अजूनकाही
युद्धामध्ये पहिला बळी सत्याचा असतो. ‘वॉर अँड पीस’ या कादंबरीतील हे एक भक्कम आशयसूत्र आहे. महाराष्ट्र पोलिसांनी हे आशयसूत्र सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे.
भीमा-कोरेगाव येथील स्मृतीस्तंभाला अभिवादन करायला गेलेल्या आंबेडकप्रेमींवर १ जानेवारी २०१८ रोजी जो संघटित हल्ला झाला त्याला ३१ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात झालेली एल्गार परिषद जबाबदार आहे, असा पोलिसांचा दावा आहे. एल्गार परिषदेचे आयोजक माओवादी होते, निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा उपयोग आयोजकांनी करून घेतला असाही पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. हे सर्व माओवादी आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुनाचा कट आखला होता असाही पोलिसांचा दावा आहे. यापैकी एक व्हर्नोन गोन्सालवीस. त्यांच्या जामिनाची सुनावणी सुरू असताना, फिर्यादी पक्षाने म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी असा दावा केला की, व्हर्नोन गोन्सालवीस यांच्याकडे लेव तोलस्तोयची ‘वॉर अँड पीस’ ही आक्षेपार्ह कादंबरी सापडली.
‘वॉर अँड पीस’ ही लेव तोलस्तोयची गाजलेली कादंबरी. या कादंबरीवर चित्रपट निघाले, दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती झाली, रेडिओवरही अनेक कार्यक्रम सादर झाले. या कादंबरीवर संगीतिका बसवण्यात आल्या, नाटकंही सादर करण्यात आली, अनेक चित्रकारांनी या कादंबरीतील अनेक प्रसंग चित्रांमध्ये उतरवले. केवळ रशियातच नाही तर इटली, इंग्लंड, अमेरिका अनेक देशांमध्ये. महाराष्ट्र पोलिसांना त्याची कानोकान खबर नाही. आणि खबर असली तरीही पुरावा रचायचा असतो, त्याच्या सत्यतेची फिकीर करायची नसते.
न्यायालयात जे काही मिळेल त्याला ‘न्याय’ म्हणतात आणि न्यायदान पुराव्यावर अवलंबून असतं. हा पुरावा पोलिसांनी गोळा करायचा असतो. त्यामुळे आपणच ‘न्याय’ ठरवतो अशी पोलीस यंत्रणेची धारणा असते. सलमान खानने दारूच्या नशेत कार चालवून अनेकांचे बळी घेतले, परंतु पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला. यामध्ये पोलिसांची भूमिका निर्णायक होती. महाराष्ट्र पोलिसांनी व्हर्नान गोन्सालवीस यांना अटक केली वा त्यांना सजा देण्यात ते यशस्वी झाले, तर सत्याचा बळी घेतल्याचा आनंद त्यांना होईल!
‘खलनिग्रहणाय’ या आपल्या ब्रीदवाक्याला महाराष्ट्र पोलिसांनी केव्हाच सोडचिठ्ठी दिली आहे. ‘सत्यमेव जयते’ या देशाच्या ब्रीदवाक्याशीही त्यांना देणं-घेणं नाही. सत्ताधारी पक्ष जे करायला सांगेल, त्यानुसार कारवाई करायची, असा त्यांचा साधा सरळ खाक्या आहे. भारतीय संस्कृती सहिष्णू आहे; सत्य, अहिंसा, अस्तेय याची बूज राखणारी आहे; स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि बंधुता यांचा पुरस्कार भारतीय संविधानाने केला आहे, अशी आपली प्रदीर्घ काळ समजूत होती. वास्तविक भारतीय समाजाच्या हिडीस रूपावरचा हा मुखवटा होता. हा मुखवटा दूर करण्याचं ऐतिहासिक कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल इत्यादी संघटना आणि केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या शासनानं पार पाडलं आहे. त्याबद्दल भारतीय मतदारांनी त्यांचं सदैव ऋणी राहायला हवं.
बुलंद शहरमध्ये दंगेखोरांनी एका पोलीस अधिकार्याची हत्या केली, त्या दंगेखोरांचं स्वागत जनतेनं केलं. दहशतवादी कृत्यामध्ये गुंतलेल्या, नथुराम गोडसे यांची आरती म्हणणार्या प्रज्ञा सिंग यांना भाजपने लोकसभेचं तिकीट दिलं आणि मतदारांनी त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी केलं. राजस्थानात एका हिंदू धर्माभिमान्यानं एका गरीब मुसलमान मजुराचा खून केला, त्याला जिवंत जाळलं, या कृत्याचं चित्रण मोबाईल फोनच्या कॅमेर्यावर केलं आणि सोशल मीडियावर प्रसारित केलं. या आरोपीला अटक झाली, तेव्हा शेकडो हिंदुत्वप्रेमींनी न्यायालयावर भगवा फडकवला होता.
उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इत्यादी राज्यांतील पोलिसांच्या आपण एक पाऊल पुढे आहोत. आपण थेट लेव तोलस्तोयच्या दाढीलाच हात घालू शकतो, याचा अभिमान महाराष्ट्र पोलीस आणि सत्ताधार्यांना आहे. देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील सत्ताधारी वर्गात—कायदेमंडळाचे सदस्य, प्रशासन, न्यायसंस्था इत्यादी, वाचन संस्कृती रुजलेली नाही, याचं हे प्रातिनिधीक उदाहरण आहे.
लेव तोलस्तोयचं नाव माहीत नसणं हे स्वाभाविक आहे. परंतु हे पुस्तक राजकीय व्यवस्था उलथून टाकणारं आहे, असा दावा आपण करत असू तर ते निदान वकिलाकडून वाचून घ्यायला हवं वा गुगल करून ‘वॉर अँड पीस’ ही कादंबरी व्यवस्था उलथून टाकणार्याला कशी प्रेरणा देते, किती देशांमध्ये या कादंबरीवर बंदी घालण्यात आली आहे, इत्यादी माहिती तरी पोलिसांनी गोळा करायला हवी होती. समाजामध्ये वाचन संस्कृती रुजलेली नसली की, मागासलेपणाचा अभिमान वाटू लागतो!
महाश्वेतादेवी या बंगाली लेखिकेच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटमध्ये— ‘प्रथम प्रतिश्रुती’ आणि ‘बकुल कथा’ या दोन कादंबर्यांचा उल्लेख केला होता. या दोन्ही कादंबर्या महाश्वेता देवींच्या नाहीत तर आशापूर्णा देवींच्या आहेत. त्यापैकी ‘प्रथम प्रतिश्रुती’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, या बाबी सुषमा स्वराज (त्यावेळी त्या परराष्ट्रमंत्री होत्या) वा त्यांच्या स्वीय साहाय्यकाला वा ज्याच्याकडून या कादंबर्यांची नावं मिळाली त्या व्यक्तीला माहीत नव्हत्या. असं ट्विट करून आपण केवळ आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करत नाही तर एका थोर लेखिकेचा अपमान करत आहोत, याचंही भान केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्याला नव्हतं. अर्थात त्यांच्यापुढे नरेंद्र मोदी यांचा आदर्श असावा! खुद्द पंतप्रधानच दिशाभूल करणारी, अर्धसत्य आणि असत्य विधानं करत असतात!!
या पंतप्रधानांना देशातील जनतेनं भरभरून मतं दिलेली आहेत. एकदा नव्हे तर दुसर्यांदा संधी दिलेली आहे. त्यामुळे असत्याला शक्ती प्राप्त होते. सत्य-असत्याचा विवेक, हिंसा-अहिंसा, कायद्याच्या राज्याचा आदर यांचा घनिष्ठ संबंध वाचन संस्कृतीशी आहे. कारण वाचन संस्कृती रुजलेल्या देशांमध्येच लोकशाही क्रांत्या झाल्या. अन्याय, अत्याचार, शोषण तिथे होतं वा अजूनही आहे, परंतु समाजजीवनाचे आदर्श वेगळे होते. भारतीय संविधानात त्याच आदर्शांचं प्रतिबिंब आहे. या आदर्शांची सांगड भारतीय संस्कृतीशी घालण्याचं कार्य घटना परिषदेनं केलं होतं. मात्र तो मुलामा होता. भारतीयांची मूळ प्रवृत्ती ७० वर्षांनंतर पुन्हा उसळी मारून वर आणल्याबद्दल भाजप-संघ परिवाराला शुभेच्छा द्यायला हव्यात. याही युद्धात सत्याचा पहिला बळी पडला आहे!
.............................................................................................................................................
लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत.
suniltambe07@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sachin Shinde
Sun , 01 September 2019
Desai Yani Ase mhantlay ki Pustake aslyane te gunegar siddha hot nahi. pan polisani ti mandali aahe ki aaroppatrat tyavar desaini hi pustake kashyasathi thevlit yacha khulasa karayala sangitala aahe
Sachin Shinde
Sun , 01 September 2019
Ekdam vastavdarshi lekh aahe
????? ??????
Fri , 30 August 2019
हा लेख चुकीच्या माहितीवर आधारित आहे.लिओ टॉलस्टाय यांच्या " वॉर अँड पीस" या कादंबरीचा उल्लेख आरोपपत्रात नाही. वृत्तसंस्थानीं दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल हायकोर्टाच्या न्यायामूर्तीनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ही बातमी दि २९/०८/२०१९च्या लोकसत्ता मध्ये आहे.
????? ??????
Fri , 30 August 2019
हा लेख चुकीच्या माहितीवर आधारित आहे.लिओ टॉलस्टाय यांच्या " वॉर अँड पीस" या कादंबरीचा उल्लेख आरोपपत्रात नाही. वृत्तसंस्थानीं दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल हायकोर्टाच्या न्यायामूर्तीनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ही बातमी दि २९/०८/२०१९च्या लोकसत्ता मध्ये आहे.