अजूनकाही
अलविदा जेटली जी,
जेव्हा एखादा नेता विद्यार्थिदशेतच राजकारणाची निवड करतो, तेव्हा त्याचा आवर्जून सन्मान करायला पाहिजे. आणि जो शेवटपर्यंत टिकून राहतो, त्याचा विशेष सन्मान करायला पाहिजे. सुरक्षित जीवन सोडून असुरक्षित जीवनाची निवड करणं सोपं नसतं. १९७४मध्ये सुरू झालेल्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात अरुण जेटली सहभागी झाले होते. आणीबाणीच्या घोषणेनंतर त्यांना अटक झाली, कारण रामलीला मैदानात ते जयप्रकाशांसोबत उपस्थित होते. बंडखोरीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे जेटली शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी एकदाच निवडणूक लढवली, पण हरले. राज्यसभेत खासदार राहिले. पण आपल्या क्षमतेच्या जोरावर जनतेमध्ये नेहमी जनप्रतिनिधी बनून राहिले. कुणाच्या तरी कृपेमुळे राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे, अशा प्रकारे त्यांच्याकडे कधी पाहिलं गेलं नाही. जननेता नसले म्हणून काय झालं, राजकीय नेता तर होतेच ना!
जेटलींच्या व्यक्तिमत्त्वात शालीनता, विनम्रता, कुटीलता आणि चतुराई सगळं होतं आणि एकप्रकारचा अहंकारही होता. पण त्यांनी कधी आपल्या बोलण्याचा स्तर घसरू दिला नाही. ते घोषणाबाजीचे स्पिनर होते. त्यांचं म्हणणं खोडता यायचं, पण असायचं खास. ते एक आव्हान निर्माण करायचे की, तुमची तयारी असेल तरच त्यांचं म्हणणं खोडून काढता यायचं. ल्युटन दिल्लीचे अनेक पत्रकार त्यांचे खास होते आणि तेही पत्रकारांचे ओळखून असायचे. पत्रकार त्यांना गमतीनं ‘ब्युरो चीफ’ म्हणत.
जेटलींनी वकिलीमध्ये नाव कमावलं आणि आपल्या नावानं त्या क्षेत्राला प्रतिष्ठाही मिळवून दिली. अनेक वकील राजकारणात येऊन जेटलींसारखं स्थान मिळवण्याची आकांक्षा धरायचे. जेटलींनी अनेकांना मदतही केली. ते अनुदार नव्हते. त्यांच्या जवळचे लोक सांगायचे की, स्वप्न पाहण्यात ते कधी हात आखडता घ्यायचे नाहीत.
अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, अनंत कुमार, गोपीनाथ मुंढे यांच्यासारखे भाजपनेते दुसऱ्या पिढीतले मानले गेले. यातील जेटली-स्वराज वाजपेयी-आडवाणी यांच्या समकालीनांसारखे राहिले. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा जेटली दिल्लीत त्यांचे वकील होते. मोदींनी त्यांच्या निधनानंतर तीव्र दु:ख व्यक्त करत म्हटलं की, दशकों पुराना दोस्त चला गया है. अमित शहांनाही जेटली आठवत राहतील. एक चांगला वकील चांगला मित्रही असेल तर प्रवास सुखकर होतो!
जेटलींची पाहण्याची आणि हसण्याची नजाकत वेगळीच होती. ते कधी टिंगलटवाळी करायचे तर कधी हसवायचे. ते आपल्या बोलण्यातून आणि कल्पनेतून राजकारण करत, तीर आणि तलवार चालवणारं राजकारण करत नसत.
जी व्यक्ती राजकारणात असते, ती जनतेमध्ये असते. त्यामुळे तिच्या निधनाकडे जनतेच्या दु:खासारखं पाहिलं गेलं पाहिजे. सार्वजनिक जीवनात राहणं हे खूप कठीण असतं. जे लोक हे करतात, त्यांच्या निधनानंतर पुढे होऊन श्रद्धांजली द्यायला हवी. अलविदा जेटली जी. आजचा दिवस भाजपच्या शालीन आणि उत्साही नेत्यांना खूप उदास करणारा असेल. मी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो. ओम शांती!
मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा
.............................................................................................................................................
रवीश कुमार यांच्या मूळ हिंदी लेखासाठी पहा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment