अजूनकाही
गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन जंगलाला आग लागली आहे. ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जगभर हा चर्चेचा विषय झाला आहे. एव्हाना या आगीविषयीच्या बातम्या तुमच्यापर्यंतही पोहचल्या आहेत. या आगीवरून विविध पर्यावरणप्रेमी, एनजीओ आणि विविध देशांचे प्रमुख यांचे नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेले आहेत. ‘विकास’ नावाची तथाकथित गोष्ट केवळ भारताच्याच नव्हे तर जगातल्याही अनेक देशांच्या जीवन-मरणाची कसोटी ठरू लागली आहे. पण सत्ताधारी या प्रश्नाकडे एकतर दुर्लक्ष करतात किंवा स्वत:च्या हितापलीकडे त्यांना पर्यावरणाचे गांभीर्य समजून घेण्यात रस नसतो. अॅमेझॉनची ताजी आग हे ब्राझीलचे पाप आहे, असा स्पष्ट आरोप विविध देशांचे प्रमुख, पर्यावरणप्रेमी, ‘अॅमेझॉन वॉच’सारख्या एनजीओज करत असल्या तरी ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो मात्र एनजीओ आणि आदिवासी यांच्यावरच आरोप करत आहेत.
नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेण्याआधी अॅमेझॉन जंगलाविषयी थोडक्यात समजून घेऊ.
अॅमेझॉन जंगल हे जगातील सर्वाधिक मोठे जंगल म्हणून ओळखले जाते. त्याचे क्षेत्रफळ ५५ लाख वर्ग किलोमीटर इतके अवाढव्य असून ते ब्राझिल, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, सुरीना आदि १० देशांत पसरलेले आहे. या जंगलाचा सर्वाधिक म्हणजे जवळपास ६० टक्के भाग एकट्या ब्राझीलमध्ये येतो. तर उर्वरित भागापैकी पेरूमध्ये १३ टक्के, कोलंबियामध्ये १० टक्के आणि व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, सुरीना यासारख्या देशांमध्ये १७ टक्के भाग येतो.
या अवाढव्य जंगलाला ‘पृथ्वीचे फुप्फुस’ असे म्हटले जाते. हे जंगल जैववैविध्याने संपन्न आहे. असे म्हणतात की, जगातील एकंदर २० टक्के ऑक्सिनची निर्मिती हे एकटे जंगल करते. यावरून या जंगलाची महती स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर जगातील एकंदर जंगलापैकी ५० टक्के एवढ्या मोठ्या आकाराचे हे जंगल आहे. त्यामुळे त्याला ‘पृथ्वीचे सुरक्षा कवच’ असेही म्हटले जाते. साहजिकच या जंगलाची वातावरणातील कार्बन शोषून घेण्याची आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची कामगिरीही मोठी, महत्त्वाची आणि कळीची आहे.
या जंगलात जवळपास तीस लाखांपेक्षा जास्त वन्यप्रजाती आहेत. विविध आदिवासी समूह आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे हे जंगल नष्ट होऊ लागले आहे. ही आग किती मोठी असावी? तर या जंगलापासून जवळपास अडीच हजार किलोमीटरवर ब्राझील या देशातील साओ पाऊलो हे शहर आहे. या शहरावर मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर धुराचे ढग पसरले होते. हे ढग इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की, सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहचू शकला नाही. नासाने प्रसिद्ध केलेल्या पृथ्वीच्या एका छायाचित्रात या धुराचे ढग स्पष्टपणे दिसतात.
अॅमेझॉन जंगलाला काही पहिल्यांदाच आग लागली आहे असे नाही. मोठ्या जंगलात वणव्यामुळे बऱ्याचदा आग लागते. मात्र सध्याची आग ही पूर्णपणे मानवनिर्मित आहे असे म्हटले जात आहे. एवढेच नव्हे तर या आगीमागे ब्राझील हा देश आहे असाही आरोप होतो आहे. अलीकडच्या काळात अॅमेझॉन जंगलाला ब्राझील पुरस्कृत आगी लावण्याचे प्रकार वाढलेले आहेत. यावेळची आग या वर्षांतली सर्वांत मोठी आग आहे. इतकी की, दर दोन मिनिटांनी एक एकर जंगल या आगीत नष्ट होत आहे.
जर्मनीने या आगीसाठी ब्राझीलला जबाबदार ठरवले आहे, तर ब्राझीलने काही एनजीओंना. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो म्हणाले की, सरकारने काही एनजीओंचे फंडिंग बंद केल्यामुळे त्यांनी सरकारवर सूड उगवण्यासाठी जाणूनबुजून ही आग लावली आहे. किती जोरदार आणि पटण्यासारखा युक्तिवाद आहे नाही!
शेतीसाठी अॅमेझॉन जंगलाचे लचके तोडण्याचे प्रकार तर चालूच आहेत. त्यामुळे अनेकदा जाणूबुजून आगी लावल्या जातात. वणव्यासारख्या आगी जंगलात आपापत:ही लागतात. पण त्यातून फार मोठे नुकसान झाल्याच्या फारशा नोंदी नाहीत. विशेषत: अॅमझॉन जंगल हे सदाहरित असल्याने या जंगलाच्या आसपास छोटी-मोठी आग लागली तरी एरवी त्याच्यापासून फार मोठा धोका नसतो. कोरड्या पडणाऱ्या जंगलाला मात्र आगीचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. परंतु मानवनिर्मित आग ही प्रसंगी हिरव्यागार जंगलालाही नष्ट करू शकते. सध्याची आग त्याच प्रकारची आहे.
कारणे काहीही असोत अॅमेझॉनची आग फक्त त्याच्या शेजारच्या देशांपुरती मर्यादित राहणार नसून तिचे परिणाम जगभर होण्याचा धोका पर्यावरणप्रेमींना वर्तवला आहे.
अॅमेझॉन जंगलाची गंमत अशी आहे की, हे जंगल दहा देशांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे या दहाही देशांवर त्याच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी येत असली तरी सर्वाधिक जबाबदारी ब्राझीलवर येते. कारण या जंगलाचे जवळपास ६० टक्के क्षेत्रफळ या देशात येते. मात्र ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष याबाबत ज्या प्रकारचे वर्तन करत आहेत, त्यावरून त्यांना या जंगलापेक्षा स्वत:च्या धोरणांची जास्त चिंता असल्याचे दिसते.
अॅमेझॉन जंगल जगातले सर्वांत मोठे जंगल असले म्हणून काय झाले, ‘विकासा’च्या नावाखाली त्याचेही लचके तोडण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सदोदित चालूच आहे. १९७०पासून त्यात सातत्याने वाढच झालेली दिसून येते. अगदी अलीकडची उदाहरणे द्यायची झाली तर २००४मध्ये ब्राझीलमधील २८ हजार चौरस किलोमीटर जंगल नष्ट केले गेले, तर मागच्या महिन्यात १४०० चौरस किलोमीटर जंगल नष्ट केल्याची बातमी आहे.
ही अशी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत राहिली तर अॅमेझॉन जंगलाला काही फार बरे दिवस राहिलेले नाहीत असेच म्हणावे लागेल. त्यामुळे जागतिक समुदाय, पर्यावरणप्रेमी, हवामानतज्ज्ञ आणि एनजीओ यांना अॅमेझॉन जंगलाची कितीही काळजी वाटत असली तरी ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन करत आहेत. अॅमेझॉनपेक्षा त्यांना ‘विकास’ नावाची सबब जास्त महत्त्वाची वाटत आहे. म्हणूनच ते हवामान बदलाची खिल्ली उडवताना दिसतात. जागतिक हवामान बदलाकडे सरळ दुर्लक्ष करतात. शेती, खाणकाम, पायाभूत सुविधा यांच्यासाठी अॅमेझॉन जंगलावर घाला घालायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान तसे आश्वासनच त्यांनी ब्राझीलच्या जनतेला दिले होते. आणि तरीही ते निवडून आले. याचा अर्थ स्पष्ट आहे. ब्राझीलच्या जनतेचीही एकप्रकारे अॅमेझॉनची लचकेतोड करायला परवानगी आहे. ब्राझीलमधील उद्योगपती-व्यावसायिक यांच्यासारखा एक वर्ग या निर्णयामुळे आनंदला असेल. कारण या वर्गाला सहा पर्यावरण, निसर्ग, नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्याविषयी प्रेम नसते. त्याला फक्त आपल्या संपत्तीविषयीच प्रेम असते.
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ देशांच्या - म्हणजे ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका यांच्या - परिषदेमध्ये अॅमेझॉनच्या आगीविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांनी हा मुद्दा परिषदेमध्ये उपस्थित केला. ही कृती बोल्सोनारो यांना ब्राझीलमध्ये ढवळाढवळ वाटत असली तरी जी-७च्या सदस्य देशांनी ही आग थांबवण्यासाठी एकमताने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या गटाकडून २० दशलक्ष युरोंची मदत दिली जाणार आहे. ही मदत आग थांबवण्यासाठी अग्निशमन विमाने पाठवण्यासाठी दिली जाणार आहे. तसेच या गटाने आगीत नष्ट झालेल्या जंगलाच्या फेरलागवडीसाठीही पुढाकार घेतला आहे. मात्र या योजनेला ब्राझील तसेच स्थानिकांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. त्याबाबात बोल्सोनारो काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.
या आगीपासून आपण काय बोध घ्यायचा? आपल्या देशातली, राज्यातली परिस्थितीही जंगलाविषयी, नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी अशीच बेफिकीरीची आहे. पश्चिम घाटाविषयीचा पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा अहवाल धूळ खात पडला आहे. त्याची अमलबजावणी अजूनही झालेली नाही. गाडगीळ यांनी वर्तवलेले धोकेही सरकार लक्षात घ्यायला तयार नाही. नुकताच सांगली-कोल्हापूरमध्ये पुरामुळे जो हाहाकार उडाला, त्यालाही निसर्गनिर्मित कमी आणि मानवनिर्मित कारणेच जास्त जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत आपण बेफिकीर आहोत. निर्णय घेण्याबाबत, त्यांची परिणामकारक अमलबजावणी करण्याबाबत आणि व्यापक जनहित, निसर्गहित याबाबत आपण कायमच गलथानपणा दाखवतो. ज्याचे परिणाम ताबडतोबीने होत नाहीत, त्याकडे फारसे लक्ष द्यायचे नाही. कोणी तसे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला उडवून लावायचे, असा एकंदर आपला खाक्या असतो. त्यामुळे ब्राझीलच्या अध्यक्षांची आणि आपली मनोवृत्ती यांत फारसा फरक राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच हशील नाही.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment