अजूनकाही
२६ ऑगस्ट हा ‘जागतिक श्वान दिन’ (International Dog Day). त्यानिमित्तानं कुत्र्यांविषयी काही रंजक व रोचक माहिती देणारी ही लेखमालिका सुरू झाली. त्यातला हा दुसरा लेख. ही लेखमालिका ‘Pedigree Dogs Exposed’ या बीबीसीच्या लघुपटावर आधारित आहे. पुढचा लेख येत्या सोमवारी प्रकाशित होईल.
.............................................................................................................................................
१८६७, गोयेट गुंफा (goyet caves), बेल्जियम. इथं जिवाश्मांचं उत्खनन करताना शास्त्रज्ञांना वेगवेगळे अवशेष मिळाले. ज्यामध्ये आपल्या अश्मयुगीन पूर्वजांची बरीचशी हाडं, वेगवेगळे दगड, हाडांपासून तयार केलेली हत्यार, मॅमोथ या प्राचीन विशाल हत्तीचे हस्तिदंत, आपले सगळ्यात जवळचे पूर्वज ‘neanderthals’ यांचे अवशेष इत्यादी अनेक गोष्टी सापडल्या. त्यात अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे कुत्र्यासारख्या प्राण्याच्या कवटीचा वरचा भाग. कार्बन डेटिंग पद्धतीनं मापन केलं असता लक्षात आलं की, ती कवटी साधारण ३३००० वर्षांपूर्वीची आहे. आणि त्या कवटीची ठेवण (morphology) बघता असंही लक्षात आलं की, ती कवटी धड कुत्र्याचीही नाही आणि लांडग्याचीही नाही, तर त्या दोन्हींच्या मधला दुवा आहे. लांडग्याचं कुत्र्यात रूपांतर होण्यामधला दुवा!
France creates replica Chauvet cave
१९९४, चौवेत गुंफा (chauvet caves), फ्रान्स. अगदी अलीकडेच शोध लागलेली पुरातत्त्व जागा. मानव इतिहासाचा दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा ठेवा असणारी. गुहांचा भिंतींवर, छतांवर प्राण्यांची शेकडो चित्रं आपल्या पूर्वजांनी रेखाटलेली आहेत. त्या आदिम चित्रांचं महत्त्व इतकं की, अगदी तशीच हुबेहूब rock formetions असणारी कृत्रिम प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गुहा फ्रेंच सरकारनं तयार केली आहे. तिथं तशीच्या तशी हुबेहूब चित्रं रेखाटून घेतली आहेत. तिथंच सामान्यांनी गुहेचा अनुभव घ्यायचा. बाकी मूळ गुहा फक्त शास्त्रज्ञांसाठी खुली. मूळ चित्रं मानवी हस्तक्षेपानं खराब होऊ नयेत म्हणून ही खबरदारी.
cave of forgoten dreams- Werner Herzog- Netflix documentary.
मूळ गुहेत हजारो वर्षांपूर्वी चिखलावर उमटलेले पायांचे काही ठसे शास्त्र्यांना मिळाले आहेत. ठशांचा आकारमानावरून ते ८-१० वर्षांच्या मुलाचे वाटतात आणि त्याचा बरोबर अजून एक प्राणी चालत आहे असं वाटतं. तो म्हणजे कुत्रा. जवळच दगडावर घासून मशाल विझवल्याच्या कोळशाच्या खुणा उमटल्या आहेत. त्याच्यावरून कार्बन डेटिंग पद्धतीनं मापन केलं असता त्याचा कालावधी निघाला २६००० वर्षांपूर्वीचा. माणूस आणि कुत्रा एकत्र चालायला लागल्याचं उदाहरण!
१९१४, बॉन ओबरकॅसल (bonn oberkassel), जर्मनी. बेसाल्टचा उत्खननात सापडलेली एक कबर. त्यामध्ये एक स्त्री, एक पुरुष आणि एक कुत्रा यांच्या अवशेषांबरोबर हाडांचे, दगडांचे आणि शिंपल्यांचे नक्षी केलेले दागदागिने. स्त्रीचं अंदाजे वय असावं २०-२५ वर्षं, पुरुषाचं ३५-४५ वर्षं, कुत्र्याचं सात-आठ महिने. कार्बन डेटिंग पद्धतीनं मापन केलं असता हे १४००० वर्षांपूर्वीचे अवशेष निघाले. ज्या अर्थी स्त्री आणि पुरुष एकत्र पुरलेत, त्या अर्थी ते एकमेकांचा अगदी जवळचे असावेत. आणि कुत्रा म्हणजे त्यांचा लाडका टॉमी?
२००८ साली आधुनिक डीएनए चाचणीच्या मदतीनं कुत्र्याच्या अवशेषांचा अभ्यास केला असता असं लक्षात आलं की, त्या कुत्र्याच्या पिल्लाला canine distemper हा कुत्र्यांमधला एक गंभीर आजार होता. कुत्र्याचं ते पिल्लू खरं तर खूप आधीच मरायला पाहिजे होतं, पण त्याच्या पालकांनी/ माणसांनी त्याची चांगली काळजी घेतली असावी. त्यामुळे निदान सात महिने तरी ते जगलं. माणूस आणि कुत्र्यामधला भावनिक बांध (emotional attachment) दृढ होण्याची सुरुवात!
लिखित इतिहासाला (written/documented history) अजून सुरुवात व्हायची होती. शेतीचा शोध लागून स्थिरस्थावर व्हायला माणसाला अजून हजारो वर्षांच्या अवधी होता. चाकाचा शोधही अजून लागला नव्हता. अन्नासाखळीतही माणूस अजून उच्चपदावर पोचला नव्हता. ना मोठी शिंगं, ना धारदार नख्या, ना सुळे, ना धिप्पाड देह, निसर्गाचा दृष्टीनं अगदी नाजूक-साजूक असे आपले पूर्वज होते. बुद्धी विकसित होऊन अंगठा वापरून वेगवेगळी अवजार वापरण्याचा काळा (Cognitive revolution) नंतर आत्ता कुठं आपण दगडावर दगड आपटून, त्यांना धार लावून, आकार देऊन त्यांचा हत्यार म्हणून वापर करायला लागलो होतो. आत्ता कुठं आगीचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळलं होतं. शिकार करून आणि फळं, कंदमुळं गोळा करून जगणारे हे आपले अश्मयुगीन पूर्वज होते.
अतिविशाल प्राणी (megafauna) पृथ्वीवर राज्य करत असण्याचा तो काळ. अतिविशाल हत्ती (mamoth), मोठाले केसाळ गेंडे (wooly rhinosoras), विशाल अस्वल (cave bears), खंजिरीसारखे लांब सुळे असणारे वाघ (saber tooth cat) आणि विशाल लांडगे (dire wolves) इत्यादी अनेक तगडे प्रतिस्पर्धी माणसाशी झगडा करत होते.
त्यात लांडगा (canis lupas) हा माणसाचा सगळ्यात मोठ्ठा प्रतिस्पर्धी. दोघांमध्ये बरीच समानताही. माणूस आणि लांडगा दोन्हीही सामाजिक प्राणी (social animals), कळपात/टोळीत राहणारे (pack animals), त्यात काहीएक सामाजिक स्तर असणारे (social stucture). जसं की, कुटुंबप्रमुख किंवा बुजुर्ग, अनुभवी व्यक्ती, उच्च पदावरचे नर आणि मादी, भक्ष्याला दमवून थकवून त्याची शिकार करणारे, एखाद्या मोठ्या कळपातून एखादं दुबळं सावज हेरून त्याला कळपापासून बाजूला करून मग मिळून आपलं संख्याबळ वापरून आपल्यापेक्षा कितीतरी पट मोठ्या प्राण्याला ठार करू शकणारे. खरं म्हटलं तर एक सारखेच, समान पातळीवर असणारे दोन्ही प्राणी. फरक एवढाच पडला की, माणसाचा मेंदू हळूहळू मोठ्ठा होत गेला, भाषा विकसित झाली, आगीला ताब्यात ठेवता यायला लागलं.
…तर लांडगा आणि माणूस हे एकमेकांच्या आजूबाजूनेच वास्तव्य करत असायचे. त्यामुळे कधी कधी दोन्ही प्राण्यांची एकमेकांबरोबर घमासान व्हायची. आगीचं तंत्र शिकल्यामुळे आणि भाषा विकसित झाल्यामुळे माणसं बऱ्याच बाबतीत त्याच्या या जुन्या प्रतिस्पर्ध्याला भारी पडायला लागली होती. त्यात माणसांच्या लहान लहान टोळ्या एकत्र येऊन एक मोठी टोळी बनायची आणि मोठ्या प्राण्यांची, कधी कधी अखंड कळपाची शिकार व्हायची. त्यांचं उरलंसुरलं खायला इतर मांसाहारी प्राण्यांची स्पर्धा लागायची. त्यात माणसाच्या आजूबाजूला राहणारे लांडगे आघाडीवर होते.
काही धीट लांडगे माणसाला न भिता लपूनछपून माणसांच्या टोळीच्या आजूबाजूला राहायचे आणि उरल्यासुरल्यावर आपलं पोट भरायचे. रोज शिकार करून खाण्यापेक्षा हे सोपं होतं. अन्न मिळण्याची खात्री होती. त्यामुळे जगण्याची आणि पुनरुत्पादन करत राहण्याची शक्यता जास्त होती.
असे माणसांच्या आजूबाजूला राहणारे लांडगे, हे त्यांच्या जंगली भाईबंदांपेक्षा स्वभावानं बरेच मवाळ (tame) झाले होते. ते शक्यतो माणसाचा वाटेला न जाता आपलं जीवन जगत राहायचे. माणसांनाही त्यांचा या सख्या शेजाऱ्यांचे फायदे जाणवायला लागले होते. लांडग्याचा कान आणि नाक तीक्ष्ण असल्यामुळे ते लांबून एखादा प्राणी (predeator) जवळ येत असला तरी आरडाओरड (भुंकून नाही. भुंकणं हे कुत्र्यांमध्ये फक्त माणसांशी संवाद करण्यासाठी खूप नंतर विकसित झालं आहे!) करून धोक्याचा सूचना द्यायचे. त्यामुळे माणसं सावध राहायची. मशाल वगैरे घेऊन तयार राहायची.
माणसांनी त्यांच्या या शेजाऱ्याचा आता स्वीकार केला होता. त्यातले जे जास्तच मवाळ होते, ते हळूहळू माणसांशेजारी शेकोटीच्या उबेलाही बसायला लागले. त्यांच्या तीक्ष्ण नाकाचं महत्त्व लक्षात येऊन मग माणसं त्यांना त्यांच्याबरोबर शिकरीलाही न्यायला लागली, सावजाचा अचूक मग काढत शिकार करणं सोपं व्हायला लागलं. यशस्वीपणे शिकार करण्याची माणसाची क्षमता कित्येक पटीनं वाढली. माणसांकडून मिळणाऱ्या अन्नाचा बदल्यात त्यांनी आपलं स्वातंत्र्य माणसांना बहाल केलं. हळूहळू ते माणसाचा स्पर्शही सहन करायला लागले. Oxytocin नं आपलं काम केलं आणि भयानक अशा लांडग्यांचं एका प्रेमळ प्राण्यात- कुत्र्यात रूपांतर झालं.
‘कुत्रा’ सगळ्यात पहिला माणसाळलेला प्राणी, माणसाळलेला एकमेव मोठा मांसभक्षक, माणसाचा सगळ्यात चांगला मित्र.
आत्ता अस्तित्वात असणारा लांडगा (grey wolf, canis lupas) हा आत्ताचा आपल्या कुत्र्याचा सगळ्यात जवळचा भाईबंद. इतका की दोन्ही मिळून healthy offspring तयार करू शकतात. काही शास्त्रज्ञांच्या मते कुत्रा हा लांडग्यापासूनच उत्क्रांत झाला. एक विचार असाही आहे की, लांडगा आणि कुत्रा हे दोन्ही एकाच पुरातन पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत. लांडग्याचं कुत्र्यात रूपांतर होण्याचा तो माणसाळण्याचा काळ ३०,०००-१५,००० इतक्या वर्षांपूर्वीच्या कालखंडातला असावा.
त्यांच्यात domastication नक्की कधी घडून आलं या बद्दलही दुमत आहे. काही जणांच्या मते ते युरेशियामध्ये झालं असावं, तर काही जण चीनमध्ये म्हणतात, तर काही जाण मध्यपूर्व हेही ठिकाण मानतात. असंही एक मत आहे की, domastication त्याच कालखंडात स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालं असावं आणि नंतर स्थलांतर करत जेव्हा दोन माणसांच्या टोळ्या एकत्र आल्या असाव्यात, तेव्हा हे वेगवेगळ्या ठिकाणी उत्क्रांत झालेले कुत्रेही एकत्र आले असावेत. अशा अनेक थिअरीज आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते माणसाच्या मदतीला कुत्रा आल्यामुळे त्याची यशस्वी शिकार करण्याची क्षमता वाढली. त्यानंतर तो अन्नसाखळीत सगळ्यात वर पोहोचला. त्याची झपाट्यानं प्रगती झाली. कुत्रा जर माणसाळला नसता तर हे अशक्य होतं.
खरं-खोटं काहीही असो, आज कुत्रा हा माणसाचा सगळ्यात चांगला मित्र झालेला आहे, हे नक्की!
Werner Herzog on the 'Cave of Forgotten Dreams'
............................................................................................................................................
या मालिकेतला पहिला लेख -
प्रमाणीकरणाच्या हव्यासामुळे खूप कुत्र्यांचे बळी जातात, जगभर!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3585
............................................................................................................................................
लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.
saurabhawani@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment