अजूनकाही
पुरुषी सत्तेचे हजारो हात
स्त्री-पुरुष लैंगिक प्रेरणांची अपरिहार्यता सांगणाऱ्या फुको आणि सायमन यांनी दिलेली उत्तरे शरीरशास्त्र पातळीवरची होती. पण स्त्रीवाद्यांचा लढा सामाजिक पातळीवरील स्त्री-पुरुष विषमतेविरुद्ध होता. त्यामुळे त्या सतत हेच मांडत आल्या की पुरुषांनी स्त्रीवर लादलेली लैंगिकता आम्ही नैसर्गिक का मानावी? आज आपल्या भारतातही ‘कन्यादानां’सारखे विधी कोणताही प्रश्न न विचारता स्वीकारतो किंवा स्त्रीला संपत्ती मानणाऱ्या, समजणाऱ्या अनेक रूढी तशाच पुढे चालू देतो. संपूर्ण स्त्री जीवनाला जखडून टाकणारे पुरुषी लैंगिक नियंत्रण कसे असते याचे स्पष्टीकरण अमेरिकन अभ्यासक कॅथलीन गॉफ यांनी दिले आहे. त्यांनी पुरुषी नियंत्रणाचे आठ मार्ग सांगितले आहेत -
१. स्त्रियांची लैंगिक भावना नाकारणे
आजच्या कुटुंबव्यवस्थेत स्त्रीला लैंगिक भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही. तिच्यावर चारित्र्यशुद्धीच्या, यौनीशुचितेच्या पावित्र्याच्या इतक्या कल्पना लादल्या गेल्या आहेत की, तसे धाडस करणारी स्त्री पतिता समजली जाते. आपल्याकडे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागणे हे त्याचेच निदर्शक आहे. श्रीरामाने एका धोब्याचे ऐकून सीतेचा त्याग केला हे खरे नाही तर एका विशिष्ट सांस्कृतिक मानसिकतेतून तिचा त्याग केला. स्त्रीचे समलिंगी संबंध रोगट आहेत म्हणूनच केवळ अस्वीकारार्ह आहेत असे नाही तर तिला तिची लैंगिक धारणा व्यक्त करण्याचा अधिकार नाही हे कारण आहे.
२. पुरुषाची लैंगिक भावना स्त्रियांवर लादणे
स्त्रियांवर होणारे बलात्कार मग ते विवाहांतर्गत असो अथवा विवाहबाह्य, पुरुषी लैंगिकता लादण्याचाच तो भाग आहे. लैंगिक साहित्यातून स्त्री शरीराचे वस्तुकरण झालेले असून स्त्री शरीराचा कणनकण उपभोग्य वस्तूसमान असल्याचे लक्षात येते. ‘समाजाचे स्वास्थ्य जपण्यासाठी वेश्याव्यवसायाची आवश्यकता आहे’ असे म्हणणारे लोक पुरुषी लैंगिकतेची आक्रमकताच अप्रत्यक्षपणे सुचवतात. वाङ्मयातून ‘आक्रमक पुरुष किंवा धसमुसळे पुरुष स्त्रियांना आवडतात’ किंवा स्त्री शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या प्रवृत्तीचे वर्णन कथा-काव्य नाटकांमधून दिसते.
३. स्त्रीला पुरुषाची संपत्ती समजणे
या समजातूनच स्त्रीच्या श्रमावर आणि तिने केलेल्या उत्पादनावर अधिकार गाजवला जातो. कुटुंबासाठी त्याग, निरपेक्ष प्रेम अशा कल्पनांचे उदात्तीकरण करूनच तिला कुटुंबसंस्थेच्या चौकटीची मर्यादा आखून दिली आहे. गर्भारपण, गर्भनिरोधन आणि बाळंतपण याबाबतचे सर्व निर्णय पुरुषाच्या हातात असल्याने स्त्रीला स्वत:च्या शरीरावर स्वत:चा हक्क राहिलेला नाही. यातूनही एखाद्या स्त्रीने या चौकटीबाहेर जायचे ठरवल्यास तिला चेटकीण ठरवले जाते.
४. मुलांवर बापाचा हक्क दाखवून त्यांना स्त्रीपासून तोडणे
स्त्रीप्रमाणेच तिने निर्माण केलेल्या उत्पादनावर आणि जन्म दिलेल्या मुलांवरही आपलीच संपत्ती मानून हक्क गाजवला जातो. ज्यावेळी एखादी स्त्री बंड करते आणि या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिची मुले तिच्यापासून हिरावली जातात. घटस्फोटानंतर मुलांचा विशेषत: मुलग्यांच्या ताब्याच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर तयार झालेला दिसतो. स्त्रीलिंगी गर्भ पोटातच मारून टाकणारी प्रवृत्ती या लैंगिक राजकारणाचाच भाग आहे.
५. स्त्रियांच्या शारिरीक हालचालींवर बंधने घालणे
स्त्रियांवर सततपणे मातृत्व लादून, बलात्कार करून, विधवा स्त्रीचे केशवपन करून, तिला अंधाऱ्या खोलीत राहायला लावून, स्वायत्त होऊ पाहणाऱ्या स्त्रियांचे चारित्र्यहनन करून, तिच्यावर शारिरीक हल्ले करून आजपर्यंत नेहमीच तिच्या हालचालींवर बंधने आणली गेली आहेत.
६. स्त्रियांचे वस्तुकरण करणे
महाभारतात द्रौपदीच्या शरीरावर पाच पुरुषांचा लैंगिक अधिकार होता एवढेच नव्हे तर तिला दानाची वस्तू म्हणून द्युतात वापरले गेले. इतक्या प्राचीन काळापासून स्त्रीचे वस्तुकरण झालेले आहे. ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ या वाक्यातील स्त्रीचा लैंगिक उपभोग्यतेबरोबरच इतरही वस्तूशी तुलना होऊ शकते ही भूमिका आजवर जाहिरातींमधील, चित्रपटांमधील सर्व गाण्यांतून ठायी ठायी व्यक्त होताना दिसते.
७. स्त्रियांना सामाजिक ज्ञानापासून वंचित ठेवणे
स्त्रियांना सामाजिक ज्ञानापासून वंचित ठेवल्याने त्या तेच गुलामगिरीचे वास्तव स्वीकारून त्यावुरुद्ध बंड करायला धजावत नाहीत हे सत्य महात्मा फुले आणि राजाराम मोहन राय यांना उमगले होते हे सर्वश्रुतच आहे. आजही मर्दानी कामे वेगळी आणि स्त्रियांची कामे वेगळी असे विभाग करून स्त्रियांना तांत्रिक ज्ञानापासून वंचित ठेवले जाते.
८. स्त्रीच्या मानसिक स्वायत्तेवर, सर्जनशीलतेवर बंधने घालणे
स्त्रियांच्या स्वायत्त विचारावर सर्जनशीलतेवर अनेक बंधने असल्यामुळे आजपर्यंत वाङ्मयात स्त्रियांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होऊ शकला नाही. संपूर्ण इतिहास आणि वाङ्मयाची निर्मिती पुरुषी दृष्टिकोनातून झालेली दिसते.
कॅथलीन गॉफ यांनी सांगितलेल्या या ढोबळ वैचारिक चौकटी मधून आजच्या समाजव्यवस्थेकडे पाहिले तर स्त्रियांवरील अत्याचाराची मुळे स्त्रीवरील पुरुषांच्या लैंगिक वर्चस्वामध्ये सापडतात. म्हणूनच जहाल स्त्रीवादी स्त्रिया ही भिन्नलिंगी संबंधांची चौकटच नाकारतात. एड्रीन रीच या ब्रिटनच्या स्त्रीवादी लेखिका आपल्या ‘Copulsary Hetrosexuality’ या पुस्तकात भिन्नलिंगी व्यवस्थेवरच हल्ला चढवतात.
सक्तीची भिन्नलिंगी कुटुंबव्यवस्था
एड्रीन रीच या स्त्रीसमलिंगी संबंधाचा पुरस्कार करणाऱ्या काळ्या स्त्रीवादी लेखिका आणि कवयित्री आहेत. अत्यंत सूक्ष्म पातळीवरील सैद्धांतिक चर्चा करणाऱ्या या पुस्तकात प्रचलित विवाहसंस्थेतील स्त्री-पुरुष लैंगिक संबंध नैसर्गिक का मानावेत असा प्रश्न त्या विचारतात. हजारो वर्षांच्या मानवी विकासात हेच संबंध नैसर्गिक आणि निरोगी आहेत असे ठसवले गेले म्हणून आपण ते आहे तसेच स्वीकारले आहेत. परंतु हे पुरुषी लैंगिकतेचे वर्चस्व आणि नियंत्रण नाकारण्याची वेळ आली आहे.
रीच असे म्हणतात की स्त्री समलिंगी संबंधाकडे कसे पाहिले जाते-
१. ती काही स्त्रियांची निवड आहे.
२. ते काहीतरी अनैसर्गिक रोगट आहे.
३. ती भिन्नलिंगी संबंधाची प्रवृत्ती आहे. म्हणजे नवरा-बायको या नात्याचीसुद्धा
४. हे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीबद्दल वाटणारे अनावट नैसर्गिक आकर्षण आहे. थोडक्यात तीसुद्धा एक शारीर प्रेरणा आहे.
रीच हे चारही दृष्टिकोन पूर्णपणे अमान्य करतात. त्या ‘सामाजिक घडणवादी’ विचारसरणीच्या पुरस्कार करतात आणि त्या या प्रक्रियेतील अनेक पुरावे सादर करतात. लैंगिक निवडीचा अधिकार आज कोणत्याही स्त्रीला नाही. आज ९९.९ टक्के स्त्रिया ज्या भिन्नलिंगी व्यवस्थेत पुरुषी लैंगिक वर्चस्वाची शिकार बनल्या आहेत, त्याला त्या स्त्रियांची निवड कशी म्हणावी? स्त्रियांच्या आजूबाजूच्या परिस्थितीत लैंगिक प्रेरणांच्या मानसिक घडणीतून तयार झालेली समलिंगी प्रेरणा जेव्हा स्त्रियांनी व्यक्त केली आहे तेव्हा समाजाने त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला आहे. भिन्नलिंगी संबंधातील पुरुषी वर्चस्वामुळे, अत्याचारामुळे स्त्रीची जी मानसिक घुसमट होते, त्यावेळी कोंडमाऱ्याला वाट करून देण्यासाठी ती समाजपातळीवरील समलिंगी संबंधाचा आधार शोधते. आजवरच्या इतिहासात एकटे जगू पाहणाऱ्या किंवा स्वायत्त होऊ पाहणाऱ्या स्त्रियांना कित्येक वेळा समलिंगी संबंधांचा आधारही शोधला आहे. त्यांची समाजाने निंदानालस्ती केली आहे किंवा त्यांना चेटकिणी ठरवून त्यांचे निर्दालन केले आहे. घरातील विधवा किंवा अविवाहित स्त्रिया याच्या बळी ठरल्या आहेत. आजही भारतात पतिनिधनानंतर एकटेपणाचा, मानसिक छळाचा जाच सहन करण्यापेक्षा स्त्रिया सती जाणे पसंत करतात असेही निरीक्षण रीच यांनी मांडले आहे.
कोणताही लैंगिक प्रेरणा मग ती स्त्री-स्त्रीसंबंधाची असो किंवा भिन्नलिंगी, ही आंतरिक नैसर्गिक नसते तर ती सामाजिक सांस्कृतिक प्रक्रियेत घडलेल्या मानसिकतेचा परिपाक असते अशी स्पष्ट मांडणी त्या करतात. पुनरुत्पादन प्रक्रियेची गरज म्हणून स्त्रियांची आंतरिक लैंगिकप्रेरणा अपरिहार्यपणे भिन्नलिंगी असते असे मानण्यामुळेच पुरुषांचे लैंगिक वर्चस्व नकळतपणे स्वीकारले गेले आहे. आज सामाजिक प्रक्रियेत घडलेली पुरुषांची लैंगिक प्रेरणा अपरिहार्यपणे आक्रमक आणि हिंसात्मक आहे असे त्या म्हणतात. म्हणूनच स्त्रीदास्य अंतासाठी ही भिन्नलिंगी व्यवस्थाच नाकारून समानपातळीवरील स्त्री समलिंगी संबंधाचाच एकमेव पर्याय आहे असे त्या ठरवतात.
रीच यांच्या विचारातील वादळी जोर पाहिला की प्रथम बिचकून जायला होते. भिन्नलिंगी व्यवस्थेवरील हल्ला आपल्या अंगावर येतो. तो विचार प्रथमदर्शनीच स्वीकारायला जड जाते कारण आमच्या पदराशी पुरुषी लैंगिकतेचे कडू-गोड अनुभव असतात. रीच आमच्या अनुभवाच्या ठेव्याला हात घालतात आणि त्यातील फोलपणा उलगडून दाखवतात.
१९७०च्या आसपास स्त्रीमुक्ती चळवळीला असे वाटत होते की, स्त्रिया दबलेल्या, दडपलेल्या स्थितीत राहण्यामागे त्यांचे जीवन अधिकारहीन असणे आणि लैंगिकदृष्ट्या त्यांचे जीवन नियंत्रित असणे ही कारणे आहेत. त्यांच्या लैंगिक क्षमतेची जाणीव करून दिल्याने त्या पुरुषी वर्चस्वाला तोंड देऊ शकतील. लैंगिक जीवनात पुरुषाने आक्रमक असणे आणि स्त्रीने समर्पणवादी असणे अशा ठाम समजुती काढून टाकल्या पाहिजेत. पुरुषाने केव्हाही आपली लैंगिक प्रेरणा स्त्रीवर लादावी आणि स्त्रीने नेहमीच ‘गेटकीपर’सारखे संयमन करावे हे नाते नैसर्गिक नाही असे सर्वच स्त्रीमुक्तीवाद्यांनी ठामपणे सांगितले. पुरुषाने अन्नवस्त्रनिवाऱ्याच्या बदल्यात आपली लैंगिक प्रेरणा लादून सुख घ्यावे यामुळे या लैंगिक नात्याला वस्तुरूप देवाणघेवणाचे स्वरूप आले आहे. उदा. आपल्याकडे ‘एरियल’च्या जाहिरातीमध्ये पुरुष घरकामात स्त्रीला मदत करतो, कपडे धुतो हे पाहून लगेच स्त्री-पुरुष समानता जाहीरातींमध्ये आली असे मानण्याचे काही कारण नाही. कारण लगेचच त्या जाहीरातीतल पुरुष सूचकपणे म्हणतो, ‘वसूल कर लुंगा!’ म्हणजे मी पत्नीला घरकामात केली तरीही तिच्या लैंगिकतेवरील हक्क अजिबात सोडणार नाही. म्हणूनच कॅथलिन मॅक्फीनॉन या स्त्री अभ्यासिका म्हणतात की, लैंगिक संबंधातील पुरुषाची आक्रमकता ही सांस्कृतिक अस्मितेचाच एक भाग बनली आहे. त्यामुळे बलात्कारामध्ये असो की मत्सरी लैंगिक संबंधात, स्त्रीचे शरीर आपली मालमत्ता असल्याचीच भूमिका व्यक्त होते. या भूमिकेतून भिन्नलिंगी संबंधात अपरिहार्यपणे आक्रमकता आणि हिंसात्मकता आलेली आहे.
नुकतेच शंकराचार्यांनी तर एका वर्षापूर्वी साक्षी महाराजांनी आणि त्यापूर्वी मोहन भागवत यांनी असे विधान केले आहे की, स्त्रियांनी कमीत कमी दहा अपत्यांना जन्म द्यावा. जणू स्त्री ही त्यांच्या दृष्टीने प्रजननाचे यंत्रच आहे. स्त्रीला माणूस म्हणून पाहण्यापेक्षा आपल्या उपभोगाचे साधन म्हणून पाहणे हेच यात दिसते. हे म्हणजे एका वेळी चार-पाच पिल्ले देणाऱ्या उंदीर-मांजराच्या पातळीवर आणून ठेवण्यासारखे आहे. प्राण्याच्या पातळीवर आणण्यापेक्षाही जास्त यात संपूर्णपणे या लेखात वर सांगितलेली स्त्रियांच्या लैंगिकतेवर हरप्रकारे नियंत्रण ठेवणारी पुरुषसत्ताक मनोवृत्ती आहे, जी इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात मनूने ‘मनुस्मृती’मध्ये लिहून ठेवलीय. प्रत्येक स्वायत्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीला आपल्या कह्यात कसे ठेवता येईल हाच एकमेव विचार सनातनी बुरसटलेल्या विचारांच्या पुरुषांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एकीकडे अवकाशात संशोधन करणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांचे कौतुक करायचे, बंदिस्त घरांचे उंबरठे ओलांडणाऱ्या स्त्रियांना शक्तीरूप द्यायचे, दुर्गा, महिशासुर मर्दिनी देवीचे रूप द्यायचे आणि तेवढेच त्या स्त्रियांना लक्ष्मणरेषेच्या आत ओढण्यासाठी मुलांना जन्म देणारे यंत्र बनवून उंबरठ्याच्या आत खेचायचे. म्हणून या मनुवादी वृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडाच!
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
kundapn@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment