‘साहो’ : कथा कमी, वळणं अधिक; तर्क कमी, मारधाड अधिक! 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘साहो’चं पोस्टर
  • Sat , 31 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie साहो Saaho प्रभास Prabhas श्रद्धा कपूर Shraddha Kapoor नील नितीन मुकेश Neil Nitin Mukesh

‘साहो’बाबत बोलत असताना त्यात एक महत्त्वाची भूमिका साकारणारा नील नितीन मुकेश म्हणाला की, सदर चित्रपटात काम करत असताना ‘क्रिस्टोफर नोलनच्या चित्रपटात काम करत असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. तसा तो चुकीचाही नाही. कारण, ‘साहो’मध्ये नोलनला लाजवतील असे ट्विस्ट्स आहेत. इथं एक ढोबळ कथानक आहे, पण संख्येनं त्याहून अधिक नि त्यावर कुरघोडी करणारे ट्विस्ट्स आहेत. आता इतके सगळे ट्विस्ट्स म्हणजे क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट अशी संकल्पना त्याच्या मनात आहे म्हटल्यावर त्याला असं वाटणारच.

मात्र, मुद्दा असा आहे की ‘साहो’मधील ट्विस्ट्स अतर्क्य आणि स्पष्टपणे बोलायचं झाल्यास बाळबोध आहेत. (जे नोलनबाबत कदापिही लागू होत नाही.) व्यावसायिक भारतीय चित्रपट तसेही कायम तर्कापासून दूर राहिलेले आहेत. तेलुगू चित्रपटही याला अपवाद नाहीत. पण, इथं तर्काच्या अभावासोबतच ‘चित्रपटकर्ते आणि चित्रपटातील पात्रं कित्ती हुशार आहेत!’ हे सांगण्याचा अट्टाहास आहे. अशा वेळी ‘साहो’ ज्या आत्मविश्वासानं इतके टुकार ट्विस्ट्स एकापाठोपाठ एक समोर आणत राहतो, ते खरंच कौतुकास्पद आहे!

‘साहो’चं कथानक दोन पातळ्यांवर चालतं. रॉयला (जॅकी श्रॉफ) पृथ्वीराजकडून (टिनू आनंद) एका परदेशस्थित माफिया गॅंगचा वारसा मिळालेला आहे. वाजी नामक देशात या गॅंगचा कारभार चालतो. पण, रॉय आपला कारभार मुंबईला हलवणार असतो. मात्र, त्यात यशस्वी होऊन मुंबईत येताच त्याचा खून होतो. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत घडलेल्या या घटनेनंतर रॉयचा मुलगा, विश्वांक (अरुण विजय) त्याचा वारसदार म्हणून समोर येतो. तर, पृथ्वीराजचा मुलगा, देवराज (चंकी पांडे) यामुळे नाखूष असतो. अपेक्षित ती वळणं येऊ लागतात आणि सत्तासंघर्ष सुरू राहतो. 

दुसरीकडे, भारतात, त्यातही पुन्हा मुंबईत पोलीस कुणा भुक्कड चोराला पकडण्याच्या प्रयत्नात असतात. बहुतेकांना अपयश आल्यानंतर अशोक चक्रवर्ती (प्रभास) या गुप्त पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती या केसवर केली जाते. मग त्या चोरानं (नील नितीन मुकेश) केलेल्या चोरीचा आणि रॉयच्या गॅंगचा संबंध जोडला जातो. मग ही दोन टोकं एकत्र येतात, त्यानंतर कथानकात अनेक वळणं येत राहतात. कथा कमी, वळणं अधिक. तर्क कमी, मारधाड अधिक. 

‘साहो’ म्हणजे एखादा चित्रपट कमी आणि एखादी जाहिरात किंवा एखादा म्युजिक व्हिडिओ अधिक आहे. त्याला असलेला एक नखशिखांत चकचकीत असा मुलामा, दर काही मिनिटांनी येणाऱ्या गाण्यांमध्ये दिसणाऱ्या अर्धनग्न स्त्रिया, त्या पार्श्वभूमीवर चालणारी उडत्या चालीची गुरू रंधावा, बादशाह, तनिष्क बागची ते थेट शंकर-एहसान-लॉय यांची गाणी म्हणजे इथली दृश्य-सांगीतिक वैशिष्ट्यं! चित्रपटकर्त्यांचा अर्धनग्न ललनांचा अट्टाहास त्याच्या पोलीस अधिकारी असलेल्या नायिकेलाही (?!) ‘सायको सैंय्या’ म्हणत नाचायला लावतो! मधल्या काळात एका गाण्याच्या निमित्तानं जॅकलिन फर्नांडिसदेखील तंग कपडे घालत नको तिथली खळी दाखवून जाते. 

प्रभास चित्रपटभर मख्ख चेहऱ्यानं वावरतो. चित्रपटभर अगदी भरभरून मारधाड असलेल्या दृश्यांमध्येही आपलं सौंदर्य आणि मेकअप सांभाळून असलेली नायिका साकारताना श्रद्धा कपूरकडून अभिनयाची अपेक्षा नसते (तशी ती कधीच नव्हती, किंबहुना अजूनही नाही). या दोन्ही मठ्ठ चेहऱ्यानं वावरणाऱ्या व्यक्ती जोडपं म्हणून शोभतात. अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणा की! 

या चित्रपटातील अ‍ॅक्शनदेखील अगदी महनीय नि अतर्क्य आहे. इतकी की ‘शॉटगन’ नामक भयावह बंदुकीतून निघालेल्या गोळीचा प्रभावही इथल्या विश्वात एखाद्या छोट्या पिस्तुलाइतका होतो. यापलीकडे जाऊन चित्रपटात येणाऱ्या ट्विस्ट्सची अतर्क्यता हा तर एक वेगळाच मुद्दा आहे. कारण, चित्रपट तीन तासांच्या लांबीत जे काही ट्विस्ट्स आणतो, ते खुद्द पात्रांकडून वदवून घेतले जातात. परिणामी ‘आमचा नायक किती हुशार आहे पहा!’ याचं प्रदर्शन मांडण्याच्या नादात चित्रपटकर्ते स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन मांडतात. 

‘साहो’ त्यातील अतर्क्य आणि दोषपूर्ण वळणांबाबत अब्बास मस्तानच्या ‘प्लेयर्स’ची (२०१२) आठवण करून देतो. याखेरीज कथानकाच्या पातळीवरही तो इतर अनेक चित्रपटांकडून काही ना काही उसनं घेत राहतो. अर्थात इतकी सारी ठिगळं एकत्र जोडूनही तो विस्कळीत आणि वाईटच राहतो हा भाग वेगळा. थोडक्यात, पटकथाकार-दिग्दर्शक सुजीत दोन्ही पातळ्यांवर एक अपरिपक्व अशी कलाकृती समोर घेऊन येतो. जी तिच्या तब्बल तीन तासांच्या लांबीमुळे कुणाही तार्किक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या सहन करण्याच्या पलीकडील ठरते. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख