गांधींनी सर्वसंगपरित्याग केला तो दुसऱ्याची सेवा करण्यासाठी, दुसऱ्यांच्या आनंदासाठी!
सदर - गांधी @ १५०
लुई फिशर
  • ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 02 September 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi लुई फिशर Louis Fischer

प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : हिज लाइफ अँड टाइम्स’ या महत्त्वपूर्ण चरित्राचा मराठी अनुवाद ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ काल पुण्यात समारंभपूर्वक प्रसिद्ध झाला. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर, विचारवंत रावसाहेब कसबे आणि अनुवाद वि.रा. जोगळेकर यांच्या उपस्थित हा अनुवाद ए.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात प्रकाशित करण्यात आला. साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

पहिल्या जागतिक महायुद्धाचा मोठा परिणाम होऊन ब्रिटिश भारतातील सरकारविरोधी चळवळीला जोर चढला. काँग्रेसमधील मवाळ पक्षीयसुद्धा स्वराज्याची मागणी करू लागले. सप्टेंबर १९१५मध्ये मिसेस अ‍ॅनी बेझंट या इंग्रजी महिलेने भारतात ‘स्वराज्य संघटने’ची स्थापना केल्याची घोषणा केली, त्याचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी जुने जाणकार व्यक्तिमत्त्व असलेल्या दादाभाईंना राजी केले. अशा प्रकारच्या कामगिरीने अ‍ॅनीबाईंनी आपले नाव भारताच्या इतिहासात कायमचे नोंदले आहे.

त्यावेळी त्या सत्तरीच्या आसपास होत्या; त्यांचा जन्म १८४७चा. मानवी हक्कांच्या समर्थक आणि ब्रह्मविद्येच्या प्रवर्तक अशा नास्तिक, समाजवादी बेझंटबाई म्हणजे वादळी व्यक्तिमत्त्व होते. ‘झंझावाती मृत्यू ओढवून घेतलेले अलेक्झांड्रीयाचे हैपाथिया व गिऑरड्नो ब्रूनो यांनी माझ्या रूपाने पुनर्जन्म घेतला आहे’ असे त्या म्हणत. आपण ख्रिस्ताची वधू ठरावे अशी त्यांची इच्छा, त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. भारतात त्या परकीय असल्या तरी भारतीयांनी आदरणीय नेता म्हणून त्यांचा स्वीकार केला होता. त्यांच्या ठारी छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व होते. ठाम विचारसरणीच्या लेखिका व धाडसी राजकारणी अशा बेझंटबाईंनी भारतात बरेच लिखाणही प्रसिद्ध केले होते. त्यांनी भारताचे नागरिकत्त्व स्वीकारले होते. १९३३ साली त्यांचा मृत्यू झाला.

पवित्र गंगा नदीच्या काठी वसलेल्या बनारसला त्यांनी १८९२ साली एक विद्यालय स्थापन केले. पंडित मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू विश्वविद्यालयाच्या रूपाने या विद्यालयाचा विस्तार झाला. त्याच वर्षी त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. तीन दिवसांच्या त्या कार्यक्रमाला नामवंत व्यक्तींची उपस्थिती होती; अलंकाराने नटलेले कित्येक राजे-महाराजे महाराण्या, आणि सरकारी अधिकारी भरजरी पोषाखात हजर होते; शिवाय व्हॉइसरॉयही आलेले होते.

४ फेब्रुवारीला गांधींनी इथल्या सभेपुढे भाषण केले. परंतु ते पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना ते अर्धवट सोडावे लागले. तोपर्यंतच्या इतिहासात भारतीयांनी गांधींचे भाषण पहिल्यांदाच ऐकले असावे. अत्यंत स्पष्ट शब्दांत आणि उपस्थितांपैकी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ते म्हणाले, ‘कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविलेल्या उच्चपदस्थ महाराजांनी भारतात असलेल्या दारिद्रयाचा उल्लेख केला होता. इतर वक्त्यांनीही त्याचा जोरदार उल्लेख केला. परंतु माननीय व्हॉइसरॉय (लॉर्ड हार्डिंग) यांनी पायाभरणी केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी या भव्य मांडवात काय पाहायला मिळाले? पॅरिसहून मुद्दाम आणलेल्या जवाहिऱ्यांनी, नेत्याचे पारणे फेडणारे भव्य प्रदर्शन घडवले! मी या उच्चपदीय सरदारांची, भारतात पसरलेल्या लक्षावधी दरिद्री लोकांशी मनात तुलना केली. त्यानंतर या सरदारांना असे सांगावेसे वाटले की, आपल्या अंगावरील जडजवाहीर उतरून त्याचे एका सार्वजनिक विश्वस्त निधीत रूपांतर करावे; तेवढे केल्याने भारतीयांची दारिद्रयाच्या शापातून मुक्ती होईल.’

‘वाहवा!’ विद्यार्थ्यांनी एकच गिल्ला केला, बऱ्याच जणांनी त्यास नापसंती दर्शविली तर काही राजपुत्रांनी सभात्याग केला. तरीही गांधी निर्भयपणे बोलतच राहिले. ‘एखाद्या मोठ्या शहरात राजेशाही इमला बांधण्याचे काम चालू आहे असे ज्या ज्या वेळी मी ऐकतो, त्या त्या वेळी मला वाटते की, शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशातून हे काम चालले आहे; मग ते ब्रिटिशांच्या भारतात असो, की स्वराज्यात असो, असेच पाहायला मिळते.

‘शेतकऱ्यांच्या कष्टांतून निर्माण झालेली सगळी संपत्ती आपण किंवा अन्य कोणीही लुटून नेली तर स्वराज्याला काहीच अर्थ राहाणार नाही. वकील, डॉक्टर्स किंवा धनवान जमीनदार हे आपले प्रश्न सोडवू शकणार नाहीत, तर ते प्रश्न शेतकरीच सोडवू शकतील. म्हणून काँग्रेसवाल्यांनो सावध व्हा!’ गांधी बलवानांपुढे आपले निशाण फडकावीत होते. वास्तविक ते तर पददलितांचे निशाण होते.

‘या सायंकाळी मी मुख्यत: निष्ठावान विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आहे. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या आध्यात्मिक निष्ठेच्या जीवनाशी जगातील अन्य कोणीही बरोबरी करू शकणार नाही. मात्र केवळ मोठ्या तोंडाने जगापुढे त्याचे प्रतिपादन करीत राहिलो तर ते आज चुकीचे ठरेल. आपण आपल्या बडबडीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध किंवा प्रभावित करीत असू तर तो बडबडीचाही अतिरेक ठरेल. आपल्या तडफदार कृतीनेच आपण त्यांच्या हृदयाला भिडले पाहिजे.

‘आज या सायंकाळी उच्च व पवित्र अशा विश्वविद्यालयाच्या प्रांगणात मला न शोभणाऱ्या भाषेत आपल्याच देशबांधवांना हे ऐकविण्याची पाळी आली आहे. हे आपल्या सर्वांनाच लज्जास्पद, खाली मान घालायला लावणारे आहे.’

आपल्याच चिंतनात मग्न असल्यासारखे गांधी बोलत होते. ‘गेल्या पन्नास वर्षांत आपण आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतले असते, तर आज आपण कोठल्या कोठे पोचलो असतो! आपल्या देशाला एव्हाना स्वातंत्र्य मिळाले असते! त्यातून आपल्यामध्ये विद्वान व्यक्ती निर्माण झाल्या असत्या; आपल्याच देशात परकीयांप्रमाणे न नांदता त्यांनी देशाच्या हृदयाशी संवाद साधला असता; आपल्या गरीबातल्या गरीब लोकांत ते मिळून मिसळून राहिले असते; आणि त्यातून जे निर्माण झाले असते, ती आपल्याच राष्ट्राची वडिलोपार्जित कमाई ठरली असती.’ या भावनात्मक आवाहनाला तुरळक टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.

आपल्या तत्त्वज्ञानाचे थोडक्यात निवेदन करण्यासाठी त्यांनी अखेरीस जी भाषा वापरली, ती तेथे उपस्थित असलेल्या अमीर-उमरावांना धक्का देऊन गेली. ते म्हणाले, ‘केवळ पत्रव्यवहार करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही; किंवा आपण स्वातंत्र्यासाठी कसे पात्र आहोत हे मोठमोठी व्याख्याने देऊन सिद्ध होऊ शकणार नाही. आपण ते मिळवायला लायक आहोत, हे केवळ आपल्या कष्टांतून सिद्ध केले पाहिजे. आपण आपले राज्य कसे चालवणार? काहीही हातचे मागे न ठेवता मी बोलत आहे असे इथे आपल्याला वाटत असेल तर मुकेपणी वावरणाऱ्या लोकांच्या मनींचे बोल, सर्वांना ऐकू जाईल अशा शब्दांत मी बोलतो आहे असे समजा. सभ्यतेच्या मर्यादांचे मी उल्लंघन केले आहे असे आपल्याला वाटत असेल, तर स्वैरपणे बोलणाऱ्या मला कृपया क्षमा करा. काल सायंकाळी काशी-विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराला प्रदक्षिणा घालताना माझ्या मनात विचार तरळत होते... एक हिंदू म्हणूनच मी हे स्पष्ट बोलतो आहे! पवित्र मंदिराचा प्रदक्षिणा-मार्ग इतका अस्वच्छ का असावा? परिसरातील इमारती कशा अस्ताव्यस्त बांधल्या आहेत. गल्ली बोळ इतके अरुंद, वाकड्यातिकड्या वळणाचे आहेत की बघता सोय नाही. आपली मंदिरेच जर अप्रशस्त व अस्वच्छ असतील तर मग आपले स्वराज्य कसे असेल? -मग ब्रिटिशांकडून मुक्तता झालेल्या क्षणापासून आपली मंदिरे पावित्र्याची, स्वच्छतेची आणि शांततेची प्रतीके ठरतील काय?’

मंद श्रवणशक्ती असलेल्या माणसांना देखील ऐकू जाईल इतक्या स्पष्ट आवाजात आणि स्पष्ट शब्दांत त्यांनी आपल्याकडील जीवनाचे वास्तव चित्र उभे केले. ‘मुंबईच्या रस्त्यावरून चालत जात असताना दुतर्फा अनेक मजली इमारतींत राहणारी माणसे आपल्यावर थुंकी टाकतील या दडपणाखाली रस्त्यावरील लोक वावरत असतात; ही कल्पना किती अस्वस्थ करणारी आहे’. हे ऐकून तेथे उपस्थित असलेल्या कित्येक भारतीयांच्या भुवया वक्रावल्या. इंग्लिश माणसांच्या उपस्थितीत असे बोलणे योग्य आहे का? -आणि थुंकण्याचा हा विषय बनारस विश्वविद्यालयाशी किंवा स्वातंत्र्याशी कसा संबंधित आहे?

श्रोत्यांतून विरोधाची भावना निर्माण होत असल्याची जाणीव गांधींना होऊ लागली; तरीही त्यांनी आपले कडक बोलणे चालूच ठेवले. ‘मी नेहमी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत असतो. त्यातील अव्यवस्थेसाठी केवळ व्यवस्थापकांना दोष देऊन चालणार नाही. दुसऱ्यांच्या झोपायच्या बाकावर भारतीय लोकच नेहमी थुंकतात. रेल्वेमध्ये गोंधळ घालतात, ते इंग्रजीतही बोलतात. त्यांनी नॉरपॉक पद्धतीची जाकिटे घातलेली असतात; डब्यामध्ये राखीव आसनांवर आपल्यालाही बसण्याचा हक्क आहे असे समजून, बळजबरीने आपल्याला पाहिजे ते आसन बळकावतात. हे सगळे आपल्यापुढे मी खुल्या अंत:करणाने मांडतो आहे. स्वराज्याच्या मार्गाकडे वाटचाल करीत असताना आपण या गोष्टींत सुधारणा करायला नको का?’ मर्मभेदी व मनाला झोंबणारे असे गांधींचे ते उद्गार होते.

अटळ वाटणारे विचार मांडण्याचा दिवस अद्यापि मावळला नव्हता. त्या विचारांचा निर्देश करण्याचे अद्यापि बाकी राहिले होते. ‘गेल्या दोन-तीन दिवसांत आम्ही ज्या मानसिक खळबळ उडविणाऱ्या विचारांत गुंतलो आहोत, त्याचे पूर्ण कथन करणे आवश्यक आहे. बनारसच्या रस्त्यावरून जाणारे व्हॉइसरॉय पाहताना आमच्या मनाला चिंता लागून राहिली होती. ठिकठिकाणी गुप्तचर शिपायांची नेमणूक करण्यात आली होती. अर्थात त्यावर खुलेपणी किंवा आमंत्रितांच्या चर्चा होणे अपेक्षित नव्हते.’ गांधींनी तो विषय खुलेपणाने मांडला. ‘आम्ही भयचकित झालो. आम्ही स्वत:लाच प्रश्न विचारला की, असा गैरविश्वास कशासाठी? जिवंतपणीच्या असल्या मरणापेक्षा खरा मृत्यू पत्करला, असे लॉर्ड हार्डिंगना का वाटले नाही?

‘तथापि एका बलाढ्य सार्वभौम सत्तेच्या प्रतिनिधींना असे करून कसे चालेल? जागेपणीच्या मृत्यूपेक्षा जिवंत राहणे ही त्यांची जबाबदारीच होती. परंतु त्या गुप्तचर शिपायांचा आम्हाला का भुर्दंड?’

गांधींनी न टाळता येणारे प्रश्न उपस्थित केले होते. पण त्याला न टाळता येणारी उत्तरेही दिली. ‘आम्ही कितीही आदळ आपट करो,’ -गुप्तचर शिपायांच्या संबंधित भारतीयांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या, त्याविषयी गांधी पुढे म्हणाले, ‘आपणाला ते कितीही न आवडो, पण हे विसरता कामा नये की, आजच्या भारतीयांनी आपल्याच करणीने ही अराजकी परिस्थिती निर्माण केली आहे. मी देखील अराजक माजवणाऱ्यांपैकीच एक आहे.... परंतु तो जरा वेगळ्या प्रकारचा आहे... त्यांच्या अराजकतेत एक प्रकारची भीती दडली आहे. आपली ईश्वरावर श्रद्धा आणि भीतीयुक्त आदराची भावना असेल तर आपण व्हॉइसरॉय, गुप्तचर पोलीस, एवढेच नव्हे तर जॉर्ज राजेसाहेबांचीही भीती बाळगण्याचे कारण नाही!’

हळूहळू श्रोते अनावर होऊ लागले आणि त्यांच्यामध्ये आपसात वादविवाद सुरू झाले. गांधी आणखीही पुढे काही बोलायला लागणार, इतक्यात सभास्थानी अध्यक्ष असलेल्या अ‍ॅनी बेझंटनी त्यांना ‘आता कृपा करून खाली बसा’ असे ओरडून सांगितले.

त्यांच्याकडे वळून गांधी म्हणाले, ‘मी तुमच्या आज्ञेची प्रतीक्षाच करतो आहे. तुम्हाला जर असे वाटत असेल की या प्रकारे बोलून मी देशसेवा किंवा साम्राज्याची सेवा करीत नाहीये, तर मी माझे बोलणे थांबवतो.’ मिसेस अ‍ॅनी बेझंट थंडपणे म्हणाल्या, ‘कृपा करून आपला उद्देश स्पष्ट करा.’

‘तेच तर मी करतो आहे... स्पष्टपणे....’ समोरच्या गोंधळात गांधींचे पुढील शब्द विरून गेले.

‘पुढे चालू करा’ काही जण ओरडू लागले.

‘गांधी खाली बसा’ बाकीचे ओरडले.

थोड्या वेळात सभा शांत झाली. गांधींनी अ‍ॅनी बेझंट यांचे समर्थन केले. ‘त्यांचे भारतावर आत्यंतिक प्रेम आहे. मी तुमच्यापुढे स्पष्ट बोलतो आहे, त्यात मी चुकतो आहे असे त्यांना वाटल्यामुळे अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी मला त्यांनी परवानगी दिली असावी. तरुणांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आपला शोध घेण्यासाठी मी आमच्यावरच प्रकाश टाकला आहे.... काही वेळा आपल्याकडे दोष घेणे रास्त ठरते.’

त्याक्षणी सभेत एकच गोंधळ उडाला. कित्येक अधिकारी व्यक्तींनी सभात्याग केला. त्यामुळे गांधींनी आपले बोलणे थांबवले. मिसेस अ‍ॅनी बेझंटनी सभा विसर्जित केली. नंतर बनारसहून गांधी आपल्या साबरमती आश्रमाकडे परतले.

भारतात गावागावांतील अंतर लांबलचक असते, आणि प्रवासाची साधनेही कार्यक्षम नसतात. अगदी थोड्या लोकांनाच लिहिता वाचता येते. अगदी थोड्या लोकांकडेच रेडिओ असतो. बहुधा त्यामुळेच भारतीयांची कर्णेंद्रिये मोठी आणि संवेदनक्षम असतात. तरीही आश्रमात राहणारा एक पुण्यवान माणूस दारिद्रयाचे जीवन जगत जगत, दरिद्री माणसांचे समर्थन करीत असल्याची वार्ता भारतीयांच्या कानी १९१६ साली पडली. हा सामान्य माणूस धैर्याने आणि मागच्या-पुढच्या परिणामांना न घाबरता, श्रीमंत माणसांना तोंड देत उभा आहे हे त्यांना दिसले. तथापि अजून राष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती म्हणून गांधींची ओळख झाली नव्हती. लक्षावधी लोकांना ते माहीतही नव्हते. हळूहळू या महात्म्याची कीर्ती भारतभर पसरत होती. सत्ता आणि संपत्तीकडे भारतीय लोक दरारायुक्त भीतीने पाहात असतात; परंतु नम्रपणे गरिबांची सेवा करणाऱ्यांवर ते प्रेमच करीत असतात. मोठी संपत्ती, हत्तीदल, दागदागिने, सैन्य, राजवाड्यांचे वैभव असलेल्या लोकांबरोबर भारतीय लोक आज्ञाधारकपणे वागत असतात; आणि स्वार्थत्याग व सर्वसंगपरित्याग करणारी माणसे भारतीयांची हृदये जिंकतात.

मॅथ्यू अर्नाल्डने लिहून ठेवले आहे, ‘पौर्वात्य माणसे स्फोटापुढे वाकतात आणि त्याकडे सहनशीलतेने आणि खोल तुच्छतेने पाहातात. पण ज्या पौर्वात्य माणसांनी संपत्ती आणि सत्ता कमावली आहे, त्यांच्यापुढेही वाकून ते खोल तुच्छतेने पाहतात.’

म्हणून भारतीय माणसाला सर्वसंगपरित्यागाची जाण असते, त्याचा ते स्वीकार करतात. भारतात कित्येक मठाधिपती आणि संन्यासी आहेत. परंतु गांधींचा सर्वसंगपरित्याग हा केवळ सर्वपरित्याग या मर्यादेपुरता नव्हता. त्यांनी लोकांच्या हृदयाची तार छेडली होती. एका पत्रात ते म्हणतात की, ‘बाळाने शू करून भिजवलेल्या वस्त्रात आई नाइलाजाने झोपते असे नसून, बाळ कोरड्या वस्त्रात झोपी जावे अशी तिची इच्छा असते म्हणून!’

गांधींनी सर्वसंगपरित्याग केला तो दुसऱ्याची सेवा करण्यासाठी, दुसऱ्यांच्या आनंदासाठी!

.............................................................................................................................................

लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................                                                        

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......