‘एंजल हॅज फॉलन’ : रटाळ आणि निर्बुद्ध मारधाडपट  
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘एंजल हॅज फॉलन’चं पोस्टर
  • Sat , 24 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie एंजल हॅज फॉलन Angel Has Fallen

‘फॉलन’ चित्रपट मालिका अतिशयोक्तीपूर्ण, निर्बुद्ध कथानकं आणि मारधाड दृश्यांवर अवलंबून राहिलेली आहे. या मालिकेतील चित्रपट ना अ‍ॅक्शन-थ्रिलर या विधेमध्ये काही प्रयोग करू पाहतात, ना स्वतःला अतिबुद्धिमान समजतात. ‘ऑलिम्पस हॅज फॉलन’ (२०१३) आणि ‘लंडन हॅज फॉलन’ (२०१६) या  चित्रपटांनी हे सिद्ध केलेलं आहेच. ‘एंजल हॅज फॉलन’ हा या चित्रपट मालिकेतील तिसरा चित्रपट आहे. तो या मालिकेतील चित्रपटाकडून असलेली अतिशयोक्तीपूर्ण मारधाडपटाची अपेक्षा पूर्ण करू पाहतो. तसंही नव्या-जुन्या मारधाड-हेरपटांची कथानकांचं पुनर्निर्माण करणाऱ्या या मालिकेकडून चांगल्या आशय-विषयाची अपेक्षा कधी नव्हतीच. 

माइक बॅनिंग (जेराल्ड बटलर) हा सध्या अमेरिकन ‘सिक्रेट सर्व्हिस’मध्ये कार्यरत आहे. यापूर्वीही अनेकदा त्याचा हुद्दा आणि नोकरी हिरावली जाण्याचे प्रसंग आलेले आहेत. या मालिकेतील पूर्वीच्या चित्रपटांमध्ये या समस्यांचं दर्शनही झालं आहे. यावेळी राष्ट्रपती अ‍ॅलन ट्रम्बल (मॉर्गन फ्रीमन) त्याच्यावर ‘सिक्रेट सर्व्हिस’च्या संचालकपदाची जबाबदारी सोपवणार असतानाच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होतो. ज्यात बॅनिंग अंतर्गत काम करणारे सर्व लोक मारले जातात, नि केवळ राष्ट्रपती ट्रम्बल आणि एजंट बॅनिंग बचावतात. साहजिकच कथानकाच्या गरजेपोटी राष्ट्रपतींची प्रकृती खालावल्यानं ते शुद्धीवर नसतात, बॅनिंगवर त्यांचा विश्वासघात करून त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा ठपका ठेवला जातो. 

परिणामी यापूर्वीही जेम्स बॉंड-जेसन बॉर्न चित्रपट मालिकांमध्ये अनेकदा दिसलेल्या गोष्टींचं इथं पुनर्निर्माण होतं. आपल्या नायकाला स्वतःच्या वैयक्तिक-कौटुंबिक समस्यांशी लढा देत स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं. त्यात हे कमी आहे की काय म्हणून देशालाही वाचवायचं असतं. ज्यात भर म्हणून रशियाचे उल्लेख येऊन जातात. एक व्यावसायिक मारधाडपटातील नायक, बटलर, अमेरिकन जनतेला आशावाद आणि राष्ट्रप्रेम या संकल्पनांचे डोस देतो. प्रकरण बरंच मूलभूत, बरंच सामान्य आणि एकुणात रटाळ आहे. (इथं कुणाला आपल्याकडील अक्षय कुमार-जॉन अब्राहम आदी लोक आठवले तर हा काही योगायोग नसेलच.) 

बाकी बटलर आपल्याला एक मारधाडपटात शोभेल असा नायक पडद्यावर आणू पाहण्याचा प्रयत्न करतो, तर मॉर्गन फ्रीमन अगदी रटाळ संवादांनाही तितक्याच संयत समर्पकतेनं सादर करण्याची ताकद राखतो. तसाही इतरांना या कथानकात फारसा वाव नाही. 

‘एंजल हॅज फॉलन’चा आणि एकूणच ‘फॉलन’ चित्रपट मालिकेचा भर वैशिष्ट्यपूर्ण शैलीपेक्षा अतिशयोक्तीपूर्ण मारधाड, जलद गतीचा आभास निर्माण करणारं दृश्य संकलन इत्यादी गोष्टींवर अधिक राहिलेला आहे. आणि या बाबी अगदी परिणामकारक स्वरूपात समोर येतात असंही घडत नाही. त्यामुळे आशय-विषय ते दृश्य शैली अशा सर्वच पातळ्यांवर हे चित्रपट निर्बुद्ध कथानकांभोवती फिरणारे स्वीकारार्ह चित्रपट ठरतात. ते मनोरंजक असू शकतात का, तर हो. पण, ते निरर्थक सीक्वेल्स आहेत, हेही तितकंच खरं. 

आता ‘एंजल हॅज फॉलन’ छायाचित्रण आणि व्हीएफएक्सच्या स्तरावर बराच चांगला असला तरी या गोष्टी त्याला चांगला चित्रपट ठरवण्यास पुरेशा नाहीत. कारण, चित्रपटाचं कथानक स्वाभाविक वळणं घेत राहतं आणि असं करताना त्याच्या लांबीचंही भान चित्रपटकर्त्यांना राहत नाही. त्यामुळे त्यानं कंटाळा आणण्याचं प्रमाण अधिक वाढत जातं. त्यातल्या त्यात उत्तरार्धात बरीच चांगली मारधाडीची दृश्यं आहेत. किमान त्यामुळे तरी पूर्वार्धात यातील अभिनेत्यांना अभिनयाचे प्रयत्न करताना पहावं लागलं होतं तसे प्रसंग कमी येतात. 

रिक रोमन वॉग दिग्दर्शित ‘एंजल हॅज फॉलन’ रोलंड एमरिक-मायकेल बेंच्या चित्रपटांइतका निर्बुद्ध नाही. आणि मायकल बेच्या चित्रपटांसारखं नसणं ही काही मोठी कौतुकाची बाब असू शकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख