सत्ता सामान्यांच्या श्रद्धा आणि भावनांचा आधार घेऊन बळकट होते. त्यासाठी सामान्यांची प्रतीकं, श्रध्दास्थानं, त्यांचा इतिहास यांचा वापर मोठ्या खुबीने सत्तेकडून केला जातो. आपल्या राजकीय मुल्यांप्रमाणे इतिहासाची रचना व्हावी यासाठी सारेच सत्ताधीश प्रयत्नशील असतात. अकबर सत्तेत आला तेव्हा त्याने मोगलांच्या इतिहासाचे लेखन करण्यासाठी समिती नेमली. पुढे अनेक मोगल बादशहांनी हाच कित्ता गिरवला. इंग्रजांनीही तेच केले. इलियट, डाउसन, जेम्स मिल, कर्नल टॉड अशा शेकडो इतिहासकारांना वसाहतवादी अंगाने भारताचा इतिहास लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. पुढे इंग्रज गेले. पण ही भूमिका बदलली नाही. स्वतंत्र भारतात आणि पाकिस्तानात इतिहासाच्या पुनर्लेखनाचे, इतिहासावर सत्तासूत्रे लादण्याचे अनेक प्रयत्न होत राहिले. इतिहासातून राष्ट्रीय अस्मिता आणि राष्ट्रवादाची अधिष्ठानं मजबूत करण्याचे प्रयत्न झाले. पण इतिहास काही बदलला नाही. इतिहासाच्या आकलनाची दृष्टी बदलली म्हणून इतिहासाची साधने बदलली नाहीत. उलट ती साधने इतिहासाच्या वस्तुनिष्ठ आकलनाची गरज मांडत राहिली.
बाबरी मसजिद आणि रामजन्मभूमी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जमीन वादाचा निकाल महिन्याभरात येण्याची अपेक्षा आहे. बाबर आणि त्याचा इतिहास या प्रकरणाशी संबधित आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा इतिहास चर्चिला जाणार आहे. त्यानिमित्ताने बाबर आणि बाबरी मसजिदच्या अनुषंगाने ही पाच लेखांची मालिका. त्यातील हा दुसरा लेख... पुढचा लेख येत्या गुरुवारी प्रकाशित होईल.
.............................................................................................................................................
बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता. ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसूत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती टिकली नाही. काही दिवसांतच बाबर पदच्युत झाला. सत्ता गेल्यानंतर त्याच्या नशिबी भटकंती आली. तो निर्वासितांसारखा भटकत राहीला. पित्यानंतर बाबरला कुणी मार्गदर्शक मिळाला नाही. परिस्थितीने पदरात टाकलेला प्रत्येक अनुभव पाठीशी बांधत बाबर प्रगल्भ होत गेला. त्याने अनेक संकटे झेलली. उपासमार सहन केली. १४९७ ते १५०४ पर्यंत त्याने भटकंतीत आयुष्य काढले. त्याचे सर्व सहकारी त्याला सोडून गेले. १५०४ मध्ये त्याच्याजवळ फक्त दोन सैनिक शिल्लक होते.१ बाबर त्याच्या एका कवितेत म्हणतो,
‘‘भाग्याने पदरी बांधलेले कोणती संकटे मी झेलेली नाहीत? कोणती हानी सहन केली नाही?
या हृदयाने सर्व काही सहन केले. हाय, असे कोणते संकट आहे जे मी भोगले नाही.’’
अशा दयनीय अवस्थेतून तो पुन्हा उभा राहिला. १५०४ मध्ये त्याने काबुल ताब्यात घेतले. बाबरचे चरित्रकार लेनपुल यांनी काबूल जिंकण्याआधीची त्याची परिस्थिती वर्णिली आहे. ते म्हणतात, ‘‘तो बागेत मृत्युच्या प्रतीक्षेत पडला होता. पण त्याच्या नशीबाने नवे वळण घेतले.’’२ काबुल जिंकल्यानंतर बाबर १५२४ पर्यंत तेथे राज्य करत राहिला. काबुलचा प्रादेशिक विस्तार अत्यंत कमी होता. त्यामुळे तुटपुंज्या महसुली उत्पन्नात गुजराण करणे अशक्य झाले होते. नवा प्रदेश साम्राज्याला जोडणे गरजेचे होते. त्याचा साम्राज्यविस्ताराचा विचार सुरू होता. पित्याचे राज्य पुन्हा जिंकण्याचा पर्याय समोर होता. पण याच काळात त्याला राणा संगा आणि दौलतखाँ लोदी यांनी भारतावर हल्ल्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर बाबरने १५१९ ते १५२४ पर्यंत भारतावर हल्ल्याचे चार प्रयत्न केले. या हल्ल्यामध्ये तो काहीसा अपयशी ठरला. मात्र २१ एप्रिल १५२६ रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात त्याने इब्राहिम लोदीचा पराभव करून दिल्लीत आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि बाबर भारतात स्थायिक झाला.
बाबरने शब्दबद्ध केलेला भारत
‘बाबरनामा’ हे बाबरचे आत्मचरित्र. त्याला ‘वाकेआनामा’ किंवा ‘तुज्क इ बाबरी’ असेही म्हणतात. बालपण आणि तारुण्यातील काही वर्षे वगळता बाबरने दररोज घडलेल्या घटनांची माहिती यात दिली आहे. प्रत्येक घटना प्रामाणिकपणे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या अनेक चुका प्रांजळपणे कबूल केल्या आहेत. स्वतःचा लाजरेपणा, पराभवाच्या वेदना, गाजवलेले शौर्य, भोगलेले दुःख अशा सर्वच नोंदी यात आहेत. तो ज्या ज्या प्रदेशांत गेला, त्यांच्याविषयी त्याने लिहिले आहे. काही प्रदेशांवर त्याने कवितादेखील केल्या आहेत. काबूलवर अधिकार जमवल्यानंतर त्यावर एक शेर लिहिला आहे. त्यात तो म्हणतो,
‘‘गवत आणि फुलांमुळे श्रावणात काबुल स्वर्गात रूपांतरीत होते.
त्याशिवाय बारान आणि गुलबहारचा मौसम अद्वितीय आहे.’’
याप्रमाणेच गजनी, खुरासान आणि भारतावरदेखील त्याने काही शेर लिहिले आहेत. ‘बाबरनामा’ हा ग्रंथ हजारो पानांमध्ये विस्तारलेला आहे. त्यामध्ये बाबरने भारताविषयी केलेल्या लिखाणावर एक छोटेखानी पुस्तक होईल इतकी त्या लिखाणाची व्याप्ती आहे. भारतावरचे त्याचे लिखाण कुतूहलाने व्यापलेले आहे. त्याने भारतातल्या लहानसहान बाबींची दखल घेतली आहे. नद्यांची माहिती विस्ताराने दिली आहे. एखाद्या प्रदेशाची भौगोलिक वर्णने नकाशा शब्दबद्ध केल्यासारखी आहेत. प्रत्येक प्रदेशातील झाडांच्या, फळांच्या प्रजातींपासून प्राणी आणि पक्ष्यांची निरीक्षणेदेखील त्याने नोंदवली आहेत. भारतीयांच्या जगण्यातल्या वेगळेपणाची त्याने दखल घेतली आहे. इथली निसर्गसंपत्ती, जैवविविधता यांचा इतका अभ्यास मध्ययुगात अपवादानेच कुणी केला असेल.
‘बाबरनामा’मध्ये ताड, लिंबू, नारळ, अक्रोड, आवळा, चिरोंजी, चिंच, जांभुळ, खिरनी, कमरख, कटहल, महुवा, बडहल, बोर अशा ५० हून अधिक भारतीय फळांची माहिती आहे. यातील बहुतांश फळांची नावे मध्ययुगीन फारसी भाषेत असल्यामुळे ती कोणती आहेत, याचा अंदाज बांधता येत नाही. जी फळे बाबरच्या देशातही पिकत होती, त्यांच्या आणि भारतीय जातीच्या फळात कोणता फरक होता, हेही त्याने सांगितले आहे. आंब्याविषयी बाबर म्हणतो, ‘‘आंबा हिंदुस्तानचे मोठे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्तानी लोक ‘ब’चा उच्चार अशा प्रकारे करतात, जणू त्यापुढे कोणता स्वर नसावा. उदा. ‘अम्ब’. त्यामुळे त्याचा उच्चार योग्य वाटत नाही, म्हणून काही लोक त्याला ‘नगजक’ म्हणतात. ख्वाजा खुसरो (अमीर खुसरो) लिहितात,
‘‘नगज के मा नगज कुने बुस्तां
नगज तरीन मेवये हिंन्दुस्तां ।’’
(माझी सुंदरी, (आंबा) बागेचे सौंदर्य वाढवणारे फळ, हिंदुस्तानातील सर्वोत्तम फळ)
बाबरने भारतीय समाजाची तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती देताना अनेक विद्वानांचे संदर्भ दिले आहेत. त्यावरून भारतीय समाजाच्या अभ्यासाठी त्याने कोणत्या ग्रंथांचा आधार घेतला होता हे स्पष्ट होते. खुसरोंसोबत, अल् बेरुनी, जियाउद्दीन बरनी वगैरेंच्या साहित्याचाही त्याने अभ्यास केला होता.
फळांसोबत फुलांविषयीही बाबरने विस्ताराने लिहिले आहे. जास्वंदीच्या फुलाचे बारकावे त्याने सांगितले आहेत. गुलाबाच्या फुलाशी तुलना केली आहे. शेतीशी निगडीत वनस्पती आणि जनावरांची माहिती दिली आहे. त्यासोबतच हत्ती, घोडे, माकड, खारी, मोर आणि पोपटाच्या वेगवेगळ्या प्रजातींचे त्याने जवळून निरीक्षण केले होते. शेतकऱ्यांचे जगणे, त्यांची जमीन कसण्याची पद्धती याची प्रत्यक्ष माहिती घेतली होती. प्रत्यक्ष माहिती घेऊनच तो नवा विषय समजून घ्यायचा. काश्मीरचे वर्णन करताना ‘मी तेथील प्रदेशाची माहिती घेण्यासाठी काही स्थानिकांशी संवाद साधला, पण त्यांनी माहिती दिली नाही.’ म्हणून बाबरने दुःख व्यक्त केले आहे. तर एकदा त्याला विहिरीवर पाणी काढण्यासाठी लावलेली रहाट दिसली, ती त्याने चालवून पाहिली. कित्येक वेळा त्याद्वारे पाणीही काढले.३ एखादे नवे तंत्र, जगण्यातील वेगळी पद्धत त्याला दिसली की, तो त्याची खोलात जाऊन माहिती घ्यायचा. ती ‘बाबरनामा’मध्ये विस्ताराने नोंदवायचा.
संपूर्ण ‘बाबरनामा’मध्ये असेच लिखाण अनेक ठिकाणी आढळून येते. अनेक शहरांची माहिती येते. त्या शहरातील बोलीभाषा व त्यातील शब्द, भाषेचा हेल, लोकांचा पेहराव, स्त्रियांचे जगणे, खानपान, आहारातील बदल यासह अनेकविध विषयांवरचे बारकावे टिपलेले आहेत. बाबरमुळे तत्कालीन भारतीय समाजाचा अभ्यास करण्यास भरपूर मदत होते.
बाबर त्या अर्थाने भारतीय उपखंडातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या मानवी जीवनाचा मध्ययुगीन अभ्यासक आहे. खुरासान, गजनी, काबूलमध्ये कैक वर्षं जगलेला बाबर भारतात आला आणि भारतीय समाजात तो सामावून गेला. पण त्याला भारतीय समाज समजून घेताना बराच त्रासही सहन करावा लागला.
जगण्यातले अडथळे, बाबरची टीका आणि स्तुती
बाबर तुर्कवंशीय. तुर्कांचे जगणे भारतीयांपेक्षा निराळे. त्यांचा पेहराव, खानपान, नैसर्गिक रचना भारतीयांपेक्षा वेगळी. बाबर भारतात आल्यानंतर त्याला भिन्न जीवनपद्धतीच्या अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याचा त्रागा व्हायचा. उष्ण वातावरणात जगणे अवघड व्हायचे. तेव्हा इथे बर्फ मिळत नाही म्हणून ‘बाबरनामा’मध्ये त्याने टीका केली आहे. काही फळे मिळत नाहीत म्हणून नाराजीही व्यक्त केली आहे. याच आवेषात भारताविषयी त्याने व्यक्त केलेली काही मते स्विकारता येत नाहीत. मात्र त्याच्या सबंध लिखाणात द्वेषाचा अंश नाही किंवा स्वतःच्या मातृभूमीच्या तुलनेतला तिटकारा नाही. निरीक्षणे टिपण्यात बाबर निरपेक्ष होता. त्यांवर त्याने कधीच अभिनिवेष लादले नाहीत. स्वमताग्रह धरला नाही. भारतात जे काही दिसले, ते जसेच्या तसे त्याने आपल्या आत्मचरित्रात मांडले. त्यातील सौंदर्यस्थळे त्याने दाखवून दिली.
बाबर मर्मग्राही चिंतक होता. त्याच्या चिंतनाचा निसर्ग हा मुख्य घटक आहे. मानवी समाजाच्या विविध रूपांचे अनेक पडसाद त्याच्या समग्र लिखाणात सातत्याने जाणवत राहतात. भारताविषयी त्याच्या निरीक्षणांत अशा अनेक गोष्टींचा भरणा आहे. तो म्हणतो, ‘‘हिंदुस्तान मोठा विस्तृत प्रदेश आहे. मनुष्य आणि सर्जनाने हा प्रदेश परिपूर्ण आहे. हिंदुस्तान पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या इकलिममध्ये (ऋतुंमध्ये) मध्ये स्थित आहे. याचा कोणताच भाग चौथ्या इकलिममध्ये मोडत नाही. हा खूप आश्चर्यजनक देश आहे, जर आपण याची तुलना आपल्या देशाशी केली तर तो एका वेगळ्या विश्वासमान भासू लागेल. येथील पर्वत नद्या, जंगल, नगर, शेती, पशु आणि पाऊस तथा हवा सर्व भिन्न आहेत. काबुलच्या जवळच्या स्थानातील गरम सीर (गरम भूभाग)च्या काही गोष्टी हिंदुस्थानशी मिळत्याजुळत्या आहेत. मात्र सिंधु नदी पार केल्यानंतर सर्व प्रदेश हिंदुस्थान सारखा दिसायला लागतो. भूमी, जल, वृक्ष, टेकड्या, मानवी समूह, आचार विचार आणि प्रथा.’’४ (भाषांतर प्रस्तुत लेखकाचे)
बाबर भारताच्या भौगोलिक विस्ताराने मोहीत झाला होता. पुनरुक्तीचा दोष पत्करून त्याने याविषयी ‘बाबरनामा’मध्ये सातत्याने उल्लेख केला आहे. इथल्या ऋतुमानाचे त्याला विशेष आकर्षण होते. त्याविषयी तो लिहितो, ‘‘हिंदुस्तान एक विस्तृत असा मोठा देश आहे. त्याच्यामध्ये सोन्या-चांदीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाच्या ऋतुंमध्ये वाहणारे वारे आल्हाददायी असते. येथील पावसामुळे कधी कधी एका दिवसात दहा–दहा, पंधरा–पंधरा, वीस-वीस वेळा ढगांमधून पाण्याचा वर्षाव होतो. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होते. जेथे पाण्याचा थेंबही नसतो तेथे नद्या–नाले वाहायला लागतात. पावसामध्ये आणि पावसाच्या नंतर आल्हाददायी वारे वाहतात. येथील पावसाचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य हे आहे की, बाण अनुपयोगी ठरतात. बाणांचा काय विषय? इथे ग्रंथ, पोषाख आणि अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते.
कधी कधी पावसाच्या दिवसाऐवजी उन्हाळ्यात देखील वारा वेगाने वाहतो. काही वेळा तर त्याचा वेग इतका असतो की, त्याला वादळाचे स्वरूप प्राप्त होते. भारतात व्यवसायांची विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकाच व्यवसायातील लोक मोठ्या संख्येत असतात. गरजेवेळी एकच काम करणारे हजारो माणसं उपलब्ध होतात. मुल्ला शरफुद्दीन यजदी ‘जफरनामा’मध्ये लिहितात, जेव्हा दगडांनी जुमा मसजिद बांधली तेव्हा दोनशे दगडावर नक्षीकाम करणारे कारागीर अझरबैजान, फारस आणि भारतातून गोळा केले होते. या तुलनेत भारतामध्ये दगडावर नक्षीकाम करणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज यावरून देखील बांधता येईल की, जी इमारत मी आग्रा शहरात बनवायला सुरुवात केली आहे, त्यासाठी फक्त आग्रा शहरातून ६८० दगडकाम करणारे कारागीर उपलब्ध झाले आहेत. सिकरी, बयाना, दौलतपूर, ग्वाल्हेर, कोल येथे ज्या इमारती उभारणीचे काम हाती घेतले आहे, ते १४०० दगडकाम करणारे कारागीर काम करत आहेत. यावरून अंदाज बांधता येईल की, भारताच्या काही विशिष्ट व्यवसायात हजारो माणसे कार्यरत आहेत.’’५
भारताच्या भुगोलाप्रमाणे बाबरने इथल्या मानवी समाजाविषयी त्यांच्या व्यावसायिक परंपरांवर भाष्य केले आहे. इथले लोक वर्षानुवर्षे परंपरेने हे एकच व्यवसाय करत असतात, असे तो म्हणतो. त्याचे हे निरीक्षण अल् बेरुनीच्या जातसंस्थेवरील भाष्याशी साम्य पावणारे आहे. भारतीय समाजाच्या विविध घटकांविषयीही बाबरने अशाच पद्धतीने विश्लेषण केले आहे.
भारताविषयी आत्मीयता
बाबरने भारतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर प्रचंड गतीने साम्राज्याचा विस्तार केला. भारतातच त्याला स्थैर्य मिळाले. त्याने भारताच्या सत्तेविषयी इश्वराचे आभार मानले. त्याविषयीच्या शेरमध्ये तो म्हणतो,
‘‘शेकडो धन्यवाद दे, हे बाबर उदार, क्षमा करणाऱ्याला
त्याने प्रदान केले आहेत तुला हिंद आणि सिंध सारखे राज्य
जरी तू सहन करू शकत नाहीस येथील उष्णता
जर तुला थंड दिशा पहायची असेल तर ते पहा तिकडे गजनी आहे.’’६
हिंद आणि सिंधचे राज्य तुला मिळाले म्हणून तू ईश्वराचे आभार मानले पाहिजेत. जरी या प्रदेशातील वातावरण तुला योग्य वाटत नसले तरी तू हे सहन करायला हवेस. कारण गजनीत थंडी असताना तुला किती त्रास सहन करावा लागला. सारे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आणि ईश्वराने तुला हिंद आणि सिंधसारखे राज्य देऊन तुझ्यावर कृपाच केली आहे.
भारताविषयीच्या आत्मीयतेचा बाबरचा हा विचार काव्यापुरता मर्यादित नाही. त्याने तो प्रत्यक्ष कृतीतही उतरवला. २४ फेब्रुवारी १५१९ ची एक घटना यासंदर्भात उल्लेखनीय आहे. त्याचे काही सैनिक भिराच्या नागरिकांची लूट करत होते. ही बातमी समजल्यानंतर बाबरने काही अन्य सैनिकांना पाठवून त्यांना कैद करायला लावले. त्यातील काहींना त्याने मृत्युदंड दिला तर काहींची नाके कापून त्यांची छावणीतून धिंड काढायला लावली.७ जे लोक आपली अधिसत्ता कबूल करतात त्यांच्याशी आणि शेतकऱ्यांशी आपल्या मित्रांसारखा व्यवहार करायला हवा असे त्याचे मत होते.
भारतीयांशी सद्व्यवहार करण्याविषयी तो लिहितो, ‘‘हिंदुस्तानवर अधिकार जमवण्याची माझी तीव्र इच्छा होती. हा भिन्न देश, भीरा, खुशआब, चिनाब आणि चिनिउत कोण्याकाळी तुर्कांच्या अखत्यारीत राहिले आहेत. त्यामुळे मी त्याला आपले मानत होतो. त्याला शांतीपूर्वक किंवा युद्धाद्वारे, ज्यापद्धतीने शक्य असेल आपल्या आधिकारात आणण्याचा निश्चय केला होता. त्या कारणानेच या पर्वतरांगांबद्दल सदव्यवहार आवश्यक होते. त्यामुळे मी आदेश दिला की, शेतकऱ्यांना, जनावरांना कोणत्याच प्रकारचे नुकसान पोहचवू नये. इथपर्यंत की त्यांच्या सुताच्या तुकड्याला आणि सुईलादेखील कोणतीही हानी पोहचू नये.’’८
बाबरला इथल्या लोकजीवनाचे, त्यांच्या गरजा, उत्पादनसंस्था, श्रमाची विभागणी याविषयी आश्चर्य वाटायचे. ती सारी व्यवस्था एखाद्या संहितेने बद्ध असावी अशा पद्धतीने चालते, पण वास्तवतः शासनाने तसे कोणतेच नियमन केलेले नाही, हे पाहून तो थक्क व्हायचा. भारतीय समाज या अर्थाने स्वयंभू आहे असे त्याचे म्हणणे होते.
बाबरने भारताविषयी केलेल्या लिखाणात मध्ययुगीन ग्रंथलेखन पद्धतीप्रमाणे बाजारातील नियम, तोलन–मापन पद्धती, स्थानिक गणिताचे शास्त्र, घड्याळ वापरण्याचे नियम, वेळेची विभागणी, महसुली उत्पन्न, प्रादेशिक पिकांची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या डायरीत केलेले लिखाण प्रासंगिक आहे. त्या काळाची ती नोंद आहे. पण त्या डायरीचा समग्र अभ्यास केल्यास तो एखादा ग्रंथ असावा आणि एखाद्या अभ्यासकाने नियोजनपूर्वक, प्रचंड कष्ट करून त्याची रचना केली असावी असा भास होतो. मध्ययुगात सर्वप्रथम अल् बेरुनीने भारतीय समाजाचा अभ्यास केला. त्यानंतर इब्न बतुता, जियाउद्दीन बरनी वगैरेंनी अभ्यासाची ही परंपरा समृद्ध केली. याच अभ्यासकांच्या परंपरेत बाबरला सन्मानानेच स्थान आहे.
.............................................................................................................................................
हेही पहा, वाचा
बाबर जसा होता, तसा कधी मांडला गेला नाही. बाबर जसा हवा, तसा मात्र मांडला गेला!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3574
.............................................................................................................................................
संदर्भ
१) डॉ. नागोरी, एस. एल. आणि कांता नागोरी, बाबर, पृष्ठ क्र. १४, २०१७
२) लेनपुल, बाबर, पृष्ठ क्र. ८८
३) प्रख्यात इतिहासकार सय्यद अतहर अब्बास रिजवी यांनी मूळ फारसीवरून भाषांतरीत केलेला बाबरनामा, मुगलकालीन भारत (बाबर), बाबरनामा, पृष्ठ क्र. २५, १९६०, नवी दिल्ली
४) कित्ता, पृष्ठ क्र. १६८-६९
५) कित्ता, पृष्ठ क्र. २००
६) कित्ता, पृष्ठ क्र. २००
७) कित्ता, पृष्ठ क्र. १०२
८) कित्ता पृष्ठ क्र. ९९
.............................................................................................................................................
लेखक सरफराज अहमद हे टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आणि गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूरचे सदस्य आहेत.
sarfraj.ars@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment