अजूनकाही
आज ‘जागतिक श्वान दिन’ (International Dog Day). त्यानिमित्तानं कुत्र्यांविषयी काही रंजक व रोचक माहिती देणारी ही लेखमालिका. पुढचा लेख येत्या सोमवारी प्रकाशित होईल. ही लेखमालिका ‘Pedigree Dogs Exposed’ या बीबीसीच्या लघुपटावर आधारित आहे.
.............................................................................................................................................
साल १८५९. औद्योगिक क्रांतीचा अगदी भरातला काळ. वाफेचं इंजिन, लेथ मशीन, रेल्वे इत्यादींमुळे क्रयशक्ती अतिशय वाढलेली. मानवजातीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि भरभराटीचा असा हा काळ. या भरभराटीच्या आणि उत्साही वातावरणात इंग्लंडमधल्या न्यू कॅसल या ठिकाणी एक प्रदर्शन भरलं होतं. प्रदर्शनात लोक आपापली ‘गुणवत्तापूर्ण उत्पादनं’ (Quality Product) दाखवत होते. तज्ज्ञ, उत्साही, हवशेनवशेगवशे सगळेच कुतूहलानं पाहत होते. परीक्षक मंडळ व्यवस्थित मोजमाप करून तपासणी करत होते. मग वेगवेगळ्या विभागातून ते ते विजेते निवडले गेले. प्रत्येक विभागातल्या विजेत्यातून एक विजेता ‘बेस्ट इन शो’ हा किताब मिळवून स्पर्धेचा सर्वोच्च विजेता ठरला. लोक त्या विजेत्याच्या निर्मात्याकडे बुकिंग करू लागले. असा सगळा नेहमीचा, कोणत्याही मोठ्या प्रदर्शनात पाहायला मिळतो तसा माहोल. पण हे कसलं प्रदर्शन होतं? त्यातली उत्पादनं कसली होती?
...तर हे प्रदर्शन होतं कुत्र्यांचं आणि इथली ‘बेस्ट इन शो विनर’ ठरलेली प्रॉडक्ट्स होती कुत्री.
युरोपात औद्योगिक क्रांतीनंतर एक नवा मध्यमवर्ग उदयाला आला होता. औद्योगिक क्रांतीची फळं मिळून आता लोकांकडे पैसा खेळायला लागला होता. बऱ्याचशा देशांमध्ये राजेशाही नाममात्र होऊन समांतर अशी लोकशाही व्यवस्था रुळायला लागली होती. हुजूर वर्ग (Ruling Class) आणि मजूर वर्ग (Working Class) असे दोन वर्ग मागे पडून मध्यमवर्ग वाढीस लागला. मग हातात आलेला पैसा आणि वेळ कुठेतरी खर्च होणं भाग होतं. पूर्वी फक्त राजे आणि सरदारांचे म्हणून जे शौक असायचे, ते आता मध्यमवर्गालाही परवडायला लागले. त्यातला एक प्रकार म्हणजे वेगवेगळी कुत्री बाळगणं (Dog Fanciers).
आधी फक्त घर आणि शेताच्या राखणीसाठी वा शिकारीसाठी किंवा मेंढ्या-गाईगुरं राखण्यासाठी घराबाहेर असणारं कुत्रं आता घरात विराजमान झालं. वेगवेगळी कुत्री बाळगणं हा ‘स्टेटस सिम्बॉल’ बनला. आफ्रिका आणि आशिया खंडात होणाऱ्या समुद्र सफरींमधून वेगवेगळी कुत्री युरोपात विशेषतः इंग्लिडमध्ये यायला लागली. लोक अगदी हौसेनं कुत्र्यांची पैदास (Dog Breeding) करायला लागले. या कामाला समाजात प्रतिष्ठा मिळायला लागली. त्यातूनच आत्ता आपल्याला माहीत असणाऱ्या कुत्र्यांच्या वेगवेगळ्या जाती तयार झाल्या. उदाहरणार्थ, जर्मन शेफर्ड (German Shepherd), लेब्रॉडोर रिट्रीव्हर (Labrador Retriever), गोल्डन रिट्रीव्हर (Golden Retriever), डॉबरमॅन (Doberman), पॉमेरेनिअन (Pomarenian), पग (Pug), डालमेशन (Dalmetion), बॉक्सर (Boxer), पुडल (Poodle) इत्यादी. १८७३ साली जगातल्या खास कुत्र्यांच्या हौशी लोकांचा ‘The Kennel Club’ क्लब तयार झाला. त्यात वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांसाठी ‘Breed Standard’ ठरवले गेले.
एखादं प्रॉडक्ट, मग ते कुठलंही असो, तुम्ही हा लेख ज्यावर वाचताय तो मोबाईल, वही, पाण्याची बाटली, टेबल, खुर्ची, इस्त्री, गाडी, विमान, त्याचे सुटे भाग या प्रत्येकाची मोजमापं ठरलेली असतात. त्यानुसार त्याचे स्टॅंडर्ड असतात. जगभरात त्या स्टॅंडर्डनुसार बनवली गेलेली वस्तू एकसारखीच असते. त्यासाठी रेखांकनं (Drawings), तपशील (Specificatoin), मर्यादा (Limits), सहनशीलता (Tolarances) इत्यादी कसोट्या असतात. या सर्वांची पूर्तता करून तयार केलेलं उत्पादन ‘Quality Product’ म्हटलं जातं.
अगदी त्याचप्रमाणे ‘Dog Standard’मध्ये कुत्र्यांचं वजन, उंची, त्या त्या जातीच्या कुत्र्याचा ग्राह्य रंग, चेहरा, धड, पाय, शेपटी इत्यादींचं एकमेकांबरोबर असणारं प्रमाण असे बरेच निकष असतात. आणि त्या निकषांमध्ये जर कुत्रा असेल तर तो ‘Pure Breed’ किंवा ‘Top Quality’ समजला जातो.
आता या सगळ्या कुत्र्यांच्या रंगरूपाच्या स्टँडर्डची पूर्तता कशी करायची? कारण डार्विनच्या ‘नैसर्गिक निवड’ (Natural Selection) थेअरीप्रमाणे जो लढून-झगडून सगळ्याला पुरून उरून आपले जीन्स पुढे पास करतो, तोच खरा यशस्वी. यात वैविध्य येतं आणि स्टँडर्ड बोंबलतं. मग यावर ‘Selective Breeding’चा तोडगा काढला गेला. म्हणजे आपल्याला ज्या काही विशेषता (characteristics) कुत्र्यामध्ये हव्या असतील, त्या विशेषता असणारी कुत्र्यांची जोडी निवडायची आणि त्यांचं मीलन घडवून आणायचं. म्हणजे मला पिवळ्या रंगाचं, लांब केसांचं, मध्यम आकाराचं कुत्रं हवं असेल तर त्याची पूर्तता करणाऱ्या नर-मादीचं मीलन घडवून आणायचं. म्हणजे त्यांना पिल्लंही तशीच होतील!
पिवळा रंग, लांब केस, मध्यम आकार हे झालं कुत्र्याचं बाह्यरूप (Phenotype). पण प्रत्येक वेळी असे नर-मादी मिळतीलच असं नाही. निसर्ग म्हटला की विविधता आलीच, पण स्टँडर्डची पूर्तता तर झाली पाहिजे. शिवाय एकमेकांसारखी दिसणारी दोन कुत्री ही जवळच्या नात्यातलीच असणार! मग तशाच प्रकारची पैदास सुरू झाली. ज्यातून अगदी जवळच्या नात्यातल्या कुत्र्यांचं एकमेकांबरोबर मीलन घडवून आणलं गेलं. उदा. आई-मुलगा, बाप-मुलगी, बहीण-भाऊ इत्यादी. या प्रकाराला जीवशास्त्रीय भाषेत ‘Inbreeding’ म्हटलं जातं. पण हे निसर्गनियमांच्या विरुद्ध होतं. त्यामुळे आनुवंशिक वैविध्य (Genetic Diversity) कमी झालं आणि अनुवंशिक रोगांचं प्रमाण वाढलं. एका प्रमाणाबाहेर जर ‘Inbreeding’ घडून आलं, तर त्या प्रकाराला शास्त्रीय भाषेत ‘Inbreeding Depression’ असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या सजीवाचं जीवशास्त्रीय सौष्ठव (Biological Fitness). म्हणजेच जगण्यासाठी लायक असे जीव (Healthy off Springs) तयार करण्याची आणि स्वतःचे जीन्स पुढचा पिढीत पाठवण्याची क्षमता. ती ‘Inbreeding Depression’मुळे कमी होते. त्यामुळे ‘Pure Breed’ कुत्र्यांमध्ये हाडांचे, सांध्यांचे, मणक्याचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यांचा ‘Helthy life span’ कमी झाला.
या ‘Selective Breeding’मधून पुढे Francis Galtonची ‘युजेनिक्स’ (Eugenics)ची थेअरी पुढे आली. जी नाझी विचारसरणीचा पाया होती. आता युजेनिक्सची थेअरी निकालात निघाली असली, तरी जगभरातले सगळे ‘Kennel Club’ अजूनसुद्धा ‘Dog Standards’ला धरून आहेत. या सगळ्यामुळे एखादा उमदा जातिवंत कुत्रा आपण जरी आणला तरी त्याला हिप डायप्लेसिया (Hip Dysplasia), एल्बो डायप्लेसिया (Elbow Dysplasia), एपिलेप्सी (Epilepsy), कॅन्सर (Cancer), मधुमेह (Diabetes) यांसह खूप सारे हृदयाचे आजार असण्याची शक्यता असते.
आता परदेशात म्हणजे युरोप-अमेरिकेत हे सगळं टाळण्यासाठी पैदास करण्याआधी जेनेटिक टेस्ट्स करून घेणं बंधनकारक आहे. त्यात जी कुत्री पास होतील त्यांनाच मीलनाचा अधिकार. त्यामुळे तुम्हाला जर कुत्रा पाळायचा असेल तर Cross Breed किंवा अगदी गावठी कुत्रंच (Indian Stray or Pariha) पाळणं चांगलं.
आपल्या या निसर्गावर मात करण्याच्या आणि त्याला आपल्याप्रमाणे वाकवण्याच्या प्रकारामुळे एका उमद्या जनावराच्या आरोग्याला चांगलाच फटका बसला आहे. आपल्या प्रमाणीकरणाच्या (Standardization) हव्यासामुळे खूप कुत्र्यांचे बळी जातात, जगभर!
............................................................................................................................................
कुत्र्यांविषयीचा एक रंजक लघुपट
............................................................................................................................................
लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.
saurabhawani@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 04 September 2019
सौरभ नानिवडेकर, लेख अगदी समर्पक आहे. कुत्रा माणसाचा मित्र असतांना त्याचा असा गैरवापर मनास व्यथित करून जातो. आपला नम्र, -गामा पैलवान