या प्रदर्शनाबाबत जी दहशत पसरवली आहे, ती फक्त नाटक-सिनेमापुरतीच मर्यादित नाही तर त्यामध्ये समाजजीवनाची सगळी नीतिमूल्ये, व्यवस्था संपूर्णपणे एकाच धर्मतत्त्वाच्या चौकटीत ठासून बसवण्याचा प्रयत्न आहे. एक प्रकारे लोकांच्या व्यक्तिगत-सामाजिक जीवनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा तो एक भाग आहे. १९व्या शतकात इंग्रजांच्या सांस्कृतिक आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळीतील एका प्रवाहाने ‘भारतमाता’ (संकल्पना) उभी केली होती. ही प्रतिमा संपूर्ण हिंदू मूलतत्त्ववादी विचारांचेच पुनरुज्जीवन करणारी होती. या ‘भारतमाते’च्या प्रतिमेच्या पोटात देशातील बौद्ध, द्रविड, मुस्लिम, दलित, आदिवासी अशा अनेकविध प्रवाहांना ठासून कोंबण्याचा प्रयत्न झाला. या ‘भारतमाते’चे वरकरणी रूप ब्राह्मणी हिंदुत्ववादी स्त्रीचेच राहावे यासाठी विशेष प्रयत्न झाला. (उदा. आजच्या मंत्र्यांना ओवाळणाऱ्या सुवासिनी) तिची वाणी संस्कृत होती. ती धर्माने आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेच्या आत राहणारी अत्यंत विनयशील नम्र अशी सात्त्विक स्त्री होती. (की दडपलेली होती?) देशातल्या तमाम स्त्रियांनी तोंडातून एकही ‘ब्र’ न काढता तिचे हेच विनयशील आदर्श ‘सतिसावित्रीचे’ रूप स्वीकारावे अशी अप्रत्यक्ष धमकावणीही होती.

२०१२साली निर्भयावरील बलात्कारा संदर्भात आसारामबापू यांनी असे विधान केले होते की, त्या मुलीने त्या बलात्कारी पुरुषास विनवणी करायला हवी होती की तिला त्याने बहीण मानून तिची सुटका करावी. त्याच वेळी अन्य महाभागांनी इन्टरनेटवर असेही सूचित केले होते की ‘बलात्कार स्त्री एन्जॉय  करते’ पण नंतर तिला त्यात फायदा दिसू लागला की ती त्याविरोधात बोंबाबोंब करू लागते. मागच्या दशकात समलिंगी स्रीसंबंध चित्रीत करणाऱ्या ‘फायर’सारख्या फिल्मवर हल्ले झाले होते तेही या हिंदुत्ववादी संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या ‘त्या भारतमातेचे’ रक्षण करण्याचाच एक भाग आहेत. यात केवळ ‘भारतमाते’च्या प्रतिमेचे रक्षणाचाच नव्हे तर स्त्रियांच्या लैंगिकतेवरील पकड अजिबात ढिली पडू नये यासाठीचाही प्रयत्न आहे. हे स्त्रियांच्या लैंगिकतेवरील नियंत्रण पुनर्स्थापित करण्याचे राजकारण आहे.

जगाच्या इतिहासात विविध मार्गांनी स्त्रियांच्या लैंगिकतेवरील नियंत्रण हे स्त्रियांची दडपणूक करण्यासाठी पुरुषप्रधान व्यवस्थेने वापरलेले महत्त्वाचे हत्यार आहे. स्त्रियांना स्वतःची मालमत्ता समजून त्यांची देवाणघेवाण, त्यांच्यावरील कौटुंबिक अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळवणूक, चेटकिणींचे निर्दालन (Witch Hunting) अशा हजारो मार्गांनी स्वायत्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीजीवनाचे पुष्प खुडून टाकण्याचा आजवर सतत प्रयत्न होत आला. विषमतेविरुद्ध लढे उभे राहिले. स्त्री-पुरुष समानता मागणारी चळवळ उभी राहिली. परंतु सरसकटपणे पुरुषी लैंगिकता स्त्रियांवर लादून त्यांचे शोषण करणाऱ्या वर्चस्ववादी पुरुषी लैंगिकतेविरुद्ध मात्र आवाज अजिबात बुलंद होऊ शकला नाही. याचे कारण प्रत्येक स्त्रीच्या स्वतःच्याही नकळतपणे भिन्नलिंगी संबंधाची चौकट (Hetrosexual Institution) हीच नैसर्गिक आणि खरी आहे अशी तिची मानसिकता झाली आहे. संपूर्ण स्त्रीजीवनाला अत्यंत सूक्ष्म, अदृश्य पातळीवर व्यापणारे स्त्री लैंगिकतेवरील हे नियंत्रण हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सारखेच आहे. फक्त त्याच्या दृश्यरूपात फरक असू शकतो.

मानवी विकास प्रक्रियेत या पुरुषी लैंगिक नियंत्रणाला केव्हा आणि कशी सुरुवात झाली, स्त्रियांच्या लैंगिकतेवरील नियंत्रण म्हणजे नेमके काय, स्त्री-पुरुष असमानता का आहे यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध अनेक समाजशास्त्रज्ञांनी, इतिहासकारांनी, मानववंशशास्त्रज्ञांनी घेतला आहे. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात स्त्रियांनी स्त्री-पुरुष असमानतेविरुद्ध लढे दिले. परंतु ‘भिन्नलिंगी संबंध’ व्यवस्थेच्या चौकटीतच समानता मागण्याचा तो भाग होता. लैंगिक संबंधात पुरुष ‘लैंगिकदृष्ट्या’ आक्रमकच असतात आणि स्त्रिया ‘समर्पण’वादीच असतात असा सार्वत्रिक समज आहे. या समजाला ‘शारीरिकदृष्ट्या (biologically) अपरिहार्य’ या तत्त्वज्ञानाने पुष्टीच दिली. डार्विनसारख्या अनेक शास्त्रज्ञांनी या ‘अपरिहार्यवादाला’ (essentialism) आपल्या सिद्धान्तांनी भक्कमपणा दिला. स्त्री-पुरुष लैंगिकता आणि लैंगिक प्रेरणा यांचे विश्लेषण करणारी ही नैसर्गिकवादाची अथवा अपरिहार्यवादाची जी चौकट होती, तिला विरोध करणारा प्रवाह साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच उदयाला आला. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राईड यांनी तर ‘लैंगिकतेच्या दृश्य आविष्काराची मुळे मनुष्याच्या अलैंगिक प्रेरणांमध्ये व सुप्त इच्छा-आकांक्षांमध्ये असल्याचे’ म्हटले. तसेच लैंगिक कृती अशा अदृश्य प्रेरणांच्या वाहक असतात, इतके स्पष्टपणे अलिंगिकतेचे विश्लेषण केले आहे. खरे तर हा ‘अपरिहार्यवादी’ चौकटीला जोरदार धक्काच होता. विशेषतः मायकेल फुको यांच्यासारख्या समाजशास्त्रज्ञांनी तर लैंगिक प्रेरणांची नैसर्गिकता आणि ‘अपरिहार्य’ता पूर्णपणे नाकारली. त्यांनी म्हटले की, लैंगिक प्रेरणा या मुख्यतः समाजाने आणि संस्कृतीने घडवलेल्या असतात (Sexual desires are socially constructed).

फुको यांच्या सैद्धान्तिक मांडणीचा स्त्रीवाद्यांना स्त्रीशोषणाबद्दल आपलं म्हणणं मांडण्यासाठी खूपच फायदा झाला. कारण एव्हाना स्त्रीमुक्ती चळवळीची दुसरी पिढी भिन्नलिंगी संबंधातील पुरुषी वर्चस्ववादी लैंगिकतेविरुद्ध ठामपणे उभी राहिली होती. पाश्चात्य स्त्रीवादी चळवळीत एव्हाना दोन प्रवाह दिसू लागले होते. एक साम्यवादी स्त्रीवादी (Socialist Feminist) आणि दुसरा जहाल स्त्रीवादी (Radical Feminist). सिमॉन द बोव्हांनी ‘सेकंड सेक्स’ लिहून भिन्नलिंगी संबंधांमधील स्त्रीच्या लैंगिक, सामाजिक आणि राजकीय-अर्थिक शोषणाचा ताळेबंद समोर मांडलाच, पण त्यांच्याही पुढे जाऊन सुझन ब्राऊन मिलर यांनी ‘अगेन्स्ट अवर बिल’मध्ये पुरुषाची लैंगिकता मूलतःच बलात्कारी स्वरूपाची असते (Every Man is Potential Rapist) असे म्हणून भिन्नलिंगी लैंगिकतेमधील हिंसात्मकता पुढे आणली. दुसऱ्या बाजूला साम्यवादी स्त्रीवादी स्त्रियांनी पुरुषी लैंगिकता ही वर्चस्ववादी असण्यामागे उत्पादनसंबंध आणि सामाजिक सत्ता / अधिकार संबंध (Power Relations) आहेत असे म्हटले. पाश्चात्य जहाल स्त्रीवाद्यांच्या ‘भिन्नलिंगी लैंगिक व्यवस्थेचा विरोध’ (Hetrosexual Institution) या विचारात इत्का प्रचंड जोर होता की, त्या चळवळीने सगळी समाजव्यवस्थाच ढवळून निघाली. जहाल स्त्रीवाद्यांपैकी काही गट भिन्नलिंगी संबंधांच्या कुटुंबसंस्थेविरुद्धच उभे राहिले आणि स्त्री-स्त्री समलिंगी संबंधांचाच पर्याय एकमेव पर्याय असू शकतो असे म्हणू लागले. भिन्नलिंगी संबंधांमध्ये असणारी पुरुषी लैंगिकता हीच स्त्रियांवरील सर्व प्रकारच्या अत्याचाराचे मूळ आहे असे त्यांनी मांडले. एड्रीन रीच या या ब्रिटनच्या जहाल स्त्रीवादी लेखिकेने पुरुषी लैंगिकतेमधील हिंसात्मकतेचे, आक्रमकतेचे आणि त्याच्याशी निगडित सर्व आर्थिक-सामाजिक अधिकार संबंधाचे (Power Relations) दाखले दिले आहेत. आणि भिन्नलिंगी व्यवस्था नाकारून त्यातील वर्चस्ववादी पुरुषी लैंगिकतेला स्त्री समलिंगी संबंधाचा पर्याय दिला पाहिजे अशी भूमिकाही मांडली.

जहाल स्त्रीवाद्यांची ही तिसरी पिढी केवळ पुरुष वर्चस्ववादी भिन्नलिंगी व्यवस्थेच्याच विरुद्ध उभी राहिली नाही तर समलिंगी संबंधस्त्रीवाद (Lesbianism) असा एक पर्यायी प्रवाह म्हणून उभा राहिला. त्यांच्या लढ्याला व्यापकतेचे परिमाण होते.  ती एक आक्रमक स्त्री चळवळ होती. या आक्रमक स्त्री समलिंगी स्त्रीवादी (Lesbian) प्रवाहातून तिसरी पिढी चौथी उदयास आली आहे, जी स्त्री समलिंगी संबंधाचा पुरस्कार करणारी आहे. परंतु तिसऱ्या पिढीतील आक्रमकतेच्या पर्यायी प्रवाहाचा जोरच त्यातून लुप्त झाला आहे, अशी खंत अलीकडे काही स्त्री अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. चौथ्या पिढीतील स्त्री समलिंगी प्रवाहाचा मुख्य भर स्त्री लैंगिक संबंधात जास्तीत जास्त आनंद (Pleasure Techniques) यावर आहे. स्त्री-स्त्री आकर्षण ही लैंगिक प्रेरणादेखील नैसर्गिक आहे असे म्हणणारी ही भूमिका बरीचशी अपरिहार्यता वादाच्या (essentialist theory) जवळ जाते असे एड्रीन रीच म्हणतात. व्यापकतेचे परिमाण असलेली स्त्रीसमलिंगी चळवळ (lesbianism) अशा तऱ्हेने खूप व्यक्तिकेंद्रित सुखवादाकडे (individualistic pleasures) जाता जाता कुठेतरी आपल्याच मर्यादांमध्ये अडकू लागली आहे. चळवळीचे पर्यायी प्रवाहाचे भान त्यातून हरवत चालले आहे, असे एका अभ्यासिकेने म्हटले आहे. कदाचित ही तात्पुरती ग्लानी असू शकते.

इतिहासाचार्य राजवाडे यांचा विवाहसंस्थेचा शोध

स्त्री-पुरुष लैंगिकतेबाबत अत्यंत भौतिकवादी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध घेऊन मांडणी करणारे वि. का. राजवाडे हे एकमेव इतिहासकार होते. १९२० ते १९२३ या काळात ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ आणि ‘राधामाधवविलासचंपू’ अशी पुस्तके लिहून भारतीय वर्णव्यवस्थेला उत्पादन संबंधाचा आणि संपत्तीवरील मालकीला स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधाचा शास्त्रीय पाया कसा आहे हे वैदिक वाङ्मयातून सप्रमाण दाखवून देणारे राजवाडे वादग्रस्त न ठरले तर नवलच.

‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ लिहीत असताना राजवाड्यांनी असे म्हटले की, आर्यांनी भारतात आल्यानंतर हळूहळू जी तथाकथित ‘सुसंस्कृत’ समाज व्यवस्था तयार केली, ती मूलत: भिन्नलिंगी असली तरी ती मातृवंशीय होती याचे पुरावे दिले आहेत. वसिष्टीपुत्र, गौतमीपुत्र असे शब्द किंवा अनेक देवतांच्या पुराणकथा आज आपल्या भारतातील मूळ मातुप्रधान कुटुंबव्यवस्थेबद्दल माहिती देतात. परंतु कौंतेय, राधेय, माद्रेय या शब्दांमधून मातेपेक्षा पुरुषाबद्दल जास्त माहिती देणाऱ्या मातृप्रधान व्यवस्थेपासून पितृप्रधान व्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या संस्कृतीबद्दल माहिती मिळते, असे राजवाडे म्हणतात.

वैदिक वाङ्मयातील स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाविषयी जे दाखले दिले गेले आहेत, ते पाहिले तर असे लक्षात येते की, प्राचीन भारतीय समाजजीवनात आज भिन्नलिंगी संबंधातील जी असमानता दिसते तितके तिचे त्या वेळी वर्चस्ववादी स्वरूप नव्हते. स्त्रियांना आपली लैंगिक प्रेरणा व्यक्त करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य होते.

‘विवाह’ म्हणजे शरीरसंबंध अशी स्पष्ट कल्पना असणाऱ्या हिंदू संस्कृतीत अनिर्बंध लैंगिक संबंधापासून बंदिस्त विवाहसंस्था तयार होण्यापर्यंत नेमकी केव्हा वाटचाल झाली याबद्दलचा खूप उद्बोधक आढावा राजवाडे घेतात. ते म्हणतात की, ‘टोळीबद्ध’ आर्य समाजात जोपर्यंत ‘मनुष्यसंख्याबळ’ निर्मितीसाठी व साधनसंपत्तीच्या वाढीसाठी प्रजोत्पादनाची गरज होती तोपर्यंत अनिर्बंध लैंगिक संबंधांना पर्याय नव्हता, परंतु पुढे उत्पादनसाधने, पशुपालन, संपत्ती हे सगळे जसजसे वाढत गेले आणि उत्पादन साधनांचे कौशल्य वाढविण्यासाठी विशिष्ट समाज गट एकत्र राहणे आवश्यक बनले तेव्हा जातिधंदेवाचक गट पडत गेले. या जातिधंदेवाचक गटांमधील भेद अभेद्य नव्हते. वर्ण, जाति बदलणे, कोणत्याही गटातील स्त्रीने किंवा पुरुषाने परस्परांशी लैंगिक संबंध ठेवणे शक्य होते. पण उत्पादनप्रक्रियेत सततपणे तेच काम आणि तेच हत्यार आणि अंगमेहनत करण्यामुळे ‘विशिष्ट कर्मफलां’ची निष्पत्ती वाढली, कौशल्य वाढले. त्यामुळे संपत्ती वाढली यातूनच हळूहळू वंशसंकराची क्रिया बंद पडली, विशिष्ट कौशल्याच्या जोपासनेसाठी कुटुंबव्यवस्थेची गरज निर्माण झाली आणि हळूहळू ‘विवाह’ संकल्पनेचा जन्म झाला. त्याचबरोबर लैंगिक बंधनांचाही जन्म झाला. चार जाती वंश-वर्ण व्यवस्थाही बंदिस्त झाल्या.

राजवाड्यांनी ठिकठिकाणी वैदिक वाङ्मयातील स्त्री-पुरुष लैंगिक संबंधांविषयी जे दाखले दिले आहेत ते पाहिले तर असे लक्षात येते की, प्राचीन भारतीय समाजजीवनात आज भिन्नलिंगी संबंधांतील जी असमानता दिसते तितके वर्चस्ववादी स्वरूप नव्हते. स्त्रियांना आपली लैंगिक प्रेरणा व्यक्त करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. उदा. उलपी अर्जुनाला म्हणते की, ‘मदनार्थ स्त्रीची इच्छा पुरवणे अथवा एक रात्र समागम हा अधर्म नाही’ (आदिपर्व २१४ अध्याय) किंवा ‘आश्रम स्त्रियांना गुरुपत्नीची ऋतुशांती करण्यास शिष्याला सांगितले’ म्हणजे गुरूपत्नीची ऋतुशांती आश्रमात येणाऱ्या कोणत्याही पुरुषाला करता येत होती असे दिसते (उत्तेजकाची कथा आदिपर्व २१४वा अध्याय). तसेच शास्त्राने उपभोग्य ठरविलेली कामूक स्त्री जर एकांतात भोग मागेल तर तो दिला पाहिजे नाहीतर धर्मदृष्टीने तो प्रमाद भ्रूणहत्या करणारा होता (आदिपर्व ४३ भा.वि.स.पृष्ठ १९१.१). यातून दुसरीही एक गोष्ट लक्षात येते. प्राचीन स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाचा केंद्रबिंदू ‘पुनरुत्पादन’ आणि संपत्ती रक्षणासाठी ‘वंशसातत्य’ असा होतो. लैंगिक संभोग प्रक्रियेतील असलेली स्पष्टता, जनेंद्रियांच्या कोणत्या ठिकाणी स्पर्श केल्यास उत्तेजना येते इत्यादी जे अनेक अथर्ववेदातील तपशील राजवाड्यांनी दिले आहेत. त्यातून लक्षात येतेच, परंतु भिन्नलिंगा समागमातील समान आनंद (equal pleasure) या मूल्यालाही त्या काळात महत्त्व होते असे लक्षात येते.

पंजाबमध्ये सधन शेतकरी समाजात आजही पति वारल्यास स्त्रीला तिच्या दिराशी लग्न लावावे लागते अशी पद्धत आहे. भारतात हिंदू विवाह पद्धतीत ‘कन्यादान’ केले जाते. आदिवासी समाजात ‘देज’ स्वरूपात पैसे, धन देऊन पत्नीला विकत घेतले जाते. आजही ग्रामीण बोलीभाषेत परक्या घरी मुलगी दिली, ‘विकली’ असे शब्द प्रचलित आहेत. या सगळ्यात स्त्रीला मालमत्ता मानण्याची जी संकल्पना आहे, त्यातून एक गोष्ट सहज दिसते की, तिच्या सर्व तनमनधनावर पुरुष नियंत्रण आहे. पुरुषाला (पित् – ‘पा’ म्हणजे पालनकरता) प्राचीन काळात रक्षणकर्ता म्हणून जे अधिकार प्राप्त झाले होते, त्यांचे नंतर व्यवस्थेत स्त्रीच्या लैंगिकतेवर सर्व प्रकारे निर्बंध ठेवण्याच्या अधिकारात रूपांतर झाले असल्याचे लक्षात येते.

स्त्री-पुरुष नात्यातील अधिकार संबंध

स्त्रीला संपत्तीचा भाग मानणाऱ्या संपत्ती असणाऱ्या समाजात तिच्यापासून मिळणाऱ्या संततीवरही विशेष अधिकार गाजवला जातो. साम्यवादी स्त्रीवाद्यांच्या मते उत्पादनप्रक्रियेमध्ये स्त्रीने केलेल्या उत्पादनावर तर अधिक गाजवला जातोच, पण तिच्या श्रमशक्तीलाही दुय्यम लेखले जाते. त्यामुळे स्त्रीवाद्यांचा मुख्य लढा या उत्पादनप्रक्रियेतील अधिकार संबंधाविरुद्ध (Power relation) असायला हवा असे त्यांना वाटते. स्त्री-पुरुष असामानतेची मुळे वर्गसंबंध आणि अधिकार संबंध यांमध्ये आहेत. आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण व अत्याचार हे त्याचे पर्यवसान आहे असे साम्यवादी स्त्रीवाद्यांना वाटते.

जहाल स्त्रीवाद्यांच्या (Radical feminist) मते स्त्री-पुरुष असमानता (Gender inequality) आणि लैंगिक वर्चस्वातून मुक्ती (Sexual liberation) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जेंडर लिंगभाव आणि लिंगभेद या दोन गोष्टी बारकाईने पाहायला हव्यात असे त्यांना वाटते. शारीरशास्त्रीयदृष्ट्या स्त्रीलिंगी व्यक्तीला दुय्यम मानणे किंवा स्त्री ही नैसर्गिक दृष्ट्याच अबला आहे असे मानणे हे अशास्त्रीय आहे. यालाच ‘Gender indentity’ लिंगभावाचे भान असणे म्हणता येऊ शकते. हा लिंगभाव सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रियेत घडवला गेलेला असतो असे त्यांचे म्हमणे आहे. हा लिंगभाव पुरुष वर्चस्ववादी आहे. लिंगभाव लैंगिक संबंधामध्ये पुरुषाच्या आक्रमक लैंगिकतेमधून आणि स्त्रीच्या लैंगिक संबंधांमध्ये पुरुषाच्या आक्रमक लैंगिकतेमधून आणि स्त्रीच्या लैंगिक षोषणातून व्यक्त होतो. म्हणून मूलत: लिंगभाव विरोधी चळवळ (Gender inequality) आणि लैंगिक मुक्ती चळवळ केल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही अशी त्यांनी मांडणी केली. गर्भधारणा आणि मातृत्व यामुळे त्या काळात स्त्रीच्या हालचालीवर विशेष मर्यादा पडतात या मर्यादांचा फायदा घेऊन पुरुषप्रधान समाजाने तिच्यावर परावलंबितता लादली आहे. या लादण्याला या स्त्रीवाद्यांचा विरोध आहे. पुरुषी लैंगिकता स्त्रियांवर लादण्याला तिसऱ्या पिढीच्या स्त्रीवादी चळवळीचा विरोध आहे.

मूलतत्त्ववादी विचारधारा (Essentialist theory)

सर्वत्र आढळणारी मूलतत्त्ववादी विचारधारा असे मानते की, मनुष्यातील लैंगिक भावना ही नैसर्गिक आणि अपरिहार्य असून या भावनेमुळे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे अगदी स्वाभाविक आहे. या लैंगिक प्रेरणेचा आविष्कार यौन संभोगात होतो. आणि असा संबंधच शरीरशास्त्रदृष्ट्या योग्य व निरोगी आहे. त्यामुळे वंशसातत्य राहते व ते राहावे याकरता या लैंगिक प्रेरणा सतत कार्यरत असतात. पुरुषाची लैंगिक प्रेरणा सर्वसाधारणपणे स्त्रीपेक्षा प्रबल असते आणि नेहमीच पुरुषाची भूमिका पुढाकाराची असते तर स्त्रीची भूमिका समर्पणाची असते.

या विचारधारेमुळे पुरुषांच्या वर्चस्ववादी लैंगिकतेला आणि त्यांनी लैंगिकता नियंत्रित करण्याला चांगलेच समर्थन मिळते. लैंगिकतेविषयी विचार मांडणाऱ्या मानसशास्त्रज्ञ स्त्रीवादी या सगळ्यांनी सतत या विचारसरणीवर हल्ला करूनच आपले विचार मांडले आहेत. स्त्रीवाद्यांनी यौनसंभोगाची प्रेरणा अजिबात नैसर्गिक नसून स्त्री-स्त्री लैंगिक संबंधामध्येही या प्रेरणांचा आविष्कार होऊ शकतो असे म्हटले. मूलतत्त्ववाद्यांनी असे संबंध किती अनैसर्गिक आहेत असे कितीही म्हटले तरीही या संबंधातही नैसर्गिक आनंद मिळू शकतो व ते संबंध समान पातळीवरील असतात असे त्यांचे म्हणणे आहे. मूलतत्त्ववाद्यांना विरोध करणाऱ्या अनेक विचारधारा आहेत.

लैंगिक प्रेरणांची सामाजिक घडण

मायकेल फुको या समाजशास्त्रज्ञाने ‘लैंगिकतेचा इतिहास’ या आपल्या तीन खंडांच्या पुस्तकात याविषयी खूप तपशीलात विश्लेषण केले आहे. त्यांनी ‘लैंगिक प्रेरणा नैसर्गिक असतात’ ही कल्पनाच नाकारली आहे. लैंगिक प्रेरणा या मुख्यत: धर्मशास्त्रातील तत्त्वज्ञान, मानसशास्त्राने दिलेली माहिती आणि समाजशास्त्रज्ञांनी केलेले विश्लेषण या सगळ्यांच्या संस्कारातून घडत जाते. उदा. चर्चसारख्या संस्थांचा माणसांशी नैतिक पातळीवर संवाद होणे तसेच इतर ज्ञानाच्या आधारावर परस्परांच्या क्रिया-प्रतिक्रिया होणे यातून लैंगिक प्रेरणांची घडण होते (Social construction of sexual desire) काही मूलतत्त्ववादी मानसशास्त्रज्ञांनी २ ते ४ वयोगटातील मुलांचे निरीक्षण करून असे मांडण्याचा प्रयत्न केला की, मुलांमध्ये मुलगे नैसर्गिकदृष्ट्याच मुलींपेक्षा आक्रमक असतात. शिवाय मुलगे त्यांच्या नकळतपणे मुलग्यांचे खेळ निवडतात. त्यावर कौहेलबर्ग या शास्त्रज्ञाने ‘Cognitive development theory’ या आपल्या संशोधनात असे सप्रमाण सिद्ध करून दाखवले की, मूल जन्माला आल्यानंतर सभोवतालच्या परिस्थितीचे जे आकलन करू लागते, त्यावेळीच त्याच्यासमोर प्रथम दोन लिंगामधली भेद समोर येतो. उदा. आई आणि वडील इ. या प्रक्रियेत त्यांची लैंगिक जाणीव वाढू लागते आणि नंतर ती सेक्सपासून जेंडर आयडेंटीटीपर्यंत उत्क्रांत होत जाते. (Sexual contradictions, Jenet scajer, page 13) पुरुषी वर्चस्ववादी लैंगिकतेमध्ये लहानपणापासून नकळतपणे शिरलेला हा लिंगभाव आपण कित्येक वेळा तपासून पाहण्याचे टाळतो.    

लिंग, लैंगिकता आणि लिंगभाव (Sex, sexuality and gender) या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मनुष्याच्या लैंगिकतेमधून त्याचा लिंगभाव व्यक्त होतो तर प्रत्येकाची लैंगिकता त्याच्या लिंगसापेक्ष असते असे पॅट कॅपलान या स्त्री अभ्यासिकेने म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ‘लैंगिकता प्रत्येक मनुष्याच्या स्वत्वाचा एक आविष्कार असतो. एखादा अनुभव तेव्हाच लैंगिक बनतो जेव्हा ती व्यक्ती सामाजिक प्रक्रियेत आकळलेले ज्ञान आचरणात आणते.’ (an experience becomes sexual by application of socially learned behaviour) (द कल्चरल कन्स्ट्रक्शन ऑफ सेक्शुअॅलिटी – पॅट कॅपलान प्रास्ताविक)

काही समाजशास्त्रज्ञांनी असे म्हटले की, गर्भधारणा आणि गर्भारपण या नैसर्गिक घटनांमुळे स्त्री अपरिहार्यपणे कमकुवत होत जाते. त्यामुळे तिला दुय्यम वागणूक दिली जाते. एंगल्स यांनी असेही म्हटले आहे की, स्त्रीला दुय्यम लेखण्याचा संपत्तीशी जवळचा संबंध आहे. त्यांनी म्हटले की हे खरे आहे की संपत्तीवान समाजामध्ये संपत्ताला वारस पाहिजे म्हणून स्त्रीवर गर्भारपण लादले जाते व तिला सामाजिकदृष्ट्या गुलाम बनविले जाते. परंतु संपत्ती नसलेल्या कष्टकरी वर्गातील स्त्रियांच्या दृष्टीने गर्भारपण ही दुहेरी आपत्ती ठरते. कारण मालकसुद्धा गर्भारस्त्रियांना पुरेसे श्रममूल्य द्यायला तयार नसतात. (Sexual contradictions-Janet Scajer, p. 5) गर्भारपण, बाळंतपण आणि संगोपन यामुळे स्त्रीची गुलामगिरी वाढते असे म्हणण्यामध्ये शरीर पातळीवरील कमकुवतपणा अनिवार्य आहे असे म्हणण्यापेक्षा त्यात सामाजिक अधिकारसंबंधामुळे तिची गुलामी वाढते असेच दिसते. शरीरशास्त्रीय पातळीवर लैंगिक भावनांची नैसर्गिकता मांडणाऱ्या मूलतत्त्ववादी शास्त्रज्ञांनी स्त्रीची लैंगिक भूक चेतवणाऱ्या अनेक घटकांचा विचार पुढे मांडला. या माहितीच्या आधारावरच मनुष्य लैंगिक कृती करतो. तर्कशास्त्र त्या त्या माणसाच्या मानसिक घडणीनुसारच तयार होते. म्हणजे एकंदरीत या लैंगिक प्रेरणा मनुष्याच्या घडणीवरच ठरतात.

 

लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

kundapn@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......