स्वतःची आणि त्यासोबत इतरांचीही महाराष्ट्राबद्दलची समज व्यापक व्हावी, यातून या पुस्तक प्रकल्पाची कल्पना पुढे आली!
ग्रंथनामा - झलक
सुहास कुलकर्णी
  • महाराष्ट्राचा नकाशा आणि ‘महाराष्ट्र दर्शन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 23 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक महाराष्ट्र दर्शन Maharashtra Darshan सुहास कुलकर्णी Suhas Kulkarni समकालीन प्रकाशन Samkalin prakashan

महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातील अभ्यासक-पत्रकार-लेखकांच्या सहभागातून साकारलेला पुस्तक प्रकल्प म्हणजे ‘महाराष्ट्र दर्शन’. या पुस्तकात बहुरंगी महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक अंतरंगाचं जिल्हावार दर्शन घडवणारे लेख आहेत. समकालीन प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

१.

‘महाराष्ट्र दर्शन’ हा एक पुस्तकप्रकल्प आहे. तो एक पुस्तक-प्रयत्नही आहे. महाराष्ट्राचं बहुरंगी दर्शन घडवण्याचा प्रयत्न.

महाराष्ट्राचे भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही किमान पाच-सात भाग पडतात. मुंबई, कोकण, पश्‍चिम-दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, वर्‍हाड आणि झाडीपट्टी. या विभागांच्या पोटात इतर उपविभाग आहेतच. आता असा विचार करून पाहा की, या भागांचं एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किती आदानप्रदान होतं? उदाहरणार्थ, सोलापूरचे लोक पुण्याशी आणि कोल्हापूरशी भौगोलिक जवळिकीमुळे थोडे जोडलेले असू शकतात; पण ते यवतमाळ-अमरावती किंवा चंद्रपूर-गोंदियाशी किती जोडलेले असतात? कोणी तरी दूरचा नातेवाईक नोकरीमुळे वगैरे तिकडे असेल, तर त्या भागाशी त्यांचेच जुजबी संबंध असतात एवढंच. दुसरीकडे, बुलढाणा-परभणी हे विदर्भ-मराठवाड्यातले शेजारी जिल्हे. त्यांच्यात भौगोलिक जवळिकीमुळे संबंध असतात, पण त्यांचा सांगली-कराडशी संबंध येण्याचं कारण काय? त्यांच्या सोयरिकी आपापल्या परिसरात होत असणार, किंवा जास्तीत जास्त त्यांची नोकरी करणारी मुलं-मुली पुण्या-मुंबईत असतील तर ते या भागाशी जोडलेले असणार. पण सांगली-कराडशी त्यांचा जैवसंबंध निर्माण होण्याचं अन्यथा काही कारण नसतं. तळ-कोकणच्या सिंधुदुर्गातल्या माणसांना राज्याच्या दूर पूर्वेकडच्या गडचिरोलीतले आदिवासी कोणती भाषा बोलतात आणि ते काय खातात-पितात हे कळण्याचा काही मार्गच नाही, इतकं त्यांच्यात अंतर असतं. महाराष्ट्रात धुळे-नंदुरबार-नाशिक-पालघर या पट्ट्याशिवाय मेळघाट (अमरावती) आणि गडचिरोली-गोंदिया भागात आदिवासींची वस्ती आहे. पण त्यातल्या नंदुरबारच्या आदिवासींचा गडचिरोलीतल्या आदिवासींशी किती संबंध येतो, हा संशोधनाचा विषय आहे. गोंड, माडिया, कोलाम या विदर्भातील आणि वारली, भिल्ल, पावरा, कोकणा या उत्तर महाष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती आहेत. पण त्यांना आपसातल्या चालीरीती, परंपरा कितपत माहीत असतील, कोण जाणे! एक वेळ विदर्भातल्या जमातींना आसपासच्या अन्य जमातींबद्दल काही माहिती असेल. तेच धुळे-नंदुरबार नि नाशिक-ठाण्याबाबत लागू असेल. पण दंडकारण्यातील मंडळींना सातपुड्यातील भाईबंदांबद्दल नीट माहिती असण्याची शक्यता अगदीच कमी. आदिवासींनाच आपापसाची माहिती नसेल तर कोल्हापूरच्या ऊसवाल्याला किंवा सांगलीतल्या मध्यमवर्गीय नोकरदाराला ती असण्याची अपेक्षा कुणी का धरावी? शिवाय लोकांना माहिती असतात ती त्या त्या जिल्ह्याचं केंद्र असलेली शहरं. त्या जिल्ह्यातल्या तालुक्यांमधली विविधता, त्यामधला विरोधाभास कुणाला माहिती असतो? उदा. पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे पीक-पाण्याने समृद्ध भाग असं उर्वरित महाराष्ट्राला वाटतं. पण याच पश्‍चिम महाराष्ट्रातले आटपाडी, जत, माण, खटाव असे कित्येक तालुके वर्षानुवर्षं पर्जन्यछायेखाली अभावग्रस्त जगणं जगताहेत, याची त्यांना कुठे कल्पना असते? 

थोडक्यात, भौगोलिक अंतरांमुळे आणि लोक आपापल्या भागांतील सांस्कृतिक वातावरणात रममाण असल्यामुळे बहुतेकांची समज मर्यादित राहते. या पार्श्‍वभूमीवर एका प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजे. गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये स्थलांतर नावाची प्रक्रिया देशभर जोरात चालू आहे. महाराष्ट्रातही. माणसं पोटापाण्यासाठी किंवा शिक्षण-करिअर-नोकरी-धंद्यासाठी आपापल्या भागांतून उठून दुसरीकडे जात आहेत. ही प्रक्रिया दोन प्रकारची आहे. एक, शरीरश्रम करणारी, मेहनत-मजुरी करणारी माणसं तुलनेने जवळच्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात. त्यातली काही माणसं पोटापाण्याच्या शोधात कायमची स्थलांतरित होतात; तर काही जण वर्षातले चार-सहा महिने कामासाठी बाहेर काढून उरलेल्या काळात आपापल्या गावी परततात. दुसरीकडे, शिक्षण-नोकरीसाठी आपापली गावं सोडणारी तरुण पिढी प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये येते आहे. त्यातही दूरदूरच्या भागातील मुलं-मुली प्रामुख्याने पुण्या-मुंबईत येताना आणि नशीब आजमावताना दिसतात. या आवक-जावकीमुळे महाराष्ट्र आतून बांधला जाण्याची शक्यता आहे. त्यातून सर्वच प्रकारचं आदानप्रदान वाढू  शकतं.

पण या शक्यतेलाही काही मर्यादा आहेत. पोटापाण्यासाठी स्थलांतर करणार्‍या माणसांचं पहिलं प्राधान्य असतं चार पैसे गाठीला बांधण्याचं. आसपासच्या जगण्यात वाकून पाहण्याएवढा त्यांच्याकडे वेळ नसतो आणि संधीही नसते. उदाहरणार्थ, बीड-उस्मानाबादचे ऊसतोड कामगार पोटापाण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्राच्या उसपट्ट्यात येऊन रात्रंदिवस राबतात, तेव्हा त्यांना कुठे तिथल्या जगण्यात डोकायवायला वेळ असतो? ते आपले उघड्यावरचे संसार सावरत आधीची उचल भागवण्याच्या विवंचनेत असतात. दुसरीकडे, तरुण पोरांबद्दल बोलायचं, तर त्यांचं महाराष्ट्रभरातून स्थलांतर होतंय ते प्रामुख्याने पुणे आणि मुंबईत. वर्ध्याचा मुलगा औरंगाबादला किंवा कोल्हापूरला शिक्षणासाठी वा नोकरीसाठी जाण्याची शक्यता जितकी कमी, तितकीच इचलकरंजीतली मुलगी नाशिक-जळगावला जाण्याची शक्यता कमी. याचा अर्थ त्यांना कळून कळणार पुण्या-मुंबईबद्दल. त्यामुळे संभाव्य आदानप्रदानाची खोली आणि व्याप्ती असून असून किती असणार?

गेल्या वीस वर्षांत जग बरंच जवळ आलेलं असलं, तरी आपल्याकडे ती प्रक्रिया तेवढीशी वेगवान झालेली नाही. पुण्या-मुंबईच्या लोकांना लंडन-न्यूयॉर्क जवळचं वाटतं, पण ही माणसं अख्ख्या जन्मात धारणी-भामरागड तर सोडाच, हिंगोली आणि बीडपर्यंतही पोहोचू शकत नाहीत. या लोकांना पॅरिस नि बर्लिनमधील गल्ल्या माहीत असतात, पण त्यांना अक्कलकुव्याला सोडलं तर ते स्वत:च्या घरी पोहोचण्याची खात्री कुणी देऊ शकत नाही. जग जवळ येण्याची आपली कथा ही अशी आहे!

२.

कोणत्याही समाजाचा स्वत:च्या सांस्कृतिक ओळखीचा स्त्रोत त्याचा भूतकाळ, म्हणजे इतिहास असतो. महाराष्ट्राच्या इतिहासातल्या कोणत्या व्यक्ती- घटना-परंपरा-दैवतं आणि वैशिष्ट्यांतून महाराष्ट्राची ओळख तयार झालीय? आपल्या रक्तात भिनलेल्या गोष्टी कोणत्या आहेत बघा.

महाराष्ट्राचा गौरवाचा काळ म्हणजे शिवकाळ. छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महाराष्ट्राचे ऑल-टाइम हीरो आहेत. असा राजा चांद्यापासून बांद्यापर्यंत झाला नाही, असं म्हटलं जातं. खरंतर शिवराय हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्याही इतिहासातले महत्त्वाचे आणि एकमेवाद्वितीय राजे आहेत. अर्थातच महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या काळातले गड-किल्ले, सह्याद्रीचे कडे, तोफांचे गडगडाट नि तलवारींचे खणखणाट, तुतार्‍या नि चौघडे, भवानी तलवार, तुळजापूरची आई भवानी आणि शिवकालातील वीरकथांनी भारलेला आहे.

महाराष्ट्रावर दुसरा प्रभाव आहे भागवत परंपरेचा, वारकरी संतांचा. या संतपरंपरेमुळे देहू-आळंदीहून निघणारी पंढरपूरची वारी, ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव आणि अन्य महान संत, त्यांचे अभंग; या परंपरेशी नातं जोडलेल्या भीमा, इंद्रायणी वगैरे नद्या; वारकरी संतांनी घडवलेली मराठमोळी वाणी, अशा बाबी मराठी मनामध्ये कायम वस्तीला असतात. त्यामुळेच वारकर्‍यांचा आणि शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा महाराष्ट्र सतत उंचावत असतो.

पण आपलं दुर्दैव असं की ज्या भूमीत शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाने एक मोठा आदर्श घालून दिला, त्या भूमीत इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या जीवनाचा संदेश काय याबद्दल मतैक्य नाही. याबाबतीत दोन टोकांच्या मांडणींमध्ये महाराष्ट्र विभागला गेलेला आहे. वारकरी परंपरेतील संतांच्या संदेशाच्या वाचनाबाबतही अशीच गोची होऊन बसली आहे. या परंपरेने आपल्याला सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि रूढीदास्य यांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला. पण त्याचं आपण काय केलं? सामाजिक संदेशांचं सोडा, आध्यात्मिक संदेशही आपण पुरेसा पचवू शकलेलो नाही. पण हा विषय या मनोगताच्या चौकटीबाहेरचा असल्याने त्याची चर्चा इथे नको.

पुन्हा मुद्याकडे येऊयात. शिवकाळानंतर पेशवाई, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पुढचे तीन महत्त्वाचे टप्पे. गेल्या सात-आठशे वर्षांच्या या काळावरून ओझरती नजर टाकली, तर आपला इतिहास कमी-अधिक फरकाने सह्याद्रीच्या कुशीत आणि विशेषतः पुण्याच्या आसपास फिरताना दिसतो. किमान तसं सांगितलं तरी जातं. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईच्या काळात पुणे हे महत्त्वाचं केंद्र बनलं. पुढे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही लोकमान्य टिळकांमुळे पुणे अग्रभागी राहिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यालाही मुंबई पाठोपाठ पुण्याचंच नेतृत्व लाभलं होतं. प्रबोधनात्मक चळवळीतही लोकहितवादी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी यांच्यामुळे पुण्याचा बोलबाला राहिला. हा सर्व इतिहास पाहता महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासावर छाप दिसते ती एकाच भूभागाची. पुण्याच्या अवतीभोवतीच्या प्रदेशाची. म्हणूनच कदाचित मराठी कवींनी लिहिलेली महाराष्ट्राची गौरवगीतं पाहिली तर महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर सह्याद्रीची उत्तुंग छाया पडलेली दिसते. सह्याद्रीचे कडे-कपारी, त्याच्या अंगाखांद्यावर बागडणार्‍या मर्द मराठ्यांची पोलादी मनगटं आणि उभ्या कातळांची काळी छाती यांच्या वर्णनांनी ही गीतं फुलून गेलेली दिसतात. अगदी एखाद-दुसरा अपवाद सोडला तर गौरव-गीतांमधून महाराष्ट्राचं वर्णन असंच दिसतं. सह्याद्रीच्या पलीकडे सातमाळाचे, अजिंठ्याचे, हरिश्‍चंद्र-बालाघाटचे आणि महादेवाचे डोंगर आहेत याचा पत्ताच जणू आपल्या कवींना नाही. सह्याद्रीच्या आसपास उगम पावणार्‍या नद्यांपलीकडील तापी, पूर्णा, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा या नद्यांबद्दल कुणी अभिमानाने सांगायला तयार नाही. अजिंठा-वेरूळ-लोणार या जगप्रसिद्ध आश्‍चर्यांबद्दल चकार शब्द नाही. जैन, बौद्ध, शीख, मुसलमान, लिंगायत, कबीरपंथी, महानुभाव आदी संप्रदायांच्या मानचिन्हांचा उल्लेखही नाही. माडिया, गोंड, भिल्ल अशा महाराष्ट्राच्या आद्य रहिवाशांचा आणि गडचिरोली, मेळघाट, नंदुरबार वगैरे त्यांच्या वसतिस्थानांचा स्पर्शही महाराष्ट्राच्या गौरवशाली ओळखीला झालेला नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या दीर्घकाळ नांदलेल्या राजवटींबद्दल कुणी बोलायला तयार नाही. लांबच्या इतिहासाबद्दल सोडा, ओरिसापर्यंत जाऊन स्वतःच्या राज्यकारभाराचा अमीट ठसा उमटवणार्‍या रघुजी भोसलेंसारख्या नागपूरकर राजाबद्दलही कुणी सांगत नाही. आपले वारकरी संत थोरच; पण त्यांच्याआधी किंवा त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या चक्रधरस्वामी, गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज, अंबरसिंग महाराज, ताजुद्दिन बाबा वगैरे अन्य परंपरांतील महात्म्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत आपली अनास्था का असते? जाता जाता आणखी एक गोष्ट बघा. आपल्या गौरवगीतांमध्ये देशावरच्या धनधान्यांचा उल्लेख सापडतो; पण विदर्भ-खानदेशात पिकणार्‍या पांढर्‍या सोन्याचा-कापसाचा आणि गरिबांचं अन्न असलेल्या केळ्याचा उल्लेख करायला कुणी तयार नाही. याचा अर्थ, विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण या महाराष्ट्राच्या प्रचंड विस्तार असलेल्या भूभागाला आणि तिथे तिथे विकसित झालेल्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या ओळखीत स्थान नाही की काय?

असं असेल तर महाराष्ट्राची स्वओळख एकारलेली आहे आणि ती सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक नाही, असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रीय संस्कृतीचा विकास फक्त सह्याद्रीच्या छायेतच झाला आणि दूर पूर्वेकडील सपाट, मैदानी प्रदेशातील मराठी माणसं फक्त आला दिवस घालवत होती, असं कुणाचं म्हणणं आहे की काय? महाराष्ट्राची गौरवगीतं वाचल्यानंतर यापेक्षा वेगळं मत झालं तर ते आश्‍चर्य ठरावं.

३.

खरं पाहता युरोपातल्या एखाद्या देशाला पोटात सामावून घेईल एवढं आकारमान महाराष्ट्राला लाभलं आहे. एवढ्या मोठ्या भूभागात एकच एक सह्याद्रीछायेतील संस्कृती नांदते आहे, असं मानणं लघुदृष्टीचं आहे. महाराष्ट्रगीतात पडणार्‍या प्रतिबिंबाचं सोडा, पण महाराष्ट्रात किती प्रकारच्या संस्कृती-उपसंस्कृती नांदतात, किती बोली-किती लोकबोली बोलल्या जातात, बोलींची मिश्रणं-त्यांचे लहेजे-त्यांचे हेल किती मोहक असतात, म्हणी-वाक्प्रचार-शिव्या यांना स्थानिक मातीचा कसा सुगंध लाभलेला असतो, खाण्यापिण्यात किती लज्जतदार वैविध्य असतं, खाद्यपदार्थांचा आणि स्थानिक उपजांचा कसा घनिष्ठ संबंध असतो, सण-उत्सव-प्रथा-परंपरा-रूढी-देव देवस्की यांचे किती वेगवेगळे आविष्कार दिसतात हे पाहिलं तर चक्रावून जायला होतं. चित्रकला, नाटककला, मूर्तिकला, शिल्पकला यांनी महाराष्ट्राचे विविध टापू कसे नटलेले आहेत हे थोडे इतिहासात डोकावून पाहिलं, तर आपण किती कमी भूभागाला डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख सांगू पाहतो आहोत, याची जाणीव होते. इतिहासातील विविधधर्मीय (राजकीय आणि आध्यात्मिक) सहअस्तित्वामुळे महाराष्ट्रात जी अद्भुत सरमिसळ झालेली आहे, ती डोळेझाक करता येण्याजोगी नाही. त्यापलीकडे स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ज्या विविध आर्थिक-सामाजिक प्रक्रिया उलगडत गेल्या, त्याचाही महाराष्ट्राच्या आजच्या ओळखीशी संबंध आहे. आपल्या संकुचित विचारविश्वातून बाहेर पडून हे सारं बघायला हवं. तसं झालं तरच महाराष्ट्राची खरी ओळख पुढे येणार आहे आणि त्यातून महाराष्ट्रीय माणसं खर्‍या अर्थाने जोडली जाणार आहेत. आपण एका राज्यात राहतो, त्याची एक विधानसभा आणि एक मुख्यमंत्री आहे म्हणून एकत्र वावरणं वेगळं, आणि राज्यातल्या सर्व प्रकारच्या लोकांना या राज्यात आपलं प्रतिबिंब पडतंय, असं वाटून त्याविषयी आत्मीयता असणं वेगळं. असं होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र, त्यातले कानाकोपरे, त्यातले बारकावे, त्यातली मजा सगळ्यांसमोर यायला हवी. हाच या पुस्तक प्रकल्पाचा उद्देश आहे.

४.

महाराष्ट्राच्या नावाने मराठी माणसांची छाती फुलत असली तरी आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीची, इतिहास-भूगोलाची आणि वर्तमानाचीही पुरेशी ओळख नाही, हा आतापर्यंतच्या विवेचनाचा थोडक्यात अर्थ. ‘युनिक फीचर्स’ या माध्यमसंस्थेमार्फत तीसेक वर्षं महाराष्ट्रभर काम केल्यानंतर आणि कानाकोपर्‍यात वावरल्यानंतर हे मत तयार झालं आहे. हे मत सरधोपट आहे असं कुणाला वाटू शकतं. पण महाराष्ट्राबद्दलची आपली जुजबी समज आणि त्याआधारे निर्माण झालेला अभिमान याकडे त्रयस्थपणे पाहिलं, तर आपण महाराष्ट्राबद्दल बरेच अनभिज्ञ आहोत असं आपल्या लक्षात येईल. मी आणि माझे सहकारी विविध कारणांनी महाराष्ट्रात फिरत असतो, तेव्हा आपण महाराष्ट्राच्या विविधांगी जगण्यापासून किती लांब असतो हे कळत असतं. महाराष्ट्रात दूर खेड्यापाड्यांत राहणार्‍या लोकांचा ‘आपल्याला महाराष्ट्र कळलेला आहे’ असा काही दावा नसतो. ते बिचारे आपापल्या जगण्यात बुडून गेलेले असतात. पण स्वतःला सर्वज्ञ समजणारे पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील लोक महाराष्ट्राबद्दल विशेष अज्ञानी आहेत, असं लक्षात येतं. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक सत्तेची सूत्रं हळूहळू पुण्या-मुंबईपासून दूर सरकू लागलेली असली, तरी ‘आपल्याला सर्व काही माहीत आहे’ असा गंड इथल्या धुरीणांमध्ये अजूनही कायम आहे. ही परिस्थिती फारशी चांगली नव्हे, कारण अपुरी माहिती असण्यापेक्षा जेवढी माहिती आहे, ती संपूर्ण आहे असं मानणं घातक! दुसरीकडे, महाराष्ट्राच्या बहुरंगी, बहुढंगी जीवनाचे वाहक असलेल्या दूरदूरच्या लोकांना महाराष्ट्राच्या सामूहिक ओळखीत स्थान नसणंही अन्यायकारकच म्हणायचं. त्यामुळे स्वतःची आणि त्यासोबत इतरांचीही महाराष्ट्राबद्दलची समज व्यापक व्हावी, यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आलो आहोत. त्यातूनच या पुस्तक प्रकल्पाची कल्पना पुढे आली, आणि बर्‍याच वर्षांच्या मेहनतीनंतर हे पुस्तक आज मराठी वाचकांसमोर येत आहे.

.............................................................................................................................................

'महाराष्ट्र दर्शन' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा-

https://www.booksnama.com/book/5072/Maharashtra-Darshan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 12 September 2019

सुहास कुलकर्णी,

आपल्याच महाराष्ट्राची ओळख करवून देणाऱ्या पुस्तकाची कल्पना आवडली. इझ्रायाल झांगविल या विचारवंताच्या मते प्रत्येक पिढी हे एक नवीन राष्ट्रच असतं. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया दरेक पिढीत संततधार चालू असते. हाच नियम महाराष्ट्रासही लागू पडतो. प्रत्येक नवी पिढी जणू वेगळा महाराष्ट्रच आहे. तिला स्वत:च्याच विविध अंगांची ओळख करवून द्यायलाच हवी. प्रस्तुत पुस्तक हे त्या दिशेने टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. अशा धर्तीवर बृहन्महाराष्ट्राची ओळख करवून देणारं पुस्तक निघायला हवं. इथे बृहन्महाराष्ट्र म्हणजे जिथे मराठी लोकं लक्षणीय रीत्या राहतात असा महाराष्ट्राबाहेरचा प्रदेश.

आपला नम्र,
गामा पैलवान


RAJESH MOHITE

Sat , 24 August 2019

खूपच छान पुस्तक आहे पुण्या मुंबईकडच्या लोकांना विदर्भ म्हणजे नक्षलवादी आणि अमरावती म्हणजे कुपोषण बालमृत्यू हा गैरसमज दूर होण्यासाठी अवश्य वाचावे त्यापेक्षाही वेगळं खूप काही आहे तसेच आजपर्यंतचे इतिहासकार भूगोलकार लिहिणारे प्रकाशित करणारे त्याच पट्ट्यातील असल्याने बाकी mh बद्दल खूप कमी माहिती दिली असते पण तुम्ही छान माहिती मांडली त्याबद्दल अभिनंदन


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......